Pratap Singh Rane and Vishwajit Rane Dainik Gomantak
ब्लॉग

पर्येत राण्यांचे बंड की गृहकलह?

निवडणुकांचा काळ हा चित्रविचित्र वृत्ती-प्रवृत्तींच्या प्रदर्शनाचाही काळ असला तरी काही घटना लक्ष वेधून घेतात, अस्वस्थ करतात आणि विचारप्रवणही करतात.

दैनिक गोमन्तक

अनंत साळकर

प्रतापसिंग राणे परिवारातील जुन्या पिढीचा धाकल्या पातीकडे होऊ घातलेला संघर्ष हाही असाच अस्वस्थ करणारा आहे. यातून बऱ्याच गृहितकांच्या खऱ्या-खोटेपणाची उकल झालेली आहे आणि संघर्षाचे सत्र यापुढेही चालू राहिले तर निवडणुकीत कुणी कुणावर मात केली यापेक्षा दोन्ही बाजूंचे काय नुकसान झाले हाच विषय दीर्घकाळ चर्चेत राहाणार आहे. आपला आब, प्रतिष्ठा आणि दरारा जीवापाड सांभाळणाऱ्या परिवारातील विचारभिन्नता जाहीर संघर्षाच्या पातळीवर येऊ नये, मतभेदांची जुनाट वस्त्रे चव्हाट्यावर धुतली जाऊ नयेत आणि सवंग चर्चेला खाद्य मिळू नये यासाठी अर्थातच दोन्ही पिढ्याना आतादेखील काही करणे शक्य आहे. पण एकंदर राजकारणाचाच स्तर खालावला असेल तर त्याला कोण काय करणार? (Pratap Singh Rane and Vishwajit Rane News Updates)

विश्वजीत राणे वडिलांच्या नावाचा उपयोग करून राजकारणात आले असले तरी त्यानी ऐन तारुण्यातच समांतर वाट चोखाळली, हे मान्य करावेच लागेल. 1999 च्या निवडणुकीनंतरच्या पाडापाडीच्या खेळादरम्यान वाळपईचे माजी कॉंग्रेस (Congress) आमदार व्यंकटेश तथा बंडू देसाई याना एका सकाळी घरातून बाहेर काढत नेसत्या वस्त्रानिशी पणजीत आणून फुटिरांच्या सरकारांत मंत्रीपदाची सपथ घ्यायला लावणारे विश्वजीत आठवा! २००७च्या विधानसभा निवडणुकीत आपण अपक्ष म्हणून अर्ज दाखल केल्यानंतर कॉंग्रेस पक्षाला घोळात घेऊन कुणीच नावही न ऐकलेल्या एका कार्यकर्त्याला त्या पक्षाची उमेदवारी देण्यास भाग पाडणारे आणि नंतर त्या उमेदवारास अर्ज मागे घेण्यास लावून आपला विजय निश्चित करणारे विश्वजीत (Vishwajit Rane) आठवा! किंवा, २०१७ साली कॉंग्रेसचे आमदार म्हणून निवडून आल्यानंतर आठवड्याभरात पदाचा राजीनामा देत भाजपतर्फे रिंगणात उतरलेले आणि देदीप्यमान मताधिक्क्याने विजयी झालेले विश्वजीत आठवा; प्रतापसिंग राणे याना अशा प्रकारच्या राजकारणाची कल्पनाही शिवणार नाही. १९९९ आणि २००७ मध्ये तर प्रतापसिंगांचे नाव सतत मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत असायचे, इतके त्यांचे कॉंग्रेस दरबारी वजन होते. तरीही विश्वजीत आपल्याला हवा तोच मार्ग चोखाळत गेले. खासगी बाबी उजेडांत न आणण्याचे तारतम्य प्रतापसिंगांनी आजवर दाखवले आहे, त्यामुळे मुलाचे नाव बेभरवशाच्या राजकारणाशी जोडले जातेय, याचे वैषम्य त्याना त्या काळात वाटत होते का, याची उकल होणे कठीणच. पण त्यानी मुलाच्या राजकीय कर्तृत्वाचे कौतुकही कधी चारचौघात केलेले नाही. पण, या पितापुत्रांना एकमेकांच्या विरोधात ठाकण्याची वेळ सत्ताकारणामुळे येईल, याची कल्पना मात्र कुणी केली नसेल. प्रतापसिंग राणे वयपरत्वे निवृत्त होतील आणि राजकारणापासूनही विलग होतील, असाच सर्वसाधारण कयास होता. त्यानी संकेतही तसेच दिले होते. म्हणूनच सोमवारी त्यानी सपत्निक प्रचाराला बाहेर पडणे जितके गूढ आहे तितकेच उमेदवार कोण आणि पक्ष कोणता याबाबतीत स्वीकारलेले मौनही अनाकलनीय आहे.

विश्वजीत यांचे आक्रमक राजकारण लोकानुययाचे नवनवे आणि अशिष्ट टप्पे ओलांडत असताना प्रतापसिंग राणे यांनी केलेले दुर्लक्षही येथे विचारात घ्यावे लागेल. सत्तरी युवा मोर्चाच्या माध्यमातून जेव्हा अभूतपूर्व अशा उपस्थितीच्या सभा आयोजित व्हायच्या तेव्हा त्याना संबोधित करणाऱ्या प्रतापसिंगाना सभागृहाबाहेर उभ्या असलेल्या बसेसची लांबलचक रांग कधी खटकली नाही आणि म्हाताऱ्यांपासून तरुणांपर्यंतचे आपले मतदार आपल्यामागे कशी काय गर्दी करतात असाही प्रश्न पडला नाही.

उन्हातान्हातून वणवण करत मते मागणे हे प्रतापसिंगांच्या (Pratap Singh Rane) स्वभावांत कधीच नव्हते. हल्लीच्या काळात तर ते नावापुरतेच निवडणुकीवेळी फिरायचे. तरीही विक्रमी मताधिक्य मिळायचे. ह्यामागे मुलाचे ''कर्तृत्व'' आहे हे त्यांच्या लक्षात आले नाही काय? विधानसभेत त्यांच्याच पक्षाचे सदस्य गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे नामकरण वाळपई वैद्यकीय महाविद्यालय असे करा म्हणून कुत्सित टोमणे मारायचे, तेव्हाही मुलाने आपली वट निर्माण केल्याची जाणीव त्याना झाली नाही काय? आज जेव्हा विश्वजीत वडिलांचा दहा हजार मतांनी पराभव करायची ग्वाही देतात, तेव्हा त्याचे यत्किंचितही आश्चर्य वाटत नाही आणि ती विश्वजीत यांची दर्पोक्तीही वाटत नाही. काळ बदलला आहे, हेच विश्वजीत आपल्या पित्याला सांगताहेत. काळ बदलताना त्याची दखल घेण्याची सावधगिरी प्रतापसिंगानी दाखवली नाही, ते आपल्याच विश्वात मग्न होते. बदललेला काळ आणि त्यानुरूप बदललेला मतदार आपल्या निष्ठा वेगळ्याच ठिकाणी ठेवत असल्याचा विदारक अनुभव त्याना येत्या काही

दिवसात येऊ शकतो. मात्र या अनुभवातले कटुत्व त्यांच्या कौटुंबिक स्वास्थ्यावर परिणाम करणारे ठरू नये, हीच सदिच्छा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT