Mhadai River Dainik Gomantak
ब्लॉग

Mhadai River: गुळेलीची वैभवदात्री म्हादई आणि खडकीतील 'राजग्याची स्मृतीस्थळे'

गोमन्तक डिजिटल टीम

राजेंद्र पां. केरकर

आज आपण दैनंदिन खाद्यान्नात साखरेचा मोठ्या प्रमाणात वापर करतो. परंतु पूर्वी गोडधोड करण्यासाठी गुळाचा वापर व्हायचा. सत्तरीतील म्हाऊस आणि गांजेजवळील उसगाव ही गावे ऊस लागवडीशी निगडीत असावीत. म्हाऊसचा ऊस गुळ्ळे येथे, तर उसगावचा ऊस गुळेलीत बैलगाड्यांद्वारे नेऊन गुळाची निर्मिती केली जात असावी.

म्हादई नदी मासोर्डे गावातून जेव्हा खडकीच्या दिशेने जाऊ लागते तेव्हा पाण्याच्या मोठ्या साठ्यामुळे तिच्या पात्राचा आणि प्रवाहाचा विस्तार होतो.

मासोर्डे ते खडकीपर्यंत नदीच्या दुतर्फा राहणारे भूमिहीन कष्टकरी पाव शतकापूर्वी म्हादई नदीत ठिकठिकाणी दगडधोंडे एकत्र करून हिवाळ्यात गोड्या पाण्यात आढळणारे ‘मळये’, ‘देकळे’, ‘काडय’, ‘वाळय’, ‘खवळे’, ‘पिट्टोळ’ आदी मासे पकडण्यासाठी बांधसदृश ‘किंव’ घालायचे.

असे पारंपरिक बांध उभारल्याकारणाने नदीच्या वाहत्या पाण्याच्या प्रवाहाची गती काही प्रमाणात शिथिल व्हायची आणि अशावेळी नदी पात्रात नियोजनबद्ध इथले कष्टकरी पुरण शेती करायचे.

नांगराचा शोध लागण्यापूर्वी सत्तरीत नवाश्म युगाशी नाते सांगणार्‍या ज्या कृषी परंपरा इथल्या आदिमानवाच्या जगण्याला साद देत होत्या. त्यात डोंगर उतारावरती केली जाणारी कुमेरी आणि नदीपात्रातली पुरण शेती हे दोन प्रकार महत्त्वाचे होते.

हिवाळा आला की वेळगे, नाणूस, सावर्शें, खडकी या नदीकाठच्या गावांतल्या कष्टकर्‍यांना पुरण शेती करण्याची चाहूल लागायची. सत्तरीत शेतजमिनींची मोठ्या प्रमाणात मालकी मोकासदार आणि जमीनदाराची, त्याचप्रमाणे सरकाराची असल्याने भूमिहीनाची संख्या बरीच मोठी आहे.

त्याकाळी काजू आणि बागायती पिके घेण्यासाठी त्यांच्याकडे जमिनी नसल्याकारणाने जगण्यासाठी भूमिहीनांना वारेमाप संघर्ष करावा लागत होता. त्याच संघर्षात या लोकांना म्हादई नदीच्या पात्रात केल्या जाणार्‍या पुरण शेतीचा जगण्यासाठी आधार लाभायचा.

आकस्मिकरीत्या पाऊस आला तर बर्‍याचदा भातकापणी करण्याशिवाय पुरणशेती समूळ महापुरात वाहून जाण्याची प्रकरणे उद्भवलेली होती. परंतु असे असताना उपजीविकेचा कोणताच अन्य समर्थ पर्याय नसल्याने त्यांच्यासाठी पुरण शेती हा जगण्याचा एकमेव आधार होता.

परंतु जलसंसाधन खात्याने जेव्हा म्हादई नदीत वसंत बंधारे बांधले तेव्हा सरकारने या भूमिहीनांच्या पुरण शेतीचा काडीचाही विचार केला नाही. आणि त्यामुळे काही अपवाद वगळता ही इतिहास पूर्वकाळातली शेती आज इतिहासजमा होण्याच्या वाटेवर आहे.

हिरव्या भातमळ्याच्या दुलईला लपेटून वाहणार्‍या म्हादईचे अप्रूप रूप वेळगे- खडकी परिसरात जे पाहायला मिळायचे तेसुद्धा दुरापास्त झालेले आहे.

वेळग्यातून म्हादई एकेकाळी महाकाय खडकांनी समृद्ध असलेल्या खडकीत यायची. केवळ नदीकिनारीच नव्हे तर खडकीतही विविध प्रकारच्या शिलाखंडांचे वैविध्य आज पाहायला मिळते. एकाच योनी पिठावरती खडकीत पूर्वापार असलेले द्विलिंग या परिसरातले सांस्कृतिक आणि धार्मिक संचित आहे.

अशोक वृक्षाच्या सावलीत पाणथळ जागी वसलेले हे द्विलिंग महाशिवरात्रीला भाविकांना आकर्षित करते. म्हादई नदीपात्रात खडकीत पाण्याचे बरेच डोह आहेत, त्यापैकी ‘राजग्याची कोंड’ हे स्थळ खूपच प्रेक्षणीय आहे. म्हादईच्या डाव्या किनारी खालच्या आणि वरच्या बाजूला राजग्याची स्मृतीस्थळे आहेत.

दलित समाजात जन्मलेला राजगो स्वामीनिष्ठ, प्रामाणिक सेवक खडकी येथील मोकासदार राणे सरदेसाई यांच्या पदरी होता. नदीपल्याड जाऊन दरदिवशी आपल्या स्वामीला तो फुकट मिळणारी दारू आणून द्यायचा. त्याचे स्वामी असलेले राणे ही दारू कुत्र्याला थोडी पाजल्यानंतर आपण प्यायचे.

दरदिवशी दारू फुकट द्यावी लागत असल्याने एकदा दारू दुकानाच्या मालकाने दारूत विष घालून राण्यांपासून मुक्ती मिळवण्याचे षडयंत्र आखले. राजगो दारू घेऊन आल्यावर राणेंनी सवयीप्रमाणे त्यातली थोडी दारू आपल्या कुत्र्याला पाजली असता, अल्पावधीत तो तडफडून मेला.

राणेचा संशय राजग्यावरती बळावला आणि त्यांनी मागचा पुढचा विचार न करता प्रामाणिक राजग्याचा शिरच्छेद केला आणि त्यावेळी त्याचे शीर म्हणे तेथे पडण्याऐवजी मंदिरासमोर पडले आणि लोकांना सत्यघटना सांगितली. रागाच्या भरात आपण केलेल्या कृत्याचा राणेंना पश्‍चात्ताप झाला आणि खडकी, वेळग्यातल्या लोकांना त्याच्या त्यागी, सत्यवादी वर्तकाची प्रचिती आली.

त्यांनी राजगो याची स्मृती चिरंतन राहावी म्हणून त्याची प्रतिकृती असलेले स्मृतीस्थळ उभारले. त्याकाळी खडकीतल्या लोकांना नदीपल्याड होडीतून ने -आण करण्याची कामगिरी सेवाभावी वृत्तीने करणार्‍या राजग्याच्या कार्याची जाण होती आणि त्यासाठी नदीकिनारी आणि रस्त्याच्या वरच्या बाजूला उभारलेली राजग्याची स्मृतीस्थळे समस्त जातीजमातींसाठी वंदनीय ठरली.

राजगो जरी देहरूपाने आज नसला तरी म्हादई किनारी असलेली त्याची स्मृतीस्थळे त्याच्या कार्याचा सुगंध घेऊनच उभी आहेत.

खडकी, सावर्शे, भिरोंडा येथून म्हादई गुळेली गावात प्रवेश करते. गुळेली गावातले लोकजीवन, संस्कृती फुलवण्याचे कार्य म्हादई नदी शेकडो वर्षांपासून करत असल्याने, इथल्या भूमिपुत्रांनी जणू काही म्हादई नदीला मातृस्वरूपात पुजले ते नौकेत स्थानापन्न करूनच.

भारतीय मूर्तिकलेच्या क्षेत्रात ललामभूत ठरण्यासारख्या नौकारूढ मातृदेवतेच्या मूर्तीचे पूजन म्हादई नदीच्या दुतर्फा भिरोंडा, गुळेली, धामशे, शेळ- मेळावली, गांजे परिसरात पाहायला मिळते.

गुळेलीतल्या लोकजीवनात म्हादई नदी त्यांची ‘शीतकडी’च समृद्ध करत नव्हती, तर उद्योग, व्यवसायाला हातभार लावणार्‍या जलमार्गाचा आधार ठरली होती. शेती, बागायती फुलवून म्हादई, इथल्या कष्टकर्‍यांची अन्नदात्री ठरली होती. आणि त्यासाठी गुळेलीत अष्टभुजा देवीच्या दोन भग्न मूर्ती गतवैभवाची साक्ष देत उपेक्षित स्थितीत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

SCROLL FOR NEXT