Independance Day: 1946 साली मडगावात रणशिंग फुंकले; धुवांधार पावसात, जमावबंदीचा आदेश झुगारून गोमंतकीय एकत्र आले

Portuguese Rule in Goa: सिंधू तीरावरची ही गोमंत भूमी, तिचा निसर्ग, पर्यावरण, लोकसंस्कृती टिकवणे म्हणजे भारतीयत्वाचा बाणा राखणे हे ध्यानीमनी बाळगणे गरजेचे आहे!
Goa Liberation Struggle
Goa Liberation StruggleDainik Gomantak
Published on
Updated on

ब्रिटिश राजवटीतून १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी भारत मुक्त झाला आणि त्यामुळे एकेकाळी ब्रिटिशांच्या गुलामगिरीखाली खितपत पडलेल्या भारतीयांना स्वातंत्र्याचा आस्वाद घेणे शक्य झाले. परंतु, पोर्तुगीज सत्तेखाली असलेले गोवा दमण आणि दीव हे भारतीय भूमीचे अविभाज्य प्रदेश मात्र परवशतेच्या पाशात खितपत राहिले.

जेव्हा भारतीय समाज स्वातंत्र्यदिनाचे साक्षीदार होऊन अभिमानाने तिरंगा ध्वज फडकवत होते, तेव्हा गोवा दमण आणि दीव त्याचप्रमाणे दादरा आणि नगर हवेली या प्रांतांतील जनतेला पोर्तुगालच्या ध्वजासमोर नतमस्तक होण्याची पाळी आली होती.

१५ ऑगस्ट १९४७ हा भारतीय स्वातंत्र्याचा दिवस शेकडो वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अवतरल्याने, त्यानंतर हा दिवस समस्त भारतीयांनी दरवर्षी स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्या प्रारंभ केला.

तीन वर्षांनंतर २६ जानेवारी १९५० रोजी भारत देश राज्य घटना स्वीकारल्यामुळे सार्वभौम, प्रजासत्ताक, लोकशाही राष्ट्र म्हणून अधिसूचित झाला. परंतु असे असले तरी महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांच्या कुशीत वसलेल्या गोव्यात मात्र पोर्तुगीज सत्ता अनिर्बंधपणे चालू होती.

३,७०२ चौरस किलोमीटर फळात वसलेल्या गोव्याच्या एका बाजूला कर्नाटक आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राची सीमा संलग्न असली तरी गोव्यातले लोक पोर्तुगालचे अधिकृत नागरिक असल्याकारणाने आंतरराष्ट्रीय सीमेवरून ये-जा करणे प्रतिकूल बनले होते.

परंतु असे असले तरी गोमंतकीय भारताभिमानींसाठी अशोकचक्र अंकित केलेला तिरंगा ध्वज प्राणांहून प्रिय ठरला होता. त्यासाठी शरीरात प्राण असेपर्यंत तिरंग्याची शान आणि सन्मान जपणे हे त्यांचे आद्य कर्तव्य ठरले होते.

भारतीय अस्मितेचे आणि पराक्रमाचे प्रतीक असणारा तिरंगा ध्वज गोव्यात पोर्तुगीज अमदानीत सर्वोच्च जागी अविरत फडकवत ठेवणे ही जबाबदारी स्वीकारणे त्यांच्यासाठी प्रतिकूल असूनदेखील उत्साह आणि ऊर्जावर्धक ठरले होते. त्यासाठी पोर्तुगीज तुरुंगात बंदिस्त होऊन त्रास सोसणे त्यांनी निर्भीडपणे पत्करले होते.

सोळाव्या शतकात पोर्तुगिजांनी तिसवाडी, बार्देस आणि सासष्टी हे महाल जिंकल्यावर या प्रदेशाची भारतीय ही ओळख पुसून टाकण्यासाठी त्यांनी वेगवेगळे कायदेकानून लागू केले.

इथली भाषा, धर्मसंस्कृती, जेवणखाण, वेषभूषा त्यांनी सोडावी आणि ‘विवा पोर्तुगाल’चा जयघोष करतील तसेच लॅटिन अस्मिता आपलीशी करतील असे वातावरण निर्माण केले. परंतु याविरुद्ध बुलंदपणे आवाज उठवून स्थानिकांच्या धर्म-संस्कृतीचा खेळखंडोबा करण्यात सिद्ध झालेल्या ख्रिस्ती पंथगुरुंना ठार मारून सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धात कुंकळ्ळीच्या वीर अक्षौहिणीचे सामर्थ्य लाभलेल्या सोळा पुरुषोत्तमांनी बंडाचे निशाण उभारले.

त्यानंतर स्वाभिमानी गोमंतकीयांनी बऱ्याचदा पोर्तुगीज सत्तेला आव्हान देण्याचे प्रयत्न केले. भारतीय मोहिनी विद्येच्या वारशाला नवी झळाळी देण्यास कारणीभूत ठरलेल्या आबे फारिया यांनी आपल्या अन्य स्वाभिमानी ख्रिस्ती पंथगुरूतर्फे उठाव केला.

सत्तरीतील कष्टकरी समाजाने काही स्वाभिमानी राणे सरदेसाईंनी पोर्तुगीज सत्तेविरुद्ध उभ्या केलेल्या नेतृत्वाखाली बंडांचे निशाण उभारले. परंतु पोर्तुगीज सरकारने हे उठाव पूर्ण सफल होऊ दिले नाहीत.

त्यामुळे गोव्यातले काणकोण, केपे, सांगे, धारबांदोडा, सत्तरी, डिचोली आणि पेडणे हे महाल पोर्तुगिजांच्या ताब्यात आल्यावर आणि भारत स्वतंत्र झाल्यावर अमेरिकेच्या नेतृत्वाखाली नाटो राष्ट्रांचे सदस्य असलेल्या पोर्तुगालच्या भारतातील वसाहती ताब्यात घेण्यास प्रारंभी पंडित नेहरू इच्छुक नसल्याने गोव्यातल्या बऱ्याच लोकांनी ‘विवा पोर्तुगाल’चा जयघोष करण्यात धन्यता मानली.

परंतु भारत ही आपली मातृभूमी आहे, भारतीयत्व आपली अस्मिता आहे अशी धारणा असणारे मिनेझिस बाग्रांझा यांनी पोर्तुगीज सत्तेखाली लोकमान्य टिळकांचा बाणा पत्करून ‘गोमंतकीय असंतोषाचे जनक’ होण्याची कामगिरी आपल्या लेखणी आणि वाणीद्वारे आरंभली.

१९२८ साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कार्यातून प्रेरणा घेऊन त्रिस्तांव ब्रागांझ कुन्हा यांनी गोवा काँग्रेसची स्थापना केली. रामायण, महाभारत यांचा वारसा आपला मानणाऱ्या आणि रवींद्रनाथ ठाकूर यांचे बंगाली साहित्य पोर्तुगीज भाषेत अनुवादित करणाऱ्या तेलो दी मास्कारनेस यांनी पोर्तुगालच्या संसदेत भारतीयत्वाचा आवाज बुलंद केला.

भारतभूच्या सिंधू तीरावर सुंदर माझा गोवा असे मानून भारतीयत्वाचा बाणा इथे रुजवण्यासाठी वावरणाऱ्या डॉ. मनोहरराय सरदेसाई यांच्यासारख्या साहित्यिकांनी राष्ट्रीय अस्मिता प्रतिपादन केली.

त्यामुळे डॉ. ज्यूलियांव मिनेझिस यांच्यासोबत विश्रांतीसाठी साळ नदीकिनारी वसलेल्या असोळणा गावी डॉ. राम मनोहर लोहिया आले तेव्हा गोमंतकीयांच्या नागरी स्वातंत्र्यासाठी १८ जून १९४६ रोजी मडगाव शहरात रणशिंग फुंकण्याची सिद्धता दर्शवली त्याची वार्ता कळताच धुवांधार पाऊस कोसळत असताना स्वातंत्र्याभिमानी गोमंतकीय मोठ्या संख्येने जमावबंदीचा आदेश झुगारून एकत्र आले.

लोहिया यांनी क्रांतीची ठिणगी गोमंतकीय लोकमानसात टाकल्याने सुशिक्षित गोमंतकीयांनी पोर्तुगीज गुलामगिरीचा लागलेला कलंक पुसून टाकण्याचा चंग बांधला.

पांडुरंग पु. शिरोडकर ‘नवशक्ती’सारख्या दैनिकात पत्रकारिता करताना भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाले. त्रिस्ताव बागांझ कुन्हा यांनी सविनय कायदेभंग, असहकार आणि सत्याग्रह यावर आधारलेली महात्मा गांधीजींची चळवळ गोव्यात रुजवण्यासाठी प्रयत्न आरंभले.

कॉम्रेड दिवाकर काकोडकरांसारखे मुंबईत शिक्षण घेणारे गोमंतकीय तरुण समाजवादी चळवळीद्वारे भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाले. अ‍ॅड विश्वनाथ लवंदेंसारख्या युवकांनी ‘आझाद गोमंतक दला’ची स्थापना करून पोर्तुगिजांच्या साम्राज्याला हादरे देण्यास प्रारंभ केला.

Goa Liberation Struggle
Independence Day Wishes in Marathi: बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो... स्वातंत्र्य दिनानिमित्त मित्रपरिवाराला पाठवा 'या' देशभक्तीभर शुभेच्छा

भगतसिंगाच्या सशस्त्र क्रांतीची चळवळ गोव्यात शिवाजी देसाई, जयसिंगराव राणेंसारख्या मंडळींनी ‘गोवा लिबरेशन आर्मी’द्वारे सक्रिय केली.

त्यामुळे भारतीयत्व आणि गोवा भारताचा अविभाज्य घटक असल्याची भावना वृद्धिंगत झाली. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाल्याचा आनंद गोव्यातल्या राष्ट्राभिमानी तरुणांनी उत्स्फूर्तरित्या साजरा केला. त्यानंतर हा अशोकचक्राने अंकित तिरंगा गोव्यातल्या क्रांतिकारकांना ऊर्जास्रोत ठरला. दरवर्षी भारतीय तिरंगा ध्वज पोर्तुगिजांच्या नजरेला पडेल अशा ठिकाणी लावण्याची परंपरा १५ ऑगस्टला निर्भयी गोमंतकीय तरुणांनी आरंभली.

Goa Liberation Struggle
Independence Day 2025: आपल्या हाती जे ‘स्व-निर्णयाचं बळ’ आहे, त्याची ताकद स्वातंत्र्याच्या 78 वर्षानंतरतरी प्रत्येकाच्या लक्षात येऊ दे

त्याच्यासाठी त्यांनी वारेमाप संघर्ष सुरू केला. समोर भारताशी एकरूप होण्याचे ध्येय ध्रुव ताऱ्यागत त्यांनी समोर ठेवून पायतळी धगधगते निखारे सोसण्याची तयारी ठेवली आणि त्यामुळे भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या प्रेरणेतून गोवा मुक्तीची चळवळ उभी राहून कालांतराने शिगेला पोहोचली. त्यामुळे भारतीय सैन्याच्या ‘ऑपरेशन विजय’द्वारे गोवा १९ डिसेंबर १९६१ रोजी मुक्त झाला आणि मांडवी किनाऱ्यावर वसलेल्या तत्कालीन सचिवालयासमोरच्या ध्वजदंडावर तिरंगा ध्वज गौरवाने फडकू लागला.

आज सिंधू तीरावरची ही गोमंत भूमी, तिचा निसर्ग, पर्यावरण, लोकसंस्कृती टिकवणे म्हणजे भारतीयत्वाचा बाणा राखणे हे ध्यानीमनी बाळगणे गरजेचे आहे!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com