Kerala
KeralaDainik Gomantak

माझा गोवा असा का नाही?

केरळचे प्रत्येक ठिकाण म्हणजे नैसर्गिक देणगीच होती.
Published on

गोवा: लग्नानंतर नवरा आणि मित्रांसोबत केरळला जाण्याचा योग आला. आम्ही तेथील वातावरणात रमून गेलो होतोच पण तेथील नयनरम्य सौंदर्य, स्वच्छता पाहून गोव्यात हे का होऊ शकत नाही हाच विचार माझ्या मनात सतत डोकावून जात होता. केरळमद्धे आम्ही ज्या ठिकाणी, ज्या भागात फिरायला गेलो होतो, तेथील भाषा आमच्या परीचयाची नव्हतीच मुळी. त्यामुळे आम्हाला त्याठिकाणी अडचणीचे होईल याची मनात भिती होतीच. तेथे गेल्यानंतर फिरण्यापासून ते राहाण्याची सगळी व्यवस्था, तसेच प्रेक्षणीय स्थळे दाखवण्यासाठी एका गाईडची व्यवस्था केली गेली होती. ज्या ठिकाणी आम्ही गेलो, ते प्रत्येक ठिकाण म्हणजे नैसर्गिक देणगीच होती. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या सोईसुविधा त्याठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. रस्ते एकदम साफ आणि स्वच्छ, तर सगळीकडे चहाचे मळेच मळे. त्यामुळे सर्वत्र मनमोहक द्रुश्य होते.     

Kerala
Goa Festivals: 'आनंदासाठी सण उत्सव हवे'

तेथील लोकांचा समजुतदारपणा, मनमिळावू स्वभाव यामुळे आम्ही गाव, घर आणि राज्य सोडून परक्या ठिकाणी आलो असे वाटलेच नाही. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विविध प्रकारच्या योजना राबविण्यात आल्या आहेत. त्याठिकाणी असलेल्या पाण्याचा वापर त्यांनी योग्य प्रकारे करून घेतला आहे. आम्हाला लाभलेल्या मार्गदर्शकाला आमची भाषा कळत नव्हती आणि त्याची भाषा आम्हाला कळत नव्हती. परंतु त्याने आम्हाला समजून घेतले. आमच्या आवडी निवडी ओळखून तो आमच्यात रममाण झाला. त्यात आम्ही गोवेकर असल्याने त्याला आमच्याबद्दल वेगळाच आदर होता.

निसर्ग सौंदर्याने नटलेल्या कोची - केरळ भागात रस्त्यावर एक पान देखील पडलेले दिसून आले नाही. आम्ही चौकशी केली असता सरकारने तसा नियमच बनवला आहे. त्यामुळे सर्वच ठिकाणी स्वच्छता आणि सुंदरता बघायला मिळणार आहे असे तेथील लोकांनी आम्हाला समजेल अशा तोडक्या मोडक्या भाषेत सांगितले. आम्ही त्यांचे म्हणणे ऐकून घेतले आणि जे काही समजायचे ते समजून गेलो.

मनात विचार आल, “सुंदर गोवा, स्वच्छ गोवा” हे आमच्या गोवा राज्याचे ब्रीदवाक्य आहे. जगाच्या नकाशावर एका ठिपक्याएवढे असलेल्या इवल्याशा गोवा राज्यात हे का शक्य नाही? जगाच्या नकाशावर जगप्रसिद्ध असलेल्या गोवा राज्याचा पर्यटन क्षेत्रात नावलौकिक आहे. समुद्र किनाऱ्यावर मौजमजा करण्यासाठी देशविदेशातील लाखो पर्यटक सातासमुद्रापार करून लाखो मैल दुरवरुन गोव्यात येतात. गोवा सुंदर आहे परंतु स्वच्छ आहे का ?

देशविदेशातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी मंत्री आणि संबंधित अधिकारी विदेशवारी करतात. त्यासाठी लाखोंची उधळपट्टी केली जाते. यातून काय साध्य होते हा संशोधनाचा विषय आहे. विदेशवारी करून लाखोंच्या संख्येने पर्यटक गोव्यात येत असतीलही परंतु येथे आल्यावर त्यांचे समाधान होते की नाही हा प्रश्न आहे. वास्तविक मंत्री आणि अधिकार्यांनी शेजारच्या केरळ राज्यात जाऊन तेथील माहिती जाणून घेऊन त्याची अंमलबजावणी केली तरी आमचा गोवा सुजलाम सुफलाम तसेच सुंदर आणि स्वच्छ होण्याची शक्यता आहे. गोव्यात आलेले पर्यटक येथील वाईट गोष्टींची जाहिरात विदेशात करतात. त्यामुळे गोवा बदनाम होतो.

त्यापेक्षा भारतातील केरळ - कोची येथील आदर्श घेऊन ते आचरणात आणले, पडिक जमीनीचा उपयोग करून पडिक जमीन उत्पादनाखाली आणली तर गोवा सुजलाम सुफलाम आणि सुंदर बनल्याशिवाय राहाणार नाही. शेती व्यवसायाची ओढ लागली की युवा पिढी पांढरपेशा सरकारी नोकरीच्या शोधात बेकार राहाणार नाही. राज्य सरकारने कागदी घोडे नाचवण्यापेक्षा कृती करण्यासाठी प्रयत्नशील असायला हवे. राज्याला गोड्या पाण्याची नैसर्गिक देणगी लाभली आहे. या पाण्याचा वापर योग्य प्रकारे करणे आवश्यक आहे.

Kerala
आपली नाटकं आणि आपलेच प्रश्न...

महिला मंडळांना फक्त निवडणुकीत वापरून घेण्यापेक्षा महिलांच्या हाताना काम देऊन राज्यात स्वच्छता मोहीम राबविण्यात यावी. आपला परिसर कसा स्वच्छ राहील. यासाठी योजना राबविण्यात यावी. आपले घर आणि आपला परिसर स्वच्छ ठेवला तर गाव स्वच्छ राहील. गाव स्वच्छ झाला तर राज्य स्वच्छ होईल. याबाबत राज्य सरकारने विचार करायला हवा. त्यासाठी इच्छाशक्तीची आवश्यकता आहे. पण तिचाच तर येथे अभाव आहे.

-शमा महेंद्र च्यारी

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com