Tourist| Goa Beach  Dainik Gomantak
ब्लॉग

Goa Tourism: स्थानिकांनाच उखडणारे पर्यटन का हवे?

Goa Tourism: गोव्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या,उपलब्ध साधनसुविधांवर येणारा ताण आणि नैसर्गिक स्रोतांवर होणारा परिणाम यांचा ताळेबंद मांडणे आवश्यक आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Tourism: नववर्ष साजरे करण्यासाठी गोव्यात लोटलेली पर्यटकांची गर्दी अभूतपूर्व होती. पण, त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीचा बोजवारा उडाला. परिणामी स्थानिक आणि पर्यटकही वाहतूक कोंडीत अडकले. येणाऱ्या पर्यटकांची संख्या,उपलब्ध साधनसुविधांवर येणारा ताण आणि नैसर्गिक स्रोतांवर होणारा परिणाम यांचा ताळेबंद मांडणे आवश्यक आहे.

राज्याच्या जीडीपीमध्ये पर्यटन उद्योगाचे योगदान सुमारे 17% आहे. कोविड येण्यापूर्वी जितके पर्यटक गोव्यात यायचे, तेवढे पर्यटक म्हणजे जवळपास 81 लाख (एकूण लोकसंख्येच्या पाचपट जास्त) गोव्यात येतील, असे लक्ष्य सरकारने 2022सालासाठी ठेवले होते.

पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सरकारचा भर जुगार, मौजमजा आणि पार्टी टाइम इव्हेंटवर राहिला. त्याशिवाय अनधिकृतपणे ड्रग्ज आणि सेक्स या गोष्टींनीही पर्यटकांना आकृष्ट केले. परंतु, दीर्घकाळ टिकून राहणाऱ्या दर्जेदार पर्यटनाला चालना देण्यात गोवा सरकार अयशस्वी झाले.

ग्रीस, आयर्लंड, स्पेन, इटली यासारख्या नावाजलेल्या पर्यटन स्थळांवर स्वत:चे घर बांधणे स्थानिकांच्या अवाक्याबाहेरचे होऊन बसले आहे. उलट जगभरातील श्रीमंत आणि उच्चभ्रू लोक याच भागांत ‘हॉलिडे होम’ घेतात.

अशी परिस्थिती येथे उद्भवण्यापासून गोमंतकीयही फार लांब नाहीत. प्रमाणाबाहेर वाढलेला पर्यटन व्यवसाय स्थानिकांसाठी आपत्तीच ठरतो.

जलस्रोतांची कमतरता असलेल्या ठिकाणी गोल्फ कोर्ससह जलतरण तलावांसारख्या पर्यटन सुविधा, स्थानिकांच्या तोंडचे पाणी पळवतील. त्यामुळे, गोव्यासारख्या छोट्या राज्यासाठी भौगोलिक आणि दरडोई आकारमानानुसार शाश्वत कौटुंबिक पर्यटनाचे मॉडेल उपयुक्त आहे.

बेलगाम पर्यटन एका छोट्या राज्याचे काय दिवाळे काढू शकते, याचे प्रातिनिधिक उदाहरण म्हणून व्हेनिसकडे पाहता येईल. शेकडो वर्षांपासून सुंदर शहर पर्यटकांना आकर्षित करत आहे. व्हेनिसने वार्षिक कार्निव्हल, कला महोत्सव, चित्रपट महोत्सव आयोजित करण्यापासून सर्व काही केले.

ज्यामुळे, महसुलात निश्चितच वाढ झाली, पण त्याचे दुष्परिणाम स्थानिकांना भोगावे लागले. तेथे अपार्टमेंट्सची किंमत गगनाला गवसणी घालून आणखी पुढे जात आहे. साधा फ्लॅट विकत घेणे सोडूनच द्या, स्थानिकांना भाडेही परवडेनासे झाले आहे.

पर्यटनाशी संबंधित व्यवसाय आणि शोभेच्या वस्तूंची विक्री करणारी दुकाने खूप चांगली चालतात. परंतु, किराणा माल आणि दैनंदिन वापराच्या वस्तूंची दुकाने बंद पडत आहेत. पर्यटन हंगाम नसलेल्या काळातही सार्वजनिक वाहतूक अगदी ओसंडून वाहते.

जगणे महाग झाले आहे आणि जीवनाचा दर्जाच घसरला आहे. हंगामात दरवर्षी सुमारे 30 दशलक्ष पर्यटक असतात (दररोज सुमारे 80 हजार पर्यटक) म्हणजेच प्रति स्थानिक रहिवासी 600 पर्यटक!

स्थानिकांची घटलेली संख्या लक्षांत घेऊन युनेस्कोला हस्तक्षेप करावा लागला आणि 2017 साली धोकादायक स्थितीत असलेल्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत व्हेनिसला टाकण्याची धमकी द्यावी लागली.

हीच गत फ्रान्सची. पॅरिसलगतच्या खेड्यांमध्ये जगभरातील श्रीमंत आणि उच्चभ्रू लोकांसाठी बांधलेली हॉलिडे होम्स/रिटायरमेंट होम्स ही फ्रेंच लोकांसाठी मोठी डोकेदुखी ठरली. फ्रान्सने एक प्रकारे संतुलित दृष्टिकोन निवडला आणि भरमसाठ पर्यटनवाढ होऊ दिली नाही.

त्यांच्यासाठी त्यांच्या संस्कृतीचे आणि निसर्गाचे संरक्षण खूप महत्त्वाचे होते. रिटायरमेंट होम/हॉलिडे होम यातून केवळ 36.2% अतिरिक्त मालमत्ता आणि गृहनिर्माण कर गोळा होतो. ज्यामुळे फ्रेंच लोकांना काही शिल्लक राखण्यात मदत होते.

‘उच्च मूल्य, कमी प्रमाण’ हे पर्यटनाचे धोरण भूतानने अंगीकारले आहे. त्यामुळे पर्यटनाचा जास्तीत जास्त आर्थिक फायदा होतो आणि पर्यटकांचे आगमन नियंत्रित केल्यामुळे स्थानिक संस्कृतीवर, पर्यावरणावर नकारात्मक प्रभाव कमी होतो.

2023 पासून युरोपियन युनियन पर्यटक कर लादणार आहे. क्रोएशियामधील दुब्रोव्हनिक शहरदेखील 2019पासून जहाजांचे आगमन मर्यादित करत आहे. युनेस्कोच्या दबावाखाली 2021पासून व्हेनिसमध्ये उन्हाळ्याच्या दिवसांत क्रूझ जहाजांना प्रवेश बंदी आहे.

जानेवारी 2023 पासून आगाऊ नोंदणी केलेल्यांसाठी 10 युरोच्या प्रवेश शुल्कासह व्हेनिसमध्ये प्रवेश दिला जाईल.

निसर्गाचे शोषण दीर्घकाळासाठी हानिकारक आहे. पर्यावरणाचे रक्षण करायचे, स्थानिकांचे रक्षण करायचे की महसूल वाढवायचा याचा निर्णय राज्यांनी घेणे आवश्यक आहे. हॉलिडे होम्स आणि इतर पायाभूत सुविधांवर मोठ्या प्रमाणावर कर आकारणी होते.

हॉटेलच्या बेड संख्येवर नियंत्रण, ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी कडक नियम, जुगारावरील निर्बंध यासारखे नियम लागू करून बेफाम पर्यटनाला आळा घातला जाऊ शकतो. प्रत्यक्षात मात्र तसे होताना दिसत नाही.

याची कारणमीमांसा करताना, पुरस्कार विजेत्या प्रवास आणि पर्यटन पत्रकार एलिझाबेथ बेकर सांगतात, ’सर्वांत कठीण समस्या म्हणजे राजकारण्यांचा सहभाग व हस्तक्षेप. इतर कोणत्याही मोठ्या व्यवसायाप्रमाणे पर्यटनातही पैसा बोलतो.’

2019 मध्ये महामारीच्या आधी तीस दशलक्ष प्रवाशांनी व्हेनिसला भेट दिली आणि त्या वर्षी एक हजार स्थानिकांनी व्हेनिस सोडले. दुसरी बाजू म्हणजे व्हेनिसने पर्यटनावर भरपूर कमाई केली, पण स्वतःच्या नागरिकांना वाचवता आले नाही. हीच शोकांतिका आहे!

व्हेनिसमध्ये राहिलेले काही व्हेनेशियन लोक त्यांच्या शहराचा बेलगाम सामूहिक पर्यटनातून वाचवण्यासाठी जिवाचा आटापिटा करत आहेत.

गोव्याचे वेगळेपण आणि निसर्गाचा हिरवागार पदर ओढलेली शालीनता, लाखो पर्यटकांना आकर्षित करण्यास समर्थ आहेत. त्यासाठी कॅसिनो, ड्रग्ज, वेश्याव्यवसाय यांना थारा देण्याची किंवा प्रोत्साहन देण्याची काहीच गरज नाही.

नैसर्गिक स्रोतांचा योग्य वापर, दीर्घकालीन शाश्वत पर्यटनाच्या दृष्टिकोनातून साधनसुविधांचा विकास, दर्जेदार पर्यटक बारमाही येतील यावर कायम लक्ष, हंगामातही पर्यटकांच्या येण्याचे प्रमाण राखणे या गोष्टी गोव्याच्या पर्यटन धोरणात आल्या पाहिजेत. आपल्याला गोव्याचे व्हेनिस होऊ द्यायचे नाही!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT