Goa CM Pramod Sawant with PM Narendra Modi  
ब्लॉग

Narendra Modi Birthday: ‘मोदीजींचे गोव्यावर प्रेम असून गोवाही मोदीजींचा चाहता आहे'

मोदीजींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारांत गोव्याला कधी नव्हे ते भरभक्कम प्रतिनिधित्व लाभले.

दैनिक गोमन्तक

गेली सात वर्षे गोव्याला (Goa) केंद्राकडून अभूतपूर्व असा पाठिंबा लाभला आहे, मग तो साधनसुविधांच्या विकासाबाबतीत असो, रस्त्यांचे जाळे सुदृढ करण्यासाठी असो वा विविध कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीसाठी असो. पंतप्रधानांचे (PM Narendra Modi) द्रष्टे नेतृत्व आणि अथक परिश्रम यामुळे गरीब, महिला, शेतकरी, मागास आणि दलित अशा फार मोठ्या वर्गाचे जीवनमान सुधारले आहे. त्यांचे केवळ सशक्तीकरणच झालेले नसून महत्त्वाच्या पदांवर नियुक्ती करून त्यांना सुयोग्य प्रतिनिधित्व देण्यात आले आहे.

लोकशाही शासनव्यवस्थेत एखाद्या नेत्याची लोकप्रियता आणि कार्यपद्धती यांचे मूल्यांकन वरचेवर करण्यासाठी निवडणुकांचे प्रयोजन असते. आजपासून 20 दिवसांनी म्हणजे 7 ऑक्टोबर 2021 रोजी श्री. नरेंद्र मोदीजी आपल्या सार्वजनिक जीवनाची वीस यशस्वी वर्षे पूर्ण करतील. गुजरात राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी सुरू केलेला प्रवास 2014 पर्यंत अव्याहत राहिला आणि त्यानंतर उभ्या देशाने त्यांच्या कार्यपद्धतीला सलाम करत देशाची धुरा त्यांच्या हाती सोपवली व जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीप्रधान देशाचे पंतप्रधानपद बहाल केले. अशा प्रकारचे यश दुर्मिळ तर असतेच; पण मोदीजींच्या बाबतीतली नोंद घेण्याजोगी बाब म्हणजे हा प्रवास सुप्रशासन, द्रष्टे नेतृत्व आणि सचोटीच्या राज्यकारभाराचा होता.

मोदीजींच्या कठोर टीकाकारांनीही त्यांच्यावर कधीच भ्रष्टाचाराचे आरोप केलेले नाहीत, ही लक्षणीय बाब असून, आपल्या सार्वजनिक जीवनात त्यांनी पाळलेल्या मूल्यनिष्ठेवरले हे भाष्य आहे. मोदीजींच्या जीवनपटातून आपल्याला सेवेचे माहात्म्य कळते आणि देश व देशवासीयांच्या प्रती असलेल्या निरंतर निष्ठेचा प्रत्यय येतो. उर्वरित देशाप्रमाणे गोवाही 17 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर असे पुढील वीस दिवस ‘सेवा और समर्पण अभियान’ राबवणार आहे. माननीय पंतप्रधानांची कार्यशैली आणि जीवनमूल्यांवरल्या निष्ठेतून कोट्यवधी देशबांधवांच्या जीवनमानात झालेल्या आमूलाग्र बदलांविषयीची जनजागृती करतानाच त्यांनी पददलितांच्या उत्थानासाठी राबवलेल्या उपक्रमांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे हा या अभियानामागचा हेतू आहे.

गोव्याने आपल्या शंभर टक्के पात्र जनतेला कोविड लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यांत सामावून घेतल्याच्या उपलब्धीच्या पार्श्वभूमीवर मी हे लेखन करतो आहे. मला हे नमूद करणे महत्त्वाचे अशासाठी वाटते की, देशभरांत लसीकरणाला जे सुयश लाभते आहे त्याचे श्रेय पंतप्रधान मोदीजींच्या आणि त्यांच्या सरकारच्या अथक यत्नांना जाते. महामारीच्या प्रारंभीच लसीकरणाचे महत्त्व ओळखून त्यांनी पूर्वतयारी आरंभली होती. त्यांनी लस उत्पादकांना त्वरेने मान्यता देत अन्य प्रकारचे सरकारी साहाय्यही दिले. त्यामुळेच भारताला जगातली सर्वांत मोठी लसीकरण मोहीम जगातल्या अन्य विकसनशील देशांच्या बरोबरीने यशस्वीरित्या राबवणे शक्य झाले आहे. या कसोटीच्या क्षणी त्यांना ‘वसुधैव कुटुंबकम्’च्या मंत्राचा विसर पडला नाही आणि जगभरातील कितीतरी गरजू देशांना भारताने लस पुरवून मदत केली आहे. महामारीच्या खडतर काळातून जाताना मोदीजींनी जे कणखर नेतृत्व दिले त्याबद्दल देश त्यांचा सदैव ऋणी असेल.

‘मोदीजींचे गोव्यावर प्रेम असून गोवाही मोदीजींचा चाहता आहे’, हे मला पितृस्थानी असलेले माझे मार्गदर्शक दिवंगत मनोहर पर्रीकरांचे शब्द मला स्मरतात. ते नेहमीच गोव्यात 2002 साली झालेल्या भाजपाच्या राष्ट्रीय अधिवेशनाचा उल्लेख करून त्या अधिवेशनात मोदीजींच्या गुजरातमधील नेतृत्वाला पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाने कसा आशीर्वाद दिला, याचे वर्णन करायचे. 2013 साली पुन्हा गोव्यात झालेल्या अधिवेशनाने, तर 2014 सालची लोकसभा निवडणूक मोदीजींच्या नेतृत्वाखाली लढण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला व त्यांना प्रचार समितीचे अध्यक्षपद देण्यात आले. 2012 च्या विधानसभा निवडणुकीद्वारे राज्याचा आमदार बनल्यामुळे मला तो घटनाक्रम जवळून पाहाण्याचे भाग्य लाभले. पंतप्रधान झाल्यानंतर दिल्लीतून बाहेर पडण्यासाठी मोदीजींनी सर्वप्रथम गोव्याची निवड केल्याचेही माझ्या स्मरणात आहे. तमाम गोमंतकीयांसाठी ती अभिमानाची बाब होती. दिवंगत पर्रीकरांसमवेतचे मोदीजींचे मैत्रही आमच्या चीरस्मरणात राहील.

संघाचा स्वयंसेवक ते प्रचारक ते मुख्यमंत्री ते पंतप्रधान हा मोदीजींचा प्रवास प्रत्येक निष्ठावंत कार्यकर्त्याला ऊर्जा प्रदान करणारा आहे. रा. स्व. संघ ही जगातली सर्वांत मोठी स्वयंसेवी संघटना आणि भारतीय जनता पार्टी ही जगातली सर्वांत मोठी राजकीय संघटना यांच्या पाठबळावर मोदीजींसारखा कष्टाळू आणि निष्ठावान कार्यकर्ता यशाच्या शिखरावर आरूढ झाला.

गोव्यावर मोदीजींचे विशेष प्रेम आहे. माझ्या मुख्यमंत्री पदाच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात त्यांच्यासह त्यांच्या अवघ्या मंत्रिमंडळाचे प्रचंड पाठबळ लाभले. मोदीजींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारांत गोव्याला कधी नव्हे ते भरभक्कम प्रतिनिधित्व लाभले. श्रीपादभाऊ नाईक 2014 पासून मंत्रिमंडळात आहेतच, याशिवाय मनोहर पर्रीकर यांच्या रूपाने देशाला संरक्षणमंत्रीही गोव्याने दिला आणि आता राजेंद्र आर्लेकरजींच्या रूपाने राज्यपालही दिलेला आहे. भाजपाने गोव्याला जे दिले ते अन्य कोणत्याच पक्षाने दिलेले नाही.

गेल्या सात वर्षांत मोदी सरकारने केलेल्या कामांची जंत्री सादर करायची तर मला वेगळा विस्तृत लेख लिहावा लागेल. त्यांनी घेतलेल्या प्रत्येक निर्णयाच्या केंद्रस्थानी जनसामान्यांचे व्यापक हित होते. जनधन योजना, आयुष्यमान भारत, स्वच्छ भारत, मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत, स्टार्टअप इंडिया अशा योजना असोत किंवा जीएसटी कर प्रणालीची कार्यवाही असो, कलम 370चे उच्चाटन असो वा नागरिकत्व कायद्यातली दुरुस्ती असो किंवा अयोध्येत भव्य राममंदिराचे निर्माण असो, आपल्या जाहीरनाम्यातील प्रत्येक वचनाची पूर्तता त्यांनी केली आहे.

माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांसाठी मोदीजी प्रेरणास्रोत आहेत. त्यांनी सर्वोच्च पदापर्यंत केलेला प्रवास भारतीय जनता पक्षाच्या लोकशाही मूल्यांवरल्या निष्ठेकडे निर्देश करतो. त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची मला संधी मिळाली हे मी माझे सद्भाग्य समजतो. माझ्या सरकारसाठी ते शक्तिस्थळ आहेत. त्यांना पुन्हा एकवार मनःपूर्वक शुभेच्छा देताना या नितांतसुंदर राज्यांत त्यांचे पुन्हा एकदा स्वागत करण्याची संधी आम्हाला मिळावी, अशी प्रार्थना करतो.

डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री, गोवा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT