Goa Forest: केवळ भारतातच नव्हे तर जगभरातल्या संस्कृतींनी काही वृक्षांना पवित्र मानलेले आहे. त्यांच्यातल्या वैशिष्ट्यपूर्ण अशा गुणधर्मामुळे त्याचप्रमाणे उपयुक्ततेमुळे त्यांच्यात लोकमानसाने पावित्र्य अनुभवलेले आहे.
युरोपात प्राचीन काळापासून तेथे प्रामुख्याने आढळणाऱ्या ओक वृक्षाला पवित्र मानलेले आहे. फ्रान्स देशातल्या राज्यकर्त्यांनी ओक वृक्षाखाली आपला दरबारही भरवल्याचे उल्लेख आढळतात. ग्रीक देशाच्या प्राचीन संस्कृतीने ओक वृक्षाचे पावित्र्य अधोरेखित केलेले असून, त्याला सांस्कृतिक जीवनातही महत्त्वाचे स्थान प्रदान केले होते.
जपानच्या लोकसंस्कृतीने तेथे आढळणाऱ्या पाइन वृक्षाला संस्कृतीत स्थान दिलेले आहे. पाइन वृक्ष तेथे दीर्घायू, शुभसंकेत आणि तपस्येचे प्रतीक मानला जातो. जपानी नववर्षाच्या प्रारंभी त्याला पुनर्जन्म, उज्ज्वल भविष्य आणि नावीन्याचे संचित मानले जाते. जपानातल्या प्राचीन शिंतो पंथात, ‘वृक्षांत आत्म्यांचा प्रवेश झाल्यावरती ते शेकडो वर्षे जगतात’, अशी लोकश्रद्धा रूढ आहे.
त्यामुळे, त्यांनी अशा वृक्षांना पवित्र संचिताच्या रूपात पाहिलेले आहे. भारतीय लोकमानसात तर प्राचीन काळापासून पवित्र वृक्षाची संकल्पना प्रचलित आहे. वड, पिंपळ, अशोक, आंबा, औदुंबर आदी वृक्षांना देवत्व प्रदान केलेले असून, त्यांचे रक्षण मोठ्या श्रद्धेने आणि आत्मीयतेने केले जाते.
वड, पिंपळ, अशोकासारखे वृक्ष मधुर फळे देत नसले तरी ते हिरवेगार आणि थंडगार सावली देणारे, तसेच जैविक संपदेच्या नानाविध घटकांसाठी जीवनाधार ठरले आहेत. आंबा माधुर्यपूर्ण फळ देत असतो, तसेच त्याची पाने मंगल कार्यात सजावटीस लावण्याची परंपरा आहे. कडुनिंब, तुळशीसारख्या वनस्पती औषधी तत्त्वासाठी ख्यात आहेत.
परंतु काही वृक्ष विषारी फळे देणारे असूनही इथल्या लोकमानसाने त्यांना देववृक्षाचे स्थान बहाल केले आहे. अशा विषारी फळांची विपुल प्रमाणात पैदास करणारा वृक्ष म्हणून काजरा मानला जात असला, तरी त्याला देव, देवचाराचा वृक्ष म्हणून स्थान लाभलेले आहे. दक्षिण गोव्यातल्या नेत्रावळी अभयारण्याच्या कक्षेत येणाऱ्या सांगे तालुक्यातल्या वेर्ले या आदिवासी वेळीपबहुल गावात भाद्रपद महिन्यात ‘कोडवा परब’ साजरी करण्याची परंपरा आहे.
या सणाच्या पूर्वसंध्येला वेर्लेवासीय देवराईत जाऊन काजरो आणि हुरो या दोन वृक्षांना वगळून अन्य झाडपाला, कंदमुळे एकत्र करून सकाळी नाश्ता सेवन करण्यापूर्वी कडू औषधाचा आस्वाद घेतात. काजरा आणि हुरो या दोन्ही वृक्षांकडे विषारी म्हणून पाहिले जात असले तरी त्यांच्यात अलौकिक शक्तीचे वास्तव्य असल्याचे मानले जाते.
त्यामुळे, त्यांचा समावेश पवित्र वृक्षात करण्यात आलेला आहे. हुरो हे मध्यम आकाराचे झाड विषारी गुणधर्मासाठी ख्यात असले तरी गोव्यातल्या बऱ्याच गावांत देववृक्षाच्या परिवारात त्याचा समावेश झालेला आहे.
वनस्पतिशास्त्रात ‘फालकोनेरिया इन्सिग्नीस’ या नावाने आढळणारा हा वृक्ष पानगळतीचा असून, शिशिर ऋतूत त्याची पाने गळून पडतात आणि त्यावेळी हा वृक्ष पूर्णपणे ओकाबोका दिसतो. पर्णहीन फांद्यांनी युक्त या वृक्षाला जी फळे येतात ती आवडीने खाण्यासाठी काही पक्षी या झाडावर येतात.
या मध्यम आकाराच्या झाडाचे खोड जाड त्याचप्रमाणे खडबडीत असते. जेव्हा फांदीवरती हिरवीगार पाने असतात तेव्हा ती काढली तर त्या जागी दुधासारखा पांढऱ्या रंगाचा चीक वाहतो. हा चीक विषारी गुणधर्माने युक्त असल्याने त्याचा स्पर्श अंगाला होऊ नये म्हणून दक्षता घेतात.
या झाडाचा चीक विषारी असल्याची जाणीव जंगलनिवासी आदिवासी जमातीला होती आणि त्यासाठी शिकारीच्या वेळी धनुष्याद्वारे जो बाण सोडला जायचा त्याच्या टोकाला हुऱ्याचे विष लावले जायचे. दुधासारख्या रंगाचा चीक या झाडाच्या बुंध्यातून स्रवत असल्याने त्याला ‘दुदला’, तसेच ‘चिकाडा’ असे नाव आहे.
गोवा-कोकणात मात्र हे झाड हुरा किंवा हुरो म्हणून ओळखले जाते. काही पशुपालक जमातीत जेव्हा म्हैस रेडकाला जन्म देते, तेव्हा म्हशींचे दूध काढण्यापूर्वी हुऱ्याच्या बुंध्याला स्पर्श करण्याबरोबर ताकाच्या भांड्याला हात लावला जायचा.
हुऱ्याचा चीक जरी विषारी असला तरी त्याच्या लाकडात विषारी तत्त्वे नसणार याचे पारंपरिक ज्ञान परिसरातल्या लोकमानसाला होते आणि त्यासाठी त्याच्या लाकडाचा वापर छोटेखानी होड्या करण्यासाठी तसेच लाकडी अवजारे करण्यासाठी केला जायचा, तर त्याच्या काठ्या जळणासाठी वापरल्या जायच्या.
एकेकाळी जांभ्या दगडांनी युक्त पठारावरती विविध जंगली झाडांबरोबर याचे झाड हमखास पाहायला मिळायचे. परंतु आज अशा पठारावरती औद्योगिक वसाहतीची स्थापना झाल्यावरती जंगलतोडीत हुऱ्याच्या झाडाचीही बिनदिक्कतपणे कत्तल करण्यात आलेली आहे.
त्यामुळे आज हुऱ्याचे झाड विस्मृतीत जाण्याच्या मार्गावरती आहे. परंतु याला अपवाद ठरली आहे ती देववृक्षाची शतकोत्तर लोकपरंपरा. आज या परंपरेपायी हुऱ्याच्या झाडाचे रक्षण झालेले पाहायला मिळत आहे.
पीर्ण या जुन्या काबिजादीतल्या बार्देश महालातल्या गावी असलेल्या हिंदू मंदिराच्या विध्वंसाच्या सत्रावेळी तेथील पाषाणी मूर्तीचे स्थलांतर शेजारच्या शिवशाहीत असलेल्या डिचोली महालात करण्यात आले. परंतु याला अपवाद ठरली ती गावोगावी प्रचलित असलेली वृक्षपूजनाची संचिते. पीर्ण गावातल्या तानोडी वाड्यावरती राष्ट्रोळी ब्राह्मण लोकदैवताच्या नावाखाली हुऱ्याचे झाड पोर्तुगिजांच्या अन्याय, अत्याचाराच्या कारकिर्दीत तग धरून राहिले आहे.
राष्ट्रोळी हे दैवत अदृश्य रूपात वावरत असून, गेल्या कित्येक दशकांपासून हुऱ्याचे झाड पाऊसवारा आणि उन्हाचा मारा झेलत उभे आहे. गोव्यात शतकोत्तर इतिहासाचा वारसा सांगणारे जे महावृक्ष आहेत, त्यात तानोडी वाड्यावरचा हा हुऱ्याचा वृक्ष समाविष्ट आहे.
गावातल्या लोकांना आणीबाणीच्या प्रसंगी संकटातून मुक्त करणारा हा राष्ट्रोळी, हुऱ्याच्या झाडावरती पूर्वापार वास्तव्यास असल्याचे लोकमन मानत आलेले आहे. त्यामुळे, त्यांनी या वृक्षाचे भावभक्तीने संरक्षण केलेले आहे. मंदिराची तोडफोड आणि मूर्तिभंजन आरंभल्या कारणाने पीर्णसारख्या परिसरात, पोर्तुगिजांच्या भय आणि दहशतीखाली वावरणाऱ्या हिंदू धर्मीयांसाठी हुऱ्याचे हे झाड धार्मिक आणि सांस्कृतिक संचित ठरले आहे.
त्याकाळी वृक्षाच्या रूपात असणाऱ्या राष्ट्रोळीच्या नावे कुणी सिमेंट काँक्रीटचे मंदिर बांधलेले नसल्याने, पोर्तुगिजांची वक्रदृष्टी महावृक्षावरती पडली नाही.
गोवा मुक्तीनंतर वृक्षालाच चैतन्यधाम मानणाऱ्या इथल्या समाजाची मानसिकता बदलली आणि त्यांनी हुऱ्याच्या झाडाला कोणतीच इजा न पोहोचवता त्याच्या भोवताली मंदिराचे बांधकाम केले. ‘नवसाला पावणारा राष्ट्रोळी’ अशी धारणा रूढ झाल्याने आणि उत्तरोत्तर त्यात वृद्धी होत गेल्याने छोट्या वास्तूचे रूपांतर मोठ्या संस्थानात झालेले आहे.
पौष महिना स्त्रियांच्या धालोत्सवाचा असल्याने त्या कालखंडात तानोडी वाड्यावरच्या बायका, मुली गुलाबी थंडीच्या रात्री धालो गीतांवरती पारंपरिक लोकनृत्य, गायनाचे उत्स्फूर्तपणे सादरीकरण करतात. पाच रात्री धालोचा मांड हुऱ्याच्या झाडाच्या सान्निध्यात लोकनृत्याने गजबजतो. भजन गायनाप्रमाणे नाटकाचे सादरीकरण इथे केले जाते.
दक्षिण गोव्यात धारबांदोडा तालुक्यातल्या साकोर्ड्याजवळच्या तळसाय येथे खुंट्येश्वरी माया देवस्थान असून तेथे घोटींग, पायरी वृक्षासमवेत हुऱ्याचे झाड देववृक्ष म्हणून वंदनीय ठरलेले आहे. देववृक्ष संकल्पनेद्वारे हुऱ्यासारख्या झाडाला लाभलेले संरक्षण पर्यावरणीय संस्कृतीचे दर्शन घडवत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.