गोवा: प्रत्येक क्षेत्रात आज महिला आत्मविश्वासाने पुढे येत आहेत. ज्या क्षेत्रात केवळ पुरुषांची मक्तेदारी होती, ती क्षेत्रेही महिलांनी पादाक्रांत केली आहेत आणि स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करून दाखविले आहे. आज गोव्यात शेकडो महिला भजनी पथके आहेत, महिला नाट्यसंस्था आहेत, ज्यामधल्या महिला नाट्यप्रयोगातून पुरुष भूमिकाही उत्कृष्टरित्या वठवतात. आता तर ढोल-ताशा-झांज घेऊन शिमगोत्सवात उत्स्फूर्त आविष्कार घडविताना महिला पथकाला जेव्हा आपण बघतो तेव्हा अवाक व्हायला होते.
शनिवारी पणजी शिमगोत्सवाच्या शोभायात्रेत वास्को येथील 'फिटनेस फर्स्ट' या महिलांच्या ढोल- ताशा-झांज-लेझीम पथकाने हजारो रसिकांचे लक्ष वेधून घेतले होते.
ज्या पद्धतीने या पथकातील शंभर तरुणी व महिला ढोल-ताशा-झांजा आदी वाद्ये वाजवून शानदार सादरीकरण करत होत्या ते पाहून त्यांचे लोकांनी भरभरून कौतुक केले. या पथकातील बहुतेक युवती, महिला नोकरी करतात. घरसंसार सांभाळून, राहुल लोटलीकर यांच्या मार्गदर्शनावाखाली, सलग 15 दिवस, संध्याकाळी 7 ते रात्री 9 पर्यंत कसून तालमी करून या महिलांनी आपल्या पथकाला शिमगोत्सवात उतरण्यास सज्ज केले.
कौतुकाची गोष्ट म्हणजे पदार्पणातच या पथकाने वास्को शिमगोत्सवात ‘रोमटामेळ’ गटात मात्तब्बर अशा पुरुष पथकांशी स्पर्धा करून द्वितीय बक्षीस पटकावले. गंमत म्हणून या महिलांनी सुरवात केली होती, परंतु आज या पथकाने 'प्रोफेशनल' होण्यापर्यंत मजल मारली आहे. या पथकाच्या प्रमुख सौ. राखी मेहता यांना नवऱ्याचा याकामी पूर्ण पाठिंबा लाभला. हे पथक घडविण्यासाठी खर्चही खूप आला. अशा वेळी त्यांना नवऱ्याने आर्थिक मदतही केली. 25 ढोल आणि ताशे ही वाद्ये त्यांनी भाड्याने आणली. मात्र आज त्यांचा उत्साह दुणावला आहे.
' फिटनेस फर्स्ट' ही संस्था आता नोंदणीकृत करण्याचा त्यांचा मानस आहे. राखी या योग प्रशिक्षक आहेत. फिटनेससाठी ढोल- ताशा- झांज पथक पूरकच ठरू शकते असे त्या म्हणतात, कारण त्याद्वारेही शरीराला चांगला व्यायाम लाभतो. त्यामुळे आपल्या ढोल- ताशा पथकाला 'फिटनेस फर्स्ट' हेच नाव त्यांनी दिले आहे.
-नितीन कोरगावकर
गेली काही वर्षे आमच्या मनात विचार घोळत होता, की अशा प्रकारचे ढोल-ताशा-झांज-लेझीम पथक काढावे आणि वेगळं काही तरी करून दाखवावे. यंदा आम्ही पांच मैंत्रिणींनी पुढाकार घेतला व निश्चय केला, की यंदाच्या शिमगोत्सवात उतरायचं. त्याप्रमाणे मग प्रशिक्षक शोधला, तालमी सुरू झाल्या आणि शंभर जणींचं पथक आम्ही प्रत्यक्षात साकार केले. या पथकाचे एवढे भरभरून कौतुक झाले, की आता आमचा उत्साह दुणावला आहे. कष्टाचे चीज झाले याचा आनंद आहे. यापुढे अधिक जोमाने आम्ही पुढे येऊ.
- सौ. राखी मेहता, पथक प्रमुख
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.