ushatai amonkar Dainik Gomantak
ब्लॉग

Blog : गुणी गायिका उषाताई आमोणकर

शास्त्रीय संगीताचा पाया भक्कम असेल, तर संगीताचे इतर प्रकार गाणे खूप सुलभ होते, असे उषाताईचे प्रांजळ मत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

रघुनाथ फडके

मी मुंबई आकाशवाणीला कोकणी विभागात काम करत होतो. तेव्हा बरेच काही शिकता आले, पाहता आले. त्यावेळी कार्यक्रम अधिकारी श्री. वेणीमाधव बोरकर, अनुभवी संगीतकार श्री. मनोहर माशेलकर गोव्याचे होते. त्यामुळे एकदम आनंदी वातावरण.

‘सोज-ए-दिल’ हा क्लासिकल गजल आणि ‘मोगाची ल्हारां’ हा कोकणी गीतांचा अल्बमही प्रकाशित झाला आहे. तिच्या सीडीज तसेच ध्वनिमुद्रिका आजही आकाशवाणीच्या संग्रहालयात पाहायला मिळतात. त्यांचे आजही वेळेनुसार प्रसारण होत असते.

शास्त्रीय संगीताचा पाया भक्कम असेल, तर संगीताचे इतर प्रकार गाणे खूप सुलभ होते, असे उषाताईचे प्रांजळ मत आहे.

अनेक नामवंत गायक मंडळी कोकणी गीते गायला येत असत, उदाहरणार्थ पंडित प्रभाकर कारेकर, शामा चित्तार (ज्येष्ठ गायिका सुमनताई कल्याणपूर यांची बहीण) अजित कडकडे, रामदास कामत. त्यामध्ये उषाताईंचाही समावेश असायचा.

त्यावेळी मला आठवते की प्रत्येक महिन्यातील २ ही तारीख कोकणी विभागासाठी कोकणी गाणी, कातारां, मांडो, धुल्पद इत्यादी प्रकार ध्वनिमुद्रित करण्यासाठी राखीव असायची.

अशाच एका २ तारखेला मी सुगम संगीत स्टुडिओत गेलो तर तिथे उषाताई आमोणकर कोकणी गाणी गात होती. ती गोव्याची आहे, हे माहीत होते, पण भेट पहिल्यांदाच होत होती.ललिताताई खांडेपारकर आणि दुर्गाबाई नेवरेकर यांनी ओळख करून दिली. उंच, नीटनेटक्या अशा उषाताईंची ही पहिली भेट.....

उषाताई मूळ मडगावची. माहेरची विर्जिनकर. महिला नूतन विद्यालय, तसेच चौघुले कॉलेजमध्ये तिने शिक्षण घेतले. पुढे बी.एसी.मध्ये आपले पदवी आणि कायद्याचे (एल. एल. एम.) शिक्षण तिने मुंबईतील कॉलेजमधून घेतले. मुळातच गोड गळा असलेल्या उषाताईने अभ्यास, नोकरी यांबरोबर संगीतसाधनेलाही खूप प्राधान्य दिले.

वयाच्या ८व्या वर्षी त्यांचे पहिले गाणे रेकॉर्ड झाले, तेव्हा गोव्याला स्वातंत्र्यही मिळाले नव्हते. कोकणी गीतांबरोबर ती बालगीत व देशभक्तिपर गाणीही गायची. गोवा स्वतंत्र झाल्यानंतरही गाण्याचा हा प्रवास चालू राहिला. संसारात रमल्यानंतर मूल आणि नोकरी या व्यापात शास्त्रीय संगीत शिकणे जरा थांबले.

पण गाणे चालू होते. तिच्या भाग्याने तिला सर्वश्री पंडित गोविंदप्रसाद जयपूरवाले, निवृत्तीबुवा सरनाईक, जितेंद्र अभिषेकी, उस्ताद अस्लम खान यांसारखे विविध घराण्याचे उत्तम संगीतगुरू लाभले. त्यामुळे विविध रागांची, तालाची माहिती मिळाली आणि संगीताचा पाया भक्कम झाला.

घरात सतत कोकणी भाषा, त्यामुळे तिचे कोकणी भाषेवर प्रभुत्व, परंतु तितक्याच ताकदीने उषाताई मराठी सुगम संगीतही छान गाते. हिंदी गझल गाता यावी यासाठी उर्दू भाषेचाही तिने अभ्यास केला. या सर्व भाषांसोबत तिने सिंधी भाषेतील गाणीही गायली आहेत. ज्येष्ठांचे मार्गदर्शन, तालीमही घेतली.

काही नामांकित कंपन्यांमध्ये (प्रॉक्टर अँड गॅम्बल, महिंद्रा अँड महिंद्रा) उच्चपदावर असल्यामुळे कायम देश विदेशांत दौरे व सतत काम असायचे. खरे म्हणजे ती आमची ज्येष्ठ गुरुभगिनी, पण एके दिवशी, ‘बुवांच्या काही बंदिशी मला शिकव’, असे म्हणाली आणि मी काय शिकवणार या विचाराने गप्प राहिलो, पण तिच्या कामाच्या व्यग्रतेतही ती गाणे शिकायचे म्हणते याचे खूप अप्रूप वाटले आणि मी तिला वर्षभर शिकवले.

उच्चपदस्थ नोकरी व गायिका यामुळे तिच्या ओळखी भरपूर होत्या. अनेक संगीत संस्थांशी ती सामाजिक दृष्टिकोनातून बांधली गेली आहे. मुंबईतील, ‘बडे गुलाम अली यादगार सभा’ या संस्थेच्या कार्यकारिणीवर ती आजही कार्यरत आहे.

दादरच्या ‘सावरकर स्मारक’ व ‘डिसिल्वा हायस्कूल मैदान’ येथे मुंबईची ‘आमी गोंयकार’ ही संस्था मोठ्या प्रमाणात वार्षिक महोत्सव आयोजित करते.

याही संस्थेत ती गेली अनेक वर्षे कार्यकारी मंडळावर आहे. संगीत स्पर्धा, सत्कार सोहळे, सांस्कृतिक कार्यक्रम अशा अनेक उपक्रमांमध्ये तिचा सहभाग व मार्गदर्शन मिळते.

उषाताईला मनापासून गजल गायची आवड होती. ज्येष्ठ गायक भजनसम्राट पंडित अनुप जलोटा यांच्याबरोबर तिने गजल गायिका म्हणून देश विदेशांत कार्यक्रम सादर केले आहेत.

गोव्यात फर्मागुढी येथे होणाऱ्या ‘गिरिजाताई केळेकर संगीत समारोहा’त आयोजित करण्यात आलेल्या अनुप जलोटा यांच्या मैफलीत उषाताई गायली होती.

संपूर्ण वाद्यवृंद साथीला होताच, विशेष म्हणजे पंडित अनुप जलोटा यांनी हार्मोनिअम साथ केली होती. त्याच दरम्यान तिची ‘भजन प्रेम’ नावाने एलपी रेकॉर्ड प्रकाशित झाली.

नामवंत अशा पंडित यशवंत देव, प्रभाकर पंडित यांच्या संगीत दिग्दर्शनात मराठी भावगीतेही ती गायली आहे. उषाताईने फक्त संगीत साधनाच केली असती, तर आज ती मैफलीची गायिका झाली असती. असो!

तिने आपला संगीताचा व्यासंग सोडला नाही हे खरेच कौतुकास्पद. आजही मुंबई आकाशवाणीसह मंगलोर, गोवा येथे तिची कोकणी गीते प्रसारित होत असतात. तिचा ‘धुंद मी धुंद तू’ हा मराठी डिस्को गाण्यांचा अल्बम त्याकाळी विशेष गाजला.

‘सोज-ए-दिल’ हा क्लासिकल गजल आणि ‘मोगाची ल्हारां’ हा कोकणी गीतांचा अल्बमही प्रकाशित झाला आहे. तिच्या सीडीज तसेच ध्वनिमुद्रिका आजही आकाशवाणीच्या संग्रहालयात पाहायला मिळतात. त्यांचे आजही वेळेनुसार प्रसारण होत असते.

शास्त्रीय संगीताचा पाया भक्कम असेल, तर संगीताचे इतर प्रकार गाणे खूप सुलभ होते, असे तिचे प्रांजळ मत आहे.

मी ठाण्यात गेली २० वर्षे ‘पंडित जितेंद्र अभिषेकी स्मृतिवंदना समारोह’ करतो. त्या समारोहात उषाताईंचा सन्मान करण्याची संधी मला मिळाली. गुरुभगिनी या नात्याने तिचा सन्मान करताना खूप आनंद झाला. उषाताई तिचे यजमान, मुलगी, जावई, नातवंडामध्ये आपले निवृत्त जीवन आनंदाने घालवत आहे.

अशी ही उषाताई स्वभावाने अतिशय प्रेमळ, सर्वांशी आपुलकीने वागणारी तितकीच शिस्तप्रिय आणि सडेतोड बोलणारी. ओळख झाल्यापासून आजपर्यंत आमची ४० वर्षांची मैत्री कायम आहे, याचा खूपच आनंद होतोय.. आणि ही मैत्री अशीच टिकून राहो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shravan Recipes in Goa: कणगाची खीर, नागपंचमीला पातोळ्या; श्रावणातील गोव्याची समृद्धता

Shubman Gill Record: शुभमन गिल बनणार नवा 'लिजेंड', डॉन ब्रॅडमनचा 88 वर्ष जुना विक्रम मोडणार; फक्त 'इतक्या' धावांची गरज

Goa Fishing: खरा गोंयकार ‘बाप्पा मोरया’ केल्याबरोबर मासळीच्या स्वादाचा आनंद तेवढ्याच खुषीने घेतो..

Origin of Goans: 6000 ईसापूर्व भारतीय पुरुषांचे इराणमध्ये स्थलांतर झाले; गोमंतकीयांच्या मूलस्थानाचा शोध

फोन देण्यासाठी दार उघडले, समोर दिसला मृतदेह; सॉफ्टवेअर अभियंत्याचा हणजूण हॉटेलमध्ये रहस्यमय मृत्यू

SCROLL FOR NEXT