Fr Bolmax Pereira   Dainik Gomantak
ब्लॉग

Gomantak Editorial: धोक्‍याचा घंटानाद

कुणीही कुणाच्‍या धार्मिक अस्‍मितांना ठेच पोहोचेल, अशी कृती, वर्तन करू नये आणि ही भूमिका मान्‍य नसेल तर उमटणारे पडसाद आणि परिणाम अटळ आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

Gomantak Editorial: कोरोना महामारीच्‍या काळात सरकारी आरोग्‍य यंत्रणेकडून उपचार पद्धत विकसित करण्‍यात येत होतीच; पण ‘शारीरिक अंतर’ प्रतिबंधात्‍मक पाऊल ठरत होते. कोरोना शमला, देशात सध्‍या धार्मिक ध्रुवीकरणाची साथ वेगाने पसरतेय. दुर्दैवाने अंकुश ठेवण्‍याऐवजी सरकारची संमतीवजा बोटचेपी भूमिका दिसते.

सलोख्‍यासाठी आदर्श ठरलेल्‍या गोमंतकालाही धार्मिक कलहाची लागण होत असेल तर ते भयावह आहे. सामाजिक दुही निर्माण करणाऱ्या वाढत्‍या घटना त्‍याची साक्ष देतात. १९ जूनला कळंगुट येथे छत्रपती शिवरायांच्‍या पुतळ्यावरून झालेला वादंग शमला असतानाच फा. बोलमॅक्स परेरा यांनी शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून वास्‍कोत वातावरण तापले.

वर्षभरात असे कमी-अधिक प्रमाणात घडलेले प्रकार धोक्‍याचा घंटानाद आहे. सामाजिक एकोपा राखणे हा सार्वजनिक चिंतनाचा विषय बनला आहे. कुणीही कुणाच्‍या धार्मिक अस्‍मितांना ठेच पोहोचेल, अशी कृती, वर्तन करू नये आणि ही भूमिका मान्‍य नसेल तर उमटणारे पडसाद आणि परिणाम अटळ आहेत.

वास्‍को येथील घटनेनंतर डॉ. ऑस्‍कर रिबेलो यांनी व्‍हिडिओ प्रसारित करून दिलेल्‍या डागण्‍या इथे महत्त्‍वाच्‍या आहेत. धार्मिक एकोप्‍याला तडा जाण्‍यास कुणी निमित्त ठरू नये, हा त्‍यांच्‍या वक्‍तव्‍याचा मथितार्थ.

फादर परेरा हे प्रेम, सेवा तत्त्‍वाच्‍या प्रसाराऐवजी अनुयायांच्‍या हृदयात विष कालवू पाहत असतील आणि त्‍यामुळे कुणाच्‍या अस्‍मिता दुखावल्‍या गेल्‍या असतील तर हे धर्मगुरू म्‍हणून नैतिक जबाबदारीचे अधःपतन आहे.

इतिहास तुम्हांला वर्तमानात कसे जगावे हे शिकवतो. त्‍यात काही अयोग्‍य असेल तर चांगले काय, ह्याचा अंगीकार करावा. दुर्दैवाने इतिहासाचा आज आपापल्‍या सोईने गैरवापर केला जातोय.

‘शांती’ हा पोटाच्‍या तृप्‍तीला समानार्थी शब्‍द मानला तर समाजातील सर्व धर्म ही बोटे झाली. ही सर्व बोटे एकत्र आली तरच तृप्‍तीचा घास पोटात जाईल. कळंगुट येथील शिवरायांच्‍या पुतळ्याचा वाद असो वा वास्‍को येथील प्रकार असो. द्वेषमूलक, विखारी भावनांना बळ मिळते याचे भान हरवत चालले आहे.

ह्या प्रश्‍‍नावर सामूहिक चिंतन होणे आवश्‍‍यक आहे. त्‍यासाठी धर्मप्रमुखांनी एकत्र यावे. तसे न केल्‍यास भविष्‍यात असे प्रकार वाढण्‍याची शक्‍यता नाकारता येत नाही. अशा प्रकारांनंतर कोण बरोबर, कोण चूक ह्या भोवती मती गुंग होते, प्रत्‍यक्षात समाजाचे परिमित नुकसान होते.

फादर परेरा यांनी आक्षेपार्ह विधान केल्‍यानंतर पोलिसांत तक्रार दाखल झाली. त्‍यानंतर ज्‍या तत्‍परतेने हा विषय हाताळणे आवश्‍‍यक होते, ते झाले नाही.

चिखली चर्चने घंटा वाजवून हजारो लोकांना एकत्र जमविले. त्‍यानंतर दोन गट समोरासमोर येऊन हिंसाचाराची ठिणगी पडली असती तर? हल्ली घडलेल्या ऐतिहासिक वा धार्मिक कलहाच्या घटनांमध्ये प्रशासनाची नेहमीच संशयास्‍पद भूमिका राहिली आहे, जी संतापजनक आहे.

दवर्लीतील हिंदू - मुस्‍लिम तणावाचा प्रसंग असो वा कळंगुट येथील दगडफेक असो. जादा कुमक मागवण्याची तसदी घेतली गेली नव्हती. वास्‍कोत प्रकरण चिघळत असूनही काँग्रेस नेते कॅप्टन विरियातो फर्नांडिस आक्षेपार्ह भूमिका घेत आहेत. त्‍यांना रोखायचे कुणी? मुख्‍यमंत्र्यांनी खरे तर असे प्रकार घडू नयेत, यासाठी परखड भाष्‍य करण्‍याची गरज आहे.

१६ व्‍या शतकातील इटालियन लेखक निकोलो मॅकियाव्हेली याने त्‍याच्‍या ‘प्रिन्‍स’ या ग्रंथात ‘फसवणूक करून ऐहिक यशाला गवसणी घालणाऱ्या राज्यकर्त्यांची प्रतिमा रंगवली आहे. आज त्‍याच तत्त्वाने राजसत्तेची वाटचाल सुरू नाही ना, अशी शंका आल्‍याशिवाय राहत नाही. धार्मिक अस्‍मितांचा खेळ चालू राहू द्यायचा आणि मूळ नागरी प्रश्‍‍नांवरून लक्ष हटवायचे, ही नीती दृढ होतेय.

राज्‍यनिहाय अशी बरीच उदाहरणे आढळतील. महाराष्‍ट्रातील जनतेत आज सरकाराप्रति असंतोष आहे. परंतु मधेच कुणी संभाजी भिडे उभे राहतात. ७५ वर्षांपूर्वी निर्वाण झालेल्‍या गांधींच्‍या जन्‍मावर हीन पातळीवर जाऊन टिपणी करतात आणि सामाजिक वातावरण गढूळ होते.

सरकार मात्र हातावर हात ठेवून शांत बसते. मणिपूरमध्‍ये हिंसाचाराचा उद्रेक होतो. तो आटोक्‍यात आणण्‍यास ५६ इंचांची छातीही कमी पडते, हे कसे मानावे? राजसत्तेच्‍या हाती कायदा पालन, कारवाईचे अस्त्र आहे. परंतु सामाजिक समतेसाठी त्‍याचा विधायक वापर होत नाही, हेच मोठे दुर्भाग्‍य आहे.

छत्रपती शिवराय हे पराक्रम, वर्तन, स्‍वराज्‍यहीत जपणारे रयतेचे राजा म्‍हणून कालातीत राहिले. त्‍यांचे अनुयायी म्‍हणवून घेणाऱ्यांनी राजकारभाराचेही अनुनयन करावे. शेवटी लोकांनाच ठरवावे लागेल, आपण कोणत्‍या दिशेने जावे ते. सद्सद् विवेकाला स्‍मरून लोकांना एकी दाखवली तरच धार्मिक द्वेशाचे दुष्‍टचक्र भेदणे शक्‍य आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Calangute: बीचवरुन बेपत्ता झाला 9 वर्षाचा परदेशी पर्यटक, गोवा पोलिसांनी पुन्हा घडवली कझाकस्तानच्या मायलेकांची भेट

Goa Today's Live News: पंतप्रधानांचा सुरक्षा प्रभारी असल्याची तोतयागिरी केल्याप्रकरणी शिरंग जावळ विरोधात तक्रार दाखल

Antarctic Climate Change: अंटार्क्टिका किनारपट्टीतील हवामान बदलाचा होणार अभ्यास, गोव्यातून सात संशोधक घेणार सहभाग

Sadye: बहुमजली तसेच जलतरण प्रकल्पांना पाणीपुरवठा बंद करा! सडये ग्रामस्थांची मागणी; सामूहिक शेतीला देणार प्राधान्य

Poinguinim: गालजीबाग, तळपण नदीप्रदूषणावरुन कारवाईची मागणी! पैंगीण ग्रामसभेत मेगा प्रकल्पांना विरोध

SCROLL FOR NEXT