Nag Panchami 2021 Dainik Gomantak
ब्लॉग

Nag Panchami 2021: गोव्यातील सर्पपूजन परंपरा

गोव्याची भूमी जैविक संपदेच्या वैविध्यपूर्ण घटकांनी समृध्द असून, इथल्या नानाविध पर्यावरणीय परिसंस्थांत त्यांचे दर्शन घेता येते. पश्‍चिम घाट आणि पश्‍चिम किनारपट्टीवर ती वसलेल्या गोव्यात सरपटणाऱ्या प्राण्यांत सापांचे वैविध्य अनुभवायला मिळते.

राजेंद्र केरकर

समुद्राच्या खाऱ्या पाण्यात राहणारे काही जीव जेव्हा जमिनीवरती राहायला आले, तेव्हा त्यांनी आपल्या मूलभूत सवयींमध्ये आणि शरीरातही बरेच बदल केले आणि त्यातून उभयचर प्राण्यांचा वावर पृथ्वीवरती सुरू झाला. सुमारे तीस कोटी वर्षांपूर्वी पाली, सरड्यासारखे मणके असलेल्या प्राण्यांचे आगमन झाले आणि त्यानंतर आत्तांच्या सापांचे पूर्वज निर्माण झाले ते २० ते २५ कोटी वर्षांपूर्वी. ज्या सापांची उत्क्रांती सरड्यापासून झाली त्यांनी जमिनीवरती अंडी घालावी लागणार म्हणून त्यांचा संरक्षणासाठी टणकदार असे कवच निर्माण केले. गोव्यातल्या पश्‍चिम घाटातल्या जंगलाप्रमाणे इथल्या पश्‍चिम किनारपट्टीवरच्या समुद्रातही सापांचे वैविध्य अनुभवयाला मिळते. वाळा, खापरखवल्या, धामण, पहाडी तस्कर, गवत्या, अजगर, रुकासाप, हेवाळे, नानाटी, कवड्या असे बिनविषारी, मांजऱ्या, हरणटोळ असे निमविषारी तर विषारी गणल्या जाणाऱ्या सापांत नाग, मण्यार, चापडा, फुरसे, घोणस, पोवळा यासारख्या प्रजाती पहायला मिळतात. (Nag Panchami 202: Snake worship tradition in Goa)

साप असा शब्द उच्चारल्यावरती ही माणसे घाबरीघुबरी होतात. आपल्या परिसरात नाग, मण्यार, फुरसे आणि घोणस असे एकूण चारच विषारी साप प्रामुख्याने आढळत असताना तसेच बिनविषारी आणि निमविषारी सापांचा दंश प्राणघातक नसताना त्यांच्यासंदर्भात असंख्य अंधश्रध्दा, खुळचट चालीरीतींचे प्रस्थ विस्तारत चाललेले आहे. ही चिंतेची बाब आहे. आणि त्यामुळे सर्परक्षक सेवेस तत्पर असतानादेखील त्यांना जीवे मारण्यातच लोकांना समाधान लाभते. धामणसारखा साप एका आठवड्याला चार ते पाच उंदीर फस्त करून वर्षाला २०० ते ३०० उंदरांना मटकावून टाकतो. उंदराच्या एका जोडीला एका वर्षभरात होणारी पिले आणि त्यांची पिलावळ म्हणजे जवळपास आठशे उंदरांना फस्त करून शेतकऱ्यांच्या कष्टाच्या फळाचे रक्षण करण्याचे महत्त्वाचे योगदान हे साप करत असतात.

उंदरासारख्या बऱ्याच प्राण्यांवरती गुजराण करणारा साप निसर्गातले संतुलन राखण्याचा अप्रत्यक्षरित्या प्रयत्न करत असतो. उंदरांना भक्ष्य करणाऱ्या या सापांविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आकर्षक शरीर प्राणघातक दंश यामुळे मनात निर्माण होणाऱ्या भय, आश्‍चर्य आणि चिंता अशा भावभावनांमुळे अज्ञात काळापासून मानवी समाजात सापांची पूजा सुरू झाली असावी. सुमारे ५००० वर्षांपूर्वीच्या सिंधू संस्कृतीच्या उत्‍खननात आढळलेल्या शिक्क्यांवरती सापांची चित्रे आढळलेली आहेत. त्यामुळे या संस्कृतीच्या अभ्यासकांच्या मते सिंधू संस्कृतीत सर्पपूजन रूढ असल्याचे मत मांडलेले आहे. क्रेट बेटावरच्या मिनोयेन या सिंधू संस्कृतीच्या समकालीन संस्कृतीत सर्पांविषयीच्या आदरभावाचे दर्शन घडते. जगभरातल्या ग्रीक, इजिप्त, मेजापोटामियासारख्या प्राचीन संस्कृतीत सर्पपूजनाच्या परंपरेचा साक्षात्कार अनुभवयाला मिळतो. ऋग्वेदात दोन्ही हाती सर्प धारण केलेल्या सर्पराणीचा उल्लेख आढळतो. केरळसारख्या राज्यातल्या अय्याप्पनाच्या मंदिरात नाग, पक्षी यांच्या शिल्पांचे पूजन पहायला मिळते. दक्षिण भारतातल्या बऱ्याच ठिकाणी सापांचे पूजन मोठ्या प्रमाणात प्रचलित होते, याची साक्ष देणाऱ्या सर्पमूर्तीची शिल्पे आजही मंदिर, तलाव, पवित्र वृक्षांच्या सावलीत पहायला मिळतात. केरळ राज्यात नागासारख्या सापांसाठी सर्व कवू म्हणजे पवित्र वनाचे रक्षण झालेले दृष्टीस पडते. काश्‍मिरसंदर्भातल्या‘राजतरंगिणी’ या ग्रंथात तेथे नागवंशियांचे राज्य असल्याचा उल्लेख आहे. वाकाटक हे नागराजे होते. चुटु सातवाहन ही नागवंशीय असल्याचे मत मांडलेले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते, ऋग्वेदामध्ये नागाचे नाव आल्यामुळे ही जात बरीच प्राचीन असल्याचे सिध्द होते. द्रविड व नाग ही दोन भिन्न नावे असली तरी त्यांचा वंश द्रविड असल्याचे त्यांनी म्हटलेले आहे. इतिहासकार स.का. दीक्षित यांनी स्वस्तिक म्हणजे नर व मादी या दोन सर्पांचे एकीकरण असल्याचे म्हटलेले आहे. ‘गोमंतकाची सांस्कृतिक घडण’ या ग्रंथात का.दा.नायक यांनी पुराणकालीन नागजातीचा धांडोळा घेतलेला आहे. गोव्यात एकेकाळी नागवंशियांचे वास्तव्य होते त्याची प्रचिती इथल्या नागोवा, नागवे, नागझर, नागेशी, नागाळी.. आदी स्थलनामांद्वारे येते असे मत बऱ्याच इतिहासकारांनी मांडलेले आहे. नाग हाच क्षेत्रपती, क्षेत्रपाळ असून, वारूळ हे भूमीचे सर्जंनेंद्रियाचे प्रतीक आहे, तर नाग हे पुरुषतत्त्वाचे प्रतीक आहे. त्याची प्राधान्याने संतानदाता म्हणून उपासना होते असे प्रतिपादन ‘लज्जागौरी’ ग्रंथात रा.चि. ढेरे यांनी केलेले आहे. नागाच्या संतानदातृत्वासंबंधीची धारणा आपल्या धर्मजीवनात दृढमूल झालेली आहे. तिसवाडीतल्या तळावली या गावात दरवर्षी २६ जुलै किंवा आसपासच्या रविवारी संपन्न होणाऱ्या तवश्‍यांच्या फेस्तात मृण्मयी वारूळरूपी सांतेरच्या जागी १५७७ पासून सांतआनाला पूर्वाश्रमीच्या संतानदेवीला पर्याय दिलेला असावा.संतानप्राप्तीसाठी वारुळाची पूजा करून, त्याची माती गरोदर स्त्रिया भक्षण करण्याचा रिवाज आंध्रप्रदेशात काही ठिकाणी रूढ आहे. गोव्यात काणकोण आणि परिसरात दसरा-दिवाळी सणांच्या कालखंडात जंगलनिवासी वेळीप जमातीच्या कुमारिका बऱ्याच ठिकाणी वारुळाच्या मातीपासून तयार केलेल्या गोळ्याला रानफुलांनी सजवून धिललो म्हणून पूजतात. वारुळात नागाचे वास्तव असते. अशा लोकश्रध्दा गोव्यात असल्याकारणाने त्याचे संरक्षण आत्मीयतेनं केले जाते. इथल्या काविकलेच्या चित्रांत सर्पप्रतिमा वापरलेल्या आहेत.

लोकसंस्कृतीचे संशोधक रॉबर्ट ब्रिफो यांच्या मते नाग त्याच्या लिंगसदृश आकारामुळे लिंगरूप मानलेला असून त्यासाठी पुरुषतत्त्वाचे प्रतीक म्हणून नागाला भारताप्रमाणे विदेशातही श्रध्दास्थानी मानलेले आहे. गोव्यातल्या सांतेरी, भूमिका, माऊली, शांतादुर्गा देवीच्या उपासनेत नाग आणि नागचिन्हाला विशेष महत्त्व लाभलेले आहे. एकेकाळी नागाला ब्राह्मण, जागेकार, जाग्याचो अशा रूपांत पूजन त्यांच्या अधिवासाचे पावित्र्य जपले जायचे.रजःस्वला स्त्रियांना अशा स्थळी जाण्यास प्रतिबंध घातला होता. डिचोलीतल्या नार्वे हिंदोळेवाड्यावरती पार्श्‍वनाथाच्या मस्तकी नागाने छत्र धरलेली मूर्ती आढळली होती. गोव्यातल्या बेताळाच्या मूर्तीशिल्पात मस्तकी धारण केलेल्या मुकुटावरती आणि हाती, पायी धारण केलेल्या अलंकारांत नागआभुषणे आणि प्रतिकांचे प्राबल्य पहायला मिळते. काणकोणातील लोलये आणि डिचोलीतील कुडणे गावातल्या मूर्तीशिल्पात नागाच्या संचितांचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो. कुडणेतर अर्धेमनुष्य आणि अर्धेशरीर नागाचे असलेली मूर्ती इतिहाससंशोधकांना अचंबित करीत असते. गोव्यात श्रावणातल्या शुक्लपक्षात नागपंचमीचा सण उत्साहाने साजरा केला जातो.

बऱ्याच ठिकाणी मृण्मयी नागप्रतिमांची मौसमी पाने, फुले, पत्री अर्पण करून पूजा केली जाते आणि हळदीच्या पानात लपेटलेल्या तांदळापासून वाफावलेल्या गुळ-खोबऱ्याने युक्त पातोळ्यांचा आस्वाद घेतला जातो. डिचोली- विर्डीतील अवखळे तसेच कुंभारजुवेतले शेट कुटुंबियांत नागप्रतिमांचे पूजन केले जात नाही.काही ब्राह्मणांत केळीच्या पानावरती हळदीच्या लेपाद्वारे नाग रेखाटून पूजा केली जाते तर इब्रामपूर येथील धावस्कर मंडळी पीठापासून तयार केलेला नाग पूजतात. केपे -कोठंबीतील देसाईत, शिवमंदिरात नागाची पूजा केली जाते. भाद्रपदातल्या अनंतचतुर्दशीला गोव्यातल्या सारस्वत, पदयेच्या काही कुटुंबांत अनंतचतुर्दशीच्या व्रतात अनंत नागाची प्रतिकात्‍मक पूजा केली जाते. मांडवी तीरावरच्या सावईवेरेतल्या मदनंताच्या मंदिरात शेषशायी विष्णूचे पाषाणी शिल्प नागपूजन परंपरेची प्रचिती देत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

World Cup 2025: टीम इंडियासाठी 'करो या मरो'चा सामना, उपांत्य फेरी गाठण्यासाठी 'विजय' आवश्यक; इंग्लंडविरुद्ध 'अशी' असेल Playing 11

Goa Diwali Bazar: पणजी, दिवचल भरला दिवाळी बाजार...

Pakistan-Afghanistan War: "पाकिस्तान क्रिकेट को बर्बाद करना चाहता है…" माजी अफगाण कर्णधाराची शत्रू देशावर टीका

राजधानीत नरकासुराचा 'हाहाकार', दिवाळीची तयारी जोरदार ; Watch Video

जब तक सूरज - चांद रहेगा तब तक पर्रीकर- रवि तुम्हारा नाम रहेगा! मागोवा

SCROLL FOR NEXT