Women  Dainik Gomantak
ब्लॉग

International Widows Day : "गोव्यातील विधवा स्त्रियांची पराकाष्ठेची निष्ठूर प्रथा बंद व्हावी हीच प्रार्थना"

गोमन्तक डिजिटल टीम

अनुराधा नाईक

International Widows Day 2023 जागतिक स्तरावर साजरे होणाऱ्या दिवसांपैकी काही दिवस असे असतात ज्यांचा अभिमान वाटण्यासारखे काही कारण नसते किंवा या दिवशी आपल्या भाग्यातून वजा झालेल्या माणसाची आठवण येऊन किंवा त्याच्या जाण्यानंतर नशिबात आलेले भोग आठवून एखाद्या अभागी स्त्रीचे मन उदास झालेले असते.

पण त्यामुळेच हा दिवस महत्त्वाचा अशासाठी बनतो की जगभरातील अशा दुर्दैवी व्यक्तींना समस्या आणि त्यांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी काय केले पाहिजे यावर नजर टाकता येते, परिस्थितीचे विश्‍लेषण करता येते आणि तो बदलण्याच्या दृष्टीने पावले टाकता येतात.

आज, 23 जून हा दिवस विधवांना समर्पित असलेला जागतिक दिन आहे. आपल्या जोडीदाराच्या मृत्यूनंतर जगभरातील अनेक स्त्रियांनी आपले मूलभूत हक्क आणि प्रतिष्ठा गमावली आहे. जगभरात विधवांची संख्या लक्षणीय असूनसुध्दा ऐतिहासिक काळापासून त्यांचे अस्तित्व अदृश्‍य ठेवण्याचाच जणू समाजाचा आटापिटा चाललेला आहे. सुशिक्षित समजल्या जाणाऱ्या समाजात देखील त्यांना समर्थन मिळत नाही किंबहुना त्यांना गणलेच जात नाही.

आपल्या गोव्यातही विधवांना अनेक अडचणींना, त्रासांना सामोरे जावे लागते. रुढीचा, परंपरेचा हा भाग आहे असे मानून हे त्रास जणू त्या विधवांच्या नियतीचा भाग बनतात -नव्हे बनवले जातात. अर्थात अनेक स्त्रियांनी याविरुध्द आवाजही उठवला आहे.

विधवा बनल्यानंतर परंपरेने लादण्यात येणाऱ्या निष्ठूर जाचांना धैर्याने लाथाडले आहे. त्यांना ते सुखासुखी साध्य झाले आहे असे नाही पण त्यावर मात करून त्या पुढे गेल्या आहेत. साखळी येथील अनुराधा नाईक या त्यापैकी एक आहेत.

पतीनिधनानंतर स्त्रीला जाचक ठरणाऱ्या अनेक कर्मकांडांना त्यांनी निग्रहाने नकार तर दिलाच पण त्या विषयावर आपली मते मांडण्यासाठीही त्या निर्भिडपणे समोर आल्या. त्यांच्या मतानुसार, 23 वर्षांपूर्वी त्यांना ज्या परिस्थितीला सामोरे जावे लागले त्यात आजदेखील फारसा बदल घडून आलेला नाही.

त्या म्हणतात, ‘लोक या विषयावर बोलतात. विधवाना भोगावी लागणारी दु:खे कमी व्हायला पाहिजे असे म्हणतात मात्र दुर्दैवाने ते स्वत: मात्र या गोष्टी आचरणात आणत नाहीत.’

जर स्त्रियांना या परिस्थितीच्या कचाट्यातून स्वतःची सुटका करून घ्यायची असेल त्यांनी स्वतःच या विरुध्द आवाज उठवायला हवा असे अनुराधा यांना वाटते.

विधानसभेने विधवांना होणाऱ्या जाचाची नोंद घेतली आहे पण जोपर्यंत अन्याय सहन करणाऱ्या स्त्रिया स्वतःहून समोर येत नाहीत तोपर्यंत यात काही बदल होणार नाही असे त्या म्हणतात.

या जाचांचे कितीतरी प्रकार आहेत. गळ्यात मंगळसूत्र काढून घेणे, सारे अलंकार उतरायला लावणे हा प्रकार तर सर्व लोकांसमोर केला जातो. स्त्री त्यावेळी कुठल्या मानसिक अवस्थेतून जात असेल याचा विचारही केला जात नाही.

गोव्यातील काही गावात तर स्त्रीचा पती वारल्यानंतर, तिच्यावर घरच्या स्त्री सदस्यांनी बारा दिवस नजर देखील घालू नये अशी पराकाष्ठेची निष्ठूर अशी प्रथा पाळली जाते. तिच्यावर कुणाची नजर पडणार नाही अशा जागी तिला ठेवले जाते.

अनुराधा हिने त्या भागातील पीएचडी मिळवलेल्या एका सद्‌गृहस्थांस या प्रथेविषयी विचारले असता त्यांचे उत्तर होते, ‘आम्ही त्याविषयी काहीच करू शकत नाही. आम्हाला आमच्या ज्येष्ठांबरोबर रहावे लागते.’ आणि हा माणूस तथाकथित प्रागतिक लिखाण करणारा होता.

विधवा स्त्रीची अशा दशा-दशा करणाऱ्या या प्रथांविरुध्द विचार करायला लावणारा हा दिवस आहे. गोव्यासारख्या सुशिक्षित समजल्या जाणाऱ्या समाजात देखील जेव्हा आदिम काळातील या नृशंस प्रथा चालतात तेव्हा हा दिवस एखाद्या प्रार्थना दिवसासारख्या बनतो. ‘माणसांनी माणसांना माणसारखे वागवावे’ हीच ती प्रार्थना!

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT