Turtle Conservation Campaign Dainik Gomantak
ब्लॉग

Turtle Conservation Campaign: ने मजसी ने, परत मातृभूमीला

गोमन्तक डिजिटल टीम

डॉ. संगीता साेनक

तीन वर्षांपूर्वी मला ‘ऑलिव्ह रिडले’ कासवांची छोटी पिल्ले बघायचा योग आला. एवढ्या वर्षांत ऑलिव्ह रिडले कासवांबद्दल खूप शिकले होते, वाचले होते, ऐकले होते. पण या लहानग्या पिल्लांना बघायचा योग आला नव्हता. ऑलिव्ह रिडले कासव बघणे ही तशी दुर्मीळ घटना आहे. माहिती मिळाल्याबरोबर आम्ही मोरजीला गेलो.

तेथील वातावरण उत्साहजनक होते. वन खात्याचे काही अधिकारी देखरेख करत होते. काही स्वयंसेवकांनी स्वेच्छेने या पिल्लांच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारली होती. शेकडो इवलुशी पिल्ले अंड्यांतून बाहेर आल्याबरोबर समुद्राच्या दिशेने जात होती, अर्थात कासवाच्या गतीने. नुकतेच रांगू शिकणारे बाळ जसे पुढे सरकण्याचा प्रयत्न करते तसे ते दृश्य दिसत होते. अतिशय सुंदर! एवढ्या मोठ्या संख्येने ही ‘माणकुली’ पिल्ले समुद्राच्या दिशेने जाताना बघणे हा एक निसर्गोत्सवच आहे.

ऑलिव्ह रिडले कासवांच्या माद्या दर वर्षी विणीच्या हंगामात गोव्यातील मोरजी, अश्वे, आगोंद, गालजीबाग आणि तळपण या समुद्रकिनाऱ्यांवर अंडी घालायला येतात. सामान्यतः या कासवांच्या माद्या मोठ्या संख्येने अंडी घालायला किनाऱ्यावर येतात.

वाळू थोडीशी खोदून त्या आपले घरटे बनवतात, त्यात अंडी घालतात, वाळूने ती झाकून टाकतात आणि परत निघून जातात. अंड्यातून बाहेर आल्याबरोबर पिल्ले समुद्राच्या दिशेने जाऊ लागतात. या कासवांना घरी परतण्याची प्रवृत्ती जन्मजात असते. जवळजवळ वीस वर्षांनंतर प्रौढ झालेली मादी अंडी घालायला त्याच किनाऱ्यावर, आपल्या जन्मस्थळी परत येते.

मोठ्या संख्येने किनाऱ्यावर आगमन करून अंडी घालण्याच्या या प्रकाराला ‘अरिबाडा’ म्हणतात. अरिबाडा या स्पॅनिश शब्दाचा अर्थ आहे आगमन. पण कोकण किनारपट्टीवर यांचे आगमन तुरळक असते.

अरबी समुद्रातून येणाऱ्या या माद्या बहुतेक वेळा एकेक करून येतात. या माद्या बंगालच्या उपसागरातून पूर्वकिनाऱ्यावर मोठ्या संख्येने येणाऱ्या माद्यांपेक्षा वेगळ्या आहेत का, यावर संशोधन चालू आहे. टॅगिंग करून यांची अधिक माहिती मिळवणे चालू आहे.

प्रत्येक मादी एका हंगामात एक ते तीन वेळा अंडी घालते. एकेका वेळी शंभराहून जास्त अंडी घातली जातात. पण यांचे अतिजीवन प्रमाण (सरव्हायव्हल रेट) खूप कमी असते. हजारातून एखादे पिल्लू प्रौढत्वाचे आयुष्य जगते.

साधारणतः 45 ते 58 दिवसात अंड्यांतून पिल्ले बाहेर येतात. येणाऱ्या पिल्लांचे लिंग वाळूच्या तापमानावरून ठरते. तापमान थंड असेल तर नर व गरम असेल तर मादी.

या कासवाचे वैज्ञानिक नाव आहे ‘लेपिडोचेलिस ऑलिव्हेसिया.’ या कासवांचा पृष्ठभाग (कॅरापेस, कवच) ऑलिव्ह (जैतून) या फळाच्या रंगाचा, म्हणजे पिवळसर हिरवट राखाडी रंगाचा आहे. या रंगावरूनच या कासवाला ऑलिव्ह रिडले असे नाव पडले.

हे कासव सर्वभक्षी आहे. कोळंबी, जेलीफिश, खेकडे, मासे असे समुद्रातील जीव खाऊन ते जगते. मेलेले आणि कुजलेले मासेपण ही कासवे खाऊन पचवतात. म्हणूनच या कासवांना समुद्राचे ‘सफाई कर्मचारी’ मानले जाते.

काही जीवाश्म पुराव्यांवरून असे मानले जाते की, समुद्री कासव जवळजवळ २५ कोटी वर्षांपासून पृथ्वीतलावर अस्तित्वात आहेत. नऊ लाख वर्षांपासून विद्यमान स्वरूपात अस्तित्वात आहेत. या कालावधित पृथ्वीच्या वातावरणात अनेक नाट्यमय बदल झाले, पण समुद्री कासव टिकून राहिले.

तथापि सध्या मांस, अंडी आणि आकर्षक कवचासाठी त्यांची मोठ्या प्रमाणावर शिकार केली जाते. अनेकदा मच्छीमारांच्या जाळ्यात सापडूनही त्यांचा मृत्यू होतो. तसेच आपण टाकलेल्या प्लास्टिकच्या कचऱ्यात अडकूनही त्यांचा जीव धोक्यात येऊ शकतो.

त्यामुळे त्यांची संख्या कमी होत आहे. धोक्यात असलेल्या प्रजातींच्या आइयूसीएनने तयार केलेल्या लाल यादीमध्ये (आइयूसीएन रेड लिस्ट) समुद्री कासवांच्या सातही प्रजातींचा समावेश केला गेला आहे.

जागतिक तापमानवाढ आणि वातावरण बदलाची गंभीर समस्या या कासवांसमोर आहे. यावर हे कासव काय तोडगा काढतात, त्यांच्यात कोणते बदल होतात यावर संशोधन चालू आहे. समुद्रपातळी वाढली आहे आणि अनेक ठिकाणी किनाऱ्यांचे क्षरण (धूप) झाल्यामुळे अंडी घालण्यासाठी योग्य जागा शोधणे त्यांना कठीण होत आहे.

त्यातच वादळाच्या तडाख्याने किंवा समुद्राच्या लाटेने त्यांची घरटी आणि अंडी उद्ध्वस्त होतात. वनखाते आणि इतर स्वयंसेवकांनी स्वीकारलेली कूर्मरक्षणाची जबाबदारी कौतुकास्पद आहे. त्यासाठी आपण त्यांचे ऋणी आहोत. हे ऋण फेडण्यासाठी या कासव संवर्धनात आपल्याकडून होईल तो हातभार आपणही लावला पाहिजे.

भूतकाळात झालेल्या बदलांवर मात करून या कासवांनी आपले अस्तित्व टिकवून ठेवले आहे. पण आता त्यांच्यावर शिकारीचा दबाव मोठ्या प्रमाणावर आहे. त्यावर मात करण्यात आपण त्यांना मदत करणे जरुरी आहे. निदान आपल्याकडून त्यांना हानी होणार नाही, इजा होणार नाही याची तरी खबरदारी आपण घेतली पाहिजे.

त्यासाठी प्लास्टिकच्या पिशव्या आणि इतर कचरा कमी केला पाहिजे, निदान तो समुद्रात किंवा किनाऱ्याजवळ जाणार नाही ही काळजी घेतली पाहिजे. किनाऱ्यांवरील कृत्रिम दिवे त्यांना विचलित करू शकतात. काही संशोधक मानतात की गजबज, गोंगाट यांचाही विपरीत परिणाम कासवांवर होतो.

काही ठिकाणी कासवाला देव मानले जाते. तेथील मच्छीमार जाळ्यात सापडलेल्या कासवाला पूजा करून समुद्रात सोडून देतात. यावेळी त्यांची जाळी तुटली जातात. अशा कोळ्यांना सरकारकडून नुकसानभरपाई देता येईल का, याचाही विचार झाला पाहिजे.

आपण दर वर्षी महाविष्णूंच्या सहाव्या, सातव्या, आठव्या आणि नवव्या अवतारांचा जन्मोत्सव साजरा करतो. आता त्यांच्या दुसऱ्या अवताराचा, समुद्रमंथनाच्या वेळी मंदार पर्वताला आपल्या पाठीवर झेलणाऱ्या कूर्मावताराचा जन्मसोहळा साजरा करण्याची वेळ आली आहे!

कासवरक्षण मोहिमेला मदत करून आपण या उत्सवात सहभागी होऊ शकतो. यासाठी आपण संकल्प करू शकतो की, ‘प्लास्टिकचा वापर कमी करू आणि समुद्रकिनारी कचरा, बाटल्या टाकणार नाही.’

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ponda: बहिणीने धाडस केले पण भाऊ बचावला नाही; 17 तासानंतर आढळला दर्शन नार्वेकरचा मृतदेह

मेरशीत एक महिन्यापासून उभ्या जीपमध्ये आढळला मृतदेह, परिसरात खळबळ; गोव्यातील ठळक बातम्या

Goa Belgaum Highway: गोवा-बेळगाव महामार्गावरील वाहतूक ठप्प, दोन्ही बाजूला 4-5 किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा

Divar Island: पाचव्या शतकातील निर्मिती प्रक्रिया वापरुन गोव्यात उभारलं जातंय जहाज; पुढल्या वर्षी करणार गुजरात ते मस्कत प्रवास

Funny Viral Video: 3 वर्षापासून पैसे साठवून 4 मित्र गोव्याला निघाले, टोल भरण्यातच खिसे रिकामे झाले

SCROLL FOR NEXT