भारतीय धर्म-संस्कृतीत शक्ती आणि भक्तीचा पुरस्कार करणारे दैवत म्हणून हनुमान वंदनीय ठरलेला आहे. मारुती, अंजनीपुत्र, केसरीनंदन, रुद्राचा अवतार, वायुदेवाचा वरद प्राप्त केलेले दैवत या नात्याने हनुमानाला स्थान लाभलेले असून, आठवड्यातला शनिवार हा दिवस मारुती पूजनाशी निगडित आहे. बुद्धी, शक्ती, धैर्य, भक्ती आणि स्वयंशिस्त आदी मूल्यांचा अधिष्ठाता म्हणून त्याची पूजन परंपरा रूढ आहे. रामायण आणि महाभारतासारख्या महाकाव्यांत हनुमान शक्तिशाली आणि रिपूमर्दन करणारा देव म्हणून ओळखला गेला आहे. रावणाने फसवून सीतेला नेल्यावर तिला अशोकवनात ठेवली, तेव्हा तिच्या शोधार्थ भटकणाऱ्या श्रीरामाला तिचा शोध घेण्यात हनुमानाने साहाय्य केले आणि महापराक्रमी रावणाच्या सामर्थ्याला जणू काही आव्हानच दिले. अशा प्रचलित कथेद्वारे हनुमान शक्तिवर्धक देव म्हणून लोकमानसाला प्रिय झाल्याकारणाने त्याची उपासना रूढ झाली आणि कालांतराने गावात प्रवेश करून लोकांना त्रास देऊ पाहाणाऱ्या भुता-खेतांना नियंत्रित करावे म्हणून हनुमानाची मंदिरे सीमेवर उभारण्याची परंपरा अस्तित्वात आली.
अंजनीच्या पोटी हनुमानाचा जन्म किष्किंधा म्हणजे आजच्या काळातील तुंगभद्रा नदीच्या किनारी वसलेल्या हंपी येथे चैत्र मासातल्या पौर्णिमेला, वसंत ऋतूत झाला. दुसऱ्या कथेनुसार त्याचा जन्म महाराष्ट्रातल्या नाशकातील अंजनेरीला झाला. कोणी त्याची निर्मिती वायुदेवाच्या कृपेने झाली, असे मानतात तर कोणी तो शिवाचा अवतार, रूद्र असे मानतात. भारतात शैव आणि वैष्णव पंथियांत हनुमानाची उपासना रूढ असून, मध्य भारतातील आदिवासी जमातीतही त्याला दैवत म्हणून पूजले जाते. दक्षिण भारतातल्या केरळ राज्यातल्या अय्याप्पा देवतेशी हनुमानाचे साधर्म्य असल्याचे मानले जाते. तेराव्या शतकात मध्वाचार्यांनी वैष्णव संप्रदायाचा प्रचार करताना श्रीराम भक्त हनुमानाची उपासनाही देशाच्या विविध भागांत प्रचलित केली. कर्नाटक राज्यातल्या हन्गल येथील हलकेट गावी ५१२० मध्ये हनुमानाचे मंदिर उभारण्यात आल्याचा ऐतिहासिक संदर्भ उपलब्ध आहे. इसवीसनाच्या पाचव्या शतकातली हनुमान मूर्ती प्रयागमध्ये असून औरंगाबाद येथील वेरूळच्या कैलास मंदिरावरील रामायणाच्या दृष्यांत हनुमान कोरलेला आहे. इसवीसनाच्या आठव्या शतकात राजस्थानात चितोडगढ येथे हनुमानाची मूर्ती आढळलेली आहे. बाराव्या शतकातली हनुमानाची पाषाणमूर्ती कर्नाटकातल्या बेलूरला आढळली आहे. उत्तर चोळकाळातही हनुमानाचे पूजन सुरू होते. केरळमध्ये हनुमानाच्या पाषाण, कास्य, काष्ठ आणि हस्तिदंताच्या मूर्ती आढळतात. केरळातल्या शाठांकुलांगरा गावात सापडलेली अशोकवनात सीतेपुढे उभा असलेल्या हनुमानाची काष्ठमूर्ती चौदाव्या शतकातली आहे. नेपाळातील भक्तपूर येथील चतुर्भुज मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण असून गुजरातेत सौराष्ट्रातल्या पोरबंदर येथे ११ मुखे, २२ हातांची मूर्ती आहे. कोलकाता, उज्जैन, गिरनार, भीलवाडा आदी ठिकाणी पंचमुखी हनुमानाची पूजा केली जाते. दक्षिणमुखी हनुमान मूर्तीचे पूजन बारामती, पुणे आदी ठिकाणी होते. पाकिस्तानातल्या कराची येथील पंचमुखी हनुमानाची मूर्ती विशेष प्रसिद्ध आहे आणि आजही भाविकांचे आकर्षण ठरलेली आहे.
गोव्यातल्या लोकमानसाने रामायण-महाभारत महाकाव्यांप्रमाणे अन्य धार्मिक ग्रंथातल्या हनुमानविषयक शौर्य, पराक्रमाच्या कथांनी त्याला देवत्व प्रदान केले आहे. गोवा कदंब राज्यकर्त्यांच्या ध्वजावर हनुमानाचे चित्र होते. मध्वाचार्यांनी वैष्णव संप्रदायात हनुमान पूजेला स्थान बहाल केल्याने गोव्यात ठिकठिकाणी हनुमान मंदिरांची स्थापना करण्यात आली आहे. पोर्तुगीज अमदानीत हनुमानाच्या मूर्तींची तोडफोड करण्यात आली असावी. तळावली येथील चौदाव्या शतकातली एक हनुमान मूर्ती भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या जुने गोवे येथील वस्तुसंग्रहालयात पाहायला मिळते. बार्देस तालुक्यातल्या म्हापसा येथील मारुती मंदिरात १८४० साली मारुतीच्या चित्राचे पूजन केले जात होते. नंतर १८४३ साली तेथे पंचमुखी मूर्तीची स्थापना करण्यात आली. पणजीत मळा येथे मारूतीगड असून १९३३ साली याठिकाणी मारुती मंदिराची उभारणी करण्यात आली. गोव्यात सत्तरीतील वाळपई, नानोड्यातील बांबर व मोर्ले, बार्देशातील हणजूण येथील मारुती मंदिरांची ख्याती आहे. महाराष्ट्रात रामदास स्वामींनी सतराव्या शतकात परकीयांच्या सत्तेविरुद्ध लढण्यासाठी समाजाला प्रेरणा लाभावी म्हणून ठिकठिकाणी चारशेच्या आसपास हनुमान मूर्तींची स्थापना करून बलोपासनेला प्राधान्य दिले होते. रामदास स्वामींचे हे मारुती पूजन गोव्यातही विशेष लोकप्रिय झाले आणि पर्वत, टेकडीच्या ठिकाणी मारुतीच्या मूर्तीची स्थापना करून त्या परिसराला मारुतीगड असे नाव देण्यात आले. आज वाळवंटी नदीच्या उजव्या काठावर कारापुरात श्री विठ्ठलाच्या मंदिरामुळे जो परिसर विठ्ठलापूर म्हणून परिचित आहे, त्याला पूर्वी मारुतीगड अशी संज्ञा लाभली होती. दरवर्षी चैत्रात जेव्हा श्री विठ्ठल मंदिरात चैत्रोत्सवाचे आयोजन केले जाते, त्याचा समारोप चैत्र पौर्णिमेच्या रात्री, हनुमान जयंतीदिनी वीरभद्राचे नृत्य आणि रथोत्सवाने केला जातो. त्याला येथे असलेले पूर्वाश्रमीचे मारुती मंदिर कारणीभूत असले पाहिजे.
गोव्यात एकेकाळी काविरंगाद्वारे मंदिराच्या भिंतीवर देवादिकांची जी चित्रे पारंपरिक शैलीने काढली होती, त्यात श्री रामभक्त हनुमानाचा समावेश आहे. डिचोली तालुक्यातील अडवलपाल येथील शतकोत्तर इतिहासाची परंपरा असलेल्या आणि पाषाणी हनुमान मूर्ती असलेल्या मंदिरांत काविरंगातला हनुमान लक्षवेधक आहे. गोव्याच्या मूर्तीशिल्पांत तांबडी सुर्ला गावातल्या तयडे येथे ब्राह्मणी मायेचे जे जुने मंदिर आहे, त्याच्यावर पंचमुखी हनुमानसदृश्य असलेले चित्र प्रेक्षणीय असेच आहे. वाळपईजवळच्या नागवे येथील देवराईत ज्या पाषाणी मूर्ती आढळलेल्या आहेत, त्यात नौकेत उभ्या स्थितीतली लोकदेवता चित्रित केलेली आहे आणि तिच्या शिडावर जो ध्वज आहे, त्यावर हनुमानाशी साधर्म्य सांगणारे चित्र कोरलेले आहे.
एकेकाळी गावच्या वेशीवरती शेंदूर फासलेल्या अवस्थेत असणारी मारुतीची श्रद्धास्थाने आज मंदिरात रूपांतरित झालेली आहेत. साखळी बाजारपेठेतील मारुती मंदिर जुन्या काळी पर्ये आणि मावळंगतड या दोन्ही गावांसाठी सीमादर्शक ठरले होते. त्यामुळे आजही शिमगोत्सवात साखळी शहरात पर्येहून येणारे दोन घोडे मिरवणुकीत जेव्हा गावठण येथील घोडेमोडणीची भेट घेण्यासाठी येतात, तेव्हा त्यांच्या तलवारी मारुती मंदिरासमोर एकमेकांशी भिडतात. हनुमान जरी श्रीराम भक्त म्हणून प्रसिद्धीस पावलेला असला तरी गोमंतकातल्या लोकमानसासाठी आसुरी शक्तीचा नि:पात करणारा, भुता-खेतांचा भय निवारणारा लोकदेव म्हणूनही वंदनीय ठरलेला आहे. त्यामुळे त्याच्या मूर्तीचा, मंदिराचा भाविकांना पूर्वापार आधार लाभलेला आहे. त्यामुळेच चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंतीचा उत्सव भावभक्तिद्वारे उत्साहात गोवाभर होत असतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.