freedom fight Dainik Gomantak
ब्लॉग

गोव्याचे 'नकली' स्वातंत्र्यसैनिक

'स्वातंत्र्यसैनिक म्हणून नोंद झालेल्या बऱ्याच जणांचे राष्ट्रवाद वा मुक्ती चळवळीशी काहीच देणेघेणे नव्हते'

दैनिक गोमन्तक

वाल्मिकी फालेरो

गोवा: स्वातंत्र्यसैनिक म्हणून नोंद झालेल्या बऱ्याच जणांचे राष्ट्रवाद वा मुक्ती चळवळीशी काहीच देणेघेणे नव्हते. काहींना वेगळ्याच गुन्ह्यांसाठी तुरुंगात टाकले होते.

तया स्वातंत्र्यसैनिकांनी पुरविलेल्या अत्यंत सदोष माहितीवर विसंबलेल्या जी. के. हंडूंच्या हेरखात्याने पोर्तुगीजांच्या युद्धसज्जतेचे अत्यंत विपर्यस्त असे चित्र रंगवले. गोव्यात पोर्तुगीजांनी सेबर, फॉगा मॅजिस्टर आणि स्टारफायटर्ससारखी ट्रान्सॉनिक जेट विमाने, बॉम्ब टाकण्यासाठी सुधारणा केलेली वाहतूक विमाने, फ्रिगेट्स, पाणबुड्या तयार ठेवल्याच्या खोट्या वार्तांवर विसंबून भारताने जी तयारी केली, तिचा प्रचंड आर्थिक फटका बसणे साहजिकच होते.

हंडूना खरे तर याविषयी जबाबदार धरायला हवे होते. पण नशिब असे की काही दिवसांनी ते नेहरूंचे गोव्यासाठीचे मुख्य संकटमोचक झाले. (प्रत्यक्षात त्यानी संकटनिर्मितीच केली. ती कशी ते पुढे आपण पाहाणारच आहोत.)

सेना मुख्यालयात कार्यवाही संचालक (डीएमओ)जी जबाबदारी सांभाळणारे मेजर जनरल डी. के. पलित लिहितात, 'पोर्तुगीजांचे सामर्थ्य नगण्य होते, ते भारतासमोर आव्हान उभे करणे शक्यच नव्हते. आमची एकूणच चढाई व्यापक सरावाच्या स्तरावर आली... थोडा विनोदी विरंगुळाच म्हणा ना!'

दुसरी बाजू पाहिल्यास असेही म्हणता येईल की गोव्यातील तथाकथित स्वातंत्र्यसैनिकाना पुरवलेल्या या खोट्या माहितीमुळे गोव्यालाही अप्रत्यक्ष लाभ झाला असावा. भारताने केलेली प्रचंड जमवाजमव गोव्याच्या पथ्यावर पडली. फौजेचा हा लोंढा दिसताच पोर्तुगीजांनी कोणत्याही संघर्षाविना शस्त्रे खाली ठेवली. साहजिकच त्यांचे नुकसान झाले नाही आणि गोव्याचीही काहीच क्षती झाली नाही. गोवेकर जर दोन्ही बाजूंनी होणाऱ्या गोळीबारात सापडले असते तर प्राणहानी अटळ ठरली असती. तात्पर्य, 'नकली' स्वातंत्र्यसैनिक 'असली' तारणहार ठरले.

स्वातंत्र्यसैनिकांच्या बाबतीत घडलेला आणखीन एक 'चमत्कार' विशद करण्यासारखा आहे. 18 डिसेंबर, 1961 रोजी मुक्तिलढा निर्णायकरित्या संपुष्टात आला. स्वा. सै. डॉ. सुरेश काणकोणकर यानी 2011 साली लिहिले होते, ''बहुतेक स्वातंत्र्यसैनिक आता कालगत झालेले आहेत.'' तरीदेखील 2005 साली- म्हणजे मुक्तीनंतर 44 वर्षांनी त्यांची संख्या 1393 असल्याचे सरकारी दफ्तरातली नोंद सांगत होती. ती फुगवलेली नव्हती असे म्हणू आपण हवे तर, पण त्यानंतर पांच वर्षांनी- म्हणजे 31 डिसेंबर 2010 रोजी ती चक्क वाढली आणि 1501 वर पोहोचली. बहुतेक या जमातीला उत्क्रांतीचा वेगळाच न्याय लागू होत असावा.

गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर यानी स्वतंत्र्यसैनिकांना स्मगलर म्हटल्याचे सांगण्यात येते. त्यांच्या या कथित निरीक्षणाशी येथे सहमती दर्शवण्याचे प्रयोजन निश्चितच नाही.

( अर्थांत काहीजण तस्करींत गुंतलेले होतेच. मुक्तीनंतर सोने आणि परदेशी मालाची तस्करी करण्यासारखी परिस्थिती राहिली नाही, पण या बहाद्दरांनी भारतातील दारूबंदीचा लाभ उठवत गोव्याची फेणी आणि परदेशी बनावटीचे भारतीय मद्य सिमेपार नेण्याचा व्यवसाय नेटाने पुढे नेला.) गोव्याने असंख्य त्यागमूर्ती स्वातंत्र्यसैनिकांना जन्म दिला, हेही इथे नमुद करावे लागेल. त्यानी तुरुंगवास भोगला, पोलिसांचे अत्याचार सहन केले. काहींना पोर्तुगाल व आफ्रिकेत हद्दपार करण्यात आले आणि काहींना प्राणही गमवावे लागले. अनेक पुस्तकांतून त्यांच्या असिम त्यागाचे कथन आलेले आहे.

काही निस्सिम राष्ट्रवाद्यांनी स्वातंत्र्यसैनिक म्हणून आपली नावनोंदणी केली नाही. डॉ. पुंडलीक गायतोंडे, डॉ. राम हेगडे, . जुजे इनासियो 'फाचू' लोयोला यानी आपल्या त्यागाला आलेली 'फळे' पाहून परदेशी प्रयाण केले. मागे राहिलेल्यांतले लँबर्ट मास्कारेन्हास, प्रभाकर सिनारी यांच्यासारखे 1961 नंतरची स्थिती पाहून जाहीरपणे पश्चाताप व्यक्त करत होते. रॉक सांतान फर्नांडीस नंतर आमदार झाले पण त्यांच्या परिवाराने देश सोडला, तोही पोर्तुगीज पारपत्रांच्या आधारे.

स्वातंत्र्यसैनिक म्हणून नोंद झालेल्या बऱ्याच जणांचे राष्ट्रवाद वा मुक्ती चळवळीशी काहीच देणेघेणे नव्हते. काही निव्वळ तस्करीत गुंतले होते, काहींना वेगळ्याच गुन्ह्यांसाठी तुरुंगात टाकण्यात आले होते तर काही मजा पाहण्यासाठी घराबाहेर पडले आणि पोर्तुगीज सैनिकांकडून निव्वळ संशयावरून पकडले गेले.

अशाच एक- भलत्याच गुन्ह्यासाठी कैदेत टाकलेला आणि राष्ट्रवादाशी काडीचेही देणेघेणे नसलेला 'स्वातंत्र्य सैनिक' नंतरच्या काळात न चुकता डोक्यावर गांधी टोपी घालायचा आणि आपले पेन्शन उकळायचा. त्याला खोड होती- मडगावच्या लोहिया मैदानावर ध्वनिक्षेपक लावून आपल्या चढ्या आवाजांत लंबी- चवडी भाषणे देण्याची.

ती ऐकायला मात्र तिथे कुणीच नसायचे. पण रस्त्यापलीकडून काही टारगट कोल्हेकुई घालून हमखास त्याची खोड काढायचे. मग ही स्वारी आपले भाषण अर्धवट सोडून त्या टारगटांच्या आईमाईचा उद्धार अत्यंत निवडक आणि जालीम शेलक्या शिव्या देत करायची. लोहिया मैदान त्यावेळी बंदिस्त होते म्हणून बरे, अन्यथा या जमदग्नीच्या नजरेस एखादा टवाळखोर दिसता तर केवळ आपले भाषणच नव्हे तर चक्क मैदानही सोडून त्याने त्याचा पिच्छा पुरवला असता.

काही सच्च्या पण आर्थिकदृष्ट्या रंजीस आलेल्या स्वातंत्र्य सैनिकांना उदरनिर्वाहाचा प्रश्न भेडसावायचा. पोर्तुगीज पोलिसांच्या भयाने त्याना उघडपणे फिरता येत नसे, मग रोजीरोची मिळायची कुठून? भारतीय वायुदळातून निवृत्त झालेला एक पायलट आपल्या आठवणींत सासष्टीतल्या एका खेडेगावांतल्या अशाच एका स्वातंत्र्यसैनिकाविषयी सांगतो. गावात रात्री उशिरा येणाऱ्या बसमधून त्या पायलटची बहीण उतरली. तिच्या गळ्यातली साखळी हिसकावायचा यत्न या स्वा.सै.ने केला. सुट्टीवर आलेला तिचा पायलट भाऊ तिला नेण्यासाठी आल्याचे त्याच्या लक्षात आले नव्हते. मग व्हायचे तेच झाले, कणीक तिंबून घेतलेला तो स्वा.सै. कसाबसा वाचला.

बऱ्याच स्वातंत्र्यसैनिकांची संभावना स्थानिकांकडून 'कोंबडी चोर' म्हणून केली जायची. आपली हयात देशकार्यासाठी घालवलेला आणि आता वृद्धावस्थेमुळे काही करण्याच्या पलीकडे गेलेला असा एक स्वातंत्र्यसैनिक मडगावात होता. त्याला टारगट पोरें 'कोंबयेचे पाख' म्हणून चिडवायची आणि मग तो संतप्त होऊन त्यांचा उद्धार करायचा. या माणसाने स्वातंत्र्यसैनिकांच्या पुनर्वसनासाठीच्या एका योजनेचा लाभ घेत कुक्कुटपालनासाठी निधी मिळवला. जेव्हा अधिकारी पाहाणीसाठी आले तेव्हा कोंबड्यांचा पत्ताच नव्हता. स्वातंत्र्यसैनिकाचे म्हणणे, कोंबड्या कोणत्या तरी रोगामुळे दगावल्या. एका अतिचौकस अधिकाऱ्याने त्यावर विचारले, 'कोंबड्या दगावल्या तर मग त्यांची पिसे कुठे आहेत?' तेव्हा हे बहाद्दर शांतपणे म्हणाले, 'कोंबड्या मरताना आपली पिसे मागे नाही ठेवत !' मात्र या घटनेने त्याच्यासाठी 'कोंबये पाख' ची टवाळकी मागे ठेवली.

सासष्टीतल्या आणखीन एका बहाद्दराला असेच विनोदाचा विषय व्हावे लागले. दुपारचे भोजन झाले आणि परिसर वामकुक्षीसाठी विसावला की याला नेमकी फेरफटका मारायची हुक्की यायची. बायकोला फिरून येतो असे सांगत स्वारी घराबाहेर पडायची.

असाच एकदा तो दुपारी घराबाहेर पडला. थोड्याच अंतरावर असलेल्या शेतात त्याचे प्रेमपात्र 'जाकीन' ओणव्याने काही काम करत होते. ह्याने तिथल्या बांधाचा आडोसा जवळ केला आणि तिला हलकेच साद घातली- 'जाकीन... जाकीन...' त्याच्या दुर्दैवाने तेथून पोर्तुगीज पोलिसांची एक तुकडी जात होती. त्यांच्या कानी ही हाक पडली. त्याना वाटले, हा पठ्ठा 'जय हिंद, जयहिंद' म्हणतोय. त्यानी या गुलछबूची गठडी वळली आणि जीपमध्ये कोंबून कैदेत नेऊन टाकली. पण नशीब पाहा, स्वारी 19 डिसेंबर रोजी कैदेतून बाहेर आली ती स्वातंत्र्यसैनिक हे बिरुद लावूनच.

काणकोणमधील अशाच एका महाभागाला ताम्रपत्र आणि तहहयात पेन्शन प्राप्त झाले. ही असामीही गुलछबूच होती. त्यांची कहाणी मला माझे मित्र आणि काही काळ डॉ. पुंडलिक गायतोंडे यांच्यावर उपचार करणारे पाळोलेचे डॉ. धिल्लन देसाई यानी सांगितली. हा रंगिला एकदा रात्रीची चैन करण्यासाठी पाडी गावानजीक असलेल्या विवक्षित ठिकाणी गेला होता. पहाटे घरी परतताना पिसोणे चेकनाक्यावर त्याला अडवण्यात आले आणि पोर्तुगीज सैनिकांनी संशयावरून 'आत' टाकले. काही दिवसांनी गोवा मुक्त झाला आणि ह्या ऐयाशीची मौजमजा स्वातंत्र्यसेवेत परावर्तीत झाली!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News Today: मुख्यमंत्री सावंत यांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; विधानसभा विजयाबद्दल केले अभिनंदन

Cooch Behar Trophy 2024: दोन पराभवानंतरही गोव्याचा 'यश'वर विश्वास; छत्तीसगडविरुद्धच्या लढतीसाठी टीम सज्ज

IFFI Goa 2024: "हा माहितीपट केवळ श्रद्धांजली नाही, मोहन रानडेंचे स्मारक व्हावे म्हणून केलेला प्रयत्न आहे"; चित्रपट महोत्सवात उभा राहिला मुक्तिसंग्राम

77th Army Day संचलनाची IFFI मध्ये झलक! पुणे सांभाळणार यजमानपदाची धुरा

Goa Crime: महिलांसाठी गोवा नॉट सेफ? 11 महिन्‍यांत सात महिलांची हत्या; लैंगिक अत्याचार, विनयभंगाच्या 100 घटना

SCROLL FOR NEXT