कुसुंबा
कुसुंबा Dainik Gomantak
ब्लॉग

'कुसुंबा'ची पालवी घेऊन आला वसंत

दैनिक गोमन्तक

ऋतुचक्रातील महत्त्वाचा, वसंताचा आत्मा असणारा, चैत्र सुरू झाला. वसंताच्या आगमनासाठी सारी सृष्टी नवउन्मेषाने सजू लागते. अनेक वृक्ष आपल्या फुलांनी वसंताचे स्वागत करतात. कडक कोरड्या उन्हाळ्यात नखशिखांत फुललेल्या फुलांचे पुष्पवैभव नक्कीच अल्हाददायक असते. काही झाडांकडे मात्र इतकी मनमोहक सुंदर फुले नसतात पण त्यांची पालवी फुलांनाही लाजवेल इतकी चकाकदार देखणी असते. अशा आकर्षक पालवी असलेल्या वृक्षांत सर्वात वरचा नंबर लागतो तो कुसुंबाचा.

सध्या सह्याद्रीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कुसुंबाला ही रंगाकर्षक ‘कुसुंबी’ रंगाची पालवी फुटली आहे. या रंगाचे वर्णन करणे थोडे अवघडच. लाल, किरमिजी रंगात थोडा जांभळा आणि किंचित हिरवा रंग मिसळल्यास हा रंग बनतो. महिलांमध्ये या रंगाचे आकर्षण वेगळेच आहे. फाल्गुनात पानगळ झालेले हे वृक्ष चैत्राच्या स्वागतासाठी असे आगळे-वेगळे रूप धारण करतात की ते न्याहाळणेही तितकेच मनमोहक होते. शहरांची वाट वाकडी करून आडमार्गाने डोंगराकडे वळले की ही कुसुंबी पालवी आपल्या सहज नजरेत भरते.

लाख मोलाचा, लाल पालवीचा लावण्यवृक्ष असणाऱ्या या कुसुंबाइतका बहुगुणी आणि बहुउपयोगी वृक्ष विरळाच. जणू कल्पवृक्ष. अस्सल भारतीय असणाऱ्या या वृक्षाचे आयुर्वेदामध्ये अनेक उपाय सांगितले आहेत. मात्र सर्वात महत्त्वाचे म्हणजे या झाडापासून अत्यंत चांगल्या प्रतीची 'लाख' मिळते, जी सोन्याचे दागिने घडवताना उपयोगी पडते. हिमालयन रेंज वगळता भारतभर- अगदी शेजारच्या श्रीलंका ,ब्रम्हदेश मलेशिया या देशातही हा वृक्ष आढळून येतो.

‘लॅक ट्री’ असेच इंग्रजी नाव असणाऱ्या कुसुंबाचे वनस्पती शास्त्रीय नाव, ‘स्लेचेरा ओलिओसा’ असे आहे. जर्मन -स्विस वनस्पतीशास्त्रज्ञ स्लेचर याच्या स्मरणार्थ या वनस्पतीचे नाव ‘स्लेचरा’ ठेवले गेले आहे. ओलिओसा म्हणजे तेल असलेला तर त्याची फॅमिली सॅपीन्डसी आहे. चला तर मग अनेक अर्थाने बहुगुणी असणाऱ्या या कुसुंबाची पालवी अनुभवूया.

-अनिल पाटिल

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai Goa Highway Traffic: मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी; झाड कोसळल्याने खोळंबा!

Goa Success Story: गणेश SSC पास हो गया! गोव्यातील वानरमारे समाजातील ठरला पहिलाच विद्यार्थी

Goa 11th Admission: अवाजवी शुल्क आकारल्यास तात्काळ कारवाई; CM सावंत यांचा विद्यालयांना इशारा

Yellow Alert In Goa: गोव्यात यलो अलर्ट, पुढील दोन दिवस महत्वाचे

Goa Drugs Case: इवल्याशा गोव्यात ड्रग्जचा सुळसुळाट; 3.8 कोटींचे अमली पदार्थ जप्त

SCROLL FOR NEXT