डॉ. प्राची गणपत जोशी
सैल यांचे बालपण शेती संस्कृतीने संस्कारीत झाले आहे. त्यांनी स्वतः शेतात काम केले. त्यांच्या सर्व कादंबऱ्यांमध्ये शेती, कृषी संस्कृती यावर आस्था दिसून येते. गोमंतक प्रदेशाला साहित्य आणि संस्कृती यांचा अपूर्व ठेवा लाभला आहे व या दोन्ही बाबतींत आपला गोमंतक भाग्यशाली आहे. कारण ह्या भौगोलिकदृष्ट्या छोटेखानी असणाऱ्या या प्रदेशात अनेक संस्कृती आणि भाषा एकत्र नांदतात. एवढेच नाही तर या भाषेतून साहित्य निर्मितीही केली जाते. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे हल्लीच सरस्वती सन्मान पुरस्कार प्राप्त झालेली व्यक्ती महाबळेश्वर सैल.
महाबळेश्वर सैल मराठी आणि कोकणी अशा दोन्ही भाषांमधून समर्थपणे लिहितात. 1972 साली त्यांची पहिली मराठी कथा प्रसिद्ध झाली. तेव्हापासून ते आजतागायत अखंडितपणे सुमारे 45वर्षे सातत्याने आपल्या लेखनाद्वारे मराठी व कोकणी साहित्याच्या क्षेत्रात त्यांनी गुणात्मक भर घातली असल्याचे दिसून येते. मातृभूमी, मातृभाषा आणि मातीशी निगडित संस्कृतीशी त्यांचा फार जवळचा संबंध असल्याचे जाणवते. सैल हे एक उत्कृष्ट नाटककार, कथाकार व कादंबरीकार म्हणून केवळ गोवा व महारष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतातील साहित्य क्षेत्रात त्यांची ओळख आहे. भारतीय सैन्यातील स्वाभिमानी सैनिक म्हणून त्यांनी आपले जीवन देशाला अर्पण केले आणि तेव्हापासून निवृत्त झाल्यानंतर कोकणी साहित्याच्या क्षेत्रात एक स्वयंभू आणि प्रतिभावंत कादंबरीकार म्हणून त्यांनी स्वतःची स्वतंत्र नाममुद्रा उमटवली आहे.
1982 ते 1933 म्हणजे साधारणतः 10 वर्षे सातत्याने कोकणीत कथा लेखन केल्यानंतर ते कादंबरी लेखनाकडे वळले व काळी गंगा ही त्यांची पहिलीच कादंबरी असूनही तिने वाचकांचे लक्ष वेधून घेतले. महाबळेश्वर सैल ह्यांचे बालपण शेती संस्कृतीने संस्कारीत झाले आहे, कारण त्यांचा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला आहे. त्यांनी स्वतः शेतातील काम केले आहे व त्यांच्या सर्व कादंबऱ्यांमध्ये शेती, कृषी संस्कृती याविषयी त्यांना असणारी आस्था व्यक्त झाली आहे. फ्रेंच समीक्षक हिप्पोलेत तेन म्हणतात त्या प्रमाणे लेखक ज्या समाजाचा घटक असतो, त्या समाजाचे संस्कार त्याच्यावर झालेले असतात व त्याचे प्रतिबिंब त्याच्या साहित्य कृतीत प्रगट होत असते. महाबळेश्वर सैल यांच्या काळी गंगा, युगसांवार, हावठण ह्या तिन्ही कादंबऱ्यांमध्ये तत्कालीन समाज व्यवस्थेवर लेखकाने भाष्य केले आहे. त्यांच्या या कादंबऱ्यांमधून तत्कालीन समाज जीवनात शिक्षणाविषयी असणारी अनास्था, दारूचे व्यसन ह्यावर लेखकाने भाष्य केले आहे.
1. काळी गंगा : महाबळेश्वर सैल यांच्या काळी गंगा या कादंबरीत कारवार परिसरातील शेतकरी म्हणजेच कुळवाडी समाज हा केंद्रस्थानी आहे. या समाजाच्या अनुषंगाने त्यांची जीवन प्रणाली, जीवनविषयक दृष्टिकोन कादंबरीत विस्ताराने चित्रित करण्यात आला आहे. आपले संपूर्ण आयुष्य शेती व्यवसायात घालवणारा गावडा/कुळवाडी समाज हा प्रातिनिधिक स्वरूपात या कादंबरीत आला आहे. शेती आणि गाव सोडून तो बाहेर अन्यत्र कुठेही जाताना दिसत नाही की कसले वेगळे काम करताना दिसत नाही.
2. खोल खोल मुळां : ‘खोल खोल मुळां’ या कादंबरीत गोमंतकीय ख्रिस्ती गावडा समाजाचे चित्रण आले आहे. आपल्या जातीचा प्रचंड अभिमान असणारा हा समाज अर्थार्जनासाठी पारंपरिक शेतीभातीची कामे करून कोणतीही कामे करायला तयार होतो. समाजातील सबळ घटक त्यांचे शोषण करतो, परंतु काहीही झाले तरी पैशांसाठी अपमानास्पद जीवन जगणे नाकारणारा स्वाभिमानी गावडा या कादंबरीत दिसून येतो. .
3. युगसांवार : युगसांवार या कादंबरीत महाबळेश्वर सैल यांनी तत्कालीन गोमंतकीय समाज जीवनाचे चित्रण केले आहे. त्यांच्या या कादंबरीत कोणा एका विशिष्ट समाजाला महत्त्व त्यांनी दिले नाही, तर यामध्ये गुरव, देवळी, वाजंत्री, भोयी, तेळू, सत्रेकार, सांगणेकार, दिवटेकार, कलवंत, म्हार, म्हाले, मेस्त, कुंभार, सारस्वत, ब्राह्मण, बाटवून ख्रिस्ती झालेला समाज व पोर्तुगालमधील ख्रिस्ती मिशनरी, पाद्री इ. समाजाचे तपशीलवार चित्रण केले आहे.
4. हावठण : महाबळेश्वर सैल यांच्या हावठण या कादंबरीत कुंभार समाजाचे चित्रण आले आहे. प्रस्तुत कादंबरीत कुंभार समाजाच्या पारंपरिक व्यवसायाचा वेध घेऊन त्यातील प्रश्न, समस्या चित्रित केल्या आहेत. ह्या समाजाची उत्पत्ती, त्यांचा इतिहास याविषयी कादंबरीच्या सुरवातीला संक्षिप्त चर्चा करून मातीची भांडी तयार करण्याच्या पध्दती उदाहरणासहित चित्रित केल्या आहेत, तसेच औद्योगिकरण, जागतिकीकरण याचा या समाजावर व त्यांच्या व्यवसायावर होणाऱ्या परिणामांमुळे त्यांच्या जीवनात नेमक्या कोणत्या समस्या निर्माण झाल्या आहेत याविषयी विस्ताराने चर्चा केली आहे.
5. अदृष्ट : अदृष्ट या लघु कादंबरीत चित्रित झालेल्या समाजाचा प्रत्यक्ष उल्लेख कादंबरीत येत नाही मात्र गावात राहणारा, ग्रामीण संस्कृतीशी जवळचे नाते असणारा, परंपरेने चालत आलेले पारंपरिक जीवन जगणारा असा हा समाज आहे.
6. अरण्यकांड : अरण्यकांड या कादंबरीत स्थलांतरित समाजाचा प्रश्न लेखकाने मांडला आहे. ह्या कादंबरीत निसर्ग आणि माणूस यांच्यामधील संघर्षाचे चित्रण आले आहे. आदिमकाळापासून चालत आलेला श्रीमंत आणि गरीब यांच्यामधील कलह, निसर्ग आणि माणूस यांच्यामधील भांडण, समाजातील सबळ आणि दुर्बल घटकांमधील संघर्ष, जातीभेद, वर्णभेद, व्यक्ती व्यक्तीमधील भावनिक संघर्ष परिस्थिती शरण आलेल्या माणसाचे मानसिक संघर्ष या संपूर्ण कादंबरीत पाहायला मिळतो.
7. विकार विळखो : महाबळेश्वर सैल यांच्या ‘विकार विळखो’ या कादंबरीतही त्यांच्या इतर कादंबरीप्रमाणेच ग्रामीण भागातील समाज आला आहे. शेत बागायती करून आपला उदरनिर्वाह करणारा ह्या समाजाची जागतिकीकरण, औद्योगिकीकरण यांच्या परिणामांतून बदलेली मानसिकता व त्यातून निर्माण झालेली व्यसनाधीनता, वाढती बेकारी, पारंपरिक व्यवसायाविषयी तरुणांची अनास्था व त्यातून या समाजाची होणारी व झालेली पडझड या कादंबरीत अतिशय जिवंतपणे लेखकाने बोलक्या शब्दांत चित्रित केली आहे.
8. माती आनी मळब : ‘माती आनी मळ’ ही त्यांची आत्मचरित्रात्मक कादंबरी आहे. प्रस्तुत कादंबरीतून सैल यांच्या जीवनाचा पटच त्यांनी चित्रफितीप्रमाणे मांडला आहे.
9. अग्रदूत : ‘अग्रदूत’ ही त्यांची पौराणिक विषयाला वाहिलेली कादंबरी असून यात रामायणातील हनुमानाचा वास्तवाशी संबंध जोडण्याचा प्रयत्न केला आहे.
सैल यांच्या अशा या 45 वर्षाच्या दीर्घ साहित्यिक प्रवासाला अनेक मानसन्मान त्यांच्या साहित्यिक प्रतिभेला प्राप्त झाले आहेत. आज सैलांच्या कादंबरीने भारतीय साहित्य-विश्वाला कोंकणी साहित्याची वैशिष्टये, वेगळेपणा आणि तिची उंची दाखवून दिली आहे. हल्लीच त्यांना के. के. बिर्ला फाऊंडेशनचा सरस्वती सन्मान हा राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार प्राप्त झाला आहे. ज्ञानपीठ पुरस्काराइतकाच श्रेष्ठ समजला जाणारा असा हा पुरस्कार आहे. या पुरस्काराने महाबळेश्वर सैल यांना गौरवले, हा गौरव फक्त त्यांचा नसून तो संपूर्ण कोंकणी साहित्य प्रतिभेचा आहे.
कोंकणी व मराठी अशा दोन्ही भाषेतून सातत्याने व समर्थपणे लिहिणारा हा लेखक, त्यांच्या साहित्यनिर्मितीचा हा प्रवास फार मोठा आहे. त्यांनी 1990 नंतरच्या काळात म्हणजेच थोडेसे उशिरा जरी साहित्याची निर्मिती करायला सुरवात केली असली तरी त्यानंतर आजतागायत त्यांनी मागे वळून पाहिले नाही. गोमंतकातील प्रामुख्याने उपेक्षित व कष्टकरी समाजाचे चित्रण त्यांनी अतिशय प्रभावीपणे त्यांच्या सर्वच साहित्य प्रकारातून केले असल्याचे दिसते व त्यांचे विशेष कौतुक म्हणजे आजही त्यांच्या मनात साहित्यनिर्मितीची तळमळ जिवंत आहे जी प्रत्येक तरुणासाठी प्रेरणादायी आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.