आपल्यात प्रेमरस भरलेला असावा

संतकवी रूमी: सुगंध हुंगू शकत नसाल तर प्रेमाच्या बागेत येऊ नका
Love
LoveDainik Gomantak
Published on
Updated on

मुकेश थळी

आपल्यात प्रेमाचा वास असावा. वास म्हणजे सुगंध आणि वास म्हणजे वसती असणारा, रहिवास असणारा. काजू वा आंबा पिकल्यावर जसा रसाचा व फळाचा सुगंध आसमंत झाकोळून टाकतो, नेमका तसा, आमच्यात प्रेमरस भरलेला असावा.

स, गंध, सुगंध. नाक ह्या इंद्रियाला येणारा अनुभव. बरं, या वासाच्याही नाना तऱ्हा, प्रकार. वा... काय छान, असे उद्गार हुंगताक्षणी वा न हुंगतासुध्दा दरवळावरून यावेत आणि आहाहाSS म्हणून धन्य व्हावे. ते उद्गार हृदयातून येतात. जितकी रसिकता, अभिरूची जास्त तितकेच वासांचे अनुभव तीव्र होतात.

फुलांचे वास विविध. लहानपणी मी शाळेत जायचो. कुळागराच्या रांगेतून. नक्षत्राच्या वा अती सूक्ष्म सुदर्शनचक्राच्या आकाराच्या बकुळीच्या फुलांचा सडा पडलेला असायचा. ओलसर मातीत. मातीचा गंध आणि त्यात नाक तृप्त करणारा हा बकुळीचा सुगंध. कुळागरांच्या रांगेतूच जाताना एका बाजूला शेतं होती. विविध हंगामात त्यांचा वास अंगभर सुखद शिरशिरी आणायचा. पिवळ्याधमक चाफ्यांचा सुगंध कुळागरात अलगद डुलत झुलत यायचा. कुळागराच्या बाजूला पाण्याची एक तळी होती.

त्याची धड वा कुंपण म्हणजेच केवड्याच्या वनस्पती. कोंकणीत हातो वा कवासो. तिथून हातो काढून फूलकार म्हार्दोळला बाजारात उभे राहून विकायला न्यायचे. हात्याच्या पाकळ्या व त्यातील अलगद पावडर सोडणाऱ्या टर्कीश उशी असावी त्या प्रकारची फुलाची रचना मोहक, चित्तवेधक असायची.

Love
मोपा लिंक रोडमुळे पिडीत शेतकऱ्यांना लढ्यात सामिल होण्याचे आवाहन

त्यातून प्रसवणारा सुगंध फारच उत्तम व सुरेख असायचा. कसल्याही कृत्रिम परफ्यूमची तुलना त्याच्याकडे करू नये. म्हार्दोळच्या गंध, स्वर, दिव्यत्व यातच माझा जन्म व घडण झाली म्हटलं तर वावगं ठरू नये. हा गांवच फुलांच्या सुगंधांचा. अनंताच्या फुलांच्या कळ्यांच्या वेणी मी इथंच बघितली. जाईचा सुवास म्हणजे कळस. किती नैसर्गिक. अलवार, हळूवार, अलगद पसरणाऱ्या यमन रागाच्या स्वरांसारखा हा सुगंध.

'बाळ, कसा आहेस तू...' अशी विचारपूस केल्यासारखा, नाकाला गोंजारणारा. जाईची पूजा म्हार्दोळला महालसा संस्थानात येऊन अनुभवावी, नाक तुम्हांला लाख लाख धन्यवाद देईल.

Love
गोव्याच्या इतिहासात लीना आणि सिध्दार्थ

शिरगांवच्या देवी श्री लईराईला मोगऱ्यांच्या वेणी अर्पण करतात. जत्रेवेळी तिथं जावं. तुडुंब पाणी जसं धरणात भरलेलं दिसतं तसं मोगऱ्यांच्या सुगंधाच्या घमघमाटाच्या सागरात आपण पोहत आहोत असा भास तिथं व्हावा. पारिजातकाचाही सुगंध मला आवडायचा. रातराणीचा गंध शांत, स्तब्ध, रात्रीच्या अंधारात आपलं वर्चस्व गाजवायचा.

फुलाला सुगंध मातीचा, या नांवाचं मराठी नाटक होतं. गाजलं. छान प्रतिकाचा वापर. इंदिरा संतांच्या मृद्गंध पुस्तकाला आपण विसरू शकतो का? पहिला पाऊस पडल्याबरोबर जो सुगंध नाकाला आनंद देतो तेव्हा तो सुगंध कुपीत बंदिस्त करावा असं आतील बालमनाला वाटतं. हल्लीच एक पुस्तक वाचलं- मातीला सुगंध फुलाचा.

फळांचेही सुगंध विशिष्ट. रसाळ फणस पिकल्यावर जवळपासहून जाणाऱ्याला फणस-मधाचा घमघमाट येतो. चिंचा पिकायल्या लागल्यावर वाऱ्याबरोबर या चिंचेचा सुगंध सरभोवती वलयांकीत होत उसळत जातो. स्कूटरने जातानासुध्दा एका क्षणासाठी चिंच आपलं अस्तित्व सुगंधातून दाखवते. आता आंबे, काजू या पिकांना मोहर येणार. फारच सुंदर सुगंध आंबराईत वनराईत घमघमत जाणार.

तिथून येणाऱ्या जाणाऱ्याला वसंताची जाणीव करून देणार. निसर्गाच्या किमयेची चाहूल समजावू देणार. आंतेर म्हणजेच रामफळ घरी पिकल्याबरोबर त्याला कस्टर्डचा असा गंध येतो की इंग्रजीत कस्टर्ड एपल नांव का दिलंय याचा उलगडा होतो. काजू अर्थात मुट्टो आणि मानकुराद आंबा झाडावर जेव्हा पिकतात आणि रस पूर्ण भरून खाली ओघळत फळ भूमीवर घालून घ्यायला तयार असतं. त्या परिपक्वतेच्या क्षणी आंब्याचा व काजूचा जो परिमळ आसमंतात फैलावतो, विस्तारित होतो तो अनुभवच और.

Love
मडगाव कचरा व्यवस्थापन विधेयकांवर प्रश्नचिन्ह उपस्थित

घरात स्वयंपाकघरातील सुगंध अनोखेच. अन्नपदार्थांतून सुटणारे वास आणि नंतर खाल्ल्यावर अनुभवतो ती चव दोन्हीही रसनेला तृप्त करतात. वेगवेगळ्या प्रकारचे पोहे, उपमा, भाकरी, बटाट्याची भाजी, इतर भाजी सर्व पदार्थ घरभर पसरतात. गोव्यातील खतखतें मोठ्या भांड्यात तयार होत असताना विविध पालेभाज्या, कंदमुळं यांचा संमिश्र एकत्रित परिणाम नाकाला खाण्यासाठी सज्ज व्हा असा आदेशच देतो. ताजं ताजं कैऱ्यांचं लोणचंही तयार होतानाच खवय्यांना आपल्या वासानंच मोहित करतं. आकर्षित करतं. धोणस, तवसळी, पातोळ्यो... सर्व पदार्थच आपापल्या जातकुळीचे सुगंध घेऊन आनंद देतात.

पावसात एका बाजूला मृदगंध सुटतो तर दुसऱ्या बाजूने कुठं तरी घरातून सुक्या बांगड्याची किसमूर वा भाजलेल्या सुक्या बांगड्याचा सुगावा नाकाला लागतो.

वनस्पती, रानें, बागेतील फुलझाडें यातून किती सुगंध येतात याला अंत नाही. पावसात तर किड्यांचे सुटणारे द्राव, झाडातून पाझरणारे स्राव यांचा संमिश्र परिणाम “तू निसर्गाचा घटक आहे, तू प्लास्टिकच्या तुकड्यासारख्या स्मार्टफोनसारखा नाही रे सजीव बाळा” याची आठवण करून देतो.

आमच्या लहानपणी केरोसीन असायचं. त्यालाच पेट्रोल म्हणायचे. रात्रीच्या दिव्यातील हे इंधन. आमच्या घरी चोडणला भुसारी दुकानात आजोबा दुकानात बसायचे. ग्राहक लोक यायचे. मध्येच कोण तरी पेट्रोल विकत घ्यायचा. आजोबा त्याला त्याच्या बाटलीतून पेट्रोल द्यायचे. त्यावेळी सहजपणे कितीतरी पेट्रोलच्या गंधाचे कण हवेत उडत आमच्या नाकाशी खेळायचे. मी तिथंच लुडबुडत, रेंगाळत राहायचो. आजोबा विचारायचे – तुला चॉकलेट पाहिजे का? मला तो पेट्रोलचा वास हवाहवासा वाटायचा.

पेट्रोल पंपावर आजही गेलो तर वीस मिनिटे तिथं रांगेत थांबून बाहेर आलो तर अंगाला पेट्रोलचा वास आल्याचा भास होतो. मेकानिककडे थोडा वेळ थांबा आणि बाहेर चला. ऑईलचा वास तुमच्या सर्वांगाला यायला लागतो.

कारण साधं. सज्जनांच्या संगतीला राहाल तर चंदनाचा सुगंध येत राहील. दुर्जन मित्र असतील तर दुर्गुणांचा दर्प यायला लागेल. लोकं टाळतील.

आपल्यात प्रेमाचा वास असावा. वास म्हणजे सुगंध आणि वास म्हणजे वसती असणारा. रहिवास असणारा. काजू वा आंबा पिकल्यावर जसा रसाचा व फळाचा सुगंध आसमंत झाकोळून टाकतो, नेमका तसा, आमच्यात प्रेमरस भरलेला असावा. जवळपास येणाऱ्याला या इत्राचा म्हणजे आतील अत्तराचा शिडकावा आपणावर पडला असं वाटावं. बरं वाटावं. संतकवी रूमी म्हणतो, If you can’t smell the fragrance don’t come into the garden of Love.

(सुगंध हुंगू शकत नसाल तर प्रेमाच्या बागेत येऊ नका)

संत कबीराला एकाने म्हटलं – तुमच्याजवळ आल्याबरोबरच प्रेमरसाचा पान्हा फुटल्यासारखा सुगंध विखुरतो... कबीरने त्याला मध्येच अडवत म्हटलं क्या कहे कबीर कबीर, जा जमुना के तीर, एक एक गोपी प्रेम में बह गये लाख कबीर.

मनुष्यत्व, करुणा, दया या रसांनी जो भरलेला असतो, त्याचा वास आणि सहवास प्रत्येकाला हवा असतो. ग्रहण करणाऱ्याच्या ह्दयाचं नाक मात्र स्वच्छ पाहिजे. फुलं, फळं, झाडं, निसर्ग सुगंध देतात. आम्ही मनुष्यांनी किमान प्रेमरसाचा परिमळ तरी द्यायला नको का?

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com