नीना नाईक
पणजीच्या आयएमबी सभागृहात शनिवारी झालेल्या ‘अवघा रंग एक झाला..’ या कार्यक्रमाचा आस्वाद घेतांना सूर आणि ईश्वर ह्यांचा संगम पाहायला मिळाला. कान आणि मन तृप्त झाले. विठ्ठलाच्या गुणगानात आणि सुरतालाच्या निनादात रसिक भारावून गेले होते.
कलर्स मराठी वरील ‘सुर नवा ध्यास नवा’ची महागायिका सन्मिता धापटे शिंदे आणि उपमहागायिका संज्योति जगदाळे हासबे या दोन्ही गायिकांनी पंढरीच्या माऊलीचे मधुर गुणगान करून रसिकांना दिलेला आनंद अवर्णनीय होता. त्यांच्या गायकीभोवती गोमंतकीय गुणी वादकांनी आपल्या नजाकतदार आणि बहारदार साथीने रचलेला महौल यामुळे रसिकांना दिव्य अनुभूती लाभली. सुरईश या सस्थेने हा कार्यक्रम आयोजित केला होता.
विठ्ठलांचे अभंग, गौळण, भारुड असा विविधरंग अविष्कार अणि भावपूर्णतेने व विविध हरकतीनी सादर होत असलेल्या या कार्यक्रमाने प्रेक्षकांची उस्फूर्त दाद घेतली आणि 'वन्समोर'ही मिळवला. पूर्ण भरलेल्या सभागृहात जवळ जवळ अडीच तास रसिक खिळून रहिले होते.
‘सत्वर पाव ग’ आणि ‘या शेजारणीने..’ ही दोघी गायिकांनी गायिलेली भारुड अतिशय तडफदार होती ‘ ‘बोलावा विठ्ठल ..’ व ‘अवघा रंग..’ या अभंगाच्या शेवटी, विठ्ठल नामाच्या गजरावेळी तबला-पखवाज साथीने व तारानाथजी यांच्या शंखनादाने कळस गाठला आणि रसिकांनी टाळ्यांचा गजरात मानवंदना दिली. प्रफुल्ल वालावलकर यांनी ओघवत्या शैलीत, प्रत्येक रचनेच्या अनुषंगाने केलेलं मधुर निवेदन या कार्यक्रमाची शान वाढवणारे होते.
गायक उतम असले की साथीदार मैफलीत तेवढेच रसिकांना तल्लीन करू शकतात हे या कार्यक्रमात जाणवले. ही तोलामोलाची साथसंगत वादक नितीन कोरगावकर (तबला), किशोर तेली (पखवाज), शिवानंद दाभोलकर (संवादिनी), बाळकृष्ण मेस्त (सिन्थेसायझर) व तारानाथ होलेगद्दे (तालवाद्य) यांची होती. सिद्धांत नाईकचे ध्वनी संयोजनही उत्तम होते. एकूणच सर्वांगसुंदर असा कार्यक्रम रसिकांच्या कायम स्मरणात राहील.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.