Mahadayi River | Mahadayi Water Dispute Goa Dainik Gomantak
ब्लॉग

Mahadayi River: ‘म्हादई’चा बळी कोणी घेतला?

हीच वेळ आहे जागृत होण्याची. नाहीतर म्हादईचा ‘बळी’ घेण्याला केंद्र व राज्य सरकारसोबत आपल्यालाही भावी पिढी जबाबदार धरेल. -मिलिंद म्हाडगुत

दैनिक गोमन्तक

Mahadayi Water Dispute: सध्या राज्यात ‘म्हादई’ या विषयावर मोठे राजकीय नाट्य सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी म्हादईचे पाणी कर्नाटकाकडे वळविण्याच्या घेतलेल्या निर्णयावर कर्नाटकातच जाहीरपणे शिक्कामोर्तब केल्यामुळे वारे कोणत्या दिशेने वाहत आहे, याची कल्पना गोमंतकीय जनतेला यायला लागली आहे.

कर्नाटकाच्या विधानसभा निवडणुकीच्या अग्निकुंडात गोव्याची आहुती दिली जात आहे यात शंकाच नाही. पण अजूनही आपले मंत्री हे मानायला तयार नाहीत. अजूनही ते आपला लढा चालूच राहणार अशी ग्वाही देताना दिसत आहेत.

मंत्रिद्वय नीलेश काब्राल व सुभाष शिरोडकर यांनी जरी शहांच्या वक्तव्याचा निषेध केला असला तरी त्यालाही राजकीय नाट्याचा वास यायला लागलाय. शहांना निषेध करण्याएवढे धैर्य या मंत्र्यांनी कोठून आणले, हा प्रश्न उपस्थित व्हायला लागला आहे. दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री अजूनही न्यायालयाची भाषा बोलताहेत.

न्यायालय गोव्याच्या बाजूने निर्णय देईल असाच त्यांचा सूर दिसतोय. खरे तर अमित शहांच्या या वक्तव्याबाबत मुख्यमंत्र्यांनी आपली बाजू मांडायला हवी होती. पण, तसे झालेले दिसत नाही. त्यामुळेच ’तू मारल्यासारखे कर मी रडल्यासारखे करतो’अशातला हा प्रकार वाटायला लागला आहे.

म्हादईबाबत अन्याय झाल्यास आपण प्रसंगी राजीनामा देऊ, असे सांगणारे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक हेही आता ’तेरी भी चूप मेरी भी चूप ’अशा स्थितीत दिसत आहेत.

खरे तर म्हादई हा राजकारणाचा विषय नव्हे. हा जनतेच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. पण आज जनताही म्हणावी तेवढी जागृत झाली आहे असे वाटत नाही. खरे म्हणजे हे आव्हान युवकांनी पेलायला हवे होते. कुठल्याही लोकशाहीचा प्राण हा युवक असतो.

जेव्हा युवक पेटून उठतो तेव्हाच व्यवस्थेत बदल होत असतो. पूर्वीच्या कितीतरी उदाहरणांनी हे सिद्ध करून दाखवले आहे. 1986 साली राजभाषा आंदोलनालाही युवकांनीच ऊब दिली होती. त्यावेळी ‘दैनिक गोमन्तका’तून तत्कालीन संपादक नारायणराव आठवले यांनी केलेले आवाहन आमच्यासारख्या युवकांना स्फूर्ती देत असे.

‘तुटो हे मस्तक फुटो हे शरीर’ ही तुकोबांच्या अभंगातील ओळ तर आठवल्यांच्या स्फूर्तिदायक अग्रलेखांतून एखाद्या ब्रीदवाक्यासारखी अनेक युवकांना आंदोलनासाठी प्रवृत्त करणारी ठरलीे. पण आज तशी स्थिती दिसत नाही.

आजही ‘गोमन्तक’सारखे दैनिक तेच आठवलेंनी दिलेले वाण घेऊन वावरत आहे. जवळपास दर दिवशी या विषयावर प्रबोधन करत आहे. पण पूर्वीसारखा युवकांचा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. आजचा युवक आपल्या फायद्याचा विचार करताना दिसायला लागला आहे. परवा एक युवक हेच सांगत होता. ‘

‘सध्या आपले एका मंत्र्याकडे नोकरीबाबत प्रयत्न सुरू आहेत, आपण जर आंदोलनात उतरलो तर त्याचा परिणाम आपल्या संभाव्य नोकरीवर होऊ शकतो’, असे त्याचे म्हणणे पडले. अशी जर प्रत्येकाची मानसिकता झाली तर मग आंदोलन उभे राहणार तरी कसे व ‘आई ’म्हादईचे आपण रक्षण करणार तरी कसे हा सवाल मन:पटलावर नृत्य करायला लागतो.

म्हणूनच असेल पण विर्डी - साखळी येथे झालेल्या जाहीर सभेनंतर राज्यात याबाबतीत कोणतेही मोठे असे जन आंदोलन झालेले नाही.

विरोधकांतही मोठा दम आहे, असे वाटत नाही. हाक मारली तर पाचशे हजार लोक धावून येतील असा नेताही विरोधकांकडे नाही. 1985 साली रवी नाईक फोंड्यातील मगोचे आमदार असताना त्यांनी विधानसभेवर कूळ - मुंडकारांचा ‘न भूतो न भविष्यति’ असा भव्य मोर्चा नेला होता.

त्या मोर्चामुळे तत्कालीन मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे यांना कूळ मुंडकांराच्या प्रलंबित मागण्या मान्य कराव्या लागल्या होत्या. पण, आज तशा प्रकारचा जोर कोणत्याही विरोधी पक्ष नेत्यात दिसत नाही. त्यामुळे या आंदोलनाला हवा मिळेनाशी झाली आहे. आणि याच करता सत्ताधारी पक्षाची नाटके सुरू झालेली दिसताहेत.

आज आपण या प्रश्नाकडे काणाडोळा केल्यास उद्या नव्या पिढीच्या ‘असे का केले?’ या प्रश्नाला आपल्याकडे उत्तर असणार नाही. आणि याच करता ’तुटो हे मस्तक फुटो हे शरीर ’हा आठवलेंनी उद्घोषलेला तुकाराम महाराजांचा मंत्र घेऊन आपण रणांगणावर उतरायला हवे.

हीच वेळ आहे जागृत होण्याची आणि आपल्या हक्काकरता लढण्याची.नाहीतर आपल्याला कायमचे झोपावे लागणार आहे यात शंकाच नाही. म्हादईचा ‘बळी’ घेण्याला केंद्र व राज्य सरकारसोबत आपल्यालाही भावी पिढी जबाबदार धरेल हेही आपण विसरता कामा नये!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

...अन्यथा मनोहर पर्रीकरांना खोटारडे ठरवा; मंत्री माविन यांच्याविरोधात गोवा सरकार उच्च न्यायालयात जाणार का? चोडणकरांचा सवाल

Liquor Seized: गोवा बनावटीचे 35 लिटर मद्य जप्त! अनमोड चेकपोस्टवर कारवाई; कर्नाटकच्या चालकाला अटक

Viral Video: सापालाही आवडला नाही भोजपुरी गाण्यातला तो 'सीन', मोबाईलच्या स्क्रीनवर असं काय केलं की व्हिडिओ झटक्यात व्हायरल!

Viral Video: कोर्टात केस जिंकल्यावर भटक्या कुत्र्यांची गोव्यात पिकनिक; सोशल मिडियावर धुमाकूळ घालतोय व्हिडिओ Watch

Ganesh Chaturthi Best Status: गणपती बाप्पा मोरया! गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास 10 स्टेटस, Watch, Download, Share

SCROLL FOR NEXT