goa Dainik Gomantak
ब्लॉग

हिरवळ दाटे चोहीकडे गे

नैसर्गिक अधिवासात वाढत असलेल्या भाज्यांचा आपल्या आहारात जरूर समावेश करावा. ठरावीक कालावधीत मिळणाऱ्या या भाज्यांचा उपयोग त्या त्या दिवसांत करणे हे आरोग्याच्या दृष्टीने हितकर असते.

गोमन्तक डिजिटल टीम

डॉ. संगीता सोनक

गेली कित्येक वर्षे मी लुतीच्या भाजीची चव घेतली नाही. पणजीत ही भाजी कधी दिसली नाही. पण लहानपणी खाल्लेल्या भाजीची चव अजून जिभेवर रेंगाळत आहे. कोवळे कोंब तोडून त्यात आंबाडे घालून केलेली ही भाजी. पाऊस सुरू झाला की सगळीकडे हिरवेगार कोंब फुटतात, वेगवेगळ्या भाज्या डोकी वर काढताना दिसतात.

ठरावीक ऋतूत लागवड न करता आपोआप रुजणार्‍या आणि कोणत्याही खतपाण्याशिवाय वाढणार्‍या भाज्या म्हणजे रानभाज्या. वर्षा ऋतूत उगवणार्‍या या भाज्या गोव्यात भरपूर खाल्ल्या जातात. मात्र या रानभाज्यांबद्दल माहिती नसलेले लोक त्यांच्या वाटेला जात नाहीत. हे लोक उत्तम प्रतीच्या पोषक घटकांना मुकतात.

रानभाज्या आपल्या संतुलित आहाराचा एक अविभाज्य भाग आहेत. अनेक जीवनसत्वे (व्हिटॅमिन), खनिजे, खास करून लोह, जस्त, तांबे, व इतर ट्रेस एलिमेंट्स, तंतुमय घटक, कॅल्शियम, कार्बोदके, प्रथिने, अनेक प्रकारचे पौष्टिक गुणधर्मांनी युक्त असे घटक या भाज्यांच्या सेवनाने प्राप्त होतात. शिवाय कितीतरी औषधी रसायने या भाज्यांत असतात.

पावसाळा आला की तेरे, टायकिळो (तायखिळो, टाकळा), मशिंग (मसकाची भाजी, मोरींगा, शेवगा), आंकूर, किल्ल, अळमी, कुड्डूक, धवी भाजी, फागला, सुरण, घोटवेल, सुयी, चिवार, दिनो, भारंगी, रानकेळ, पेंढरा, अशा कितीतरी भाज्या गोव्यात वेगवेगळ्या गावांत वेगवेगळ्या पद्धतीने करून खाल्ल्या जातात. टायकिळो (Senna tora) ही संयुक्त पाने असलेली वनस्पती पावसाळ्याच्या दिवसांत सर्वत्र सापडते. मेथीसारखी दिसणारी, आणि तशीच थोडीशी कडवट-तुरट चव असलेली ही भाजी अतिशय गुणकारी आहे.

या वनस्पतीत एमोडीन व ग्लुकोसायड ही द्रव्ये, कॅल्शियम, लोह आणि एक आम्ल असते. त्यामुळे ही भाजी त्वचाविकार, हृदयविकार, श्वसनाचे विकार, पित्त, कफ, सूज इत्यादींवर गुणकारी मानली जाते. ही भाजी कृमीनाशक आहे. पारंपरिक पद्धतीने गोव्यात ही भाजी फणसाच्या बिया घालून केली जाते. मसकाची (Moringa oleifera) भाजीही (पानांची) भिकणा (फणसाच्या बिया) घालून पावसात आवर्जून खाल्ली जाते. हल्ली या पानांचे पराठेही केले जातात. टायकिळ्यासारखीच बहुगुणकारी अशी ही भाजी. याच्या शेंगा आणि फुलांचीही भाजी केली जाते.

तेरे (Colocasia esculenta) ही अळूच्या कुलातील एक भाजी. गोव्यातील आंबाडे, आमसूल किंवा चिंच घालून केलेली ही भाजी थोडी आंबट-तिखट आणि चवदार असते. मात्र तेरे खाल्यामुळे त्याच्यातील काही विशिष्ट घटकांमुळे काहींना तोंडाला खाज सुटण्याची शक्यता असते. आंबट आंबाडे (किंवा आमसूल वा चिंच) घातल्यामुळे आंबाड्यातील आम्ल या अपायकारक द्रव्याचा प्रभाव कमी करण्यास मदत करतात.

तरीही ॲलर्जी असलेल्यांनी ही भाजी टाळावी. तेर्‍यामध्ये कॅल्शियम, लोह, जस्त, मॅग्नेशियम, मँगनीज, फॉस्फोरस, पोटॅशियम ही खनिजे, काही जीवनसत्वे, नायसीन, फोलेट यांसारखे पोषण घटक, कार्बोदके, तंतुमय घटक भरपूर प्रमाणात मिळतात. आंबाडे (Spondias pinnata) कोकणात दिवाळीच्या दिवसांत मिळतात.

फागला (Momordica dioica) किंवा करटोली ही फळभाजी वेलवर्गीय आहे. ही एक औषधी वनस्पती आहे. याची कारल्यासारखी दिसणारी लांबटगोल फळे देठाजवळ रुंद व टोकाकडे निमुळती असतात. थोडेसे कडू असलेले हे फळ उष्ण असते. हे संसर्गरक्षक असून वात, पित्त, मूत्ररोग व मधुमेहात उपयुक्त मानले जाते.

ही औषधी फळभाजी भारतभर अनेक ठिकाणी खाल्ली जाते. नैसर्गिक जीवनसत्वे असल्यामुळे ही पचनास सोपी जाते. किल्ल (Bambusa arundinacea) आणि चिवार (Pseudoxytenanthera stocksii) हे दोन प्रजातींच्या बांबूंचे कोवळे कोंब. किल्लाचे कोंब पौष्टिक मानले जातात.

यांचे लोणचे पाचक असते व पचनशक्ती आणि भूक वाढवते असे मानतात. याचा वास मात्र खूप तीव्र असतो, काहींना आवडणारा तर काहींना नाके मुरडायला लावणारा. आंकूर (Acrostichum aureum) हे नेचाच्या (Fern) गटातील एक वनस्पती. पाऊस सुरू झाला की शेतांच्या कडांवर ह्या वनस्पतींचे कोवळे कोंब फुटू लागतात. ह्या कोवळ्या कोंबांचे हिरवे वाटाणे किंवा कोळंबी घालून केलेले मसाल्याचे ‘आंकराचे तोणाक’ गोंयकारांना एकदम प्रिय.

भारंगी (Rotheca serrata) आणि घोटीशेरो (Smilax zeylanica) या भाज्या कोवळ्या खाल्ल्या जातात. भारंगीच्या कोवळ्या पानांची भाजी सर्दी, खोकला, ताप यांवर व पचनशक्ती वाढवण्यास उपयुक्त आहे. घोटीशेरो वा घोटवेलीच्या कोवळ्या तुर्‍यांची भाजी केली जाते. घोटवेलीत वेदनाशामक, जिवाणूनाशक, आणि मधुमेह कमी करणारे गुणधर्म असतात.

हल्लीच्या काळात या भाज्या गरम पाण्यात उकळून ते पाणी टाकून देऊन नंतरच शिजवल्या जातात. वेगवेगळे रोग पसरलेले असताना सगळ्याच पिकांच्या आणि अन्नाच्या बाबतीत ही काळजी घेणे महत्वाचे आहे. पारंपरिक पद्धतीने बनवल्या गेलेल्या भाज्यांत पाकशास्त्रातील संस्कारामुळे गुणधर्मात चांगला बदल घडवला जातो.

आम्ल पदार्थ किंवा कांदा, लसूण, हिंग, मोहरी, हळद रानभाज्यातील अनावश्यक गुणांना कमी करतात. रानभाज्यांत असलेल्या तंतुमय घटकांमुळे मलविसर्जनास मदत होते आणि बद्धकोष्ठता, मूळव्याध, अपेंडिसायटीस, कोलायटीस यांसारख्या आतड्यांच्या, पचनक्रियेच्या विकारांत मदत होते. या रानभाज्यांची माहिती देण्यासाठी सध्या अनेक संस्था काम करताहेत. ठिकठिकाणी रानभाज्यांचे महोत्सव, फेस्त वगैरे आयोजित करून जनजागृतीचे उपक्रम चालू आहेत.

नैसर्गिक अधिवासात वाढत असलेल्या भाज्यांचा आपल्या आहारात जरूर समावेश करावा. ठरावीक कालावधीत मिळणार्‍या या भाज्यांचा उपयोग त्या त्या दिवसांत करणे हे आरोग्याच्या दृष्टीने हितकर असते. कारण वेगवेगळ्या ऋतूंत शरीराला आवश्यक असलेले वेगवेगळे घटक त्या त्या ऋतूत निसर्ग वेगवेगळ्या द्रव्यांतून, रसायनांतून तयार करत असतो.

रानभाज्या जंगली वातावरणात वाढत असल्यामुळे त्यांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. त्यासाठी त्यांना अनेक संरक्षक रसायने स्वतःमध्ये तयार करावी लागतात. ही रसायने मानवी शरीरालाही गुणकारी आहेत. या भाज्यांच्या सेवनाने शरीराचा आहार समतोल राहतो. पावसाळी भाज्यांचे योग्य प्रमाणात आणि योग्य काळजी घेऊन केलेले सेवन शरीराला फायदेशीर असते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranbir Kapoor: राज कपूर फिल्म फेस्टिव्हलची घोषणा! IFFI 2024 मध्ये रणबीरने केलं जाहीर

Goa Fraud: शेअर मार्केटमधून चांगला परतावा देण्याच्या बहाण्याने 100 कोटी लाटले, आरोपी लंडनला फरार; पोलिसांची शोध मोहीम सुरु!

Kulem Gram Sabha: कुळे ग्रामसभा तापली! ऑडिट रिपोर्टवरुन ग्रामस्थांनी सरपंचांना घेरले; मार्केट कॉमप्लेक्सच्या मुद्यावरुन वादंग

Goa News: कोट्यवधींच्या घोटाळ्याचा पर्दाफाश, मुख्यमंत्र्यांनी दिले तात्काळ कारवाईची आदेश; वाचा गोव्यातील ठळक घडामोडी

Anjuna News: गोव्यात संगीत महोत्सवाचा वाद चिघळला, भर सभेत तरुणाला मारहाण; Video Viral

SCROLL FOR NEXT