Kargil Dainik Gomantak
ब्लॉग

Kargil: माझ्या आयुष्यातील तीन सोनेरी पाने

त्याच्या मानेतून रक्ताच्या चिळकांड्या उडत होत्या. त्या स्थितीतही तो शत्रूवर धावून जाणार होता पण घात झाला.

गोमन्तक डिजिटल टीम

गुरुप्रसाद पावसकर

सहा महिन्यापूर्वी मुंबईहून मावशींचा म्हणजे ‘लक्ष्य फाउंडेशन’च्या अनुराधा प्रभुदेसाई यांचा फोन आला. ‘गुरू, यावर्षी तू आमच्याबरोबर कारगिलला येणार आहेस. 26 जुलैला कारगिल युद्धाची 24 वर्षे पूर्ण होताहेत.

सैनिकांच्या गौरवाचा विशेष कार्यक्रम करायचाय’ चार वर्षांपूर्वी अनुराधा प्रभुदेसाई यांच्याबरोबर मी आणि डॉ. शेखर केळकर यांनी केलेला कारगिलचा पहिला प्रवास संस्मरणीय होता. तेव्हापासून कारगिल हे आमचे ‘शक्तिपीठ’च झालेय. मी मावशींना लगेच ‘हो’ म्हटले आणि तयारीला लागलो.

अनुराधा प्रभुदेसाई या एका राष्ट्रीय बँकेत उच्चपदावर काम करीत होत्या. जाज्वल्य देशभक्ती आणि देशासाठी समर्पित भावनेने काहीतरी करावे, हा विचार. त्यामुळे बँकेतल्या मोठ्या पगाराच्या नोकरीत त्यांचे मन लागत नव्हते. २००९साली नोकरीचा राजीनामा देऊन त्यांनी ‘लक्ष्य फाउंडेशन’ची स्थापना केली.

देशासाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या सैनिकांसाठी आपण काहीतरी मौलिक कार्य करायला हवे, हा विचार त्यांच्या मनात अनेक वर्षे घोळत होता. ‘लक्ष्य फाउंडेशन’ने त्याला मूर्त रूप दिले.

सैनिक आणि त्यांचे कुटुंबीय यांच्याशी भारतीय नागरिकांचे नाते जोडणे, प्राणपणाला लावून रणांगणावर लढणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबीयांसोबत आम्ही भारतीय नागरिक आहोत, हे सातत्याने सिद्ध करून, घरापासून दूर असणाऱ्या सैनिकांना एक नवी ऊर्जा देणे हे ‘लक्ष्य फाउंडेशन’च्या कार्याचे केंद्रबिंदू आहेत.

अनुराधा प्रभुदेसाई न चुकता दरवर्षी कारगिलला जात असतात. आपल्याबरोबर त्या इतर देशप्रेमी नागरिकांनाही नेतात.

कारगिल युद्धाला या वर्षी वीस वर्षे पूर्ण होत असल्याने, युद्धात प्रत्यक्ष लढलेल्या सैनिकांचा, कारगिलच्याच भूमीवर गौरव करण्याचे ‘लक्ष्य फाउंडेशन’ने ठरविले. त्यासाठी गेले वर्षभर मावशी स्वतः प्रवास करून कार्यक्रमाची पूर्वतयारी करीत होत्या.

सैनिकांबरोबरच कारगिल प्रदेशातील युद्धात सैनिकांचे सामान वाहून नेणाऱ्या स्थानिक रहिवाशांचाही सत्कार होणार होता. युद्धाच्या भीतीने गाव सोडून न जाता भारतीय सैनिकांना साहाय्य करणाऱ्या, पर्वत शिखरांवरील आपली छोटी घरे सैनिकांना निवासासाठी देणाऱ्या कारगिलवासीयांचे या कार्यक्रमात आत्मकथनही होणार होते.

मावशींचा फोन आल्यापासून कारगिलने मला जणू पछाडलेच. झोपेतही लढणारे सैनिक आणि अग्नीच्या धुरात धुमसणारी पर्वतांची शिखरे दिसू लागली. ३ जुलैला विमानात बसलो तेव्हा मावशीचे आदेश आणि सूचना मनातल्या मनात आठवू लागलो. ग्राउंड मॅनेजमेंट बरोबर ५ सैनिकांच्या सोबत राहण्याची माझ्यावर जबाबदारी होती.

४ जुलैला कारगिलला पोहोचलो तेव्हा तिथल्या भूमीला पदस्पर्श होताच मन भरून आले. ‘काकसर’, ‘द्रास’ आणि ‘बटालिक’ या तीन गावांत दि ५, ६ आणि ७ जुलैला सैनिक व नागरिकांचे सत्कार सोहळे आयोजित केले होते. हे कार्यक्रम गावांतील शाळांमध्येच होणार होते.

तीन गावांतले तीन कार्यक्रम हा माझ्या आयुष्यातील एक अलौकिक अनुभव होता. अतिशय दुर्गम प्रांतात हे कार्यक्रम झाले. कारगिल युद्धात ज्या ज्या ठिकाणी सैनिक लढले आणि शत्रूचा पूर्ण पराभव करून भारताचा तिरंगी ध्वज त्यांनी फडकवला त्या ठिकाणी, त्या शिखरांच्या पायथ्याशी सैनिकांचा गौरव करताना आणि त्यांचे अनुभव ऐकताना आवेश, रोमांच, थरार, समर्पण, कर्तव्यपालन, देशभक्ती..... यासारख्या कित्येक शब्दांचा अर्थ गवसत गेला.

‘17 गढवाल’च्या कारगिल योद्ध्याची शौर्यगाथा देशातल्या सर्व तरुणांनी आपल्या हृदयात कोरून ठेवावी अशी आहे. शून्याहून खाली २० अंश तापमान, पाठीवर पंचवीस किलो वजन, शिवाय हातातील युद्ध सामग्रीचेही वजन, १६ते १७ हजार फूट उंचीचे सरळसोट ८० अंशांचे कडे, बर्फांनी आच्छादलेली शिखरे, उंचावर मोक्याच्या ठिकाणी मोठ्या संख्येने बसलेला शत्रू, रात्रीचा मिट्ट काळोख, काडी जरी पेटवली तरी शत्रूचा स्नायपर मस्तकभेद करण्यास तत्पर, शत्रूच्या तुफान माऱ्यामुळे कोसळणारे, जखमी होणारे साथीदार तरीही त्याचा आगेकूच करण्याचा निर्धार आणि पलटणीच्या इज्जतीचा विचार! सगळीच प्रतिकूल परिस्थिती होती.

पण भारतीय सैनिकांकडे शाबूत होता तो दुर्दम्य आशावाद! प्रखर राष्ट्रनिष्ठा, असामान्य कर्तृत्व, उच्च मनोबल आणि अदम्य साहस या गुणांमुळे भारतीय सैन्य लढले. ‘मश्को’, ‘द्रास’, ‘काकसर’ आणि ‘बटालियन’ जवळजवळ १२० किलोमीटरची पर्वतरांग. शत्रूची लाइट मशीनगन, मीडिअम मशीनगन, युनिव्हर्सल मशीनगन, स्ट्रींगर मशीनगन, विमान पाडण्याची क्षमता असलेल्या तोफा, वाटेवर पेरलेले अगणित भूसुरुंग..... या सर्वांवर मात करून भारतीय सैनिक लढले आणि विजयी झाले.

‘17 गढवाल’चा कारगिल योद्धा आपले अनुभव सांगू लागला :

‘मॅडमजी, मी आणि माझा साथीदार ‘बडी’ एकत्रच सैन्यात दाखल झालो होतो. बटालिक सेक्टरमधील तो भयाण खडकाळ पहाड उभा होता. गोळी छातीवर घ्यायची पाठीवर नाही, हे आम्ही ठामपणे ठरविले होते. एकमेकांना इशारे देत मोठ्या शिळांच्या आड आसरा घेत आम्ही बरेच वर पोहोचलो.

शत्रूच्या तोफगोळ्यांचे आवाज भयभीत करत होते. कोण कुणाच्या गोळ्यांनी मरत होते काहीच कळत नव्हते. पण आम्ही मात्र एकेक इंचाने चढाई करत शत्रूच्या जवळ पोहोचलो. मी एकाचा खात्मा केला. त्यांनी झाडलेली गोळी माझ्या खांद्यात घुसून बाहेर पडली. मी विव्हळलो... आणि माझा साथीदार ‘बडी’ धावत आला.

पण शत्रूने त्याला टिपले.. तो खाली कोसळला सरपटत माझ्याजवळ येऊन विचारपूस करू लागला. त्याच्या मानेतून रक्ताच्या चिळकांड्या उडत होत्या. त्या स्थितीतही तो शत्रूवर धावून जाणार होता. पण घात झाला. त्याचा श्वास कमी कमी होऊ लागला. मी माझ्या दुखापतीकडे दुर्लक्ष करत त्याला खांद्यावर घेऊन शत्रूला हुलकावण्या देत पहाड उतरू लागलो.

इतक्यात तो माझ्या कानात कुजबुजत त्याचे रक्त, माझे रक्त, सगळे शरीर रक्ताने माखले होते. मी त्याला शब्द दिला, ‘मी तुझे काम नक्की करेन’. चालत चालत मी बेसवर आलो, त्याला खाली ठेवले... तेव्हा कळले माझ्या पाठीवरच त्याने प्राण सोडले होते. तो माझ्या कानात काय कुजबुजला होता सांगू?

तो म्हणाला होता, ‘माझ्या सॅकमध्ये एक डायरी आहे. त्यात दोन नावे आणि नंबर आहेत. मी मेलो तर कृपया त्या व्यक्तींना फोन कर मी त्यांचे काही देणे लागतो ते तू दे’. मातृभूमीचे उपकार फेडणारा तो सैनिक जाता जाता हेही उपकार फेडून जायला विसरला नाही.’ आपले अश्रू गालावर ओघळू देत ‘१७ गढवाल’चा तो योद्धा खाली बसला. ते ऐकताना आमच्याही डोळ्यातून अश्रू ओघळत होते.

अनुराधा प्रभुदेसाई आणि आम्ही ‘लक्ष्य’चे ३६ स्वयंसेवक, सर्वांनाच सैनिकांच्या ‘किती कथा ऐकू, किती हृदयात साठवून ठेवू’ असे झाले होते... तर ४४ सैनिकांची स्थिती, ‘किती बोलू आणि कुणाकुणाबद्दल सांगू’ अशी झाली होती.

२० वर्षांपूर्वी लढलेल्या युद्धाची आठवण ठेवून, ‘लक्ष्य फाउंडेशन’तर्फे आपला कुणी युद्धभूमीवर सत्कार करत आहे, ही भावनाच त्यांना हळवे करत होती. त्या सैनिकांच्या चेहऱ्यावरील भावोत्कटता टिपणे आणि त्यांच्या मनातील आंदोलने न्याहाळणे हा एक आगळाच अनुभव होता. तो शब्दात व्यक्त करणे केवळ अशक्य आहे.

अनुराधा प्रभुदेसाई यांचे शब्द माझ्या मनात अजूनही जागे आहेत. ‘सैनिकांचा सन्मान करणे, सातत्याने त्यांच्या करारी निडर वृत्तीचा, कर्तृत्वाचा उद्घोष करणे, आम्ही तुमच्या समवेत आहोत हा निरोप पोहोचवणे, ही त्यांची गरज नाही. आपली जबाबदारी, आपले कर्तव्य

आहे.’ कारगीलमधील सैनिकांच्या गौरवसोहळ्यात अनुभवलेले तीन दिवस ही माझ्या आयुष्यातील तीन सोनेरी पाने आहेत. हे दिवस मला यापुढे अर्थपूर्ण जीवन जगण्याची सतत ऊर्जा देतील.

सैनिकांच्या रोमांचकारी कथा, त्यांच्या डोळ्यांत दाटून आलेले अश्रू, त्यांना ऐकताना कारगीलमधील शालेय विद्यार्थ्यांच्या हृदयाच्या पानावर लिहिला गेलेला देशप्रेमाचा जिवंत इतिहास....... अनुराधा प्रभुदेसाई यांचे सैनिकांसाठी चाललेले व्रतस्थ कार्य ....हे सर्व माझ्या आजवरच्या आयुष्याचे खरे वैभव आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

World Cup 2025: टीम इंडियासाठी 'करो या मरो'चा सामना, उपांत्य फेरी गाठण्यासाठी 'विजय' आवश्यक; इंग्लंडविरुद्ध 'अशी' असेल Playing 11

Goa Diwali Bazar: पणजी, दिवचल भरला दिवाळी बाजार...

Pakistan-Afghanistan War: "पाकिस्तान क्रिकेट को बर्बाद करना चाहता है…" माजी अफगाण कर्णधाराची शत्रू देशावर टीका

राजधानीत नरकासुराचा 'हाहाकार', दिवाळीची तयारी जोरदार ; Watch Video

जब तक सूरज - चांद रहेगा तब तक पर्रीकर- रवि तुम्हारा नाम रहेगा! मागोवा

SCROLL FOR NEXT