ओरबिन: खाण उद्योगाचे वास्तव

 

Dainik Gomantak 

ब्लॉग

Novel: 'ओरबिन' खाण उद्योगाचे वास्तव

गोव्यातील (Goa) आणि महाराष्ट्रातील चोखंदळ वाचकांचे लक्ष वेधून घेतलेली ही कादंबरी सध्या गाजते आहे.

दैनिक गोमन्तक

'ओरबिन’ ही गजानन देसाईंची पहिलीच कादंबरी. यापूर्वी ‘कुळागर’ आणि ‘नियोग’ या कथासंग्रहातून देसाईंनी स्वतःला कथालेखक म्हणून सिद्ध केलेच आहे. गोव्यातील (Goa) आणि महाराष्ट्रातील चोखंदळ वाचकांचे लक्ष वेधून घेतलेली ही कादंबरी सध्या गाजते आहे. महाराष्ट्रातील (Maharashtra) मान्यताप्राप्त वाङमयीन संस्थांचे पुरस्कार या कादंबरीला मिळाले आहेत. ‘कादंबरी’चा रूढ आकृतिबंध तिला नसला तरी तिचं सौंदर्य खानदानीच आहे.

‘जसं सुचलं तसं’ अशा वृत्तीने लेखकाने खाणव्याप्त परिसरातील स्वतःचे अनुभव या कादंबरीत ओतले आहेत. खनिज खाणीवरचे दिवस-रात्र धडधडणारे ‘ओरबिन’ ही या कादंबरीतली प्रमुख व्यक्तिरेखा. खाण व्यवसायामुळे आर्थिकदृष्ट्या संपन्न आणि उदध्वस्त झालेल्या कितीतरी लहान-मोठ्या व्यक्तिरेखा प्रसंगानुरूप या कादंबरीत येतात. त्या सर्वांना लेखकानं ‘आले अंगावर, घेतले शिंगावर’ या वृत्तीने कादंबरीत सामावून घेतलं आहे. ‘लेखकाचं सगळं बालपण पाळी, खाणव्याप्त परिसरात गेलं. त्यामुळे खाणग्रस्तांची वैफल्यग्रस्तता त्याना जवळून अनुभवता आली आणि चिरेबंदी लेखनातून आविष्कृतही करता आली.

व्यक्तिरेखांच्या भाऊगर्दीत लेखकाने प्रभावीपणे उभी केलेली विनायक गोडसे ही व्यक्तिरेखा मात्र कादंबरी वाचून संपवल्यानंतरही दीर्घकाळ मनात रेंगाळत राहते, अस्वस्थ करत राहते. ‘कुळागर’ ही गोव्याची जुनी कृषी संस्कृती. आपल्या कुळागराच्या पूर्वापार वैभवाचे आपण राखण करू शकत नाही याची खंत मनाशी बाळगून, सर्वांशी फटकून वागणारा विनायक खाण मालकाशी एकाकी झुंज देतो. काखेत ‘पास्त’ मारून कोर्टात खाणं मालकाविरुद्ध ‘देमान’ खेळून केस कागदोपत्री जिंकतो पण व्यवहारात हरतो. ‘मोडेन पण वाकणार नाही’ अशा ‘देमानिस्त’ वृत्तीच्या विनायकाच्या आणि गावठाणाच्या इतरांच्या तोंडची गावगिरी, शिवराळ भाषा ही या कादंबरीची जमेची बाजू. लेखकाचे संवादलेखन कौशल्य त्यात दिसून येते.

शेती व्यवसायाकडे दुर्लक्ष करून खाणीवर मिळेल ती नोकरी करणे, ट्रक विकत घेऊन तो खाणीवर भाडेपट्टीवर लावून धंदा सुरू करणे हे उपजीविकेचे साधन बनते. त्यातून निर्माण झालेल्या आर्थिक बरकतीचे आणि नवीन संस्कृतीचे चित्रण लेखक कौशल्यपूर्ण रीतीने करतो. दारूवर, मटक्यावर, चैनबाजीवर मनाला येईल त्या पद्धतीने पैसा उधळणं ओघानेच आले. ‘तुम्ही जीवनात कोण होणार?’ सुनंदा शिक्षिकेने वर्गात असा प्रश्न विचारताच, आपण आठवी पास झालो की ट्रक ड्रायव्हरचा होणार असं मुले एक सुरात सांगतात.

पैशांची मिजास बाळगणारा सुर्लचा बाळू आपल्या गुणदोषांसकट भेटतो. पावसात भिजताना खिशातल्या नोटांचे कवाळे दाखवून ह्यामुळे आपल्याला थंडी वाजत नाही म्हणून बेमुर्वतपणे हसणाऱ्या बाळूचा बडेजाव काळच खातो. बाळूला पुढे ट्रकांच्या धंद्यात नुकसानी सोसावी लागते. ट्रक विकावे लागतात आणि शेवटी उदरनिर्वाहासाठी जुनी रिक्षा विकत घेऊन गावागावात फिरून मासळी विकावी लागते.

ट्रक मालकांचे, ड्रायव्हरचे आणि खाणीवर काम करणाऱ्याच्या जीवनातील संघर्ष, खाण मालक आणि जनतेमध्ये होणारे लहानसहान संघर्ष याचेही चित्रण कादंबरीमध्ये (Novel) येते. मूळ बेळगावचे परंतु मुळगावात संघाची शाखा चालवणारे ज्ञानेश्वर गुरुजीं, त्यांच्यावर मनस्वी प्रेम करणारी देवदासी समाजातली जनी, अनिल या व्यक्तिरेखा त्यांच्या विचारसरणीमुळे आणि कृतिशीलतेमुळे स्मरणात राहतात. गुरुजींची व्यक्तिरेखा कादंबरीमध्ये उपरीच वाटते. आपल्या संघकार्यपुरते त्यांना मर्यादित ठेवल्यासारखे वाटते. पण खाण व्यवसायाविषयी त्यांची दूरदृष्टी व विचारसरणी मात्र उल्लेखनीय वाटते. अगदी शेवटी आपल्या विद्यार्थ्यांना मुद्दाम भेटायला आलेल्या गुरुजींचे मुळगाव परिसरातलं स्मरणरंजन लेखकाने रंजक शैलीत केले आहे. आपल्या विद्यार्थ्यांशी, अनिलशी बोलताना ज्ञानेश्वर गुरुजी म्हणतात, ‘खाणीवरचं मानवनिर्मीत ‘ओरबिन’ बंद पाडलं तरी सर्व प्रश्न सुटणार नाहीत आणि जमिनीतल्या नैसर्गिक ओरबिनचे काय? गोव्यात (Goa) कुणाच्याही परसात कुदळ घेऊन खाल्लं तरी मॅंगनीज मिळेल. हे नैसर्गिक ओरबिन बंद पाडायला धनदांडगे खाणमालक तयार होणार नाहीत’.

लेखकाने कादंबरीचा शेवट 2000 सालच्या दरम्यान दाखवला आहे. संपला असं वाटणारा खाणउद्योग संपेल असे वाटत नाही हे त्यातलं वर्तमान आणि भविष्यकालीन सूचक आहे. देसाईंना देवदत्त अशी लेखनशैली लाभलेली आहे. ते कुणाचं अनुकरण करत नाहीत. त्यांची लेखनशैली कथा-कादंबरीला पोषक आणि परिपूर्ण आहे.

-नारायण महाले

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vidhu Vinod Chopra At IFFI: 'माझ्या सिनेमाच्या पहिल्या 'शो'ला चार-पाचच प्रेक्षक होते..'; चोप्रांनी सांगिलता 'खामोश'चा दिलखुलास किस्सा

Paroda Murder Case: पारोड्यात महिलेचा अज्ञाताकडून खून! संशयित कामगाराचा शोध सुरू

एकाच दिवशी Cash For Job मधील ठकसेनांना जामीन! तक्रारदारांची मात्र चिंता संपेना

Cash For Job प्रकरणातील तक्रारदारांचे मोबाईल जप्त केल्‍याचा दावा; संशयितांचे कॉल डिटेल्स, लोकेशन्‍स जाहीर करण्याचे मुख्यमंत्र्यांना आव्हान

Anjuna Villagers Protest: हणजुणेत स्थानिक आक्रमक! मेगा इव्हेंट्सविरोधात धरणे आंदोलन; ध्वनी प्रदूषणाविरोधी झळकावले फलक

SCROLL FOR NEXT