goa Dainik Gomantak
ब्लॉग

निसर्गाचे वरदान लाभलेला भीमगडातील आमगाव

गोमन्तक डिजिटल टीम

मधू य. ना. गावकर

हिमालयापूर्वी जन्मास आलेला पश्‍चिम घाट त्याचे सदोदित हसऱ्या चेहऱ्याने स्वागत करणारा अरबी समुद्र, घाटाने आपल्या अंगातून वाहिलेल्या आणि खाऱ्या पाण्यात सामील झालेल्या कैक गोड्या पाण्याच्या नद्या, दोन पाण्याच्या मीलनाने जन्मास येणारी जैवविविधता हे सारे पर्यावरणीय गुपित अजब आहे, पश्‍चिम घाट गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू राज्यात पसरला आहे.

या पर्वतराजीमध्ये निसर्ग सौंदर्य पहावयास मिळते. उंच शिखरे, बोडके डोंगर, घनदाट जंगल, खोल दऱ्या, नागमोडी वळणाचे रस्ते, रुपेरी पाण्याच्या नद्या, खळखळ वहाणारे धबधबे, शांतता दाखवणारे झरे, खडकाळ आणि गवताळ पठारे, त्यावर वावरणारे आदिवासी, झाडांना देव मानून टिकून ठेवलेल्या देवराया, पोसलेली शेळी, मेंढरे आणि दुभती जनावरे, गवताळ घरे, अन्नधान्य, पीक घेण्याची शेती. सदाहरीत जंगल, हिंस्त्रप्राणी, सस्तन प्राणी, सरपटणारे जीव, कृमी कीटक, गोड्या पाण्यातील मासळी, रानफळे, रानमेवा, औषधी वनस्पती त्यातील भव्यदिव्य पुष्प वैभव, मारट, सिसम, किंदळ, नाणा अर्जुन, सातीण लतावेली, शेकडो प्रकारच्या अळंबीजाती, असा हा अरबी समुद्राचा राखणदार पश्‍चिमघाट भारतभूमीत उभा ठाकला आहे.

आजचा महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या तीन राज्यांच्या सीमेवर भीमगड आणि म्हादई अभयारण्य दोन भागांचा परिसर विस्तारला आहे. पश्‍चिम घाटातील भीमगड कर्नाटकात आहे आणि दीपाजी राणे गड, वाघेरी, मोर्लेगड, सोसोगडसह म्हादई अभयारण्य गोवा राज्यात आहे. कदंब राजवटीत भीमगड परिसर आणि म्हादई अभयारण्य एकत्र होते.

कदंबनंतर आदिलशाही आणि मराठ्यांची राजवट आली, त्यांनी या अतिरमणीय प्रदेशाला विभाजनाचा प्रयत्न केला नाही. मात्र त्यांच्यानंतर आलेल्या पोर्तुगीज आणि इंग्रजानी पश्‍चिम घाटातील या रमणीय जंगल प्रदेशाचे दोन तुकडे केले. कदंब काळातील विशाल गोमंतकाचा मोठा भाग इंग्रजाना दिला आणि पेडणे ते काणकोण, मुरगाव ते सत्तरीपर्यंतचा भाग गोवा करून सोडला. रत्नागिरी, राजापूर, कणकवली, मालवण, वेंगुर्ला रेडी,

सावंतवाडी, बांदा, दोडामार्ग, कणकुंबी, चोर्ला, पारवाड, चिखली,जांबोटी, आमगाव, चापोली, गावळी नेर्सा, देगाव, जामगाव अनमोड, खानापूर, लोंढा, कॅसलरॉक, तिनईघाट, सुपा आणि कारवार हा मोठा प्रदेश इंग्रजाना बहाल केला. याचे कारण दोन्ही वसाहतवादी युरोपीयन असल्याने त्यांच्यात सोयरीकपण झाले आणि सात बेटांची मुंबई पोर्तुगीजानी इंग्रजाना हुंडा म्हणून कन्येस दान दिली.

सोयरीकेने मैत्री वाढल्याने भित्र्या पोर्तुगीजानी विशाल गोमंतकाचा एवढामोठा भाग हातावर पाणी सोडून इंग्रजाना सोपवला, मात्र आज त्याचे वाईट परिणाम गोव्याच्या जनतेला कर्नाटक सरकारकडून भोगावे लागत आहेत. भीमगड आणि म्हादई अभयारण्य परिसराचे दिव्यरुप टिकवण्यासाठी म्हादईने जन्म घेतला. तिच्या पात्र परिसरातील विविधता पाहिल्यावर हे सारे कळून येते.

तिचा उगम देगावात होतो. देगावातून गवाळी गावात पोहचल्यावर तिला गवाळीचा नाला मिळतो, गवाळी कडून ती नेर्सा गावात प्रवेशते आणि होडलीन्हय नाव धारण करते. तिथे जामगावचा भांडुरा नाला मिळतो, नेर्सा गावातून ती मोठ्या वळणाने कोगलान कबनाळी भागातून जांबोटीला येते, जांबोटी गावचा नाला घेऊन ती पुढे आणखी वळणाने परत गवाळी गावच्या खालच्या भागातून चापोली परिसरात येते.

त्या परिसरात तिच्या पात्रात तीन धबधबे आहेत, वज्रापोय धबधबा, शिरोडा धबधबा आणि आगवा ओझर. या तिन्ही धबधब्यांना भव्यदिव्य सुंदरता आहे. पावसाळ्यात त्यांचा वहाण्याचा लोट रौद्ररुप धारण करतो. चापोलीकडून ती आमगावात प्रवेश करते, त्या परिसरात तिच्या पात्रात दोन रमणीय स्थळे पहावयास मिळतात, कुरही धोरलो आणि वानराची खडी. त्या परिसरातील चिखली गावातून वहाणारी बैलनदी मिळते आणि म्हादई अक्राळविक्राळ रुप धारण करण्यास सुरवात करते.

पुढे म्हादई कृष्णापूरला येते. तिथे इरटी नाल्याचे पाणी घेऊन म्हादयी गोव्यात प्रवेश करते, गोव्यात ती मरुडला नाला आणि पानशीरा अशा दोन नाल्याना सोबत घेऊन म्हादई अभयारण्यातून उस्ते गावात कळसा नाला सोबतीला घेऊन खालच्या भागातील किनाऱ्यावरील गावांना पुरणशेती करण्यास सुपीक गाळ पुरवते, याच पुरण शेतीवर सत्तरीचा भूमिपुत्र वाढला, मोठा झाला.

कर्नाटकातले भीमगड अभयारण्य असले तरी निसर्गाने त्याची उत्पत्ती म्हादईचे जंगल आणि गोव्यातील जैवविविधता पोसण्यासाठी जगवण्यासाठी निर्मिती केली आहे. चिखली, पारवाड, कणकुंबी, चापोली, जांबोटी, गवाळी, नेर्सा, कोगलान, कबनाळी, देगाव, जामगाव आणि आमगाव हे गाव भीमगड जंगलाच्या परिघात येतात, या गावात नैऋत्य माॅन्सून मोठ्या प्रमाणात पडतो,

जून ते सप्टेंबर पर्यंत या भागात पाऊस दररोजच असतो, आमगाव हे गाव भीमगडाच्या मध्यवर्ती भागात येते. आमगावात दोन डोंगराच्या मधून मोठी विशाल दाट वनराईने नटलेली दरी निसर्गाने निर्माण केली आहे, ती पश्‍चिम बाजूने गोव्यातील म्हादई अरण्याच्या दिशेने असल्याने, अरबी समुद्राकडून येणारे पावसाचे ढग ते दोन डोंगर आणि आमगावच्या पूर्वेस असलेला उंच डोंगर ढगाना तिथेच थोपवून धरतात,

त्यामुळे आमगावात दहा हजार मि.मी पावसाची नोंद होते.आमगावच्या लोकांनी कैक वर्षापासून पाऊस मोजण्याची यंत्रणा गावात बसवलेली आहे. त्या यंत्रणेतून तिथे पडणारा पाऊस गावचे लोक मोजमाप करतात, ही त्यांच्याकडून माहिती मिळाली. पण हल्लीच्या काळात कर्नाटक सरकारने कळसा, भांडुरा नाल्यावर धरणे बांधण्यासाठी डोंगरात खुदाई केल्याने त्याचा वाईट परिणाम पाणी आणि जंगलावर दिसू लागला आहे. हल्ली तिथे पडणाऱ्या पावसाची सरासरी दहा हजारावरुन सहा हजार मि. मीटरावर पोहचली आहे, त्यामुळे तिथले लोकही चिंता व्यक्त करतात.

बेळगाव गोवा मुख्य रस्त्याने चिखली गावात शिरताच तापलेले वातावरण थंड होण्यास सुरवात होते. चिखली जंगलातून आमगावला बराच लांबचा प्रवास करावा लागतो. जाताना खडकाळ रस्त्याने जावे लागते, त्या गावात माणसाना प्रवेश करण्यास बंदी आहे. वनाधिकाऱ्याना समर्पक उत्तरे देऊन त्यांच्या परवानगीने आत जाता येते.

जाताना चमत्कारीक सृष्टीने अलंकार डोळ्याना दीपवतात. सदाहरीत जंगल, कैक पक्ष्यांच्या शिळ्या, रानटीजनावरे, त्यांना सावध करणारा शेक्रु, कैक प्रकारचे सरपटणारे प्राणी, सस्तन प्राणी, दाट गवताची मळे, गुळगुळीत दगडांची पठारे, त्यातून वाहणाऱ्या उपनद्या, डोंगरांची उंच शिखरे, विविध प्रकारच्या वनस्पती, वेगवेगळी रानटी फुले, आर्कीड, रानमेवा, कंदमुळे, दोन डोंगरांत लांबलचक दऱ्या त्यामध्ये खोलातून वहाणारी म्हादई, त्यातील मासळी, आमगावची मोठ्या झाडांची देवराई असे हे गाव पावसाच्या सरासरीत, आगुंबे, मौसीमराम, चेरापुंजी, महाबळेश्‍वर अशा भारतातील प्रसिध्द वर्षा ठिकाणांच्या सरसरीला मागे टाकते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sadanand Shet Tanavade: संसदेच्या वाणिज्य स्थायी समिती सदस्यपदी सदानंद शेट तानावडे यांची निवड

Bashudev Bhandari Missing Case: बाशुदेव भंडारी बेपत्ता प्रकरणी संशयितांची पोलिसांकडून कसून चौकशी; केंद्रीय गृहमंत्रालयाने दखल घेताच तपासाला वेग

Badlapur Encounter: अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी राजकीय दावे विरुद्ध जनतेचा पाठिंबा; ''देवानेच न्याय केला...''

MP Viriato Fernandes: गोवा आणि गोमंतकीयांसाठी अभिमानाचा क्षण! देशाच्या संरक्षण समितीवर कॅ.विरियातो फर्नांडिसांची नियुक्ती

Goa Politics: 'मुख्यमंत्री महोदय 2 लाख नोकऱ्यांबाबत तपशीलवार माहिती द्या...'; कॉंग्रेसचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT