School Opening
School Opening Dainik Gomantak
ब्लॉग

School Opening: विद्यार्थ्यांना मिळेल अनोखा आनंदानुभव

दैनिक गोमन्तक

म्हापसा: विद्यालये पुन्हा सुरू करावीत, अशा आशयाचे परिपत्रक राज्य सरकारकडून जारी झाल्यामुळे विद्यार्थी, शिक्षक, पालक, शाळेचे व्यवस्थापन अशा सर्वच समाजघटकांना नक्कीच आनंद झाला असेल. आता जवळजवळ दोन वर्षांनी मुले शाळेत जाणार आहेत. त्यामुळे क्रमिक अभ्यासक्रमाच्या मागे न लागता गाणी, गोष्टी, खेळ अशा माध्यमांतून सुरुवातीला वातावरणनिर्मिती करून पुढे जावे लागेल. प्राथमिक स्तरावरील मुलांचा आधी पायाच पक्का करावा लागेल. अन्य सर्व प्रकारचे जनव्यवहार बिनदिक्कतपणे सुरूच असल्याने विद्यालये सुरू करण्यासंदर्भात सरकारने घेतलेला निर्णय योग्यच आहे, असे म्हणायला काहीच हरकत नाही.

मुलांवर कोणत्याही प्रकारची सक्ती न करता त्यांना एका जागेवर बसवणे, हेच आम्हा शिक्षकांसाठी आता आव्हानात्मक ठरणार आहे. सुरुवातीला विद्यालये पूर्णवेळ सुरू न करता काही तासांसाठीच असावीत. फक्त लिखाणावर भर न देता कृतियुक्त शिक्षणावर भर द्यावा लागेल. त्यातूनच भाषा, गणित यांसारख्या विषयांच्या संकल्पना स्पष्ट कराव्या लागतील. मुलांच्या खाण्याच्या, झोपण्याच्या सवयी बदलल्यामुळे त्यांना समजून घेऊन ती मुले वर्गात रुळावीत यासाठी थोडा वेळ द्यावाच लागेल. मुले आणि शिक्षक यांचे शारीरिक व मानसिक संतुलन बिघडू नये, याचीही आवर्जून काळजी घेणे क्रमप्राप्त ठरेल. त्या अनुषंगाने गणवेश व शैक्षणिक साहित्य यांची सध्या तरी मुलांना सक्ती करू नये, असे निदान मला तरी वाटते.

गेली दोन वर्षे शाळेतील वर्ग बंद असल्याने विद्यार्थी घरीच बसून ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेत होते. दोन वर्षांपूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी ‘अप्पर केजी’मधून पहिल्या वर्गात प्रवेश घेतला, त्यांनी कधी दोन वर्षे शाळा बघितलीच नाही. मुलांनी घरी राहण्यामुळे पालकांवर एका परीने ताण आला होता. स्वत:च्या घरची दैनंदिन कामे आवरताना पालकांनाही पुन्हा पुन्हा मुलांचा ऑनलाईन अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी त्यांना सोबत घेऊन बसावे लागले. त्यांचा अभ्यास घेणे, हा कामाचा अतिरिक्त व्याप पालकांवर वाढत गेला होता.

एरवी वर्गात मुले सर्व काही अनुभव घेतात. सार्वजनिक पद्धतीने वेगवेगळे सण साजरे करणे, त्यात क्रियाशील होऊन भाग घेणे, तऱ्हेतऱ्हेचे व्यायाम करणे, खेळ खेळणे, कला सादर करणे, वार्षिक स्नेहसंमेलनात भाग घेणे अशा विविध उपक्रमांतून लहान मुलांचा सर्वांगीण बौद्धिक तथा मानसिक विकास होतो. घरी बसून या सर्व गोष्टींना मुले मुकली होती. आता थोड्याच दिवसांत शैक्षणिक वर्ष 2021-22 च्या परीक्षा घेण्यात येतील. दरवर्षीप्रमाणे एप्रिल महिन्यात परत सुट्टी जाहीर होईल. सुमारे दोन महिन्यांसाठी मुले पुन्हा घरी राहतील. पुढे वर्ग असेच सुरू करायची सरकारची इच्छा असली तर पहिलीच्या वर्गात जी शिशुवर्गातून मुले प्रवेश घेणार त्यांना खूप समजून घेण्याची गरज राहील. प्रत्येक वर्गासाठी त्या त्या इयत्तेनुसार अडचणी असणारच. पण त्याबाबत शिक्षकही बरेच काही करू शकतात. मुले शाळेत असली तरच शाळेत चैतन्य असेल, जीवंतपणा असेल. आम्ही शिक्षकही सकारात्मक ऊर्जेने मुलांसमोर जाणार आहोत.

शाळा पुन्हा सुरू करण्याच्या सरकारच्या निर्णयाबाबत बहुतांश पालकांचा सवाल आहे, की एका महिन्यात परीक्षा होणार असताना आता ऐनवेळी वर्ग सुरू करून मुलांना शाळेत बोलावण्याची गरजच काय होती? नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत असताना जूनमध्ये हा निर्णय घ्यावा, असे कित्येक पालकांचे मत आहे. त्यामुळे सरकारच्या या निर्णयाबाबत पालक वर्गातही मतभेद निर्माण झाल्याचे दिसून येते.

कोविड महामारीसंदर्भात जे काही नियम व अटी पाळाव्या लागतात त्यांचे शाळा सुरू करताना मुलांच्या सुरक्षेबाबत परिपालन करणे गरजेचे आहे. हे मोठे जबाबदारीचे काम आहे व ते व्यवस्थित पार पडले पाहिजे. त्यासाठी काही दिवसांचा अवधी मिळाला असता तर सर्व काही व्यवस्थित करता आले असते, असे त्यांचे म्हणणे आहे.

सरकारच्या आदेशानुसार प्रत्येक विद्यार्थ्याच्या पालकाकडून स्वत:च्या मुलाला शाळेत पाठवायची परवानगी देत आहोत, अशी लेखी हमी द्यावी लागणार आहे. त्यासाठी काही दिवस असेच जातील. जे पालक स्वत:च्या मुलांना पाठवू इच्छित नाहीत, त्या मुलांसाठी ऑनलाईन पद्धतीने अभ्यासक्रम पूर्ण करावा लागेल. त्यामुळे नियमित वेळेत वर्ग घेणे व मुलांना ऑनलाईन शिकवणे ही दोन कामे शिक्षकांना करावी लागतील. कोविडविषयक शासकीय नियमांमुळे ‘सामाजिक अंतर’ म्हणजे दोन व्यक्तींमध्ये ठरावीक अंतर ठेवावे लागते. हे ध्यानात घेऊन कृती करणे भाग पडणार आहे. जे विद्यार्थी पहिल्यांदाच वर्गात प्रवेश करणार आहेत ते आपल्या इतर सहकारी विद्यार्थ्यांसमवेत एक वेगळाच आनंदानुभव घेतील. घरी आई किंवा वडिलांनी शिकवणे व शाळेत शिक्षकांनी शिकवणे यातला फरक आता मुलांना समजून येईल. वेगवेगळे संस्कार, शाळेतील ‘असेंब्ली’, प्रार्थना, घंटा वाजल्याबरोबर वर्गात जाऊन बसणे, एकमेकांशी सलोख्याने वागणे, शाळेतील वेळेचे नियम, प्रत्येक विषयाचा बदल झाल्यावर बेल वाजणार आणि दुसरी शिक्षिका येणार, शाळेच्या घंटेचा नाद हे सारे विद्यार्थ्यांना अनुभवायला मिळणार आहे आणि त्यामुळे त्यांना शिस्तही लागेल.

शाळा सुरू होणार हे समजल्यावर कितीही अडचणी आल्या तरी सकारात्मक दृष्टिकोन बाळगून अभ्यासक्रमाबरोबरच मुलांचा पाया भरभक्कम करू, असे आम्ही सर्व शिक्षकांनी ठरवले आहे.

- शोभा प्रदीप पाडगावकर, प्राथमिक शिक्षिका, सारस्वत विद्यालय, म्हापसा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Smart City : जेव्हा राजधानी पणजी शहराचे वय शोधले जाते...

Pernem Accident : धारगळमधील ‘तो’ अपघात की खून? तरुणाचा मृत्यू

Water Scarcity : पाणी टंचाईबाबत बेतोडावासीय आक्रमक; अधिकाऱ्यांना विचारला जाब

OCI Card Issue : ‘ओसीआय’प्रकरणी जनतेची फसवणूक : आमदार कार्लुस फेरेरा

Fire Brigade : अग्निशमनचे ‘मल्टिटास्क युनिट’; रायकर यांची माहिती

SCROLL FOR NEXT