Music of Goa Dainik Gomantak
ब्लॉग

Music of Goa : गोव्याच्या गीतपरंपरेतला श्रीविठ्ठल

विठ्ठल, पांडुरंग या नावाने ज्ञात हे सावळे परब्रह्म जसे मूर्तीतून प्रकटते तसेच ते गोव्याच्या लोकगीतामधूनही प्रकट होते

गोमन्तक डिजिटल टीम

राजेंद्र केरकर

विठ्ठल, पांडुरंग या नावाने ज्ञात हे सावळे परब्रह्म जसे मूर्तीतून प्रकटते तसेच ते गोव्याच्या लोकगीतामधूनही प्रकट होते. कष्ट करता करता मुखातून सहज आलेले विठ्ठलाचे नाव, साक्षात त्या विठ्ठलालाही बुधजनांच्या वेदऋचांहून अधिक प्रिय वाटते. कष्टाचेच षोडशोपचार, कष्टाचे स्तोत्र आणि कष्ट हीच फलश्रुतीही. गोमंतकीयांच्या गीतपरंपरेतला विठ्ठल आणि मूर्तीत असलेला विठ्ठल एकच. मूर्तीतील विठ्ठल कटीवर हात ठेवून विटेवर उभा राहून भक्ताची वाट पाहतो आणि गीतातील विठ्ठल कष्टकऱ्यांचा घाम पुसत विचारतो, ‘कसो आसा रे बाबा?’

भारतीय लोकमानसाला भावलेले दैवत श्रीविठ्ठलाची दिगंत कीर्ती महाराष्ट्र, कर्नाटक सीमेवरच्या सोलापूर जिल्ह्यातल्या चंद्रभागा या कृष्णेच्या उपनदीवरती वसलेल्या पंढरपुरातल्या श्रीविठ्ठल मंदिराच्या उभारणीनंतर विलक्षण गतीने पसरली. केवळ मराठी परंपरेतच नव्हे तर दक्षिणेकडच्या तेलगू, कन्नड, तामीळ सारख्या भाषांतल्या काव्यात श्रीविठ्ठलाचे गुणगान लोकमान्य ठरलेले अनुभवायला मिळते.

दक्षिण भारतातल्या होयसळ, यादव राज्यकर्त्यांनी पंढरपुरातल्या विठ्ठलमंदिराच्या बांधकामाला भरघोस देणग्या दिल्यात. त्याचप्रमाणे तेराव्या शतकातल्या शिलालेखातून गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटकात पसरलेल्या श्रीविठ्ठलाच्या भक्तांनी दान केल्याचे संदर्भ आढळतात. गोव्यातल्या लाड कुटुंबाने पंढरपूरच्या मंदिरासाठी देणग्या दिल्याचा जो उल्लेख आढळतो, त्यावरून पोर्तुगिजांनी तिसवाडी, बार्देश आणि सासष्टी हे महाल सोळाव्या शतकात जिंकून घेण्यापूर्वीच विठ्ठलभक्ती आणि आषाढी-कार्तिकी एकादशीला पाऊस, वादळवारा, दऱ्याखोऱ्यांची पर्वा न बाळगता पंढरपुरात वारी करण्याची परंपरा लोकमान्य ठरल्याचे स्पष्ट होते.

अठ्ठावीस युगापासून पुंडलिकाच्या भक्तीखातर श्रीविठ्ठल भक्तांनी दिलेल्या विटेवरती कमरेवरती दोन्ही हात ठेवून उभा असलेली पाषाणी मूर्ती नानाविध जाती जमातीत विखुरलेल्या भाविकांसाठी जगण्याचे प्रेरणास्रोत आणि श्रद्धेचे ऊर्जाकेंद्र ठरलेली आहे. त्यामुळे पंढरपुरात आषाढातल्या देवशयनी आणि कार्तिक महिन्यातल्या प्रबोधिनी एकादशीच्या पर्वदिनी पायी जाण्यात भक्तीचा परीसस्पर्श झालेल्या भाविकांनी धन्यता मानली.

सत्तरीतल्या मोर्ले गावातल्या वाटबा दुलबा राणे मोर्लेकर यांच्या भक्तीखातर श्रीविठ्ठल वाळवंटी तीरावरच्या कारापुरातल्या मारुतीगडावर चौदाव्या शतकाच्या उत्तरार्धात आल्याचे मानले जाते. गेल्या ५०० वर्षांपेक्षा अधिक काळापासून श्रीविठ्ठल रुक्मिणी आणि सत्यभामा यांच्या तिन्ही पाषाणी मूर्तींचे लावण्य भक्तांना इथे खेचून घेत आहे.

गोव्यातील आदिवासी गावडा जमात असो अथवा मध्वाचार्यी सारस्वत, दर्यात मच्छीमारी करणारे खारवी असो, अथवा बांबू कामाचे कला कौशल्य जपणारा दलित समाज असो, विठ्ठल, विठोबा, विठो, पांडुरंग ही नावे त्याच्या लोकमान्यतेची पूर्वापार प्रचिती देत आहेत. कधी अस्पर्श मानल्या गेलेल्या संत चोखोबाला चक्क कडेवर घेणारा, गोरा कुंभाराला तनमन विसरायला लावणारा श्रीविठ्ठल गोव्यातल्या नाना कष्टकरी जातीजमातींबरोबर बुधजनांतही तितक्याच प्रिय ठरलेला आहे.

त्यामुळे पर्तगाळ, पैंगीण येथील श्रीसंस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठातील श्रीवीर विठ्ठल असो अथवा सासष्टीच्या राय गावातून परागंदा होऊन डिचोलीतल्या सुर्ल, न्हावेली आणि कुडणेतल्या सीमेवरती वसलेल्या चिकणेवाड्यावरती घाडी मंडळीच्या छोटेखानी श्रद्धास्थानातील श्रीविठ्ठलाची काष्ठ प्रतिमा असो, श्रीविठ्ठलाचे रूप भक्तांसाठी मोक्षधाम ठरलेले आहे. त्यामुळे गोव्यातल्या लोकमानसाने जपलेल्या फुगडी, धालो, शिगम्याच्या पारंपरिक गीतांत श्रीविठ्ठलाचा उल्लेख हमखास आढळतो. कष्टकरी स्त्रियांच्या फुगड्यातील लोकगीतात हा श्रीविठ्ठल

पंढरीच्या पांडुरंगा, हरी विठ्ठला

लवकर ये रे, कंठ माझा दाटला

असा उल्लेख आढळतो तर शिगम्याच्या रोमटामेळात त्याचा संदर्भ

विटेवरी उभा त्याचा कटेवरी हात

काय मौजेचा पंढरीनाथ

अशा रीतीने येतो. कधी संत जनाबाई पीतांबर धूत असताना, त्यातला चंद्रहार तुटून मोती नदीत विखुरतात तेव्हा जात्यावरच्या ओव्यातून लोक गायिका भक्तीचे हे भावविश्‍व सुरेखपणे समूर्त करताना गातात

तुटलो चंद्रहार । मोतया जाली ती नदीभर ।

दयाळी पांडुरंग । मोतया वेचिता शेल्यावर ।

तर कुठे सकाळच्या प्रहरी म्हटल्या जाणाऱ्या ओव्यांतून त्या गाऊ लागतात :

पहिली माझी ओवी गं तुळशीच्या पाना

सेवाकरी कृष्णा कान्हा ये रे बा विठ्ठला

सत्तरीतल्या झर्मे गावात रणमाले लोकनाट्याची पूर्वापार समृद्ध परंपरा आहे. त्यात राणे सरदेसाईंच्या कारापूर मोकाश्यात येणाऱ्या श्रीविठ्ठलाचा संदर्भ येतो. पारंपरिक लोकगीतांतून शालेय शिक्षणापासून कधीकाळी वंचित ठरलेल्या कष्टकरी समाजाच्या हृदयीचे संचित अनुभवायला जसे गोव्याच्या खेडोपाडी मिळते, त्याचप्रमाणे पोर्तुगिजांच्या गुलामगिरीच्या काळात भक्तीचा नंदादीप तेवत ठेवण्यासाठी धडपडणाऱ्या संतांच्या काव्यरचना पाहायला मिळतात. तिसवाडी महालातल्या मंडुर गावातल्या डोंगरीच्या कृष्णमभट्ट बांदकर यांच्या भक्तीकाव्यातून श्रीविठ्ठलाविषयीची आत्मीयता प्रतीत होते.

विटेवरी पाहिला देव पंढरीचा ।

कटीवर कर शोभे हार कुंदरीचा ॥

कृष्णम्भट्ट बांदकराची ही परंपरा विकसित होण्यासाठी या भूमीत सोळाव्या शतकात भक्तीरसपूर्ण काव्यरचना करणाऱ्या गोमंतकीय ज्ञानेश्‍वर, तुकाराम, निवृत्तीदास, विष्णूदासनामा, कृष्णदास शामा आदींचे योगदान महत्त्वाचे ठरले होते. त्यामुळे अंत्रूज महालातील शिरोड्यातून कारापूरच्या विठ्ठलापुरात स्थायिक झालेल्या शाहीर गोंदजी नाईक यांच्या

लावणीत :

जय पांडुरंग पंढरीहूनी। तो आला साखळीनगरी।

ये राण्याचे भक्तीकरिता श्रीहरी। वसे शृंखलापुरी।

समपद उभा विठोबा विटेवरी॥

असा उल्लेख पाहायला मिळतो. शिगम्यातल्या पारंपरिक मांडावरती कारापुरातल्या विठ्ठलापूर आणि परिसरातील कष्टकरी मर्दानी लोकनृत्यांच्या सादरीकरणावेळी गोंदजी नाईकांनी रचलेल्या लावण्या, जतीच्या गायनावरती करण्याची परंपरा आहे. इथल्या लोकगीतांतून श्रीविठ्ठलाविषयीच्या भक्ती आणि उत्कट अशा आत्मीयतेचे दर्शन घडते. श्रीविठ्ठलभक्तीची ही परंपरा विसाव्या शतकातल्या गोमंतकीय कवींच्या भक्तीरचनांतून दृष्टीस पडते. ‘सुंदर सुकुमार मूर्ती ही सावळी’ या काव्यात गोदावरीबाई विष्णू नायक म्हणतात :

भक्तीप्रेमावीण ज्ञान नको देवा, घेई माझी सेवा पांडुरंगा।

तुंचि वास करी हृदयाभीतरी, काय उणें हरी, आम्हांसि आता ॥

‘संकटनाशनी’ या काव्यरचनेत व्यंकटेश गिरीकारे म्हणतात

जे नर विठ्ठलचरणी लागले। ते जीवनमुक्त सहज झाले॥

इतर जन्मोजन्मी शिणले । निरयगती भोगोनी॥

अहो हरी विठोबाराया ॥ सदा असोत व कृपाछाया ॥

आम्हांस भवार्णवी तारुनियां । अंती दावी तव पदा ॥

श्रीविठ्ठलाविषयीचा उत्कट भक्तिभाव अभिव्यक्त करणाऱ्या गोमंतकातल्या लोकगीतांबरोबर कवींनी रचलेल्या सुंदर काव्यरचनांनी इथल्या लोकमानसाच्या अंतःकरणात निरंतर वास करणाऱ्या वारकऱ्यांबरोबरच सर्वसामान्यांच्या जीवनाला उभारी देणाऱ्या आपल्या आराध्य दैवताविषयीचा जिव्हाळा प्रकट केलेला आहे.

पंढरपुरातल्या श्रीविठ्ठलमंदिरातल्या सोळखांबी मंडपातील एका तुळईवर कोरलेल्या संस्कृत- कन्नड शिलालेखात पंढरपूरचा उल्लेख ‘पंडरंगे’ असा ज्याप्रमाणे येतो त्याचप्रमाणे श्रीविठ्ठलाचे मारुतीगडावरती आगमन होण्यापूर्वी त्या मूर्तीस सत्तरीतली पर्येजवळच्या पेडोश गावातल्या जांभ्या पठारावरती करण्यात आली होती, त्याला ‘पंढरीण’ असे जे स्थळ नाम प्राप्त झाले, ते पंडरंगेची प्रचिती आणून देत आहे. त्यामुळे आजच्या काळातही काणकोण ते पेडण्यापासूनचे विठ्ठलभक्त आषाढी- कार्तिकी एकादशीच्या उत्सवात, ‘विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला’ असे गात, तुळशीमाळा गळ्यात धारण करून वारीला जातात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

SCROLL FOR NEXT