60th Goa liberation Day

 

Dainik Gomantak

ब्लॉग

एक पिढी बरबाद झाली गोव्याच्या मुक्तीसाठी लढा देताना

एक पिढी बरबाद झाली गोव्याच्या मुक्तीसाठी लढा देताना. दुसऱ्या पिढीने तिच्या अस्मितेला अक्षत राखण्यासाठी जनमत कौलाचे अग्निदिव्य हासत हासत करून दाखवले.

Raju Nayak

गोमन्तकच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या माझ्या केबिनमध्ये बसलो होतो. वातानुकूल आरामात बसून मुक्तिदिनावर काय लिहिता येईल, याचा विचार मनात चालला होता. एरवी मी हस्तिदंती मनोऱ्यांत बसून विचाराच्या पुड्या उघडणाऱ्या पत्रकार- संपादकांवर टीका करत आलोय. पत्रकारानी आणि संपादकांनी लोकांत जाऊन मिसळायला हवे, सत्याच्या विविध कंगोऱ्यांचा मागोवा घेण्यासाठी जमिनीला कान लावायला हवेत असे सतत सांगत आलो आहे. मग हेच लेखन मी माझ्या कक्षाच्या सुरक्षित वातावरणात बसून का करावे...?

मनात काय उलथापालथ झाली नाही सांगता यायचे. पण तत्क्षणी मी खुर्चीवरून उठलो. पेन खिशाला लावत लिहिण्याचे पॅड हातात घेतले आणि कार्यालय सोडले. गाडी सुरू केली आणि तडक आझाद मैदान गाठले. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या युगाला अंत झालेला नसल्याची दिलासादायक आठवण करून देणारे राजधानीतले हे जनतेच्या हक्काचे ठिकाण. तिथे मुक्तिदिन सोहळ्याची तयारी चाललीय. गेली काही दिवस हुतात्मा स्मारकाची साफसफाई, जुजबी डागडुजी करणारे कामगार दिसतात. आताही ते होतेच. मी गेलो आणि खालीच एका पायरीवर बसलो. तिथले लोक काहीशा विचित्र नजरेने माझ्याकडे पाहू लागले. त्याना माझे अवेळचे तिथले येणे व जमिनीवर बसकण मारणे अपेक्षित नसावे.

असाच काही वेळ गेला. मी माझ्या विचारविश्वांत हरवलो होतो. अचानक पाठीवरून कुणीतरी हात फिरवत असल्याचे मला जाणवले. मी दचकलो, घाबरून उठून उभा राहिलो. येथील निवाऱ्याच्या शोधात येणाऱ्या भिकाऱ्यांचा, गर्दुल्यांपैकी कुणी तर नसावे ना..? एकटेपणाची जाणीव होऊन मी नखशिखान्त शहारत पळण्याची तयारी केली.

तसे गेले काही दिवस मी अस्वस्थच आहे. विषण्ण उदासिनतेने मनाचा कब्जा घेतल्यासारखे झालेय. रात्र रात्र झोप नाही येत. मनात प्रचंड काहूर दाटून येते आणि गळ्यांतला हुंदका चारचौघांत बाहेर पडण्याची भीती वाटत राहाते. गेली काही वर्षे मुक्तिदिन जवळ येऊ लागताच असेच होते. निराशेचे मळभ जमू लागते मानसपटलावर, असंख्य अशुभ विचारांचे काहुर कल्लोळते आणि निराशेच्या गर्तेत आपण गरगरत कोसळल्याची भावना दृढ होऊ लागते. वाटते, गोवा आमच्या हातून निसटलाय; आता तो गोवेकरांचा राहिलेला नाही. रक्तमांसाचे शिंपण करून आम्हाला दिलेली ही विमुक्त भूमी आम्ही राखू शकलो नाही. काय केले माझ्या पिढीने गोव्याचे गोजिरेपण टिकून राहावे म्हणून? एक पिढी बरबाद झाली तिच्या मुक्तीसाठी लढा देताना. दुसऱ्या पिढीने तिच्या अस्मितेला अक्षत राखण्यासाठी जनमत कौलाचे अग्निदिव्य हासत हासत करून दाखवले. माझी पिढी त्यानंतरची. मुग्धावस्थेतील गोव्याला शाश्वत विकासाची दिशा दाखवण्याची जबाबदारी याच पिढीची तर होती. जमले नाही आम्हाला ते. याचा दोष पुढच्या पिढ्या आमच्या माथी मारल्याशिवाय राहाणार नाहीत...

आताही बसल्या बसल्या तोच विचारांचा अग्निलोळ मनाच्या गाभाऱ्यांत शिरला होता आणि अचानक पाठीवर पडला तो खरखरीत हात!

पळण्याची मनोमन तयारी करत असताना अभावितपणे मागे वळलो आणि दिसला एक वयस्क माणूस. जाडेभरडे खादीचे कपडे ल्यालेला. डोळ्यांवरल्या चष्म्याआडून त्याचे डोळे लुकलुकत होते. पाहाताक्षणी मी जाणले, हा गोमंतकीय खास नाही. कुणी उत्तरेतला पूरभय्या असावा वा बिहारी मजूर... कुणी का असेना, माझ्या पाठीवरून हात फिरवण्याची त्याची हिम्मत कशी झाली..?

माझ्या मनातले विचार त्याला उमगले असावेत. तोंडावर हसूं आणत तो म्हणाला, " ओळखलं नाहीस? मी राम मनोहर लोहिया! ही निराशा तुला शोभत नाही, बेटा"

अस्खलित हिंदीतले त्याचे बोलणे लक्षवेधी होते आणि आवाजही समोरच्याची नजर खिळवून ठेवणारा. पण हे प्रत्यक्ष राम मनोहर लोहिया असू शकतील? माझ्यातल्या तर्ककठोराने उचल खाल्ली. म्हणालो. "काय सांगता, राव? खुळचट समजलाय का मला? स्वतःला राम मनोहर लोहिया म्हणवता. मला तर तुम्ही बिहारच्या एखाद्या मागास भागातले मजूर वाटताहांत. घाटी कुठले.."

तो माणूस पुन्हा लोभस हसला, " घाटी काय? पंचाहत्तर वर्षांपूर्वी असाच आलो होतो आणि तुम्ही मला क्रांतीचे रणशिंग फुंकण्याची विनंती केली. तेव्हा दिसले नव्हते का माझे घाटीपण? मुक्तीचा वेदघोष माझ्या मुखातून ऐकताना तुमच्यातले पौरुषत्व खवळले होते, तेव्हा दिसले नाही का माझे घाटीपण? तेव्हा तर जयजयकार केलात माझा. आणि आता मी घाटी वाटतोय? खरं सांगू, तुम्ही स्वातंत्र्यासाठी लायक नव्हताच. आयतं मिळालं ते तुम्हाला. दरेका गोमंतकीयाने त्यासाठी पाठीवर आसूड सोसले असते तर कळाले असते मोल या स्वातंत्र्याचे आणि जपले असते जीवापाड त्याला. कोडगी नमकहरामी रुजलीय रक्तात तुमच्या. अन्यथा तुमच्या मुख्यमंत्र्याने नेहरूंच्या नीतीवर साठ वर्षांनंतर बालीश प्रश्नचिन्ह उपस्थित केले नसते. नेहरूच नव्हे तर गांधीजीही म्हणायचे गोव्याला मुक्ती हवी असेल, तर त्यानीच त्यासाठीचा लढा उभारायला हवा. आणि तुम्ही तर हात पांघरून बसलेला. एकसष्ट साली नेहरूंनी सैन्य पाठवले नसते तर आजही पोर्तुगीजांचे गोडवे गात बसलां असता तुम्ही. बाहेरच्यानीच येऊन मुक्त केले तुम्हाला आणि तुम्ही त्याना घाटी म्हणून हिणवतां?"

त्यांचा गोरागोमटा चेहरा संतापाने लाल झाला होता. ओठ शिवशिवत होते. त्याच सुरात ते विचारते झाले. "कोण रे ते स्वतःला रिव्होल्युशनरी गोवन्स म्हणवणारे? एकट्या दुकट्या परप्रांतीय मजुराला घेरून मारण्याचा पुरुषार्थ गाजवणारे. सांग त्याना, मी येथे आलो नसतो तर मूढांचे आणि मृतांचे जिणे जगला असता तुम्ही. स्वातंत्र्याचा अर्थ तरी कळला का तुम्हाला गेल्या साठ वर्षांत. सोने प्रसवणाऱ्या खाणी चार लुटारूंच्या हाती सुपूर्द करून त्यांच्याच समोर करवंटी घेऊन भीक मागणे म्हणजे स्वातंत्र्य नव्हे. साठ वर्षांत स्वतःच्या पायावर उभे राहता आले नाही तुम्हाला. विकासाच्या नावाखाली स्वतःलाच फसवत बसलांत तुम्ही. एक मांडवी नदी ओलांडण्यासाठी तीन पूल उभारणे हीच तुमची विकासाची कल्पना काय?"

मी गडबडून गेलो. त्याच्या म्हणण्यात तथ्य निश्चितच होतें. एवढेसे हे राज्य. पण त्याला हवा तो आकार देता आला नाही आपल्याला. स्वातंत्र्याचे मोल कळालेच नाही. जे उर्वरित देशाला गांधी नावाच्या फकिराने सांगितले ते आमच्या कानी कधी पडलेच नाही. हेही खरे की देशाच्या वाट्याला गांधीजी आले, आमच्यासाठी कोण होते? प्रश्न नेतृत्त्वाचाही होताच ना.. गांधीजीनी मिठाचाही मुद्दा बनवला आणि लाखो लोक भारल्यासारखे त्यांच्यामागे चालत राहिले, दंडुक्यांचा मार सोसत राहिले. मीठासारख्या क्षुल्लक गोष्टींवरून कसले आंदोलन छेडतां, असा प्रश्न कर्मदरिद्र्याच्या थाटात कुणी केला नाही त्याना. शेतकरी आणि मजुरापासून करोडपती उद्योजकांनी स्वेच्छेने त्यानी दाखवलेला मार्ग अनुसरला. ते भाग्य गोव्याच्या नशिबीही नव्हते. पोर्तुगीजांचे दमनसत्र चारशे एकावन्न वर्षांचे, त्याहीआधी कुठल्या ना कुठल्या सुलतानशाहीचा अंकित होता गोवा. मनीमानसी कोलमडलेल्या जनतेला मुक्तीची उर्मी कशी स्फुरायची? शरणांगतांचे जीवन होते ते. काहीजण तर पोर्तुगीजांना शह देत वेगळे राष्ट्र घडवण्याच्या विचारात होते. म्हणजे जमिनींची मालकी चार हिंदू बामण आणि चार ख्रिस्ती बामणांकडे सुपूर्द करून त्यांच्याकडे लाखो गोमंतकीयांनी वेठबिगारी करायची तजवीज चाललेली. भारताची स्वातंत्र्याची सार्वत्रिक आस आम्हाला कुठली कळायला? मुक्तीनंतरही गोव्याची उपेक्षाच झाली. दोन खासदार आमचे, संसदेच्या गर्दींत दिसायचेदेखील नाही. भारताच्या जणू खिजगणतीतच नव्हता गोवा आणि आम्ही मुक्त कसे झालो हेही कळले नाही इथल्या बहुतेकांना. अनेकजण दास्यांतच सुख मानणारे होते. नंतर होय नाही करत गोवा रुळत गेला देशाच्या वहिवाटींत. विकासाची नवनवी प्रारूपें अनुभवत राहिला. आज वाटतेंय, विकास तर दिसतो आहे; तो नाकारण्यात अर्थ नाही. पण हा विकास खरेच आपला, गोव्याचा आहे का? त्याची फळे आपण कुठे चाखतोय? भलताच घटक येऊन ही फळे उपटून नेत असतो. आपण अजूनही दास्यांतच आहोत. राजकीयदृष्ट्या तरी दिल्लीचे अंकित आहोत. आर्थिकदृष्ट्याही तसेच. आपला व्यापार उदिम आहे कुठे? कुठे आहेत आपले उद्योग? सगळेच परावलंबी...

मुक्तिलढ्याला कमी लेखण्याचा यत्न नव्हे हा. काही वेडेपीर अर्थातच होते, मुक्तीच्या कल्पनेने झपाटून गेलेले. त्यानी गोळ्या झेलल्या छातीवर, काळीज नसलेल्यांच्या हस्तकांचा अमानुष छळ सोसला, घरादारावर तुळशीपत्र ठेवून शस्त्राचार करत रानोमाळ हिंडले. पण त्यांचीही टर उडवणारे, त्याना पाण्यात पाहाणारे स्थितीशरण होतेच की. आमचे दुर्दैव म्हणजे मनाला व्यापून दशांगुळे उरणारा कुणी नेताच आम्हाला लाभला नाही. मुक्तीसैनिकांचेही इगो तरारलेले. मतभेदांचा सुकाळ! प्रत्येकाची चूल वेगळी. हे मतभेद आणि मनभेद आजही तितकेच तरारलेले आहेत...

नकळत माझ्या तोंडून शब्द बाहेर पडले, "आम्हाला माफ करा लोहियाजी. आम्ही कृतघ्न निघालो. तुमच्यासारख्या स्वातंत्र्याची मशाल पेटवणाऱ्या सेनानींचे एखादे स्मारक घडवणेही जमले नाही आम्हाला. स्वातंत्र्यवीरांचा त्याग आणि बलिदान पुढच्या पिढ्यांपर्यंत जावे, स्वातंत्र्याचे मोल त्याना कळावे, असे वाटतदेखील नाही कुणाला आज. गोवा, नेहरू, गांधी यांचे मोल पुढील पिढ्यांपर्यंत पोचावे अशी बुद्धीच नाही होत आमच्या पिढीला. माफ करा आम्हाला..."

साठ वर्षांचा कालखंड झर्कन डोळ्यांसमोरून गेला. गमावलेल्या अनेक संधीं दिसू लागल्या. परावलंबित्वाचे पोषण करणारे अर्थकारण. घरबुडव्याना गब्बर करणारे राजकारण आणि त्यामुळे नित्य चिघळत गेलेले गोव्यासमोरचे प्रश्न, त्याच्या अस्तित्वालाच आव्हान देणारे...

काय कमावले गोव्याने या साठ वर्षांत? पांच वर्षांच्या सत्तेतून हजारो कोटींची माया जमवणारे विषयलंपट नेते, इथली माती अक्षरशः फुकट उपसून लाखो कोटींच्या ठेवी विदेशी बँकांत ठेवणारे उद्योगपती. आता तर ह्या लुटींत परप्रांतातल्या पाशवी शक्तीही सामील झाल्यायत. त्यांचे मार्ग वेगळे, व्यसनांच्या वळणांचे, पण हेतू तोच... नाडण्याचा, लुटण्याचा!

गोव्याचे राजकीय नेतृत्वही घरबुडवे निघाले. छोट्या कार्यकर्त्यांच्या घामाला मोल देण्याचे वचन देत सत्तेत आलेला भाजपासारखा पक्षही व्यवस्थेचाच बटिक झाला. आज तो पक्ष कॉंग्रेसची विकृत आवृत्ती वाटतोय आणि कॉंग्रेस..? त्याची अवस्था अनौरस अपत्यासारखी झालीय. या साठ वर्षांत आपली राजकीय व्यवस्था एकही अनुकरणीय, आदर्श असा नेता आम्हाला देऊ शकली नाही. माथे टेकवावे असे पायच नाहीत कुठे! आहेत ते सत्तेच्या गंधाने पिसाट होऊन मार्गशिर्षातल्या श्वानांप्रमाणे धावत सुटलेले सत्तातुर. हे काय गोवा सांभाळतील? पुढच्या निवडणुकीचे भवितव्य मला आताच दिसते आहे. बारा- तेरा जागा संपादन करणारा पक्ष काही फुटकळ पक्षांची आणि अपक्षांची कुमक विकत घेऊन सरकार घडवणार आहे आणि पक्षांतराचे पाप पुढच्या पांच वर्षांतही सर्रास घडताना दिसणार आहे...!

जे घडतेय ते काही गुप्तपणे नाही आकाराला येत. आमच्या डोळ्यांदेखत तर चाललेय सगळे. आम्ही मात्र कुठल्या युगांचे मौन घेऊन बसलो आहोत. कुणी म्हणतात योग्य वेळेची वाट गोवा पाहातो आहे. मी गेल्या दोन रविवारच्या लेखांतून सांगत आलोंय, काळ आपल्या पावलानी चालतच असतो; त्याचे रुपांतर संधीत करणे आपल्या हातात असते. वेळ यायची वाट पाहात निष्क्रिय बसायचे की वेळेला खेचून आणायचे हे आपण ठरवायला हवे. आपल्याला येती निवडणूक एक संधी निश्चितपणे देईल. पण त्या संधीला वाट करून देण्यासाठी तुम्ही आम्ही घराबाहेर तर पडायला हवे! गोवा दिल्लीची वसाहत होतोय, हे खरेच. पण जर आपण हात पांघरून बसलो तर दिल्लीला खिशात घालणारे अमेरिकन डॉलर्सच्या भाषेंत बोलणारे अधिक धनाढ्य पुंजीपती गोव्याच्या बोकांडी बसायची वेळ दूर नाही.

लोहियाजींच्या चेहऱ्याकडे पाहाता पाहाता विचारांची त्सुनामी मनाचा तळ ढवळू लागली. माझ्या अंगाला दरदरून घाम सुटला. अशुभाच्या कल्पनेने गळ्यांत आवंढा दाटला. आसवांचे लोट डोळ्यांचा पहारा चुकवून ओघळू लागले.. दूर कुठून तरी आलेली 'सुंदर माझा गोवा' ह्या गीताची आर्त धून माझ्याभोवती फेर धरू लागली. इतका वेळ आवरून धरलेला हुंदका बाहेर पडला आणि स्थलकाळ विसरून मी हमसाहमशी रडू लागलो.. आयुष्यांत कधीच रडलो नाही इतका, आसवांमुळे धुसर झालेल्या हुतात्मा स्मारकाकडे पाहात धाय मोकलून रडू लागलो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांनी गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

Goa Today's News Live: नैसर्गिक मृत्यू की हत्या; पारोडा-केपे येथे घरात आढळला महिलेचा मृतदेह

SCROLL FOR NEXT