९५ वे अखिल भारतीय मराठी संमेलन २२ एप्रिलपासून लातूर जिल्ह्यातील उदगीर (उदयगिरी) शहरात होत आहे. तेथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाने या संमेलनाच्या आयोजनाची जबाबदारी स्वीकारली आहे. या संमेलनाचे आयोजन मराठी साहित्य महामंडळाच्या अधिपत्याखाली होत आहे. १९६० साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. १९६१ मध्ये पुण्याची महाराष्ट्र साहित्य परिषद, मुंबई मराठी साहित्य संघ, औरंगाबादची मराठवाडा साहित्य परिषद, आणि नागपूरचा विदर्भ साहित्य संघ या त्या त्या प्रदेशात काम करणाऱ्या प्रातिनिधिक चार संस्था एकत्र आल्या आणि त्यांनी मराठी भाषेचे, मराठी वाङ्मयाचे व मराठी संस्कृतीचे काही समान प्रश्न सोडवण्यासाठी एक शिखर संस्था निर्माण करावी, असे ठरवले. ती संस्था म्हणजेच अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ होय. महामंडळाच्या स्थापनेपर्यंत मराठीची जी साहित्य संमेलने भरत होती, ती पुण्याची महाराष्ट्र साहित्य परिषद भरवत असे. या संमेलनांना ‘महाराष्ट्र साहित्य संमेलन’ असेच तोपर्यंत म्हटले जात होते. साहित्य महामंडळाने काम सुरू केल्यानंतर शक्यतो दरवर्षी एक साहित्य संमेलन भरवावे, असा निर्णय १९६४ मध्ये मडगावमध्ये झालेल्या ४५ व्या साहित्य संमेलनात घेतला आणि १९६५ मध्ये हैदराबाद येथे जे ४६ वे साहित्य संमेलन झाले, ते महामंडळाचे पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होते. त्या अनुषंगाने यंदाचे साहित्य संमेलन ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन’ या नावाने भरणारे ५० वे संमेलन आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आणि अखिल भारतीय मराठी संमेलन याच्या संबंधाविषयी हल्ली गोव्यात जास्त चर्चा होत नाही, आज ती थोडी करूया.
स्वातंत्र्यानंतर सन ५० चा काळ असा होता, की सर्व मराठी भाषिक मुलुख एकाच राज्य छ्त्राखाली आणण्याचा विचार राजकीय क्षेत्रामध्ये गतिमान झाला होता. या विचारांना बळ देण्यासाठी आणि मराठी भाषा व साहित्य यासंदर्भातील समान प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेसकट वेगवेगळ्या मराठी साहित्य संस्थांना एकत्र आणण्याचे आणि सर्वांची मिळून एक प्रातिनिधिक संस्था स्थापन करण्याचे प्रयत्न सुरू झाले. त्या प्रयत्नांची परिणती १९५१ मध्ये सर्व साहित्य संस्थांच्या प्रतिनिधींची मिरज येथे बैठक होण्यात झाली. कविवर्य अनिल उपाख्य आत्माराम रावजी देशपांडे यांचा त्यात पुढाकार होता. मिरजेच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानीही अनिलच होते. या बैठकीत सर्व संस्था मिळून तयार होणाऱ्या संघ-संस्थेच्या घटनेचा मसुदा तयार करण्यात आला. संकल्पित संस्थेला ''मराठी साहित्य महामंडळ'' असे नाव द्यावे, अशी सूचना अनिल यांनीच केली. आज महाराष्ट्र, गोवा, छत्तीसगढ, मध्य प्रदेश या राज्यांत आणि बिदर, बेळगाव अशा ठिकाणी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या ३५० शाखा असून, १२ हजारांच्या वर सभासद आहेत. मराठी साहित्यातील सुमारे ४० हजार साहित्यिकांचे नेतृत्व करणारी ही सगळ्यात मोठी साहित्य परिषद आहे. मराठी भाषेचा प्रचार व प्रसारासाठी ही परिषद काम करीत असून, लोकसहभागातून संमेलने व विविध उपक्रम राबविले जातात. पुढे १९६० नंतर वेगवेगळी राज्ये निर्माण झाली, तसा राजकारण्यांनी ‘महाराष्ट्रवाद’ मागे टाकला. प्रत्येक ठिकाणी अजूनही स्थानिक भाषावाद आहेत, मग तो ‘कोकणी- मराठी’ असो वा ‘मराठी- कन्नडीग’ असो. या वादात मराठी साहित्य महामंडळ आपल्या ५० वर्षांपूर्वीच्या घेतलेल्या भूमिकेशी किती ठाम आहेत, किंवा भूमिका बदलल्या असतील तर त्यामागची कारणे काय, अशाविषयी येथील मराठीप्रेमींनी माहिती घेणे गरजेचे आहे. गोव्यातील सदस्य संस्थांच्या प्रतिनिधींनी त्याविषयी इतर मराठीप्रेमींना माहिती करून देणे गरजेचे आहे. असे न केल्याने मराठी साहित्य महामंडळाने घेतलेल्या भूमिकेवर, तिच्यामागची मूळ भावना माहीत नसल्याने विपरीत प्रतिक्रिया उमटतात आणि मराठी साहित्यप्रेमींमध्येच गोंधळ निर्माण होतो.
सन २०१९ साली महामंडळाचे ९२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यवतमाळ येथे ११ ते १३ जानेवारी या कालावधीत डॉ. वि. भी. कोलते संशोधन केंद्र आणि वाचनालय व विदर्भ साहित्य संघ- यवतमाळ यांनी आयोजित केले होते. यात भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या संमेलनाध्यक्षा अरुणा ढेरे, राज्याचे मराठी भाषा आणि सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, पूर्व संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, स्वागताध्यक्ष मदन येरावार यांच्या प्रमुख उपस्थितीत वैशाली येडे यांच्या हस्ते संमेलनाचे उदघाटन झाले. या उदघाटन सोहळ्याची जास्त चर्चा झाली ती प्रसिद्ध साहित्यिक नयनतारा सहगल यांना दिलेल्या उदघाटन सोहळ्याच्या आमंत्रणामुळे. आमंत्रण दिले व ऐनवेळी त्यांना वगळण्यात आले. त्यामुळे त्याची चर्चा देशभर झाली. सुरवातीला त्यावेळचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी सुरवातीला अतिथींच्या आमंत्रणाची जबाबदारी स्थानिक आयोजकांची असते. त्यामुळे त्यांचे नाव वगळण्यात महामंडळाचा हात नाही, अशी भूमिका घेतली. जसे पुढे हे प्रकरण वाढले, तसे त्यांनी या कृतीची नैतिक जबाबदारी स्वीकारून संमेलनाआधीच अध्यक्षपदाचा राजीनामा उपाध्यक्षांकडे सुपूर्द केला. त्यानंतर महामंडळ व स्थानिक आयोजक यांच्यामध्ये समन्वय असावा, यावर महाराष्ट्रभर चर्चा झाली. मागील अनुभवावरून यावर्षी तरी आयोजनाबाबत ही काळजी घेतली जात आहे काय, हा एक प्रश्न आहे.
जेव्हा कोकणी ज्येष्ठ साहित्यिक दामोदर (भाई) मावजो यांना यंदाच्या संमेलनाच्या उदघाटनाला आमंत्रित केल्याची बातमी आली, तेव्हा गोमंतक मराठी भाषा परिषदेचा अध्यक्ष या नात्याने माझी प्रतिक्रिया विचारण्यात आली. मी काय प्रतिक्रिया दिली, हे सांगण्यापूर्वी गो.म.भा.परिषदेच्या एकूणच भाषावादविषयीच्या भूमिकेबद्दल सांगणे गरजेचे आहे. परिषदेच्या मागील सर्वच अध्यक्षांची राजभाषेविषयी स्वत:ची ठाम मते होती. दिवंगत अध्यक्ष रामनाथ नाईक यांचे मत त्यांच्या ‘राजभाषेचे कटकारस्थान’ या पुस्तकात लिखित स्वरूपात आहे. त्यामुळे परिषदेच्या भूमिकेविषयी संशय कुणालाही घेता येत नाही. याचबरोबर परिषदेचे हेही धोरण आहे की, कधीच ‘भाषाद्वेष’ व ‘व्यक्तिद्वेष’ करायचा नाही. अध्यक्ष या नात्याने मी तो कटाक्षाने पाळतो. महामंडळासारख्या शिखर संस्थेने मावजो यांना ‘ज्ञानपीठ विजेते कोकणी लेखक’ या नात्याने प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले आहे, हे कळल्यावर त्यांचे अभिनंदन करणे संस्थाप्रमुख या नात्याने माझे कर्तव्य ठरते व ते मी केले. त्याचबरोबर हा निर्णय घेताना आपण गोव्यातील स्थानिक सभासद संस्थांना विश्वासात घेतले होते काय? असाही प्रश्न आयोजकांना करायला मी विसरलो नाही. भावना एकच की, २०१९ची पुनरावृत्ती व्हायला नको. पाहुणा काही आपल्याला बोलवा, असे सांगून येत नाही. एकदा त्याला बोलविले, की त्याचा अपमान करण्याचा कोणालाही हक्क नाही. जी काही माहिती हवी असते, ती माहिती स्थानिक सदस्य संस्थांकडून आमंत्रण देण्याआधीच गोळा करण्यासाठी मोठा अवधी आयोजकांकडे असतो. म्हणूनच गोव्यातील या महामंडळाच्या सदस्य संस्थांनी याविषयीची आपली भूमिका आताच स्पष्ट करणे गरजेचे आहे, जेणेकरून पाहुण्यांना नंतर मन:स्ताप नको.
असे म्हणतात की, इतिहासाची पुनरावृत्ती होते. ५० वर्षांपूर्वी मडगावात झालेल्या ४५ व्या साहित्य संमेलनात महाराष्ट्रातील साहित्यिक कोकणीला मराठीची बोली म्हणतात, म्हणून काही युवकांनी प्रदर्शने केली होती. त्यात दामोदर मावजो हेही होते, असे सांगणारी एक पोष्टही मुख्य अतिथींच्या बातमीसोबत व्हायरल झाली. जेव्हा भाईंनी निमंत्रण स्वीकारले, तेव्हा त्यांच्याही लक्षात ही गोष्ट असेलच. या संमेलनात त्यांना आंदोलक म्हणून नव्हे, तर भारतीय स्तरावरील मार्गदर्शक साहित्यिक म्हणून बोलविले आहे. साहित्यिक मोठ्या कष्टाने कार्यक्रम आयोजित करतात. एखाद्या विषयावरील प्रदर्शनाने त्या आयोजनाचा कसा बेरंग होतो, हे भाईंनी पुढे स्वत:ही अनुभवले असेल. प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना ते त्यांच्या तरुणाईच्या काळात घडलेल्या त्या घटनेचा उल्लेख आपल्या भाषणात कसा काय करतील, याची उत्सुकता सर्वांनाच असेल. शिवाय, ‘कोकणी-मराठी’ वादाच्या पार्श्वभूमीवर ‘भाषाप्रेम’ व ‘भाषाद्वेष’ यातील फरक त्यांना स्वानुभवावरून सांगावा लागणार आहे. हे सांगताना त्यांना ज्ञानपीठ पुरस्कारविजेते साहित्यिक म्हणून तटस्थताही सांभाळावी लागणार आहे. शेवटी मी असेच म्हणेन, की कोविड महामारीनंतर होणारा हा मराठीचा भारतातील सर्वांत मोठा आनंद सोहळा निर्विघ्नपणे होवो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.