Farm Dainik Gomantak
ब्लॉग

बदलत जाणारा आपला रमणीय भूप्रदेश

हा भूप्रदेश भावी पिढींसाठी जतन करण्यासाठी आपल्याला मिळालेले कर्ज आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

डॉ. संगीता साेनक

तीन-चार वर्षांपूर्वी आम्ही आमच्या ताळगावच्या घरी राहायला लागलो तेव्हा समोर नुसती हिरवी शेते दिसत होती. शेतात माड उभे होते. पावसात ही शेते पिकवली जायची. पहिली कापणी व्हायच्याआधी चर्चमधील पाद्री, वाजंत्री आणि गावातील काही लोकांना घेऊन शेतात यायचे, काही विधी करायचे, आशीर्वाद द्यायचे.

हा कापणीचा हंगाम ऑगस्टमध्ये सुरू होतो. उत्तर गोव्यातील अनेक वर्षांच्या परंपरेने ताळगावला पिकाची कापणी करायचा पहिला मान दिला गेलाय. हे नवे धान्य चर्चमध्ये वेदीला अर्पण केले जाते. ऑगस्ट महिन्यात गावागावांत ‘कणसाचे फेस्त’ साजरे केले जाते. राय येथील चर्चमधला समारंभही गोव्यात प्रसिद्ध आहे.

शेतकापणीला आजही आपल्या गोव्यात, हिंदू आणि ख्रिश्चन, दोन्ही समाजात देवाचे आशीर्वाद घेतले जातात. हिंदू समाजात ‘नव्याची पंचम’ भाद्रपद शुक्ल पंचमीला साजरी करतात.

या दिवशी, म्हणजे गणेशचतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी, नवीनच कापणी केलेल्या भाताची कणसे देवाला वाहिली जातात. ‘खाजन इकोसिस्टम ऑफ गोवा’ या स्वित्झर्लंडमधील स्प्रिंगर इंटरनॅशनल यांनी प्रकाशित केलेल्या माझ्या पुस्तकात मी याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

शेतकापणीत परंपरागत ताळगावला अग्रहक्क आहे. येथील पिके, भात, कणगी, भाजी, खास करून वांगी, तवशी इत्यादी उत्कृष्ट दर्जाचे मानले जायचे. येथील लोकांना त्याचा सार्थ अभिमानही होता.

पण या ताळगावच्या शेतांचे स्वरूप आता बदलत आहे. ही शेते हळूहळू बुजवली जात आहेत. तीन-चार वर्षांपूर्वी जे माड शेतात दिसत होते ते आता रस्त्यावर उभे आहेत. जवळच कॉंक्रीटने बांधलेली अनेक घरे दिसतात. लोकांची वर्दळ दिसते.

एका रात्री उशिरा समोरच्या शेतात गडबड दिसली म्हणून नीट पाहिले तर एक ट्रक भरून माती शेतात टाकली जात होती. त्या दिवशी, म्हणजे वास्तविक त्या रात्री, या ट्रकाच्या तीन चार खेपा झाल्या. दर वेळी माती भरून शेतात आणून टाकली गेली. ही माती रात्री टाकायची काय गरज असेल? सहज मनात प्रश्न आला.

नंतर लक्षात आले की ही काही आजची गोष्ट नाही आहे. हे खूप दिवसांपासून चालले आहे. समोरच्या शेतात माती घालून हळूहळू शेते बुजवली जात आहेत. बहुतेक रात्रीच्या वेळी माती टाकली जाते. तेथे काही बांधकाम चालू आहे.

लोकांची वर्दळ चालू आहे. त्याआधी तेथे असलेल्या समोरच्या शेतात आग लावून भुसभुशीत किंवा कापणीनंतर राहिलेले रोपांचे खुंट (स्टबल) आणि पेंढ्यांचे इतर अवशेष जाळून टाकले गेले होते.

असेच एका संध्याकाळी उशिरा गच्चीवर फिरत असताना गोवा विद्यापीठाच्या जवळ असलेल्या जंगली झाडांतून आग लागलेली दिसली. ही आग हळूहळू वाढतच होती. आटोक्यात येईल असे वाटत नव्हते. चौकशी केल्यानंतर कुणीतरी वाळलेली पाने एकत्र करून आग लावल्याचे कळले.

जोराचा वारा आल्यामुळे आग सगळीकडे पसरली. काही जण बादलीतून पाणी घालून आग विझवायचा प्रयत्न करत होते. पण ती आग बादलीतून आणलेल्या पाण्याला जुमानत नव्हती. फायर ब्रिगेडला फोन केल्यावर शेवटी आग आटोक्यात आली.

या आगीमुळे आसपासची हवा दूषित होते. पुढच्या पेरणीचक्रापूर्वी शेते साफ करायचा सर्वांत सोपा, स्वस्त आणि जलद मार्ग म्हणजे शेते अर्थात कापणीनंतर शेतात राहिलेले रोपांचे खुंट जाळून टाकणे. पण याचे पर्यावरणावर अनेक घातक परिणाम होतात.

याचे जागतिक तापमानवाढीत लक्षणीय योगदान आहे. शेते जाळल्याने कार्बन मोनोऑक्साइड, कार्बन डायऑक्साइड, मिथेन, आणि वाष्पशील सेंद्रिय संयुगे यांसारखे प्रदूषक उत्सर्जित होतात.

आगीमुळे झालेली उष्णता आणि तयार झालेला हा कार्बन यामुळे जमिनीची सुपीकता कमी होते आणि झीज (क्षरण, धूप) वाढते.

आगीमुळे धुके निर्माण होते. तयार झालेल्या या प्रदूषकांचा मानवी शरीरावर, आरोग्यावर घातक परिणाम होतो. वायू प्रदूषणाचे आरोग्यावर होणारे परिणाम अनेक आहेत.

त्वचा आणि डोळ्यांच्या जळजळीपासून ते मेंदू, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी गंभीर आजार तसेच श्वसनरोग, दमा, फुफ्फुसाची क्षमता कमी होणे, कर्करोग इ. आजार होऊ शकतात.

आगीऐवजी इतर काही फायदेशीर पर्याय आहेत. शेतात राहिलेल्या या खुंटांचे खत करून आपण शेते अधिक सुपीक बनवू शकतो. यासाठी काही जैविक उत्प्रेरक (बायो-एंझायम) उपलब्ध आहेत.

आज गोव्यात अनेक ठिकाणी शेते बुजवणे, आग लावणे हे प्रकार चालू आहेत. पडझड झालेल्या बांधकाम अवशेषांचा ढिगारा शेतात, खारफुटीच्या जंगलात आणून टाकणे सर्रास चालू आहे. अशा कृतींमुळे नैसर्गिक अधिवास नष्ट होतात. पण याची दखल घेतली जात नाही.

आधीच जागतिक तापमानबदलाने ग्रासलेल्या आपल्या शेतीप्रधान देशाला अन्नधान्य सुरक्षेच्या समस्येने संकटग्रस्त केले आहे. त्यात आपण शेते बुजवून अन्नसुरक्षेची समस्या अजून गंभीर करत आहोत.

काही वर्षांपूर्वी जपानमधील क्यॉटो विद्यापीठात अल्प काळासाठी शिकवत असताना तेथील विद्यार्थ्यांनी मला सांगितले होते की जपानी खरबूज हे तेथे मिळणारे अतिशय महाग फळ आहे, कारण ते जपानी मातीत पिकवले जाते.

आज जगाच्या पाठीवर सगळीकडे वेगाने शहरीकरण होत आहे. आपण सगळेच यात गुंतले गेलो आहोत. आपण शेते बुजवून कॉंक्रीटची जंगले बांधत गेलो, तर आपल्या मातीची किंमत आणि परिणामतः अन्नधान्याची किंमत अशीच वाढेल आणि आज जसे मासे विकत घ्यायला भरपूर पैसे मोजावे लागतात त्यापेक्षा जास्त पैसे आपल्याला धान्य, भाज्या आणि फळे घ्यायला मोजावे लागतील.

हा भूप्रदेश भावी पिढींसाठी जतन करण्यासाठी आपल्याला मिळालेले कर्ज आहे. आपल्या पूर्वजांकडून मिळालेला हा रमणीय भूप्रदेश आपण आपल्या पुढच्या पिढींसाठी जपून ठेवला पाहिजे. या बाबतीत आपण थोडी जागरूकता बाळगली पाहिजे.

आमच्या समोरच्या शेतात अजूनही काही लोक शेती करताना, पिके घेताना दिसतात. ही हिरवीगार शेते आशेचा किरण आहेत. आपली पुढची पिढी याबाबतीत अधिक सक्षम आणि संवेदनशील राहील, अशी अपेक्षा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pramod Sawant In Mumbai: "कामगारांचे कल्याण आणि सर्वांगीण विकासासाठी गोवा कटिबद्ध", 'OSH India 2025' मध्ये मुख्यमंत्री सावंतांचे प्रतिपादन

Goa Politics: "मंत्र्यांना सेवा नको, फक्त पैसा हवा...", मंत्री तवडकरांच्या नाराजीवरुन गिरीश चोडणकरांचा सरकारला टोला

Sam Konstas Century: कसोटी सामन्यात 'वनडे'चा तडका! बुमराहशी पंगा घेणाऱ्या पठ्ठ्यानं ठोकलं तूफानी शतक; भारतीय गोलंदाज हवालदिल

India vs Pakistan: लायकीवर उतरला पाकिस्तानी खेळाडू! सूर्यकुमार यादवला दिली शिवी; म्हणाला, "भारताला लाज वाटली पाहिजे" Watch Video

Goa Drug Case: मोडसाय - बड्डे येथे घरातूनच चालायचा 'ड्रग्स'चा धंदा; गांजासह पोलिसांनी जप्त केली Airgun

SCROLL FOR NEXT