Blog: महाप्रभु वल्लभाचार्यांची कुडण्यातील बैठक

निसर्गातल्या विविध उपलब्ध रंगांचा कल्पकतेने वापर करून आणि त्यात बाभळीचा डिंक घालून पिछवाई चित्रांची निर्मिती करून भक्तीचा प्रसार करण्यात त्यांनी साहाय्य केलेले आहे.
Mahaprabhu Vallabhacharya
Mahaprabhu VallabhacharyaDainik Gomantak
Published on
Updated on

राजेंद्र पां. केरकर

शुद्धाद्वैती, रुद्र, वल्लभ, पुष्टिमार्ग या नावांनी परिचित असलेल्या भक्तिमार्गी वैष्णव संप्रदायाचे प्रवर्तक महाप्रभु वल्लभाचार्य यांनी स्थापन केलेल्या चौऱ्याऐंशी बैठकांपैकी एक बैठक डिचोली तालुक्यातल्या कुडणे गावात लोहगडावरती आहे.

मूळ तेलुगू ब्राह्मण असलेल्या वल्लभाचार्यांचा जन्म बनारसला झाला. त्या शहरावरती इस्लामी आक्रमण झाले असता, घाबरून चंपारण्यातल्या वाटेत इल्लमगरु यांच्या पोटी १४८१साली झाला. भागवत, ब्रह्मसूत्रे, गीता, पुराणे यांचा सखोल अभ्यास करून अध्यात्मात रममाण झालेले वल्लभाचार्य गृहस्थाश्रमी होते.

त्यांना गोपीनाथ, विठ्ठलनाथ आणि लक्ष्मी ही अपत्ये होती. श्रीकृष्णाचे श्रीनाथजींच्या रूपात त्यांना गोवर्धन पर्वतावर दर्शन आणि दृष्टांत झाल्याचे मानले जाते. त्यानंतर त्यांनी श्रीकृष्ण मंदिराची उभारणी करून ‘पुष्टिमार्ग’ या भक्ती संप्रदायाची शिकवण देण्यास प्रारंभ केला.

अग्नीपासून स्फुल्लिंग निर्माण होतात, त्याचप्रमाणे ईश्वरापासून जीवांची निर्मिती होते. जीव हा शुद्ध ईश्वराचा शुद्ध अंश असून ईश्वर व जीव यांच्यात अद्वैत असते हे विचार त्यांनी मांडले.

पुष्टीमार्गात श्रीकृष्ण सर्वोच्च ब्रह्म असून तो आपल्या इच्छेने जग निर्माण करतो. कृष्णलीलेत सहभाग घेणे हे मानवी जीवनाचे सर्वश्रेष्ठ ध्येय असले पाहिजे. आपल्या भक्तिमार्गाचा प्रचार करण्यासाठी त्यांनी भारतभर तीर्थयात्रा केल्या. पंढरपुरातही ते येऊन गेले होते. विजयनगरच्या कृष्णदेवरायाच्या दरबारात त्यांनी वादविवादात राजाचे मन जिंकले.

गोवर्धन येथे श्रीनाथमंदिर बांधण्याची त्यांची इच्छा १५०२मध्ये अंबाला येथील पूरणमल खत्री यांनी पूर्ण केली. काशीला असताना हनुमानघाटावरून गंगेत त्यांनी आत्मसमर्पण केले, असे सांगितले जाते. त्यांनी भगवद्भक्तीच्या प्रचारार्थ विविध ग्रंथांची निर्मिती केली.

वल्लभाचार्यांचे सूरदास, कृष्णदास, कुंभनदास तसेच परमानंद दास असे एकूण चौऱ्याऐंशी शिष्य होते. २६ जून १५३१ रोजी त्यांनी आत्मसमर्पण केल्याने हा दिवस पुण्यतिथी म्हणून साजरा केला जातो.

मथुरा नगरीतल्या गोवर्धन पर्वतावरून इस्लामी आक्रमणावेळी श्रीनाथजींच्या मूर्तीचे स्थलांतर राजस्थानातल्या आरवली पर्वतरांगातल्या सिहाद या मेवाड प्रांतातल्या गावी करण्यात आले आणि त्यामुळे कालांतराने हे तीर्थक्षेत्र ‘नाथद्वार’ म्हणून नावारूपाला आले.

राजसमंद येथील, नाथद्वार येथील श्रीकृष्णाच्या भक्ती परंपरेतून या ठिकाणच्या हस्तकारागिरांनी श्रीकृष्णाचे जीवन कापडावरती चित्रित करून ‘पिछवाई’ कला विकसित पावली. कापडावरती रंगवलेली ही चित्रे श्रीनाथजी मंदिरातल्या मूर्तीच्या मागे भिंतीवर टांगण्यासाठी वापरली जातात.

निसर्गातल्या विविध उपलब्ध रंगांचा अत्यंत कल्पकतेने वापर करून आणि त्यात बाभळीचा डिंक घालून पिछवाई चित्रांची निर्मिती करून भक्तीचा प्रसार करण्यात साहाय्य केलेले आहे.

राजस्थानातल्या सर्वसामान्य हस्तकारागिरांनी श्रीनाथाच्या लीलांना चित्रकलेतून अमर करण्याचे कार्य केलेले आहे. गोव्यात पिछवाई कलेतल्या या चित्रांचे दर्शन घेण्यासाठी लोहगडावरती स्थापन केलेली श्रीमहाप्रभु वल्लभाचार्यांची बैठक ही महत्त्वाची जागा आहे.

कौडिण्यपूर, कुंदनपूर अशा नावांनी प्रसिद्ध असलेले साखळी- आमोणा मार्गावर कुडणे गाव प्राचीन काळापासून गोमंतकाच्या सांस्कृतिक वारशांची वैविध्यपूर्ण असे दर्शन घडवत आहे. बदामी चालुक्यापासून ते गोवा कदंब राज्यकर्त्यांबरोबर विजयनगर बहामनी, आदिलशाही आणि शिवशाहीपर्यंत या गावात असलेली कुडणे नदी मांडवीला जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरली होती.

लोह खनिज व्यवसायामुळे खाणमाती आणि गाळामुळे आज अस्तित्वासाठी संघर्ष करणारी ही नदी जलमार्ग म्हणून होड्या, गलबते यांना उपयुक्त ठरली होती. त्यामुळेच गुजरात, राजस्थान आणि अन्य प्रांतातून ये-जा करणाऱ्या यात्रेकरू, प्रवासी, व्यापारी यांना कुडणे गाव ज्ञात होते.

हिरव्यागार वृक्षवेलींनी नटलेल्या आणि सुजलाम, सुफलाम असणाऱ्या कुडण्यात गुजरातहून जैन पंथीय व्यापारी येथील गुजीरवाड्यावरती स्थायिक झाले. त्याच गावातल्या कुडणे आणि हरवळ्याच्या मधून वाहणाऱ्या नदीच्या डाव्या काठावर असणाऱ्या लोहगडावरती महाप्रभु वल्लभाचार्यांचे आपला शिष्य दामोदरदास यांच्यासमवेत आगमन झाले.

Mahaprabhu Vallabhacharya
Employment in Goa: फाईव्हस्टार हॉटेल, कॉलेज, अन्न प्रक्रिया उद्योग अशा 3 प्रकल्पांना मंजुरी; 1338 जणांना मिळणार रोजगार

एक बाजूला श्रीरुद्रेश्वराच्या प्राचीन संस्थानाचा वारसा कुडणे नदीच्या उजव्या तीरावरती उभा होता आणि त्याच पवित्र स्थळाच्या दुसऱ्या काठावरती लोह खनिजाच्या संपत्तीची श्रीमंती मिरवणारा लोहगडाचा परिसर होता.

या लोहगडावरती जेव्हा वल्लभाचार्यांचे आगमन झाले होते त्यावेळी तेथील नैसर्गिक सौंदर्य आणि पूर्वापार पावित्र्याची प्रचिती वल्लभाचार्यांना आली. त्यावेळी तेथे तीन जलाशय होते.

त्यातल्या पहिल्या जलाशयात स्वर्गीय अप्सरा, दुसऱ्या जलाशयात संगीतकार आणि तिसऱ्यात देवादिकांचा राजा इंद्र दर पौर्णिमेच्या रात्री पवित्र स्नान करण्यासाठी खास येत असल्याचे प्रत्यक्ष वल्लभाचार्यांनी दामोदरदासांना सांगितले होते.

भारतीय उपखंडात परिक्रमा करून वल्लभाचार्यांनी गुजरात, राजस्थान, उडिसा, महाराष्ट्र आदी विविध ठिकाणी भगवद्गीतेवरती प्रवचने देऊन चौऱ्यांऐंशी बैठकांची स्थापना केली होती. त्यापैकी त्रेचाळिसावी पवित्र बैठक लोहगडावरती स्थापन करण्यात आली होती.

वल्लभाचार्यांच्या पवित्र वाणीच्या श्रवणाने येथील जलाशयात कमळे आणि सुगंधित फुले फुलवली होती आणि त्यांच्या सुगंधाने कित्येकांना मोक्षप्राप्ती झाल्याची लोकश्रद्धा रूढ झाली.

Mahaprabhu Vallabhacharya
Goa Property Revenue: राज्‍यातील जमिनींचे किमान दर निश्‍चित करुन मालमत्ता महसूल गळती रोखणार

कालांतराने उद्भवलेल्या आक्रमणामुळे येथील लोहगडावरची पवित्र बैठक विस्मृतीत गेली होती. तेव्हा प्रथम पीठाधीश्वर गोस्वामी रणछोडलालजी यांनी या बैठकीचा शोध लावला. या ठिकाणी जांभ्या दगडात कोरलेल्या महाकाय पावलांची शुभचिन्हे असून त्याच्या भोवतालीच बावीस वर्षांपूर्वी पवित्र वास्तूची उभारणी करण्यात आलेली आहे.

श्रीपाद शिलाखंड आणि श्रीनाथाची पिछवाई कलेद्वारे समूर्त केलेली चित्रे या वास्तूत पाहायला मिळायची. परंतु दुर्दैवाने लोहगडावरती असलेल्या नैसर्गिक लोहखनिजाच्या वारेमाप उत्खननामुळे या वास्तूला असंख्य समस्यांना सामोरे जावे लागले.

जेथे देव, अप्सरा, नृत्यांगना पवित्र स्नान करण्यासाठी यायचे ते जलाशय आणि नैसर्गिक वैभव हां हां म्हणता झपाट्याने विस्मृतीत गेले. कधीकाळी पक्ष्यांच्या मधुर किलबिलाटाने, नदीनाल्यांच्या खळखळत्या प्रवाह आणि रुद्रेश्वर धबधब्याच्या धीरगंभीर ध्वनीने प्रसन्नतेचा शिडकावा करणारे हे तीर्थक्षेत्र हवा, ध्वनी, पाणी प्रदूषणाची शिकार ठरले.

Mahaprabhu Vallabhacharya
Gomantak Editorial: आता तरी दिवे लावा!

जेथे महाप्रभु वल्लभाचार्यांनी आपला शिष्य दामोदरदास याला आणि त्यांच्या सहवासासाठी आतुरलेल्या भाविकांना श्रीकृष्ण भक्तीचा परीसस्पर्श केला आणि भगवद्गीतेच्या तत्त्वज्ञानाची सहज सोप्या रीतीने शिकवण दिली त्या स्थळाला आज नानाविध प्रतिबंधांमुळे भाविकांच्या स्मृतीतून जाण्याची आलेली पाळी चिंताजनक आहे.

कुडणे गावाच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संचितात एकेकाळी उल्लेखनीय ठरलेले वैष्णव भक्ती संप्रदायातले पवित्र तीर्थक्षेत्र भाविकांसाठी पूजापठण, दंडवत आणि श्रीनाथाच्या दर्शनासाठी खुले होणे गरजेचे आहे.

श्रीरुद्रेश्वर मंदिराच्या उजवीकडून मोक्षधाम ओलांडल्यावर छोटेखानी लोखंडी पूल खाणमातीतून आज बंद ठेवण्यात आलेल्या पवित्रस्थळी भाविकांना घेऊन जातो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com