मुकेश थळी
‘काळजी करू नये, काळजी घ्यावी’, हे संतांचे वाक्य आहे. काळजी या शब्दाला दोन अर्थछटा आहेत. चिंता करू नका, स्वत:ला सांभाळा, असा या वाक्याचा अर्थ. काळजी घेणे म्हणजे सचेत राहणे. दक्षता बाळगणे. सर्व शक्यतांचा प्रस्तावित प्रभाव लक्षात घेऊन त्याप्रमाणे नियोजन करणे. याचा अर्थ असा नव्हे की शंका काढत बसणे. भीतियुक्त शंकांचा कीस काढत बसणे म्हणजे नकारात्मकतेच्या सागरात गटांगळ्या खाणे.
अकबर बिरबलाच्या अनेक कथा आहेत. कुठल्याही संदर्भात कायम लागू होणाऱ्या. ही बघा. महाराणीने अकबरला म्हटले, ‘फारच झाली ती बिरबलची स्तुती. इतका हुशार असेल तर उद्या सकाळी तुम्ही दोघेही उद्यानात बसाल तेव्हा मला तिथे बोलावूनच दाखवा असं सांगा त्याला. बघू.’ दुसऱ्या दिवशी बिरबल व अकबर उद्यानात बसले होते. अकबरने बिरबलला सांगितले, ‘महाराणींना इथं बोलवायला पाहिजे. आव्हान स्वीकारा.’ (From Doubt To Certainty)
‘बरं, अगदी सोपं’, म्हणत बिरबलने एका सेवकाला बोलावले, कानात पुटपुटला आणि आत दरबारात जायला सांगितले. तो आत गेला. तिथल्या सेवकाच्या कानात कुजबुजत मोठ्याने म्हणाला,
‘जहॉंपनाह ज्या सुंदर स्त्रीशी बोलत आहेत ती जगातली लावण्यवती स्त्री असावी.’ जवळ बसलेल्या राणीने ऐकले. तिला शंका आली. ताबडतोब तडातडा चालत ती बाहेर उद्यानात गेली. बघायला, कोण ही सुंदर स्त्री? बिरबलने अकबरकडे बघत स्मित हास्य केले. अकबरने विचारले, ‘बिरबल, या युक्तीमागचं गूढ काय?’ बिरबलने म्हटले,
‘जहॉंपनाह, एक छोटेसे शंकेचं पिल्लू सोडावं. झालं काम.’
अगोदरच लोक शंका काढतच असतात. त्यांना खतपाणी घातले की विचारूच नका. संशयावरून पुराणकाळापासून आजवर महायुद्धे झाली आहेत. नवरा-बायकोमध्ये एकदा शंकेची गढुळता घुसली की ते प्रकरण घटस्फोटापर्यंत, हिंसा, खुनापर्यंतही पोहोचते हे सभोवती दिसतच आहे. नातेसंबंध हे विश्वासावर अवलंबून असतात.
स्वच्छ पाण्यामध्ये एक थेंब गढूळ पाण्याचा सोडा, सगळे खराब. तसेच संशयाच्या एका थेंबाचे असते. क्लेश, कलह हे शंका कुशंकांतून मोठ्या प्रमाणात निर्माण होतात. ‘मला असं वाटलं’, ‘तिनं तसं गृहीत धरलं’, ‘यानंच हे कारस्थान रचलं असावं, असा माझा कयास आहे’, हे शंकांच्या पिल्लांचे प्रसूतिस्थान आहे. माझ्याविषयी तो हा विचार करत असेल. तो हे दुसऱ्यांना सांगत असेल. त्याला वा तिला तुझ्याविषयी व माझ्याविषयी विचार करायला वेळच नाही. तो स्वत:वरच प्रेम करण्यात मश्गूल आहे.
एक हिंदी कवन वाचले होते, ‘सब रोग का इलाज है, शक का नहीं निदान। शक से हो पीड़ा बड़ी, शक है गरल समान॥ म्हणजे शंका हे गरळ म्हणजे विषासमान आहे असे कवी म्हणतो. दोन लहान मुले खेळत होती. मुलगा, मुलगी. मुलीकडे चॉकलेट्स होत्या. मुलाकडे गोट्या होत्या. अचानक मुलगा तिला म्हणाला,
‘मी तुला या सर्व गोट्या देतो. तू मला तुझ्याकडच्या सर्व चॉकलेट्स देतेस का?’
‘अवश्य.’ तिने सांगितले. दोघांनी आदान प्रदान केले. मुलगा होता त्याने फक्त एक गोटी हळूच खिशात टाकली, बाकीच्या तिला दिल्या. नंतर तो तिच्याकडून चॉकलेट्स घेऊन घरी आला. रात्रभर त्याला व्यवस्थित झोप लागली नाही.
अस्वस्थता त्याला पांघरून होती. माहीत आहे का? गोटी ठेवून खोटारडेपणा केला हे आपले चुकले म्हणून नव्हे. आपण जशी हळूच एक गोटी ठेवली, तशीच तिनेही पण एक चॉकलेट हळूच ठेवली नसेल ना? हा मुलगा फक्त संशयग्रस्त होता. त्याला आपल्यासारखे जग भासत होते. संशयाचे किडे घेऊन फिरणे म्हणजे आपणालाच आतून अस्वच्छतेने लपेटून घेणे.
मन असावे नि:शंक. तेव्हाच मनाचे पर्यावरण स्वच्छ राहते. मन हरित राहते. ‘संशयकल्लोळ’ या नाटकात संशयाच्या किड्यांपासून उद्भवणाऱ्या कलहांवर प्रकाश टाकला आहे. अनेक दशके हे नाटक गाजले. एका इंग्रजी मासिकावर हा विनोद वाचला होता. त्याचा मथळा होता संशय. तीन कासव होते. कमालीची गर्मी होत होती. हे चालत होते. त्यांना तहान लागली.
इतक्यात ते एका ज्यूस दुकानात आत शिरले. तिघांनी मोसंबीचा ज्यूस मागवला. वेटर गेला. इतक्यात आकाशात ढग जमू लागले. काळेकुट्ट. पाऊस कोसळणार हे नक्की. तिघा कासवांना चिंता. तासन्तास पाऊस बरसला तर घरी कसे जायचे... इतक्यात एकाने घरी जाऊन छत्र्या आणायच्या असे ठरले. ज्यूस यायला वेळ होता. घरी जायला कोणच तयार होईना. शेवटी वयाने लहान असलेल्या कासवाला इतरांनी आदेश दिला, ‘बाळ, तू घरी जा, छत्र्या घेऊन ये’. त्याला जाचेच लागले. काही मिनिटांत पाऊस सुरू झाला. धो धो.... तिसऱ्याचा पत्ता नव्हता व ज्यूसचाही. इतक्यात वेटर ज्यूसचे तीन ग्लास घेऊन आला. त्याने टेबलवर ठेवले. हे दोघेही बोलू लागले,
‘हा कुठं पोचला कोण जाणे.’
‘मरणप्राय धुंवाधार पावसात येणार कसा?’
‘अडकला असेल अडगळीत.’
‘चला आपण त्याचा ज्यूस हाफ हाफ करून पिऊन टाकू. नंतर आमचा...’ असे म्हणायची फुरसत... क्षणार्धात तो लहान कासव तिथे टपकला,
‘चोरांनो, मला संशयच होता, तुम्ही हे करणार म्हणून. मी कुठंही गेलो नाही. इथंच त्या बॉक्सच्या मागे लपून बसलो होतो. तुमच्या लायकीवर विश्वास ठेवून’.
देवलांच्या ‘संशयकल्लोळ’ नाटकात ‘संशय का मनी आला...’ असे एक नाट्यगीत आहे. गृहकलह असो की राष्ट्रकलह असो, संशयांच्या गर्तेत सर्व जण वृथा कसे वाहत पतनाकडे जातात या विषयावर अनेक इंग्रजी नाटकातून व फिल्मांतून भाष्य केले आहे. काट्याने काटा काढावा, तसे शंकेविषयी ती उद्भवतानाच तिचीच शंका घ्यावी व ती काढून टाकावी, तेव्हाच मन निरभ्र होईल, शांत होईल, सुखी होईल. आनंदी होईल!
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.