Heritage of Goa Dainik Gomantak
ब्लॉग

Heritage of Goa: सुर्ल : मांडवीकिनारी सुरलवड पाटक

गोवा मुक्तीनंतर सत्तास्थानी आलेल्या सरकारांवरती इथल्या खाण मालकांनी आपला अंकुश कायम ठेवला

गोमन्तक डिजिटल टीम

राजेंद्र पां. केरकर

Heritage of Goa मांडवी नदीच्या डाव्या किनारपट्टीवरती वसलेल्या डिचोली तालुक्यातल्या सुर्ल गावाला शेकडो वर्षांचा इतिहास आणि संस्कृतीची श्रीमंती लाभलेली आहे.

भरती-ओहोटीच्या नैसर्गिक चक्रामुळे सुर्ल गावातल्या जलमार्गाला महत्त्व प्राप्त झाले होते आणि त्यामुळेच या गावाच्या सांस्कृतिक धार्मिक, आर्थिक भरभराटीला वेगवेगळ्या कालखंडात वाव लाभला होता.

आज सुर्लच्या देऊळवाड्यावरती जी सिद्धेश्‍वराची प्राचीन काळाशी नाते सांगणारी जांभ्या दगडात खोदलेली गुंफा आहे ती ख्रिस्तपूर्व दीड हजार वर्षांपूर्वीची असल्याचे मत गोव्याच्या संस्कृतीचे अभ्यासक अनंत धुमे यांनी व्यक्त केल्याने या परिसराच्या प्राचीनत्वाची प्रचिती येते.

पोर्तुगीज अमदानीत सुरू झालेल्या खजिन उत्खननाच्या व्यवसायाने गोवा मुक्तीनंतर बेकायदेशीरपणाचा कळस गाठला. त्यामुळे, या सुंदर गावाचा चेहरामोहरा बदललेला आहे.

गोवा मुक्तीनंतर सत्तास्थानी आलेल्या सरकारांवरती इथल्या खाण मालकांनी आपला अंकुश कायम ठेवला आणि आपल्या मनमानीपणाकडे सरकारी यंत्रणेला पूर्णपणे काणाडोळा करण्यास भाग पाडले. त्यामुळे इथल्या सुजलाम आणि सुफलामतेला हां हां म्हणता ग्रहण लागले.

एकेकाळी जलसंस्कृतीचा अधिष्ठात्रा नारायण देवाच्या आधारे ज्या कृषी बागायतीच्या आधारे माणसांनी गाव सतत खुलला होता, कला आणि संस्कृतीच्या आविष्काराने समृद्धीच्या शिखरावर पोहोचला होता, त्याची धुळधाण इथल्या समाजाच्या शिथिलतेमुळे खाण व्यवसायाने बेधुंदपणे आरंभली.

त्यामुळे आज सुर्लच्या गतवैभवाच्या ज्या काही मोजक्याच खाणाखुणा शिल्लक राहिलेल्या आहेत, त्या भग्नावशेषांतून वैभवाची प्रचिती येते.

मांडवी नदीने सुर्लच्या शाश्‍वत उन्नतीला प्राचीन काळात महत्त्वाचे योगदान दिले होते. बारा बलुतेदारांनीयुक्त अशी ग्रामसंस्था इथे होती. नाना जाती जमातीच्या लोकांची वस्ती विसावली आणि त्यांनी सामाजिक एकोप्याने गावगाड्याची व्यवस्था सुरळीत चालू राहावी याचा प्राचीन काळातच पाया घातला.

सुर्ल येथील बारमाही वाहणाऱ्या जलस्रोतांवरती त्यांनी ‘सिंयाचा बांध’ घातला आणि लोकधर्माद्वारे दरवर्षी त्याची सामूहिकरीत्या डागडुजी, त्याचप्रमाणे जांभ्या दगडात पाट खोदून पाण्याच्या नियोजनबद्ध वितरणाचा आदर्श प्रस्थापित केला.

गूळ आणि चुन्याचा वापर करून जांभ्या दगडाच्या कमानी बांधून नाल्याचे पाणी सुरळीतपणे अखंड वाहते राहील याकडे कटाक्षाने लक्ष दिले. त्यांनी प्रस्थापित केलेल्या जलवितरणाद्वारे पाण्याची नासाडी होणार नाही याची प्रत्येक शेतकरी आणि बागायतदारांनी दक्षता घ्यावी हा विचार त्यांच्यात पूर्वापार रुजवण्यात तिथली ग्रामसंस्था यशस्वी ठरली होती.

1882 साली ज्या तेवीस ग्रामसंस्था डिचोली तालुक्यात कार्यरत होत्या त्यात सुर्ल ग्रामसंस्था सक्रिय होती. सुर्ल गावाच्या सभोवताली वृक्षवेली यांनी नटलेल्या देवरायांची संरचना निर्माण करण्यात आली होती.

मान्सूनच्या पावसाचे पाणी व्यवस्थितपणे भूगर्भात साठले जाईल आणि हिवाळ्यापासून हे पाणी झरे, ओहोळात खेळते राहील म्हणून त्यांनी देवराया आणि अन्य मार्गाने जंगलांच्या रक्षणाला प्राधान्य दिले होते. ‘कोंतीनचो आजो’, ‘बाराजण’, ‘म्हारदांडेश्‍वर’ आदी लोकदैवतांच्या नावांनी त्यांनी जंगल संवर्धनास प्राधान्य दिले होते.

नवदुर्गा, पुरावतारी, सिंयादेव, नारायण, मल्लिकार्जुन, ग्रामपुरुष, वाघ्रो आणि पीरसाहेब या दैवतांचा समावेश सुर्लच्या पंचायतनात होतो. परंतु सिद्धेश्‍वर हे दैवत या गावात पूर्वापार अस्तित्वात आहे.

सुर्ल येथे महिषासुर मर्दिनीची पुजा नवदुर्गा म्हणून ग्रामदेवीच्या मंदिरात होत आहे. पुरातत्त्व संशोधकांना सुर्ल गावात गोवा कदंब राजवटीशी नाते सांगणारी महिषासुरमर्दिनी मूर्ती सापडली होती. पुरातत्त्वशास्त्रज्ञ डॉ. विठ्ठल मित्रगोत्रींना या मूर्ती शिल्पावरती होयसळ शैलीचा प्रभाव जाणवला होता.

देवीच्या वरच्या डाव्या हातात शंख तर खालच्या डाव्या हाताने रेड्याची जीभ ओढताना चित्रित केलेले आहे. सामूहिकरीत्या जो बांध घातला जात होता त्याच्याशी सिंया देवाचा संबंध होता. इथे जुन्या काळी घनदाट जंगल असल्याने पट्टेरी वाघांचा संचार असायचा आणि त्यासाठी इथल्या लोकमानसाने वाघ्रो देवाची स्थापना केली होती.

अरबस्थानातून जहाजाद्वारे जे घोडे आणले जात होते, ते इथे उतरवून नेण्यासाठी जांभ्या दगडांनी बांधलेली पाज नदीकिनाऱ्यापासून पाहायला मिळते. व्यापार उद्योगाखातर इथे मुस्लीम पंथीय स्थिरावले. त्यांना सुर्लच्या ग्रामसंस्थेने केवळ राहायलाच नव्हे तर मस्जिद उभारण्यासाठी जागा दिली.

इब्राहिम आदिलशहाच्या कारकिर्दीत सोळाव्या शतकात इथे जांभ्या दगडात सुंदर कलाकुसरीने युक्त तळी खोदण्या आली आणि परिसरात बगिचाही निर्माण केला होता. स्थानिक हिंदू मुस्लिमातला एकोपा वृद्धिंगत व्हावयासाठी वावरणाऱ्या पीरसाहेबाचा दर्गा मांडवी तीरावरती वसलेला आहे.

पूर्वीच्या काळी स्थानिक मुस्लीमपंथीय सिद्धेश्‍वराच्या अनुमतीने आपले उत्सव साजरे करायचे. तर इथल्या हिंदूंच्या शिगमोत्सवाचा समारोप पीरसाहेबाला मानवंदना अर्पण करून व्हायचा.

मल्लिकार्जुन या दैवताचे प्रस्थ काणकोणात, परंतु घाडीवाडा सुर्ल येथे आदिवासी भाविकांचा हा अधिष्ठात्रा देव असून विजयादशमीला त्यांच्या क्षात्रधर्माची प्रचिती अनुभवायला मिळते.

प्राचीन काळापासून सुर्ल गावात नाना देवदेवतांनी इथला सुजलाम, सुफलामतेचा वारसा पाहून कायमस्वरूपी वस्ती केली आणि त्यामुळेच देवांचा गाव म्हणून ‘सुरवल्लीवरु सुर्ल’ हे ग्रामनाम निर्माण झाले असावे.

गोवा कदंब नृपती गुहल्ल देवाच्या 23 मार्च1038 रोजीच्या ताम्रपटात सुर्ल गावाचा उल्लेख सुरलवड पाटक असा केलेला आहे. इतिहासकार डॉ. प्रकाशचंद्र शिरोडकर यांच्या मते वड व पाटक हे कानडी शब्द असून त्यांचा अनुक्रमे अर्थ मळा आणि सागरतीर असा होतो.

मांडवी नदीच्या जलमार्गाद्वारे सुर्ल गाव नावारूपाला आला. व्यापार आणि उद्योग यांची जशी भरभराट झाली, तशीच शेती आणि बागायती इथल्या भूमिपुत्रांसाठी उदरनिर्वाह ठरली.

ज्या गावात पिकाऊ शेतजमीन असते, बारमाही पिण्याच्या पाण्याची आणि सिंचनाची सुविधा असते, तो गाव शेकडो वर्षांच्या इतिहासाचा वारसा मिरवतो.

तेथेच साहित्य, संगीत, वाद्य यांचे उपासक नावारूपाला येतात. सुर्ल गावाला सुदैवाने निसर्गाचे वरदान लाभले होते आणि त्यामुळे इथे सुखसमृद्धी नांदत होती.

परंतु स्वराज्य प्राप्तीनंतर इथल्या शेती, बागायतीबरोबर पारंपरिक उद्योग धंद्यावरती खाण व्यवसायाने जी वक्रदृष्टी फिरवली, त्यामुळे या गावाचे नैसर्गिक, सांस्कृतिक वैभव संकटांच्या गर्तेत सापडले.

प्रज्ञावंतांची, साहित्यिकांची, कलावंताची श्रीमंती मिरवणारा गावा नैसर्गिक सौंदर्याच्या खाणाखुणा हरवत चालला आहे. आतिथ्यशील माड- पोफळीच्या हिरवाईची कदर करणारी पिढी प्रतिकूल संघर्ष देत सुर्ल जगवण्यास धडपडत आहे, ही या गावची शेवटची शान आहे!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT