राजेंद्र केरकर
डिचोलीतील हिरा टॉकिज थिएटरच्या उजव्या बाजूचा रस्ता लामगावच्या म्हात्रई मंदिरापर्यंत जातो. तेथे दुतर्फा उभ्या असलेल्या घरांच्यामधून जाणारी छोटेखानी वाट आहे. ‘रुद्रेश्वर’ म्हणून परिचित असलेल्या शैव पंथीयांच्या ऐतिहासिक गुंफेकडे जाते.
तेथून काही अंतरावर असलेल्या जांभ्या दगडांच्या गर्दीकडे गेल्यावरती आपण मानवनिर्मित महाकाय आणि गुढतेच्या दुलईत विसावलेल्या गुंफेकडे पोहोचतो.
आज ही गुंफा अनैतिक बाबींसाठी वापरली जात असल्याने प्लास्टिक कचऱ्याने ग्रस्त आहे. रात्रीच्या वेळेला ही गुंफा लोह खनिजाच्या उत्खननाची विस्थापित झालेल्या रानडुक्कर, साळिंदर या सारख्या वन्यजिवांचे आश्रयस्थान ठरलेली आहे. सस्तन प्राण्यांत गणना होणाऱ्या वटवाघळांसाठी ही गुंफा नैसर्गिक अधिवास ठरल्याने त्यांचा मलमूत्राची दुर्गंधी इथे नित्याचीच झालेली आहे.
लामगावातल्या रुद्रेश्वराच्या गुंफेत श्रावणातल्या सोमवारी आणि शिमग्याचा पुर्वी येणाऱ्या महाशिवरात्रीच्या उत्सवामुळे भाविकांची गर्दी उसळत असल्याने, ही गुंफा परिचित आहे. परंतु या शैव पंथीयांच्या गुंफेपेक्षा अधिक प्राचीन आणि गोव्यातल्या बौद्ध इतिहासाची आणि संस्कृतीची साक्षीदार असलेली गुंफा उपेक्षेच्या गर्तेत गुरफटली आहे. मान्सूनात कोसळणारी पर्जन्यवृष्टी आणि वादळवारा, सूर्यप्रकाश यांच्या माऱ्यापायी विस्मृतीत जाण्यच्या वाटेवरती आहे.
भगवान गौतम बुद्धाने कर्मकांडाचा त्याग करून, आपल्या शिष्यांना बुद्धिवादाचा आश्रय घेण्यास सांगितले. ‘तुम्ही आत्मदीप व्हा आणि आत्मशरण व्हा’, असा संदेश दिला. व्यवहाराच्या कक्षेत बौद्ध पंथाने सर्वांना समान अधिकार प्रदान केला.
पंथाच्या प्रवर्तकाला लोकोत्तर व्यक्तिमत्त्व लाभल्याने त्याग, तपस्या, शांती आणि अहिंसेचा पुरस्कर्ता गौतम बुद्ध त्रिरत्नकल्पनेत अग्रस्थानी आहे पांथिक विचारांच्या आचारासाठी व प्रचारासाठी आवश्यक अशी दीक्षा घेतलेली आणि शिस्तीत वाढलेला ‘संघ’ या पंथाने संघटित केला.
बौद्ध पंथाची उभारणी बुद्धिवादावर झालेली आहे. बुद्ध, संघ आणि पंथ यांच्यावरती आधारलेला बौद्ध पंथ मौर्य सम्राट अशोकाच्या कारकिर्दीत देशविदेशात पोहोचला. गोव्यात रिवण, कोलवाळ, पणजी आणि लामगाव येथे एकेकाळी बौद्ध पंथाचा प्रसार झाला होता, त्याची प्रचिती देणारी ऐतिहासिक संचिते इथे आढळलेली आहेत.
डिचोलीतल्या लामगावात एका टोकावरती विसावलेली जी लोहयुक्त जांभ्या दगडात महाकाय गुंफेची निर्मिती करण्यात आली होती, ती बौद्ध पंथाचा प्रचार करणाऱ्या भिख्खुंचे आश्रयस्थान बनली होती.
बारमाही चवदार आणि थंडगार पाण्याची उपलब्धता, भाताची भरपूर पैदास करणारा शेजारचा भतग्राम, मुख्य मांडवीशी डिचोली नदीद्वारे जोडला गेलेला बंदीरवाडा आणि साधनेसाठी पोषक वातावरण यामुळे डोंगर गेलेला बंदीवाडा आणि साधनेसाठी पोषक वातावरण यामुळे डोंगर उतारावरची आणि जंगलाच्या सान्निध्यातली लामगावची गुंफा भिख्खुंसाठी विहार ठरली.
तिबेटीयन भाषेत बौद्ध भिख्खुंना ‘लामा’ ही संज्ञा असून लामांशी संबंधित असल्याने हा गाव ‘लामग्राम’ किंवा ‘लामगाव’ म्हणून परिचित झाला आसावा, असा मतप्रवाह इतिहासकारांत रूढ आहे.
कर्नाटकातल्या हिरेगुट्टीच्या ताम्रपटात दीपक विषयातील सुंदरिका गाव बौद्ध विहाराला दान दिल्याचा जो संदर्भ आढळतो त्यावरून दीपक विषय ही डिचोली किंवा दिवचल तर सुंदरिका म्हणजे येथील सुंदर पेठ असल्याचे मत इतिहासाचे अभ्यासक लक्ष्मण पित्रे यांनी मांडलेले आहे.
जर्मन विदुषी डॉ. ग्रितल्ली मित्तलवॉल्वर यांनी लामगावच्या गुंफेचा बौद्ध परंपरेशी नाते सांगणाऱ्या अन्य गुफांच्या खोदकामाचा आणि शिल्पकलेचा तौलनिक अभ्यास करून, ‘पांडवांच्यो होवऱ्यो’ म्हणून परिचित असलेली ही गुंफा बौद्ध धर्माशी निगडीत आहे असे जे मत शणै गोंयबाब यांनी मांडले होते, त्याच्यावरती शिक्कामोर्तब केले होते.
आज या गुंफेतल्या खोदकामाची पडझड आणि शिल्पकामाची सुंदरता नष्ट झाल्याने, येथे उत्तर आणि दक्षिणेकडे खोल्या होत्या की नाही हे स्पष्ट सांगणे कठीण असल्याचे मित्तलवॉल्वर यांनी म्हटलेले आहे.
ही गुंफा इसवी सनाच्या सहाव्या शतकातली असून तत्कालीन भोजवंशीय राज्यकर्यांकडून तिला राजाश्रय लाभला होता.
या गुंफेच्या खोदकामात गुंतलेल्या शिल्पकारांनी चैत्याच्या धर्तीवरती खिडक्यांचे खोदकाम, त्याचप्रमाणे तेथे अस्तित्वात असलेल्या चार ही खांबांवरती नक्षीकाम केल्याचे मत रूढ आहे. कर्नाटकात बदामी येथील तिसऱ्या क्रमांकाच्या गुंफेशी लामगावच्या गुंफेची साम्य स्थळे आढळलेली आहेत.
लोहयुक्त जांभ्याच्या दगडातल्या गुंफेच्या खोदकामाला कालांतराने आधार न लाभल्याने, ही लामगावची गुंफा अर्धवट राहिली आणि आज उपेक्षेमुळे विस्मृतीत जाण्याच्या वाटेवरती आहे.
डिचोली शहराच्या कक्षेत असलेले बोर्डे, लामगाव हे एकेकाळी स्वतंत्र गाव म्हणून अस्तित्वात होते. आज तिन्ही गावांचा समावेश डिचोली नगरपालिका क्षेत्रात होत असला, तरी बोर्ड आणि लामगावच्या पुरातत्त्वीय आणि ऐतिहासिक संचिताद्वारे इथल्या लौकिकाची प्रचिती येते.
डिचोली हे ग्रामनाम खरे तर धीवर म्हणजे ‘डिचो’ आणि ‘हल्ली’ म्हणजे गाव यांच्या संयोगातून जन्माला आलेले आहे. बारमाही हिरवळ आणि पाणी वाहते असणाऱ्या गावात मासेमारीमुळे किंगफिशर ठरलेल्या डियो पक्षी मुबलक प्रमाणात आढळायचे- डिचोलीचे पूर्वाश्रमीचे नाव इथे विविध प्रकारच्या भाताची लागवड होत असल्याने भतग्राम झाले असावे.
सारमानस-पिळगाव येथे मुख्य मांडवी नदीशी जोडलेल्या डिचोली नदीच्या काठावरती वसलेल्या या गावात होड्या, गलबतांतून यात्रेकरू, प्रवासी यायचे. आज बंदीरवाडा म्हणून ओळखली जाणारी जागा छोटेखानी बंदर होते आणि तेथून जाणारा जलमार्ग देश विदेशांतून येणाऱ्या लोकांशी संबंधित असला पाहिजे.
घाटमाथ्यावरच्या बऱ्याच संस्थानिकांसाठी दर्जेदार अरबी घोड्यांना डिचोलीतून नेले जायचे. मयेहून डिचोली शहराकडे येणारा पाजवाडा घोेड्यांशी संबंधित होता.
बंदीरवाडा, पाजवाडा, सुंदर पेठ आदी नावांनी ओळखले जाणारे वाडे डिचोली शहराचे पूर्वीपासून असलेले व्यापार उद्योगातले महत्त्व स्पष्ट करतात.
पश्चिम किनारपट्टीवरून गुजरातातले जैन आणि मारवाडी जसे डिचोलीतल्या हिंदोळेत आले, त्याचप्रमाणे तिबेटहून दक्षिण भारताच्या दिशेने येणारे बौद्ध परंपरेचे पाईक असणारे लामा आले नसते तर नवल मानावे लागेल. लामांचे वास्तव्य बारमाही मुबलक पाणी आणि भाताची लागवड होणाऱ्या लामगावातल्या बौद्ध विहारात असली पाहिजे.
लोहयुक्त जांभ्या दगडांत गुंफा कोरड्याचे कसब विज्ञान आणि तंत्राचे ज्ञान असणाऱ्या बौद्ध भिक्षूंकडे असले पाहिजे. या गुंफेसाठी जांभ्या दगडांत केलेले कोरीव काम, खोदकाम, भुयार त्याचप्रमाणे पाण्याचे खोदलेले पाट आदी पुरात्त्वीय संचिते गोव्यातल्या बौद्ध पंथ आणि परंपरेची प्रचिती आणून देतात.
डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या कातळात कोरलेली लामगावची बौद्ध पंथियांशी संबंधित गुंफा प्रारंभीच्या काळातील लोकजीवन, श्रद्धा व परंपरा यांना जवळची होती.
इथले हे शैलशिल्प हा बौद्ध कलाकौशल्याचा आविष्कार होता याचा निष्कर्ष लामगावच्या गुंफेच्या एकंदर कलाकुसर, रचनेद्वारे इतिहास संशोधकांनी काढलेला होता, त्याला तौलनिक अभ्यासाची पार्श्वभूमी आणि संशोधनातली व्याप्ती लाभलेली आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.