प्रसन्न शिवराम बर्वे
पुरुषार्थ चतुष्टयातील धर्म, अर्थ आणि काम ही तीन मूल्ये आपण पाहिली. आता आपण मोक्षाकडे वळू. मोक्ष म्हटले की सामान्यत: कशापासून तरी सुटका, असा अर्थ घेतला जातो. फारच गहन, कळायला कठीण वगैरे अनेक गैरसमज आहेत.
साधारणत: ज्याच्याबद्दल आपली इच्छा नसते, ते आपल्यासाठी कठीण असते. पण, तसे काहीही नाही. सोप्या शब्दांत सांगायचे तर जीवाचे अंतिम ध्येय म्हणजे मोक्ष.
विद्वान माणसांचा एक व्यवच्छेदक गुण म्हणजे भांडणे लावून देणे किंवा भेद उत्पन्न करणे. चारही मूल्ये एकाच चतुष्टयाचा भाग आहेत. आधी तीन होती व नंतर चौथे घुसडण्यात आले हा बुद्धिभेद आहे. चौघांचाही एकत्र विचार नाही केला तर त्या चतुष्टयाला काही अर्थच राहत नाही.
धर्म, धर्माने अर्थ आणि धर्माने काम एवढे आचरणात आले की, जो प्राप्त होते तो मोक्षच आहे. त्यासाठी काही वेगळे करावे लागत नाही. पण, वेगळेपणा निर्माण करण्याकरता, विद्वानांची मते समोरासमोर ठेवली जातात. ती कुठल्या दृष्टिकोनातून आहेत, ते सांगायचे टाळले जाते.
व्यक्ती आणि व्यवस्था हे दोन वेगवेगळे दृष्टिकोन आहेत. अहिंसा करू नये हे व्यक्तीसाठी योग्य आहे, पण हिंसा होते म्हणून सैन्यच बाळगू नये असे एखादे राष्ट्र म्हणू लागले तर? प्रत्येक व्यक्तीसाठी धर्म, धर्माने अर्थ व धर्माने काम आणि नंतर मोक्षप्राप्ती याच क्रमाने जाणे क्रमप्राप्त आहे. ही गोष्ट व्यासांनी सांगितली आहे.
कौटिल्य जेव्हा अर्थकारण मांडतात तेव्हा राज्य या दृष्टिकोनातून अर्थ प्रमुख असून अर्थप्रमाणे धर्म व काम अशी मांडणी करतात. ती व्यक्तीसाठी नसून राज्यासाठी आहे. वात्स्यायनाचेही असेच मत आहे.
चार्वाकदर्शन काम व त्याप्रमाणे इतर मूल्यांचा विचार करते. चार्वाकाचे मत पूर्णपणे ना व्यक्तीच्या दृष्टीने योग्य आहे ना राज्याच्या. पण, ते केवळ वैदिकांच्या काहीसे विरोधात जाणारे आहे, म्हणून उचलून धरले जाते.
मोक्ष हे ध्येय ठेवल्याशिवाय पहिल्या तीन मूल्यांना काहीच अर्थ नाही. मोक्षासाठी धर्म, अर्थ व काम ही मूल्ये आवश्यक आहेत. मग, मोक्षाने धर्म, मोक्षाने काम आणि मोक्षाने अर्थ असे का म्हटले नाही? याचे महत्त्वाचे कारण म्हणजे मोक्ष हा व्यक्तिगतच असतो.
मोक्ष प्राप्त करताना कुणीही आपल्याबरोबर असत नाही. तो स्वत:चा स्वत:च मिळवावा लागतो. व्यक्तिस्वातंत्र्य, व्यक्तिस्वातंत्र्य म्हणून ज्याचा आज आपण उद्घोष करतो त्याची सुरुवात इथे होते; त्याआधी नाही.
पहिल्या तीनही मूल्यांचे पालन करताना आपला इतरांशी संबंध येतो. आपल्याव्यतिरिक्त इतर व्यक्तीचा त्यात सहभाग असतो, त्यांचा विचार करावा लागतो व घ्यावाही लागतो.
विवाहविधीमध्ये नवरामुलगा वधुपित्याला जे ‘धर्मेच, अर्थेच, कामेच..’ असे म्हणत जे वचन देतो, त्यात या पहिल्या तीन मूल्यांचाच समावेश आहे. मोक्षाचा नाही, कारण तो एकट्यानेच मिळवायचा आहे.
पण, गमतीचा भाग म्हणजे जी गोष्ट आपली एकट्याचीच आहे, त्यात अन्य वाटेकरी नाही व आपणच ती मिळवायची आहे, तीच गोष्ट आपल्याला नकोशी असते. आपल्यासारख्या सामान्य माणसांना मोक्ष नकोसा असतो तसाच तो संतांनाही नकोसा असतो.
फरक इतकाच आहे की, त्यांना माहीत असते मोक्ष म्हणजे काय आहे व आपल्याला ते माहीत नसते. त्यांना माहीत असून नकोसा झालेला व आपल्या माहीत नसल्यामुळे नकोसा असलेला मोक्ष आहे तरी कसा?
मोक्ष मिळण्यासाठी मरावेच लागते का? मोक्ष मिळवून करायचेय काय? मुक्ती आणि मोक्ष यात फरक काय, असे नानाविध प्रश्न आपल्याला पडतात.
मोक्ष समजून घेण्यासाठी अनेक गोष्टी, संकल्पना आधी स्वच्छ व स्पष्ट करून घेणे आवश्यक ठरते. त्यातील सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे चैतन्य. यालाच ऊर्जा (एनर्जी), ब्रह्म, जाणीव(कॉन्शसनेस) अशा अनेक नावांनी, अनेक संदर्भात ओळखले जाते. ‘आपण आहोत’ याची जाणीव आपल्याला कायम असते.
ही जाणीव आपल्या असण्यावर अवलंबून आहे. पदार्थाची जाणीव पदार्थ आहे म्हणून आहे. पण, कशावरही अवलंबून नसलेली, काही नसते तेव्हाही जी जाणीव असते तिलाच चैतन्य म्हणतात. संपूर्ण विश्वात भरून राहिलेली ही जाणीव जगातील प्रत्येक वस्तूमध्ये, जीवामध्येही असते.
शरीरात असलेल्या जाणिवेला आपण ‘आत्मा’ असे म्हणतो. विश्वात भरून राहिलेल्या जाणिवेशी जोडण्याचे साधन म्हणजे शरीर आणि तेच अडचणही आहे. दगडामध्येही चैतन्य किंवा जाणीव असते. पण, जशी मनुष्य देहामध्ये त्याच्या प्रकट होण्याची, दिसण्याची व्यवस्था आहे, तशी दगडामध्ये नाही.
दगडातील नको तो भाग काढून टाकला म्हणजे मूर्ती तयार होते, त्यातील चैतन्य प्रकट होते. तीनही मूल्यांचे आचरण करून कर्मफलाच्या बंधनाला(क्रिया-प्रतिक्रिया यांची शृंखला) काढून टाकले की, चिदानंदस्वरूप चैतन्य आहोत याची जाणीव होते.
आपल्यामध्ये असलेले चैतन्य व विश्वातील चैतन्य एकच आहे, याची जाणीव ही मोक्षाची सुरुवात आहे आणि ‘केवळ चैतन्यच आहे’ ही अवस्था म्हणजे मोक्ष. मुक्तीचा चौथा प्रकार ही प्रारंभिक अवस्था आहे आणि शेवटची अवस्था म्हणजे मोक्ष.
मोक्ष या अवस्थेचा अनुभव काही क्षणापुरता का होईना आपल्याला होत असतो. फक्त आपण त्याकडे जाणिवेने लक्ष देत नाही. आपण कधी विचार केलाय का, की झोपेत आपल्याला पडलेल्या स्वप्नाला कुठून सुरुवात झाली? एरव्ही आपण ते बघत असतो, तोपर्यंत ती शुद्ध जाणीव असते, जिथे आपल्या स्वप्नात आपण घुसायला बघतो(अहंकार आणि विचार ही शक्ती त्यामागे लावतो), तेव्हा ते भंगते.
त्यामुळे संपूर्ण स्वप्नामधील तेवढ्यापुरतेच आपल्या स्मरणात राहते. प्रत्यक्ष घडणाऱ्या प्रसंगात बोलणारी माणसे पुढे बोलणारी वाक्ये, संदर्भ आपल्याला जशीच्या तशी आधी कधीतरी घडून गेली आहेत, हे लक्षात येते.
पण, कधी हा प्रसंग पूर्वी घडला होता, ते आठवू जाता काही केल्या आठवत नाही. माझ्याबाबतीत हे असे अनेकदा घडले आहे, घडत आहे. अनेक वर्षे समरसून (इन्टिमेट्ली) संसार केलेल्या नवरा व बायको दोघांनाही एकाच वेळी एखादा विचार सुचतो, जाणीव होते; अगदी कितीही दूर असली तरी. त्यांचे चेहरेही एकमेकांसारखे दिसू लागतात.
अनेकांच्याबाबतीत हे घडते, पण का, कसे, कशासाठी याचा कुणीही विचार करत नाही. तेच क्षणभरासाठी चैतन्याशी झालेले तादात्म्य असते. वारीत फेर धरून रिंगण घालणारे एका विशिष्ट वेगवान लयीत देहभान सोडतात, तेव्हा सगळ्यांचे चेहरे सारखेच दिसतात.
एकच विठ्ठल सगळ्यांच्या चेहऱ्यांवरून ओसंडत असतो. विश्वात भरून राहिलेल्या चैतन्याशी आपल्या देहातील चैतन्याचे क्षणभरासाठी एकरूप होणे व हीच क्षणभरासाठीची मुक्ती कायमस्वरूपी होणे म्हणजे मोक्ष. देहाची आवश्यकताच राहत नाही. तो असला तरी रामकृष्ण हरी, नसला तरीही रामकृष्ण हरी!
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.