Dangerous Buildings in Goa : गोव्यातील ढासळणाऱ्या धोकादायक इमारतींवर उपाययोजना काय?

जसे आपण आपले वैयक्तिक आरोग्य सांभाळतो, तसेच इमारतींचे आरोग्य सांभाळणेही अत्यावश्यक आहे. त्यासाठी वेगवेगळी परीक्षणे करणे गरजेचे आहे.
Plaster Collapsed in Margao
Plaster Collapsed in MargaoDainik Gomantak
Published on
Updated on

Dangerous Buildings in Goa : मडगाव येथे नुकतेच पुष्कळ रहदारी व वर्दळ असलेल्या रस्त्यावरच्या एका जुन्या इमारतीचे काँक्रीट सज्जाचे मोठे तुकडे खाली रस्त्यावर कोसळले. त्यात एक नवी कोरी गाडी नष्ट झाली व ते एका युवतीवर पडून ती जखमी झाल्याचे समजले. ही इमारत जरी जुनी असली तरी लोकांनी व्यापलेली होती व प्रथमदर्शनी सुस्थितीत आहे. फक्त तिचा एक कमी महत्त्वाचा भाग म्हणजे सज्जा जीर्ण होऊन कोसळला. एका वर्षाआधी त्याच्याच समोर असलेली एक त्याच्याहून जुनाट अशा इमारतीचा एक मजल्याचा पूर्ण भाग तिच्या शेजारच्या एका मोठ्या इमारतीवर कोसळून नुकसान झालेले होते. जशा जशा इमारती जुन्या होत जातात व त्याची व्यवस्थित देखभाल करून निगा जर राखलेली नसली तर त्या जीर्ण व पडीक होऊन अशा धोकादायक बनणे अपरिहार्य असते.

नव्या इमारती बांधताना दर्जेदार सिमेंट, काँक्रीट व लोखंड कसे निवडावे व इमारतीचे आयुर्मान कसे वाढवावे या तंत्रज्ञानाचा आढावा आपण मागील लेखांमध्ये घेतलेला आहे. पण ज्या इमारती व वास्तू पूर्वीच बांधलेल्या आहेत आणि जुनाट व जीर्ण झालेल्या आहेत किंवा लोखंड गंजून अत्यंत धोकादायक परिस्थितीत उभ्या आहेत, त्यांच्यावर काय उपाययोजना करू शकतो हे आपण लक्षात घेऊ.

गोवा हे समुद्र किनारी वसलेले राज्य आहे. इथे बेसुमार पाऊस, आर्द्रता व खारट हवामान असल्यामुळे गंजण्याची आदर्श परिस्थिती होऊन इमारती फार लवकर गंजू लागतात. त्यामुळे त्यांचे आयुर्मान जे सत्तर वर्षांच्या वर असायला पाहिजे ते अतिशय कमी होऊन जाते. गंजण्याची जी रासायनिक प्रक्रिया आहे तिचा सगळ्यांत मोठा तोटा व दुष्परिणाम म्हणजे लोखंड जेव्हा गंजते ते आकाराने फुगून मोठे होते. त्यामुळे आजूबाजूच्या काँक्रीटवर ताण व दबाव येऊन त्याला तडे जातात जे सुरवातीला एकदम बारीक असतात. जशी गंजण्याची प्रक्रिया चालीस लागते तसे ते तडे मोठे होत जातात व काँक्रीटचे तुकडे होऊन ते सुटून खाली पडायला लागतात. याला आपण इमारतीला झालेला गंजण्याचा कर्करोग म्हणू शकतो. (कॅन्सर ऑफ कोरोजन) मडगावला घडलेली घटना अशाच प्रकारची आहे.

इमारतीच्या काँक्रीट सांगाड्याला वेगवेगळे घटक असतात. पाया, खांब, तुळई, स्लॅब, सज्जा, शिडी, टाकी इत्यादी. यातील ज्या भागांना पाऊस लागतो ते भाग पूर्वी प्रभावित होतात. जर आपण निरीक्षण केले तर आपल्याला आढळून येईल, की इमारतीचा सगळ्यात वरचा जो स्लॅब ज्याच्यावर धोधो पाऊस कोसळत असतो व जो शेवटी गळायला पण लागतो, तो गंज प्रक्रियेचा पहिला बळी असतो. तसेच टॉयलेटचे गळणारे स्लॅब, बाहेरच्या बाजूला असलेले खांबे, तुळ्या व सज्जा हे पण बळी ठरतात. जेव्हा काँक्रीट सुटून खाली पडायला लागते व पूर्ण लोखंड उघड होते. त्यानंतर गंजण्याची प्रक्रियेचा वेग एकदम बिनदिक्कत होतो व मोठ्या प्रमाणावर वाढतो. गंज प्रक्रियेत जे घट्ट लोखंड असते, ते गंजून त्याचा चुरा होतो व उरलेल्या घट्ट लोखंडाचा परीघ कमी होत जातो.

Plaster Collapsed in Margao
Plaster Collapsed in Margao : मडगावात जुन्या इमारतीचं प्लास्टर कोसळलं; रस्त्यावरील कारचं मोठं नुकसान

शेवटी अशी एक स्थिती येते, की अखंड उरलेले लोखंड भार घ्यायला सक्षम राहू शकत नाही व पूर्ण भाग खाली कोसळतो आणि इमारत किंवा तिचा भाग असुरक्षित होऊन जातो. त्यामुळे अशा जुन्या इमारतींची नियमित पाहणी करणे, तपासणी करणे, त्याच्यावर तांत्रिक चाचणी करणे, त्याच्या मूळ संरचनेचा अभ्यास करणे, जेथे लोखंड पूर्ण गंजलेले आहे तेथे नवे लोखंड घालणे, कमी गंजलेले आहे, त्याच्यावर तांत्रिक उपचार करणे, ग्राउटिंग करणे, त्याच्यावर खास प्लास्टरचा गिलावा करून इमारत परत सुस्थितीत आणणे व केलेल्या कामावर हमी देणे हे एक स्थापत्य अभियांत्रिकीमधील एक विशेष क्षेत्र आहे. त्याला रचनात्मक दुरुस्ती, पुनर्वसन आणि पुनर्बांधणी (स्ट्रक्चरल रिपेअर्स, रिहॅबिलिटिशन आणि रेट्रोफिटिंग), असे संबोधले जाते. यामध्ये असलेल्या इमारतीची संरचनात्मक शक्ती वाढवणे हा पण प्रकार येतो. जुनी इमारत जर भूकंप-रोधक प्रणालीने युक्त नसेल, तर नवे तंत्र वापरून ती भूकंप-रोधक केली जाऊ शकते. त्याला भूकंप-रोधक पुनर्बांधणी (सेस्मिक रेट्रोफिटिंग) म्हणतात.

सध्या तंत्रज्ञानात पुष्कळ प्रगती झाल्याने अनेक अद्ययावत उपकरणे आज उपलब्ध आहेत, जी काँक्रीट न तोडता त्याच्या शक्तीची शहानिशा करू शकतात. त्याला विना-तोडफोड परीक्षण (नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग) म्हणतात. प्रतिक्षेपक हातोडा व अतिसूक्ष्म ध्वनी स्पंदन वेग मापक (रिबाउंड हॅमर आणि अल्ट्रासोनिक पल्स व्हेलोसिटी मीटर) अशी काही ही यंत्रे. गंजण्याची प्रक्रिया किती वेगाने चालू आहे हे समजण्याकरिता अर्ध-धृवीय शक्तिमापक (हाफसेल पोटेन्शिओमीटर) आतील लोखंड किती, कुठे व केवढे आहे हे पडताळण्याकरिता प्रोफोमीटर वापरतात. तसेच काँक्रीटचे छोटे नमुने कापून घेऊन त्याच्यावर प्रयोगशाळेत भौतिक व रासायनिक चाचण्या केल्या जाऊ शकतात.

लोखंडयुक्त इमारतींचा वापर भारतात मोठ्या प्रमाणावर जवळपास 1950 पासून चालू झाला. गोव्यात तर तो 60 ते 70 च्या दशकापासून चालू झाला. त्याप्रमाणे गोव्यातील सुरुवातीच्या इमारती 60 वर्षे पूर्ण करण्याच्या मार्गावर आहेत. गोव्यात इमारत एकदा बांधल्यानंतर तिची प्रतिबंधात्मक देखभाल व दुरुस्ती करायची प्रथा नाही. जास्तीत जास्त पाच वर्षांनी एक रंगाचा फवारा मारला जातो. त्यामुळे इमारत गंजून, तडे पडून तुकडे कोसळणे, ती जीर्ण व पडकी होणे हे प्रकार अनिवार्य ठरतात व सर्रास बघायला मिळतात. यासाठी सगळ्या रहिवाशांनी वेळोवेळी एकत्र येऊन ह्याच्यावर विचार करून, इमारतीची नीट पाहणी करून, काही संशयास्पद व आक्षेपार्ह दिसल्यास व्यावसायिक अभियंत्याला बोलावून, पाहणी करून घेऊन, तांत्रिक अहवाल घेणे गरजेचे आहे. त्याप्रमाणे अहवालात जर तातडीच्या सूचना दिलेल्या असतील तर त्याप्रमाणे ताबडतोब पैशांची तजवीज करून असल्या उपाययोजना करणे एकदम गरजेचे आहे. जसे आपण आपले वैयक्तिक आरोग्य सांभाळतो, डॉक्टरकडे जातो, रक्ततपासणी करतो, औषधोपचार करतो, तशीच इमारतीची काळजी घेणे आवश्यक आहे, जेणेकरून इमारतीचे आयुर्मान वाढेलच, तसेच रहिवासी व पादचाऱ्यांचे सुरक्षिततेचे भान राखले जाईल.

-प्रसाद पाणंदीकर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com