हमारी विरासत, आने वाली नस्लों को राह दिखाएंगी। मुख्यमंत्री प्रमोद सावंत मनोहर पर्रीकरांच्या मार्गावर?

CM Pramod Sawant: माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे गोव्याच्या राजकारणातील एक मानदंड, मानक म्हणून ओळखले जातात. त्यांचे वाक्चातुर्य, आक्रमकता, विरोधकांना खेळविण्याची हातोटी अतुलनीय असायची.
CM Pramod Sawant, Manohar Parrikar
CM Pramod Sawant, Manohar ParrikarDainik Gomantak
Published on
Updated on

मिलिंद म्हाडगुत

माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे गोव्याच्या राजकारणातील एक मानदंड, मानक म्हणून ओळखले जातात. त्यांचे वाक्चातुर्य, आक्रमकता, विरोधकांना खेळविण्याची हातोटी अतुलनीय असायची. विरोधी पक्षनेते असताना त्यांनी विधानसभेत केलेले ’ते’ प्रभावी भाषण आजसुद्धा लोक विसरलेले नाहीत. तत्कालीन मुख्यमंत्री दिगंबर कामत, गृहमंत्री रवि नाईक यांसारख्या दिग्गज नेत्यांनासुद्धा त्यांनी त्यावेळी गारद करून सोडले होते.

मुख्य म्हणजे त्यांची भाषणे अभ्यासपूर्ण असायची. त्यामुळे त्यांच्यापुढे कोणीही टिकत नसे. मुख्यमंत्री असताना तर त्यांचा ’वन मॅन शो’ असायचा. कोणीही मंत्री अडचणीत आला की पर्रीकर तारणहारासारखे त्याच्या मदतीला धावून जायचे. अगदी आजारी असतानासुद्धा त्यांनी विरोधकांना हातावर खेळविले होते. आता हे सर्व आठवायचे कारण म्हणजे परवाच्या विधानसभा अधिवेशनातील मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भूमिका!

या संपूर्ण अधिवेशनात विरोधक भारी पडत असल्याचे ठायी ठायी प्रतीत होत होते. अनेक वेळा तर विविध खात्याचे मंत्री पावनखिंडीत सापडल्यासारखे वाटत होते. अशावेळी मुख्यमंत्र्यांनी कृष्णाची भूमिका बऱ्यापैकी निभावली. मुख्यमंत्र्यांकडे आज अनेक महत्त्वाची खाती आहेत. स्वतःच्या खात्यांबरोबरच सध्या मंत्रिपदावरून डच्चू दिलेल्या गोविंद गावडेंकडे असलेली कला संस्कृती व क्रीडा खात्यासारखी महत्त्वाची खातीसुद्धा आहेत. पण एवढी खाती असूनसुद्धा मुख्यमंत्र्यांचा या खात्यांबाबतचा अभ्यास वाखाणण्यासारखाच होता.

म्हणूनच तर ते विरोधकांना यशस्वीरीत्या तोंड देऊ शकले. अनेक मंत्री विरोधकांचे हल्ले परतविण्यात कमी पडत असताना मुख्यमंत्री मात्र ताठपणे उभे राहू शकले ते त्यांच्या या अभ्यासामुळेच. यामुळे नुकतेच पार पडलेले विधानसभा अधिवेशन लक्षात राहिले ते मुख्यमंत्र्यांच्या एकाकी लढतीमुळे. लक्षात घ्या, मनोहर पर्रीकरांसारखे राजकारणी हे अपवादानेच तयार होत असतात. त्यांची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही. पण तरीही परवाच्या विधानसभा अधिवेशनातील मुख्यमंत्र्यांची भूमिका पाहून लोकांना पर्रीकरांची आठवण यावी यातच मुख्यमंत्र्यांनी घेतलेली भरारी स्पष्ट होते.

मनोहर पर्रीकरांचे निधन झाल्यानंतर जेव्हा मुख्यमंत्रिपदाची सूत्रे तत्कालीन सभापती डॉक्टर प्रमोद सावंत यांच्याकडे आली तेव्हा अनेकांनी नाके मुरडली होती आणि मुख्यमंत्री सावंतांनाही याची जाणीव होती. पर्रीकरांसारख्या महान नेत्याचे वारसदार होणे म्हणजे खायचे काम नव्हे हे ते जाणून होते. त्यात परत पर्रीकरांसारखी आक्रमकताही त्यांच्याकडे नव्हती. तसे पाहायला गेल्यास पर्रीकरांची गोष्टच वेगळी होती! ‘गोव्यातील भाजप म्हणजे पर्रीकर’ हे समीकरण शेवटपर्यंत कायम राहिले. पर्रीकरांचा निर्णय हा याबाबतीत शेवटचा निर्णय असायचा. त्यांच्या निर्णयात हस्तक्षेप करण्याची ताकद कोणाचीच नसायची.

त्यामुळे, पर्रीकर असताना गोव्याच्या भाजपचा ‘हायकमांड’ हे पर्रीकरच असायचे. पण आता तशी परिस्थिती नाही. आता ‘भाजप हायकमांड’ची गोव्यावर बारीक नजर असते. त्याकरता त्यांची टीम वेळोवेळी गोव्यात येऊन परिस्थितीचा अभ्यासही करत असते. आणि यामुळेच मुख्यमंत्र्यांना फार सावधपणे पावले उचलावी लागत आहेत. पण मुख्यमंत्र्यांनी स्थितप्रज्ञता हीच आपली ढाल बनवली असावी असेच त्यांच्या परवाच्या विधानसभा अधिवेशनातील भूमिकेवरून वाटत आहे. ‘स्लो अँड स्टेडी विन्स द रेस’, अशी इंग्रजीत एक उक्ती आहे.

मुख्यमंत्री सावंतांना पाहून या उक्तीची आठवण यायला लागते. पर्रीकर कधी कधी विरोधकांना अगदी शिंगावर घेत असत. त्यांना ते शोभायचेही. पण मुख्यमंत्री सावंतांनी पवित्रा बदललेल्याचे दिसून आले. शांतपणे ते विरोधकांना तोंड देत असल्याचे दिसून येत आहे. मात्र २०२७साली आपले सरकार आल्यावर आम्ही ’हे’ काम करू असे आमदार विजय सरदेसाईंनी परवाच्या विधानसभा अधिवेशनात म्हटल्यावर मुख्यमंत्री आक्रमक झाल्याचेही लोकांना बघायला मिळाले. यातून ते परिस्थितीला तोंड कसे द्यायचे हे ज्ञान आत्मसात करत असल्याचे बघायला मिळत आहे.

तसे पाहायला गेल्यास नुकतेच पार पडलेले अधिवेशन भाजपचे २७ आमदार आणि इतर सहा आमदारांचा त्यांना पाठिंबा असूनसुद्धा सरकारचे वाटलेच नाही. कोमुनिदाद जमिनीवरची आक्रमणे कायदेशीर करणे, बेकायदेशीर बांधकामांना अधिकृत करणे यांसारखी विधेयके कोणालाच पटणारी नव्हती. यासारखी विधेयके गोमंतकीयांच्या हिताची नाहीत याची जाणीव विरोधकांएवढीच जनतेलाही होती आणि आहे. यामुळेच विरोधक आक्रमक झाले होते. असे असूनसुद्धा मुख्यमंत्र्यांनी किल्ला लढविला हे विशेष!

CM Pramod Sawant, Manohar Parrikar
Goa Monsoon Assembly: गोवा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनामधून काय हाती लागले?

आपला अशील दोषी आहे हे माहीत असूनसुद्धा जिवाच्या आकांताने त्याची बाजू मांडणाऱ्या वकिलांची यामुळेच आठवण झाली. आणि यातून मुख्यमंत्री डॉ. सावंत हे भविष्यात मनोहर पर्रीकर, अनंत ऊर्फ बाबू नायक, रमाकांत खलप, डॉक्टर काशिनाथ जल्मी यांसारख्या ‘ऑल टाइम हिट’ संसदपटूंच्या रांगेत बसू शकतील असा विश्वास वाटायला लागला आहे. अर्थात, हे सर्व नेते विरोधी नेते म्हणूनही यशस्वी ठरले होते हेही तेवढेच खरे. ती वेळ अजून डॉक्टर सावंत यांच्यावर आलेली नसली तरी पण कर्मधर्मसंयोगाने ती आली तर डॉक्टर तेव्हाही यशस्वी ठरू शकतील, असा विश्वासाचा किरण या अधिवेशनाने दाखविला आहे हे नक्की!

CM Pramod Sawant, Manohar Parrikar
Goa Assembly Session: गोवा विधानसभेचे 15 दिवसांचे अधिवेशन; कोणती विधेयके मंजूर? वाचा सविस्तर आढावा

मुख्य म्हणजे ज्या पर्रीकरांचे ते शिष्य आहेत त्यांनी आखून दिलेल्या मार्गावर ते वाटचाल करू शकतील असा विश्वास या अधिवेशनाने नक्कीच जागृत केला आहे. आता हा विश्वास भविष्यात प्रत्यक्षात उतरतो की नाही, याचे उत्तर मात्र येणारा काळच देणार आहे हेच खरे!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com