Goan Food : फुलांचा रंग, सुवास नेहमीच मोहवून टाकतो. केसात माळणं आणि देवाला वाहणं याखेरीज घरात सुंदरशी सजावट करण्यापलीकडे फुलांचा उपयोग कधी केला नव्हता. लहानपणी आम्ही ज्या वाड्यात राहायचो तिथल्या सर्व मैत्रिणींबरोबर भातुकलीचा खेळ थाटला जायचा तो देवचाफ्याच्या झाडाखाली. देवचाफ्याच्या आडव्या मोठ्या पानाचं ताट, शेवग्याच्या पानांची भाजी आणि फुलांची कोशिंबीर असला लुटुपुटुचा खेळ आम्ही खेळायचो. परसदारी असलेली सगळी फुलं-पानं या खोट्या संसारात खोटं अन्न म्हणून शिजवायचो. पण, खऱ्या खुऱ्या संसारात पडल्यावर फुलांपासून बनणारे खरेखुरे पदार्थ प्रत्यक्ष ताटात येऊन पडले तेव्हा मात्र आश्चर्य वाटलं.
फुलं कोणाला आवडत नाहीत? अपवादानेच अशी एखादी व्यक्ती सापडू शकते. नुसतं नाव उच्चारताच डोळ्यांसमोर रंगीबेरंगी सुवासिक फुलं येतात. इतका त्यांच्यात जिवंतपणा असतो! आपलं भावविश्व, जीवनातील खास क्षण फुलांनी बहरून टाकलेले असतात. प्रत्येक शुभदिनाची सुरुवात फुलांनी होते. फुलांशिवाय आपले सणवार साजरे झाल्यासारखे वाटत नाहीत. गोव्यातल्या लोकजीवनात फुलांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. घरी एखादी सवाष्ण महिला आली असता तिला कुंकू लावताना त्यासोबत अंगणातलं एखादं फूल दिलं जातं.
गुढी- पाडव्याला, दसऱ्याला झेंडूची फुले हवीत, गणपती-गौरीमध्ये मोगरा, तेरडा, अनंताची फुलं हवीत. मंगळागौरीला सोनचाफा-देवचाफा, मोगरा, जाई-जुई, जास्वंद अशी असंख्य प्रकारची फुलं लागतात. दिवाळीत लक्ष्मी पूजनाला पिवळी-पांढरी शेवंती हवी. देव्हाऱ्यातील देवांनादेखील एक तरी फूल आपण वाहतोच. इतकं आपलं जीवन फुलांनी व्यापून टाकलंय. अगदी जन्मानंतर बारशाच्या सोहळ्यापासून ते मृत्यूच्या विधींमध्येही फुलं आपल्याला सोबत करत असतात. पण, यात कुठेच ज्यांना स्थान मिळत नाही अशा काही फुलांना स्वयंपाकघरात महत्त्वाची जागा मिळते. फुलंदेखील आपल्या ताटात चमचमीत पदार्थ बनून येऊ शकतात हा विचारही मनाला शिवला नव्हता.
फुलांपासून छान चटपटीत पदार्थ बनू शकतो हे सांगून खरं वाटलं नसलं. मीदेखील जोवर हे पदार्थ बनवताना बघितले नाहीत, जिभेनं चाखले नाहीत तोवर विश्वास बसला नव्हता. फुलांचा नुसताच रंग आणि सुवास सुंदर नसतो, तर त्याची चवदेखील सुंदर असते हे समजण्यासाठी मात्र मला शहरी जीवन सोडून ग्रामीण भागांत जावं लागलं. नेत्रावळी, डिचोली, मये गावांतील आमच्या बचतगटांमधील महिलांकडून याबाबत पहिल्यांदा माहिती मिळाली.
शहरात राहत असले तरी दारात शेवग्याचं झाड होतं. भोपळा, कारलं-घोसाळ्याचा वेल होता. शेवग्याच्या शेंगा स्वयंपाकात कायम वापरल्या जायच्या. वेलांवरची कारली - घोसाळी काढून ताजी ताजी भाजी -भजी केली जायची. आजी कधी आमच्याकडे मुक्कामाला आली असता, शेवग्याच्या कोवळ्या पानांची भाजी चांगली होते हे सांगितलं होतं. पण, त्या उग्र वास येणाऱ्या पानांच्या भाजीची कल्पनाही नकोशी वाटायची; तर तिथे शेवग्याच्या फुलांची भाजी आणि अजून काय काय पदार्थ बनवले जातात आणि लोक मोठ्या चवीनं ती खातात हे माहितीच नव्हतं.
शेवग्याची फुलं तशी नाजूकशी असतात. लहान असताना त्याचा हार करून गळ्यात घालावासा वाटायचा. बाभळीच्या फुलांची पिवळीधम्मक कानातली आणि शेवग्याच्या फुलांचा हार सुंदर दिसायचा. भोपळ्या-कारल्याच्या फुलाचंही तसंच. त्यांचा पिवळा रंग फारच आवडून जायचा. पण, ही फुलं त्या इवल्याशा वेलावरच छान दिसायची. ही फुलं कधी तोडली नव्हती, कारण त्यानंतर येणाऱ्या कारल्या-घोसाळ्याची, भोपळ्याची मोठी उत्सुकता असायची. छोटंसं कारलं, छोटासा भोपळा वाढत जाताना बघणं हा एक त्याकाळी आवडीचा भाग असायचा. त्यामुळे, भोपळ्याच्या कळ्यांना तोडण्याची कल्पना काही ठीक वाटली नाही.
पणजीच्या भाजीमंडईमध्ये सकाळी मंडई सुरू व्हायच्या आधी त्याच्या बाहेरच अनेक महिला ताजी ताजी भाजी विकायला बसतात. छोटे छोटे वाटे केलेल्या ताज्या हिरव्यागार भाजीमध्ये अनेकदा स्वयंपाकात वापरल्या जाणाऱ्या फुलांचेदेखील वाटे असतात. भाजी मंडईत जरी नुसती चक्कर मारल्यास त्या त्या भागांत काय पिकतं आणि काय खाल्लं जातं याचा अंदाज येतो. पणजीमध्ये भल्या सकाळी भरणार्या भाजी मंडईत भोपळ्याच्या पिवळ्या नाजूकशा कळ्यांचे वाटे विकायला ठेवलेले बघून जरा आश्चर्य वाटायचं. या कळ्या खातात हे मला खूप वर्षांनी समजलं.
या भोपळ्याच्या फुलांच्या कळ्या बघितल्यावर, ‘काय ही माणसं आहेत, बिचाऱ्यांना नीट वाढूही न देता स्वतःच्या जिभेचे चोचले पुरवतात’, असं मनात येऊन गेलं होतं. पण, आता मलाही ती चटक लागलीय. जो वर ते खाण्यातली मजा - चव माहीत नव्हती तोवर नाक मुरडायचे. पण, आता मंडईत गेले की पहिला शोध भोपळ्याच्या कळ्यांचा होतो.
-मनस्विनी प्रभुणे-नायक
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.