Protection Of Environment: सृष्टी आणि परमेष्ठी

कुठलेही कायदे नसताना धर्म म्हणून होणारे पर्यावरणाचे संरक्षण याचा विचार व्हावा.
Protection of environment
Protection of environmentDainik Gomantak
Published on
Updated on

प्रसन्न शिवराम बर्वे

आधी तुळशीला नमस्कार कर. तिला सांग देवासाठी तुझी थोडी पाने घेतोय आणि मग गरज आहे तेवढीच तुळशीची पाने तोड.’, आई मला लहानपणी तुळशी काढायला जाताना सांगायची. खूप लहान होतो तेव्हा आईने सांगितल्याप्रमाणेच करायचो.

वय वाढत गेले, तशी अक्कलही वाढत गेली. मी सांगितलेले तुळशीच्या झाडाला कुठे कळते? इथपासून ते तुळशीला नमस्कार करण्याची वगैरे लाज वाटू लागली.

पर्यावरण तज्ज्ञ, वेदान्त वगैरे असले काहीही माहीत नसलेली माझी आई सृष्टीनियमांचे पालन करायची. ती काय सांगत होती, ते आज समजते. टेकड्या, डोंगर कापले जातात तेव्हा तेव्हा आईची ती वाक्ये आठवतात.

पूजा वगैरे गोष्टींना आपण कर्मकांडे ठरवून त्यामागच्या संकल्पनाच घालवून बसलो. वटसावित्रीचे पूजन करण्याची थट्टा करू लागलो, पण त्यायोगे हजारो वर्षे वृक्षांचे झालेले संरक्षण विसरलो.

Protection of environment
Vijay Sardesai: धर्मनिरपेक्ष देशात जातीयवादी राजकारणाला थारा नाही

लहानपणीचीच एक गोष्ट आहे; मी इंग्रजीतील एका धड्यावरी प्रश्‍नोत्तरे पाठ करत होतो. त्यात एक शब्द बाबांच्या कानावर गेला, ‘रिटा’. लगेच विचारले, ‘काय म्हणतोस?’, असे म्हणून त्यांनी पुस्तक हातातून घेतले व तो परिच्छेद वाचला आणि विचारले, ‘कुणी शिकवले तुला?’ सरांचे नाव सांगितले. बाबा हसत हसत म्हणाले, ‘अरे ते रिटा नाही, ते ऋत आहे.’ दुसऱ्या दिवशी बाबांनी हायस्कूलमध्ये जाऊन शिक्षकांचा वर्ग् घेतला.

‘ऋ’ या धातूपासून बनलेल्या ‘ऋत’ या शब्दाचा अर्थ सृष्टिनियमांचे, वैश्विक व्यवस्थेचे संचालन व संतुलन आणि सत्यनिष्ठ नैतिक मार्गाचे नियमन करणारे तत्त्व. सृष्टीचे संचालन, वैश्विक नियम, सृष्टिक्रम, निसर्गचक्र, ऋतुचक्र यांचा प्रत्येक जिवाशी व जीवनचक्राशी संबंध आहे.

निसर्गाच्या चक्राशी आपले आतील चक्र सुसंवाद साधत असेल, तर विश्‍वात घडणाऱ्या अनेक गोष्टींचा उलगडा आपणास होतो. आपल्या झोपेचेही चक्र असते. ते जितके निसर्गचक्राशी सुसंगत असेल, तितकेच आपले शारीरिक व मानसिक संतुलन व्यवस्थित राहते.

याच करता, भारतीय संस्कृती किंवा जगातील कुठलीही निसर्गपूजक संस्कृती हे ‘ऋत’ सांभाळणारी होती. आपल्या उपास्य देवता (वेदोत्तर आणि आधुनिक) वगळता जे तेहत्तीस प्रकार देवतांचे सांगितले आहेत, त्या सगळ्या या सृष्टीच्या व्यवस्था आहेत. त्या सृष्टी नियमांचे पालन हीच त्या देवतांची पूजा. क्षेत्रपाल ही देवता गोमंतकीय लोकश्रद्धेचा भाग आहे.

एका ठरावीक क्षेत्राची निसर्ग व्यवस्था सांभाळणारी ही देवता. अशा सर्व निसर्गदेवतांची व वसुरुद्रादित्य स्वरूपात गेलेल्या आपल्या पूर्वीच्या किमान तीन पिढ्यांची आदरपूर्वक भीती आपल्याला होती. देवराईतली झाडे टिकण्यामागेही हेच कारण आहे. सृष्टी चक्रातील प्रत्येक घटक जो मानवाशी निगडित आहे, त्याला आमच्या पूर्वजांनी कुटुंबात स्थान दिले.

पृथ्वीमाता म्हटले, चंद्राला मामा म्हटले आणि असे अनेक आदराचे व निकटचे संबंध जोडून त्यांना आप्त बनवले. दक्षिणेत अगदी पुल्लिंगी असलेल्या समुद्रालाही ‘कडलअम्मा’ संबोधतात. प्रत्येक घटकाला श्रद्धेच्या स्थानी बसवले. उपास्य देवतांची वाहने बनवले. या सृष्टीचक्रातील प्राणी, पशू, पक्षी, कीटक यांची एक प्रजाति नष्ट पावल्यास सबंध शृंखलेवर परिणाम होतो.

हे सर्व ‘ऋत’ जाणून घेऊन त्याचा थेट संबंध मानवी व्यवहारातील योग्य आणि अयोग्य आचार, विचार आणि उच्चारांशी जोडला गेला, ज्याला धर्म म्हणतात. या सृष्टिक्रमाच्या माध्यमातून माणसाचा संबंध वैश्विक चैतन्याशी जोडणारी व्यवस्था म्हणजे धर्म. एकक (युनिट) याच्यातही तेच चैतन्य आहे, जे त्याच्या निर्मितीच्या मूळ कारणात म्हणजे परमेष्ठीत आहे.

अब्रहमिक पंथात ‘कॉजलेस इव्हेन्ट नावाचा प्रकार आहे. आपल्याकडे प्रत्येक कार्याला कारण आहे, हा सिद्धांत मांडला आहे. साम्यवादाचा विचार मांडताना एंगेल्स यांनी जडतत्त्वातून चैतन्य निर्मिती व त्यांचे परिवर्तन अशा अंगाने सिद्धांत मांडला.

आपण चैतन्यातून जड आणि जडाचा पुन्हा चैतन्यात विलय हा सिद्धांत मांडला. परमेष्ठीतून व्यष्टीच्या निर्मितीपर्यंत झालेला चैतन्याचा प्रवास पुन्हा समष्टी, सृष्टी असा प्रवास करत चैतन्यापर्यंत पोहोचतो. या चार मूल्यांचे सामंजस्य म्हणजे धर्म.

Protection of environment
Special Students: दिव्यांग विद्यार्थ्यांना इतरांप्रमाणेच वागणूक द्या; गोवा बोर्डातर्फे शाळांना नोटीस जारी

जेव्हा आपण केवळ जडवाद हेच सत्य समजू लागतो, तेव्हा त्यातून नश्‍वरावर श्रद्धा जडते, इश्‍वरावर नाही. जडवाद भोगवादाला प्रोत्साहन देतो. जे काही निसर्गात आहे, ते आपल्या उपभोगासाठीच आहे, अशी वृत्ती जोपासली जाते. वृक्षवल्लींना सोयरे म्हणणे, गायीला व पृथ्वीला माता म्हणणे मूर्खपणाचे वाटू लागते.

गायीला माता म्हणण्याची लाज वाटणाऱ्यांना त्यांच्या कुटुंबातच जन्मलेल्या कुत्र्याला कुत्रा म्हटल्याचा राग येतो. केवळ कुत्रा हा प्राणीच नव्हे, तर जीव सृष्टीतील प्रत्येक जीव हा निसर्गचक्राचा घटक आहे, त्याला तितकेच महत्त्व आहे जितके मनुष्यास आहे, हा विचार मात्र पटत नाही.

फक्त ओरबाडणे सुरू होते. आपल्या दैनंदिन वापरात जेवढे लागेल तेवढेच घेऊन व्यवहार करणारा माणूस नको तितका साठा करत चालला आहे.

जंगले जमीनदोस्त करत चालला आहे, बी-बियाण्यांमध्ये जनुकीय बदल करून उत्पादन वाढवत चालला आहे. हा धर्म नव्हे, हा अधर्म आहे, हे सांगणारे उपनिषदांतील पृथ्वी सूक्तामधील काहीतरी आपल्या अभ्यासक्रमात आहे काहो? आम्हाला व्यष्टी, समष्टी, सृष्टी व परमेष्ठी यांतील सामंजस्य म्हणजे धर्म हे शिकवले जाते की, उच्चनीचता, जाती म्हणजे धर्म हे शिकवले जाते?

Protection of environment
ते कोण आहोत?

आज पर्यावरणवादासाठी झटणारे, त्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन जाणणारे, शिक्षित, उच्चशिक्षित यांना माहीत असलेली माहिती, शिक्षणाची कुठलीही व्यवस्था नसलेला ग्रामीण भागात, जंगलात राहणारा कसे जाणत होता? चार इयत्ताही न शिकलेली माझी आई, सृष्टीचे महत्त्व कसे आचरणात आणत होती?

आज आपल्याला असलेल्या पर्यावरणाची काळजी आपल्या वर्तनात दिसत नाही. तो आपला धर्म नाही. राजकारण, अर्थकारण, समाजकारण यांची सोय असणे व आंतरराष्ट्रीय पातळीवर लगेच प्रसिद्धी मिळणे तर आपल्याला पर्यावरणवादी बनवत नाही ना? याचा विचार होणे आवश्यक आहे.

अभयारण्याचे इतके कडक कायदे असूनही होणारी जंगलतोड व असले कुठलेही कायदे नसताना धर्म म्हणून होणारे पर्यावरणाचे संरक्षण याचा विचार व्हावा. काय करू नये हे कायदा सांगतो आणि कशासाठी, काय करावे हे धर्म सांगतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com