वरुण मेहता मूळ पंजाबचे असले तरी आता गोव्यात, दोनापावला इथे त्यांचे निवासस्थान आहे. त्यांची कहाणी निश्चितच स्फूर्तिदायक आहे. आयुष्याच्या एका क्षणी त्यांना डॉक्टरांनी सांगितले होते की, त्यांना त्यांचे पुढील आयुष्य आजारांबरोबर काढावे लागेल पण वरुण यांनी हार न मानता जिद्दीने आपल्या साऱ्या आजारांवर विजय मिळवला. फक्त विजय मिळवून ते थांबले नाहीत तर त्यांनी भविष्यकाळात जगभरातील हजारो लोकांच्या आरोग्य (Health) आणि फिटनेसमध्ये (Fitness) सकारात्मक बदल घडवून त्यांच्याही आयुष्याला अधिक चांगले स्वरूप दिले.
आतातर त्यांनी ‘सक्सेस ग्यान’ या भारतातील (India) अग्रगण्य संस्थेने आयोजित केलेल्या ‘सुपर स्पीकर’ (Super Speaker) स्पर्धेत देशभरच्या चाळीस हजार स्पर्धकांमधून प्रथम क्रमांक पटकावून, लोकांना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण देणाऱ्या व त्यांना प्रेरित करणाऱ्या या संस्थेचा तेही एक महत्त्वाचा भाग बनले आहेत. ‘सक्सेस ग्यान’ ही संस्था जगभरच्या उत्कृष्ट अशा 75 वक्त्यांच्या पथकाद्वारे वैयक्तिक विकास, करीयर अपग्रेडेशन, आर्थिक व्यवस्थापन, व्यवसाय वाढ आणि जीवनातील अनेक प्रमुख क्षेत्रात लोकांना प्रेरक मार्गदर्शन करत असते.
वरुण मेहतांनी अशाप्रकारच्या उच्चस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत कधीही भाग घेतला नव्हता पण 'न्युट्रिशियन' आणि 'फिटनेस कोच' म्हणून लोकांकडे प्रत्यक्ष आणि ऑनलाईन संपर्क करताना आणि त्यांना मार्गदर्शन करताना ‘वक्तृत्व’ ह्या महत्त्वाच्या गुणाचा सराव त्यांनाही अभावितपणे करावा लागला होता. त्याशिवाय हौस म्हणून ज्यांनी डीजे म्हणूनही काम केलं होतं. बस्स, वकृत्वाचा त्यांचा अभ्यास इतकाच होता. पण एक उत्तम वक्ता म्हणून नांव करावं हे त्यांचे नेहमीच एक स्वप्न होते. जेव्हा ‘सक्सेस ग्यान’ची ही स्पर्धां जाहीर झाली तेव्हा त्यांनी लगेच ती संधी घेतली. ते एक चांगले मार्गदर्शक तर होतेच पण ‘वक्ता मार्गदर्शक’ बनायची त्याची वेळ आता येऊन ठेपली होती. स्पर्धा 'मोटीव्हेशन स्पिकर्स'साठी (Motivation speakers) होती.
या स्पर्धेसाठी सुरुवातीच्या फेऱ्यात स्पर्धकांना आपल्या भाषणाचा व्हिडीओ (Video)करून पाठवायचा होता. 40185 स्पर्धकांमधून कठोर चाचणीद्वारे पहिल्या फेरीत 250 स्पर्धक निवडण्यात आले. या 250 स्पर्धकांमधून दुसऱ्या फेरीत 100 स्पर्धक निवडण्यात आले. तिसऱ्या फेरीत निवड झालेल्या अंतीम 10 जणांना प्रत्यक्ष भाषण करावयाचे होते. वरुण मेहता सांगतात, पुढच्या फेरीचा विचार न करता मी पायरीपायरीनेच विचार करत गेलो. प्रत्येक फेरीत, उत्कृष्ट सादरीकरण करेन हेच माझे उद्दिष्ट होते व अशाप्रकारे अ़ंतीम फेरी गाठण्यास मी यशस्वी ठरलो.'
शेवटच्या फेरीत 'आरोग्य व्यवसायी' या नात्याने आपण लोकांना कसा प्रेरक करू शकतो हा त्यांच्या भाषणाचा आशय होता. त्यात त्यांनी सांगितले की, डॉक्टर रोग बरा करण्यावर भर देतात, पण आपण जीवनशैलीद्वारे निरोगी राहण्याच्या दृष्टीने लोकांना प्रशिक्षित करतो. वरुण मेहता यांनी याच आत्मविश्वासाने स्वतःलाही दुर्धर आजारांतून मुक्त केले होते. त्यांचा प्रश्न होता, 'हे जर शक्य आहे तर जगात अशक्य असे काय आहे? दमदार, उत्साही व आनंदी राहून 150 वर्षे किंवा त्याहून अधिक जगावे आणि कोणत्याही वयात उत्तम आयुष्य जगण्याची प्रेरणा लोकांना द्यावी असं माझ स्वप्न आहे.' त्यांच्या या प्रेरणादायक शब्दांनीच त्यांना या स्पर्धेचे विजेतेपद प्राप्त करून दिले.
या स्पर्धेच्या विजेतेपदाने वरुण मेहता 'सुपर स्पिकर' बनले, त्यांना 1 लाख रुपयांचे बक्षीसही मिळाले पण त्यांच्या मते 'सक्सेस ग्यान'च्या उत्कृष्ट वक्त्यांच्या ताफ्यात त्यांचाही समावेश होणे ही सर्वात महत्त्वाची आणि आनंद देणारी गोष्ट होती.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.