Dr Jaywantrao Sardesai: अमेरिकेतून गोव्यात परतल्यावर कोकणी चळवळीत झोकून देणारे 'आंकू'

आंकू जन्मजात ‘भाटकार’; परंतु हातात पैसा कुठे? वाहन केवळ एक दुचाकी.
Dr Jaywantrao Sardesai
Dr Jaywantrao SardesaiGomantak Digital
Published on
Updated on

Dr. Jaywantrao Sardesai Journey

डॉ. जयवंतराव सरदेसाई ही तशी ‘मागच्या जमान्या’तील व्यक्ती. ‘ते पदेर गेले ते उंडे गेले’ अशी एक म्हण आहे. गोवा बदलला. बदललेल्या गोव्याची मूल्येही बदलली. मागच्या जमान्यात डॉ. सरदेसाई - ज्यांना त्यांचा संपूर्ण विस्तारित परिवार - आंकू म्हणून संबोधत असे- यांच्यासारखी माणसे होती. याच लोकांनी गोव्याला त्याचे खरे ‘गोवेपण’ बहाल केले होते.

आंकू कोण होते?

आंकू कवी नव्हते, लेखक नव्हते; परंतु कोकणी चळवळीत ते झोकून देऊन वावरले. रवींद्र केळेकरांचे ते भावोजी. केळेकरांची बहीण- लक्ष्मीबाय यांचे पती. ते एक वैज्ञानिक, कीटकशास्त्रज्ञ.

पोर्तुगिजांच्या अनेक वसाहतींमध्ये त्यांनी संशोधक म्हणून काम केले. ज्यावेळी अमेरिका ही आजच्यासारखी सहज जाण्यासारखी गोष्ट नव्हती - तेव्हा सुरुवातीला शिक्षणासाठी आणि संशोधनासाठी आंकू तेथे गेले. त्यांच्या दोन मुलांचा जन्म तिथलाच.

आंकूंना गोवा प्रिय. मुली मोठ्या होत असताना लक्ष्मीबायना वाटले, आपण गोव्यात यायला हवे. त्यानंतर आंकूंना अमेरिकेत एकटे रमेना. त्यांनीही आपल्या मातृभूमीचा मार्ग पत्करला.

परंतु गोव्यात आलेले आंकू बदलत्या गोव्याला कधीच स्वीकारू शकले नाहीत. जरी त्यांना तरुण मुलांबरोबर काम करायला आवडत असले तरी ते ‘जुन्या’ गोव्यातच रमले. गोव्यात आल्यावर चौगुलेंनी त्यांना आपल्या शिक्षण संस्थेत सचिव नेमले.

त्याकाळी मडगावी चौगुले कॉलेज उभे करण्याचे निश्चित झाले होते. ही ग्रामसंस्थेची जमीन त्यांना मिळवून द्यायला आंकूंची भूमिका महत्त्वाची ठरली. परंतु आंकू कॉर्पोरेट जगतात किती काळ टिकाव धरतील, हा प्रश्नच होता. तसेच घडले.

त्यावेळी विद्यार्थी चळवळ जोरात होती. एका आंदोलनात विद्यार्थ्यांनी चौगुले कॉलेज ‘ताब्यात’ घेतले होते. आंकूंनी विद्यार्थ्यांची बाजू घेऊन आपल्या सचिवपदाचा राजीनामा दिला.

आंकू जन्मजात ‘भाटकार’; परंतु हातात पैसा कुठे? वाहन केवळ एक दुचाकी. त्यांची मिळकत जेमतेम; परंतु आंकूंना ना खंत ना फिकीर . लक्ष्मीबायने शिवणकाम करून वेगवेगळी काही कलाकुसरीची कामे करून संसार रेटला.

इतके असून आंकूंना कधी मी चिंतेत, पैशांच्या फिकिरीत पाहिले नाही. विद्यार्थी चळवळीत, कोकणीच्या कार्यक्रमात आंकू झोकून देऊन काम करताना आढळायाचे. सगळी कामे बाजूला ठेवून मोर्चात दिसायाचे. साध्या कार्यकर्त्यासारखे. एकटे नाही, आपल्या मुलांसह.

मी आंकूंना अशाच अनेक कार्यक्रमांतून मडगावमध्येच पहिल्यांदा पाहिल्याचे आठवते. आंदोलने म्हणजे बालामृत. तरुणांनी वेगवेगळ्या आंदोलनात भाग घेतला पाहिजे. समाजाच्या प्रश्नाशी विद्यार्थ्याचे देणे-घेणे असते. राजकारणही वर्ज्य नको.

तुरुंगात जावे लागले तरी बेहत्तर, पण प्रत्येकाला सामाजिक भूमिका घेता आलीच पाहिजे. आंकू अमेरिकेतून आले तो रवींद्र केळेकरांसोबतच राहिले. आपल्या सासरी. तेथे राहायची कधी लाजलज्जा बाळगली नाही. घरातला मजूर नसेल तर तेच लाकडे फोडून द्यायला पुढाकार घेत असत.

त्या तुलनेने रवींद्र केळेकर ‘पाहुणा’असल्यासारखे. रवींद्र यांची आई म्हणत असे, ‘मी मुलगी देऊन मुलगा मिळविला’. आंकूंचे केळेकरांकडे नाते दृढच. आंकूंची बहीण गोदुबाय रवींद्रांची पत्नी. त्यामुळे घरात जावयाचा मान आणि बहिणीचीही माया.

आंकू तेथे राहत असले तरी लक्ष्मीबाईंना ते नकोसे वाटे. आपले सासर आडवाटेचे. शिवाय सासरा पोर्तुगालमध्ये कस्टम कलेक्टर.

हुद्दा आणि पगारानेही तसा श्रीमंत. त्यामुळे आपले एक छान टुमदार घर असावे असे तिला वाटे. ते आंकू आपल्या हयातीत कधी पूर्ण करू शकले नाहीत.

वास्तविक स्वतःसाठी संसार, आपल्याचसाठी घर, ‘मी आपले कुटुंब आणि आपले आपण’ ही संकल्पना आंकूंना मान्य नव्हती. आंकू केवळ दुसऱ्यांसाठी जगत आले, आपले जीवन त्यांनी दुसऱ्यांना आनंद देण्यासाठी चंदनासारखे झिजविले.

ही सगळी समर्पित भावना आंकूंमध्ये कशी आली असावी, याचा मी विचार करतो. आंकूंची आई त्यांच्या लहानपणातच वारली. वडील पोर्तुगालमध्ये. दोन पुत्र आणि तीन बहिणी. हा सर्व कुटुंबकबिला तेव्हा एकत्र कुटुंबात राहत होता.

पणजीत ‘बोक द व्हाक’ येथे सरदेसाईंचे जुने घर आहे - जे आंकूंच्या वडिलांनी स्वतःच्या मिळकतीतून घेतलेले; परंतु त्यावेळच्या पद्धतीनुसार थोरल्या भावाच्या नावावर. त्यामुळे वडिलांचे निधन होताच आंकूंना स्वतःचे घरच राहिले नाही.

स्वतःचे वेगळे घर बांधण्याची हौस नसल्याने शेवटपर्यंत ते मडगावच्या भाड्याच्या घरातच वास्तव्याला राहिले. नाही म्हणायला आंकूंची बायको लक्ष्मीबाय, पुत्र विजयने (सरदेसाई) सुंदर टुमदार घर बांधताच आनंदली; परंतु आंकूंचे भ्रमण तेथे कुठे होते?

आम्हा दोघा जावयांचे भाग्य असे की, आम्हाला सासरे आंकूंसारखे मिळाले. त्यातल्या त्यात आंकूंची आवडती थोरली कन्या सविता ही सुबोध केरकरांची पत्नी. सुबोध केरकर म्हणायाचे मी सविताला डेटिंग करायचो तेव्हा आंकूंही आमच्याबरोबर असायचे.

सविताला मूल झाले तेव्हापासून आंकूंनी आपला मुक्काम सुबोधच्या घरी कळंगुटला हलवला. तेव्हाच सुबोधने आपले हॉस्पिटल तेथे उभारले होते. सविताने आपली लॅब तेथे सुरू केली. आंकू गड्याप्रमाणे तेथे राबायला आले.

मला पहिली मुलगी झाल्याबरोबर सुबोध म्हणाले, ‘हा ‘गडी’ आता ‘आयता’ तुझ्याकडे येणार’. तसेच झाले. माझ्या दोन्ही मुलींना आई-वडिलांपेक्षा आंकूंची अधिक माया.

आसावरी थोरली कन्या - दुपारी दीड वाजता आंकूंजवळ गार्डनमध्ये नेण्याचा हट्ट धरी. ते तिला खांद्यावर घेऊन मडगावच्या गार्डनमध्ये रणरणत्या उन्हात सिमेंटच्या घोड्यावर बसत असत.

सकाळी दूध आणून देण्याचे काम आंकू करीत असत केवळ आमच्या घरी नाही. शेजारी दोन तीन इमारतींचे बांधकाम चाललेले असे. तेथे बरेच मजूर काम करीत. त्यांच्या बायांच्या कडेवर मुले असत.

त्यांनाही दुधाचा रतीब घालायचे काम आंकू करीत असत. एकदा भल्या सकाळी कोणी तरी दरवाजा ठोठावला म्हणून उठून मी तो उघडला तर काय, बाहेर तीन-चार मुले उभी - अधिकाराने विचारत होती, ‘दूध कुठे आहे?’

आंकू ‘भाटकार’; परंतु भाटकारांच्या व्याख्येत असा माणूस कधी सामावणार नाही. सकाळी ‘पाडा’ करायला आंकू गाडी घेऊन निघत असत; परंतु भाटात कधी वेळेत पोहोचत नसत. त्यामुळे नारळ कधी त्यांना दिसलेच नाहीत.

कारण आमच्या घराच्या नजीकच हॉस्पिसिओ हॉस्पिटल. तेथे रस्ता ओलांडताना हातात गुंडाळलेले बाळ घेऊन घरी जाताना त्यांना हमखास नवी बाळंतीण दिसे. ‘कुठे जातेस ? ये बैस’. मग आंकू तिला तिच्या घरी सोडणार आणि त्यानंतर भाटात.

आणखी एक चित्र सकाळी सकाळी मला दार उघडताच हमखास दिसे. पेपर उचलण्यासाठी मी सकाळी दार उघडताच एक दोन महिला मला उभ्या असलेल्या दिसत.

‘भाटकार ना?’

‘भाटातील लहानसा तुकडा आम्हाला घर बांधण्यासाठी हवा आहे.’ कागदपत्रे घेऊनच या महिला आलेल्या असत. महिला पहाटे पहाटे येणे हा आंकूंचा वीक पॉईंट. ते ‘नाही’ म्हणणार नाहीत, हा त्यांना विश्वास. आंकूंना ‘भाटकार’ म्हणून या कुटुंबांनी कधी एक फणसही आणून दिला नाही.

या भाटात जांभळे खूप रुचकर आणि मोठ्या आकाराची म्हणून मी ओळखून आहे; परंतु त्यातले कधी चाखायला आम्हाला मिळाले नाही; परंतु आंकूंनी आपल्या हिश्शाची जवळजवळ निम्मी जमीन अशीच उदारहस्ते देऊन टाकली आहे.

त्यालाच बिलगून काकुले कुटुंबीयांची एक जमीन आहे. ही दोन्ही भाटे आंकूंच्या वडिलांनी व काकुलेंनी एकाच वेळी घेतली होती. काकुलेंनी आपल्या जमिनीचे व्यवस्थित कुंपण घालून तिचे संवर्धन केले.

कोकणी शाळा विद्याभवनात होती. जागा अत्यंत अपुरी. शिक्षकवर्गही अपुरा. तेथे आंकूंनी दिलेले योगदान वैशिष्ट्यपूर्ण आहे. या शाळेला कोणी कोणी हातभार लावला हे सांगणारे अनेकजण आहेत; आंकूंचे कोणी नावही घेणार नाही कारण आंकूंनी स्वतः ते कधी सांगितले नाही, परंतु मुलांचे मानसशास्त्र न अभ्यासलेल्या आंकूंनी या मुलांसाठी जे परिश्रम घेतले आहेत, त्याला तोड नाही.

माझ्या छोट्या मुलीला शाळेत पोहोचविणे हे त्यांचे आणखी एक आवडते काम. पाजीफोंडहून कोंबात महिला नूतनमध्ये जाताना वाटेत मिळणाऱ्या प्रत्येक मुलांसाठी आंकूंची हक्काची गाडी असे. ‘आंकू - आंकू’ त्यांचा एकच गलका सुरू असे.

कुठे अन्यत्र ही मुले भेटली तरी आंकूंच्या नावाचा ती पुकारा करीत व त्यांना तेथेच दुकानातून चॉकलेट्स घेऊन आंकू सर्वांचे समाधान करीत असत. अजूनही या मुली - १५ वर्षांनंतर माझ्या कन्येला कुठे भेटतात तेव्हा त्या न चुकता आंकूंची आठवण काढतात.

परंतु आंकूंची ही समाजसेवा घरच्यांसाठी नेहमीच फायदेशीर ठरत असे, असे नाही. आंकू कधी पत्नी लक्ष्मीबायला मदत करायला वेळेवर पोहोचले नाहीत. तिने स्वतंत्रपणे संसाराचा गाडा हाकला.

सुबोध सांगतात, आंकू त्यांच्या घरात मुलांच्या संगोपनासह, झाडे कापण्यापासून ओझी उचलण्यापर्यंत सर्व कामे करीत असत. ही कामे म्हणजे अनेकदा लुडबुडही असे. सुबोध सांगतात, ‘थांब तुला येत नाही. मीच काढून दाखवतो’ म्हणून आंकूंनी ब्रश हातात घेऊन चित्र काढून दाखवले नाही, एवढेच!

आमच्या फ्लॅटच्या बाजूला मधमाश्यांनी मोठे पोळे केले होते. तेथे मध काढायला काही आदिवासी हमखास येत. त्यांच्याकडून गंडवून घेण्यास आंकूंना फार आवडे. एकदा चार हजार रुपये देऊन आंकूंनी त्यांच्याकडून मध विकत घेतले.

माधवी विद्यापीठातून एकदा घरी येते तो दरवाजापासून आतल्या प्रत्येक खोलीत - प्रत्येक भांड्यात आणि बादल्यांमध्येही मध ठेवले होते! माधवीने डोक्यावर हात मारून घेतला. त्यानंतर आठवडाभर मध वाटण्याच्या कामात आंकू पूर्णपणे गर्क होते.

Dr Jaywantrao Sardesai
Sao Joao Festival: बाणावलीतील वेस्टर्न बायपासचा 'सांजाव'मधून निषेध; ग्रामस्थ म्हणतात, ... अन्यथा बाणावली बुडणे अटळ

विजयने आंकूंच्या शेवटच्या दिवसात, त्यांना जेवढे ‘सुखात’ ठेवता येईल तेवढे ठेवले. पहिली मोटार विजयनेच घेऊन दिली. ‘मी अमेरिकेत मोटार चालविली आहे, तुम्हाला चालवता येत नाही, क्लच दाबता येत नाही’, असे आंकूंकडून आम्हाला नेहमी ऐकावे लागे;

परंतु आंकूंनी आपली मोटार इतक्यांदा ठोकली आहे, त्याला सुमार नाही. काही वर्षांपूर्वी त्यांनी नव्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डिव्हायडरला मोटार ठोकली, तेव्हा ती उलटली. लगेच लोक धावून आले, ‘विजयचो पाय... विजयचो पाय... ’

आंकू म्हणाले, ‘विजयचो पाय बरो आसा... मला आधी बाहेर काढा....!’

त्यानंतर वयाच्या ८०व्या वयानंतर विजयने त्यांना गाडी चालवायला देणे थांबविले; परंतु त्यांच्यासाठी फिरायला गाडी ठेवली. ‘मी तुला घर बांधण्यासाठी भाटात जागा देईन’, असे सांगून या चालकाला आंकूंनी आपलेसे केले होते.

आंकू शेवटपर्यंत असेच जगले. गेली दोन वर्षे त्यांची स्मृती थोडी दगा देत होती; परंतु त्यांचे सर्व अवयव व्यवस्थित होते. लहानपणी अनेक क्रीडा प्रकारांमध्ये घेतलेला भाग, पणजी जिमखान्यावर बांदोडकरांबरोबर सामने, श्रमाची कामे यामुळे त्यांनी शरीर कमावले होते.

शिवाय त्यांच्या शरीरावर सिझन बॉल बसून टेंगुळेही आलेली होती. अमेरिकेतही आपण क्रिकेट खेळलो आहे आणि आपले सिनियर आपल्यावर कसे खूश असत, हे ते अनेकदा ऐकवत. आंकूंला उतारवयात तरुणपणातील अनेक आठवणी येत व त्या सतत कधी कधी पुन्हा पुन्हा ते ऐकवत.

Dr Jaywantrao Sardesai
'नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न', ऐन पावसाळ्यात मुंबई गोवा वंदे भारत ट्रेनच्या वेळापत्रकात मोठा बदल

पुरुषोत्तम काकोडकर गोव्याचे एक आघाडीचे स्वातंत्र्यसैनिक; परंतु पोर्तुगालचे दुश्मन. आंकू तर अमेरिकेतील एक प्रगत संस्थेत एक संशोधक अधिकारी. पुरुषोत्तम काकोडकर पोर्तुगालमध्ये आंकूंच्याच घरात बिनदिक्कत पाहुणचार घेत.

त्यामुळे आंकू पोर्तुगाल सरकारच्या काळ्या यादीत होते; परंतु आंकूंनी ते फारसे मनावर घेतले नाही आणि स्वातंत्र्यसैनिक म्हणून स्वतःला नोंदवूनही घेतले नाही. आंकू पोर्तुगालमध्ये असताना आंकूंचे घर अनेक विद्यार्थ्यांना कायम आदरातिथ्याचे ठिकाण असे;

परंतु गोव्यात आल्यावर त्यातील अनेकांनी आपल्याला जेवायलाही बोलविले नाही म्हणून लक्ष्मीबाई खंत व्यक्त करीत, आंकूंनी ती कधी अपेक्षाही केली नाही.

व्हिएतनाम युद्धातील अमेरिकेच्या साहसाबद्दल खुद्द अमेरिकेत निदर्शने झाली तेव्हा आपल्या सेवेची पर्वा न करता आंकूंही त्यात सहभागी झाले. आंकूंनी कधी वेतन, सरकारी नोकरी, मानमरातब यांची पर्वा केली नाही.

बांदोडकरांकडे वैयक्तिक परिचय असल्याने त्यांना संशोधक म्हणून सरकारी सेवेतही जाणे सहज शक्य होते; परंतु आंकूंना तसे करणे आवडले नसते. आंकू गोव्यात परत आल्यावर कुलगुरूंसारखे पद त्यांच्याकडे चालत यायला हवे होते.

असा शिक्षक जो समाजाला योग्य मार्ग दाखवेल. जो आदर्शवादाकडे - सत्याकडे तरुणांना नेईल. गोव्याची आदर्श दिशा कोणती, हे सांगेल. विद्यार्थ्यांना सत्यासाठी लढायला शिकवेल. करियरिष्ट (स्वतःपुरते बघणारा) बनायला नव्हे! आजच्या विद्यापीठात कसली मुले पैदा होतात? त्यांचे ध्येय काय आहे? ती कसला गोवा घडवणार आहेत? आंकूंना या प्रश्नांनी व्यथित होताना मी पाहिले आहे.

Dr Jaywantrao Sardesai
Goa Congress: लोकभावनेशी खेळू नका; एकतर कॅसिनो हटवा किंवा परशुरामाचा पुतळा!

परंतु अशी पदे व हुद्दे आंकूंना कधी पचनी पडले नाहीत. आंकू या व्यवस्थेची नेहमी चेष्टा करीत. विद्यापीठातील चळवळ्या प्राध्यापकांशी मात्र त्यांचे जमत असे. छोट्या मुलांशी बोलताना, खेळताना मात्र ते त्यांच्यातीलच एक होऊन जात.

नातवंडे त्यांचा चष्मा ओढत, फोडून टाकत, तरी ते हसत असत, पुन्हा चष्मा त्यांच्या हवाली करून. आपमतलबी, स्वार्थी, मोठ्यांशी सलगी करण्यापेक्षा छोट्यांशी- जी निर्व्याज प्रेम देत - त्यांच्यात त्यांची मैत्री छान जुळे... त्या दृष्टीने आंकू हे आजच्या जमान्यातले नव्हतेच.

आयडिअलिस्टिक होते. याचा अर्थ केवळ काल्पनिक जगात वावरणारा नव्हे! अनेकदा ते आदर्शवादी असल्याने लोकांना ते काल्पनिक जगातले वाटत असत. त्या दृष्टीने आदर्श होते; परंतु उच्चशिक्षित असूनही आंकू गोव्याच्या जमिनीला घट्ट धरून होते.

आपल्या कुटुंबामध्ये उच्च मूल्यांची पेरणी करीत राहिले. आपली समाजाने कदर केली नाही हे दुःख उगाळत न बसता, समाजाची पातळी वाढावी, सामाजिक पुनरुत्थान व्हावे यासाठी ते झटत होते.

गोरगरिबांसाठी राबत होते, समानतेचे कट्टर पुरस्कर्ते होते, प्रखर पर्यावरणवादी होते- कोकण रेल्वेपासून नायलॉन ६,६ आंदोलनात सहभाग घेत होते, मानवतावाद तर आंकूंच्या रोमारोमातील आस होती...

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com