Police
Police Dainik Gomantak
ब्लॉग

Gomantak Editorial: खाकी वर्दीला गुंडांचे आव्हान

गोमन्तक डिजिटल टीम

Gomantak Editorial भक्कम अस्तित्वाद्वारे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना आणि गुंडप्रवृत्तीला भयगंड निर्माण करण्याची ताकद भ्रष्टाचाराने पोखरलेल्या पोलीस यंत्रणेत राहिलेली नाही, असे आम्हाला खेदाने म्हणावे लागत आहे. झुआरीनगरातील चोरट्यांनी पोलिसांवर केलेला गोळीबार, लोटलीत वृद्ध महिलेला लुटण्याच्या प्रकाराने गृहखात्याला आरसा दाखवला आहे.

अर्थात कोळसा कितीही उगाळला तरी काळाच राहतो, हे गृहखात्याने अनेकदा सिद्ध केले आहेच. दक्षिण गोव्यात दोन दिवसांत चोरीचे जे चार प्रकार घडले, त्यात तीन चोरटे, दुचाकीचा वापर असा समान धागा सापडतो. आणखीही असे प्रकार उघडकीस येत आहेत.

चोरट्यांना गजाआड करण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे. वास्कोतील बंद बंगला फोडण्याचा प्रयत्न हाणून पाडणारे जागरूक नागरिक व शस्त्रधारी चोरांना पकडण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक, गृहरक्षकाने जे धैर्य दाखवले, त्याला दाद द्यायलाच हवी;

परंतु हा मुद्दा तेवढ्यापुरता सीमित नाही. राजकीय पुढाऱ्यांच्‍या आशीर्वादाने पोलिसांच्या बळावर पोसलेल्या गुन्हेगारीने खाकी वर्दीला दिलेले नवे आव्हान आहे.

दक्षिण गोव्यातील सुप्तावस्थेतील गुन्हेगारीचे अनेक आयाम आहेत. झुआरीनगरमधील घरफोडी असो वा लोटलीतील सोनसाखळी हिसकावण्याचा प्रकार असो, चोर सराइत होते.

पोलिसांवर हल्ला केल्यानंतर आजूबाजूला नाकाबंदी करूनही चोरटे सापडले नाहीत, याचाच अर्थ त्यांनी रेकी केली होती वा त्यांचा त्याच भागात रहिवास असावा.

रस्त्यांची चोख माहिती नसती तर एव्हाना ते पोलिसांच्या तावडीत सापडले असते. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी परप्रांतीय विशेषतः स्थलांतरितांकडून गोव्यात वाढणाऱ्या गुन्ह्यांबाबत भाष्य केले होते. पोलिसांकडील आकडेवारीने त्यात तथ्य असल्याचे दाखवूनही दिले आहे.

बिहार, राजस्थान, काश्मिरातून रेल्वेने झुंडीच्या झुंडी गोव्यात दाखल होतात. ती माणसे कुठे जातात? काय करतात? याचा पोलीस माग घेतात का? जे मूळ गोमंतकीय परप्रांतीयांच्या नावाने बोटे मोडतात, तेच घराच्या चोहोबाजूंनी भाडेतत्त्वावर निवासी व्यवस्था निर्माण करून देतात; परंतु कागदोपत्री पोलिसांत नोंद क्वचितच असते.

अशा घरमालकांना पोलीस जेव्हा अटक करतील तेव्हाच त्यांना धाक बसेल. गोव्यात जी-२० परिषदेच्या निमित्ताने अनेक भागांत गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या ६८ गुंडांसह ८००हून अधिक जणांची धरपकड करण्यात आली.

परप्रांतीय ६८१ भाडेकरूंचीही पडताळणी झाली. परंतु त्यात सातत्य राहत नाही. अतिमहनीय व्यक्ती येण्याचे घाटते तेव्हाच सरकारी यंत्रणांची कार्यतत्परता जागृत होते, एरवी अजगरासारखी निपचित असते.

राजकारणात बस्तान बसवलेल्या बहुतांश लोकप्रतिनिधींनी गुंड पोसले आहेत. राजाश्रयानेच दक्षिण गोव्यात अनेक टोळ्या कार्यरत आहेत, हे उघड सत्य आहे. वाळू माफिया, सुवर्ण व्यावसायिकांना धाक, मच्छीमारांना दादागिरी, हप्ते वसुली बिनबोभाटपणे सुरू आहे. कुख्यात गुंड अन्वर शेखवर मडगावात दिवसाढवळ्या विरोधी गटाने हल्ला चढवला होता.

त्याच्यावरही अशाच बेकायदेशीर बंदुकीने गोळी झाडली होती. जेव्हा दोन गटांत वर्चस्वावरून वाद होतो, तेव्हा वास्तव समोर येते. कोलवा येथे घडलेले गँगवॉर त्याचे ताजे उदाहरण आहे. चाकू, सुरे, कोयत्याने एकमेकांवर वार झाले.

असे प्रकार घडतात आणि पोलीस बघ्याची भूमिका घेतात हे संतापजनक आहे. कोलवाळ तुरुंगातून प्रतिस्पर्धी गटातील गुंडांना जीवे मारण्याची धमकी दिली जाते आणि त्याचे व्हिडिओ व्हायरल होतात. तुरुंगात कैद्यांपर्यंत ड्रग्ज, मोबाइल कसे पोहोचतात, याची राज्य सरकारने कसून चौकशी केल्याचे कधीही ऐकिवात नाही.

केली असेल तर जरब बसण्याजोगी कोणतीही कठोर पावले उचललेली नाहीत. माजी तुरुंग महानिरीक्षक बॉस्को जॉर्ज यांनी शिस्तीचा अटोकाट प्रयत्न केला, पण आतील पोखरलेल्या यंत्रणेसमोर तेही हतबल झाले होते.

रवि नाईक मुख्यमंत्री असताना गृहखात्याची जी ताकद दिसली होती, त्याची अनेक लोक आजही आजही आठवण काढतात. अशा प्रकारच्या कठोर भूमिकेचे साधे तरंगही उमटत नाहीत. ठरावीक पोलीस ठाण्यांचा ताबा मिळवण्यासाठी पैशांच्या थैल्या रिकाम्या केल्या जातात, त्याची भरपाई मग गुंडगिरीला संरक्षण देऊन होते.

पोलिसांना माहिती पुरवणारे खबरे आता राहिलेले नाहीत. पोलीस गुंडांशी हातमिळवणी करू लागल्याने खबऱ्यांची गरज राहिली नसावी. बंद घरांना चोरांकडून नेहमीच लक्ष्य केले जात असल्याने घरमालकांनी सीसीटीव्ही लावून घ्यावे, सुरक्षारक्षक नेमावे, अशी भूमिका घेऊन पोलिसांनी हात वर केले आहेत.

झुआरीनगर येथे पोलिसांवर गोळीबार झाल्यानंतर लोकांमध्ये भीतीचे निर्माण झाले आहे. मुख्यमंत्र्यांकडेच गृहखाते आहे. त्यांनी गुंडांचा बिमोड करून दाखवावा. लोक त्यांना डोक्यावर घेऊन नाचतील.

पोलिसांची भीती गुंडांना वाटली पाहिजे, ती नागरिकांनाच वाटू लागते तेव्हा त्याला सुशासन म्हणता येत नाही. याचेच पुढचे पाऊल म्हणजे लोक पोलिसांकडे जाण्याऐवजी गुंडांकडे मदत मागायला जाऊ लागतील.

गुन्हेगारीची गती, दिशा व मिळणारा राजाश्रय पाहता ती परिस्थिती गोव्यात यायला फारसा वेळ लागणार नाही. खाकी वर्दीला गुंडांनी आव्हान देणे, गुंड डोईजड होणे खचितच परवडण्याजोगे नाही.

पोखरलेले प्रशासन आणि सडलेली व्यवस्था यांची पुनर्बांधणी करणे गरजेचे आहे. पोलिसांनी स्वत:चे आणि सरकारने पोलिसांचे ब्रीद राखणे उचित व हिताचे ठरेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Session Court: वेश्याव्यवसाय प्रकरणी दोषी ठरलेल्या विजय सिंग याला गुरुवारी ठोठावली जाणार शिक्षा

Canacona: तपासणी टाळण्यासाठी समुद्रातून मद्य तस्करी; काणकोण येथे एकाला अटक

Goa SSC Result Declared: यंदाही मुलीच हुश्शार, गोव्यात दहावीचा 92.38 टक्के निकाल

Xeldem Assault Case: आंब्यावरुन मारहाण, सोनफातर - शेल्‍डे येथे बागमालकास जीवे मारण्याची धमकी

Goa Today's Top News: दहावीचा निकाल, अपघात, चिरे खाणीवर छापा; गोव्यातील बातम्यांचा आढावा

SCROLL FOR NEXT