Jaggery tea benefits in Marathi, Benefits of Jaggery tea in Marathi, Gulacha Chaha Che fayde Dainik Gomantak
ब्लॉग

गुळाचा चहा आणि बरंच काही

घरी येणाऱ्या जाणाऱ्याचे स्वागत मात्र गुळखोबरे देऊन केले जात होते.

दैनिक गोमन्तक

- नारायण महाले

गुळ हा आपल्या अन्न संस्कृतीतला एक महत्त्वाचा बहुपयोगी पदार्थ. कृषिप्रधान कष्टकरी समाजव्यवस्थेने गुऱ्हाळ बनवून प्रथम गूळ बनवला आणि मग यथावकाश साखर बनली. घरी येणाऱ्या जाणाऱ्याचे स्वागत मात्र गुळखोबरे देऊन केले. तूप-साखर श्रीमंतांची तर तेल-गूळ-मीठ-मिरची ही गरिबांची असंही आपलं मानलं गेलं. (Benefits of Jaggery tea in Marathi)

‘गणपतीला गुळाचाच नैवेद्य’, ‘गाढवाला गुळाची चव काय’, ‘गुळावरच्या माशा’, ‘गुळाच्या ढेपेवरचे मुंगळे’. असे कितीतरी गुळाशी संबंधित म्हणी व शब्दप्रयोग आपल्याकडे प्रचलित आहेत. प्रसाद म्हणून देवासमोर भक्तीभावाने गुळच ठेवला जातो. सणासुदीला (Festival) लग्नकार्यात बनवण्यात येणाऱ्या ‘मणगणे’, ‘सोजी’ हे पदार्थ गुळापासूनच बनवले. सात कप्प्याच्या घावनात ओल्या खोबऱ्याच्या सोबतीने गुळ घालून त्यांची चव वाढवली, उकडीच्या मोदकांत नारळाचा चुन, गूळ घालून ते चविष्ट आणि पौष्टिक बनवले. गुळाचा पाक करून त्यात काजूचे गर, शेंगदाणे घालून गुळाचे ‘खटखटे’ नावाचा, मुलांना अतिशय आवडता असा पौष्टिक, गावरान खाद्यपदार्थ बनवला. जुन्याकाळी सासुरवाशीण माहेरी जाताना भेट म्हणून, घरच्या घरी दळलेले तांदळाचे जाडेभरडे पीठ आणि गुळ घालून बनवलेली गुळाची (Jaggery) (ग्वाडाची) भाकरी घेऊन जायची. हा पदार्थ आताच्या पिढीच्या विशेष परिचयाचा नसेलच. आज माहेरवाशिण आणि तिच्या घरचे लोक गुळाची भाकरी बनवण्याच्या फंदात पडणार नाहीत. मोठ्या कष्टाचे काम असते ते.

गुळाचे लाडू, गुळ घालून बनवलेले ‘तवसाळे’ इत्यादी खाद्यपदार्थ नुसते आठवून बघा. मकर संक्रांतीनिमित्त वाटणार येणाऱ्या तिळगुळामध्येही गुळाचीच सोबत असते. असा हा गुळ उत्साहवर्धक, आरोग्यवर्धक. वेगवेगळ्या अन्नपदार्थांतून, वेगवेगळ्या प्रकारे सेवन केला तरी त्याचा आरोग्यावर (Health) दुष्परिणाम होत नाही. बहुजनांनी तर प्रारंभापासूनच गुळाला चहाच्या माध्यमातही स्वीकारले होते. त्या काळी घरात सकाळी किंवा चहाच्यावेळी कुणी शेजारीपाजारी गजालींना आला तर त्यालाही घोटभर ग्वाडाचा चहा मिळत असे.

कालौघात साखर कारखान्यामधून साखरेचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होऊ लागले. गावोगावी सरकारमान्य दुकानातून रेशनवर स्वस्त दरात साखर उपलब्ध होऊ लागली. ‘अति सर्वत्र वर्जयते’ असं गुळाच्या बाबतीत घडून कदाचित गुळाचा चहा पिणं बहुजनांना कमीपणाचं वाटू लागलं असावे. घरातलं गुळाच्या चहाचे प्रमाण कमी कमी होत गेलं आणि त्याची जागा साखरेच्या दूधयुक्त चहाने घेतली. नोकरीधंदा (Job) तसेच इतर कारणांसाठी घरातून बाहेर पडलेल्या लोकांच्या सोयीसाठी जागोजाग हॉटेल्स, कॅन्टीन, रेस्टॉरंट निर्माण झाली. तिथे चहा-कॉफी मिळू लागली. जे शहरात तेच गावात आले. जिथं चहाचं दुकान नाही असं गाव आजच्या घडीला शोधूनही सापडणार नाही.

गावातल्या आपल्या चहाच्या हॉटेलमध्ये, ठरवलेल्या किंवा ठराविक वेळेला आपली पावलं या संकेतस्थळाकडे आपसूकच वळतात. या ठिकाणी चहा पिता पिता मनातल्या चार गजाली एकमेकांना सांगता येतात. एखाद्या विषयावर मनमोकळेपणाने बोलता येते. बुधवंतप्रमाणे चर्चा-वादविवादही करता येतात. ‘चहा तिथं गाव-न्याय आणि चहा तिथे गाव-मेळा’ असं चहाचं माहात्म्य सांगणाऱ्या म्हणीही गावगिर्‍या वाठारांत प्रसिद्ध प्रचलित आहेत. घरी कुणी आले की त्याचं स्वागत चहानेच होतं. मोठ्या समारंभप्रसंगी असो वा वेळप्रसंगी, घोटभर चहा हवाच. चहाला आपल्याकडे स्वागत-पेय म्हणून मान्यता आणि लोकप्रियता मिळाली आहे. चहा म्हणजे उत्साहवर्धक संजीवनी. अंगातला आळस झटकून टाकण्याचं सामर्थ्य चहामध्ये आहे.

गुळाच्या चहापासून सुरू झालेली आपली चहासंस्कृती, गरजेनुसार बिनसाखरेचा चहा, आल्याचा, मसाल्याचा, इलायची चहा अशा अनेक ढंगातून अविष्कृत होताना दिसतो आहे. अलीकडे मात्र शहरात काही ठिकाणी गुळाच्या चहाचे ठेले (स्टॉल्स) दिसू लागले आहेत. चहा शौकिनांची पावलं आपसूकच तिकडे वळू लागली आहेत. एकेदिवशी आपल्यासमोर घरात बनवलेला, गरमागरम वाफाळलेला, पूर्वापार गुळाचा चहा येईल अशी अपेक्षा करायला काय हरकत आहे?

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT