Rama runs Dainik Gomantak
ब्लॉग

Beach volleyball: जिंकण्याचा प्रबळ आत्मविश्वास रामा धावसकर

गोमन्तक डिजिटल टीम

किशोर पेटकर

स्वतःपाशी जिंकण्याचा आत्मविश्वास प्रबळ असेल तर काही अशक्य नाही. नेमके हेच ब्रीद मनात घोळवत आम्ही चेन्नईत आशियाई क्रीडा स्पर्धेच्या बीच व्हॉलिबॉल भारतीय संघ निवड चाचणीत खेळलो. प्रतिस्पर्धी अनुभवी आणि मातब्बर होते पण अखेर आमचा दृढनिश्चय भारी ठरला’ या शब्दात गोव्याचा प्रख्यात व्हॉलिबॉलपटू रामा धावसकर याने यशस्वी वाटचालीचे गुपीत उघड केले.

त्याला रामा या नावाने फार कमी जण ओळखतील पण पप्पू म्हटले की सारेच जण रोमांचित होतील कारण झंझावाती, कौशल्यसंपन्न आणि परिपूर्ण व्हॉलिबॉल खेळणारा पप्पू धावसकर साऱ्या गोव्यात लोकप्रिय आहे. रामा (पप्पू) धावसकरने गेल्या महिन्यात चेन्नईतील मरिना बीचवर झालेल्या भारतीय बीच व्हॉलिबॉल निवड चाचणी स्पर्धा नितीन सावंत याच्या साथीत जिंकली.

या पराक्रमामुळे या गोमंतकीय पुरुष बीच व्हॉलिबॉल जोडीस चीनमध्ये पुढील महिन्यात होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळाला. नितिन गोवा पोलिस दलात आहे. नियमित साथीदार अॅरोन परेरा दुखापतीमुळे अनुपलब्ध ठरल्यामुळे रामाने नीतिनसह जोडी जमविली आणि जिंकलाही.

‘चेन्नईत आम्ही भक्कम बचावावर जास्त लक्ष केंद्रित केले. त्यास आक्रमकतेची जोड होतीच. बचावात अधिक सरस ठरल्यामुळे प्रतिस्पर्धांचे आक्रमक धोरण फोल ठरले आणि आमच्या विजेतेपदाचे हेच मुख्य कारण ठरले.’ असे रामा म्हणाला.

पदकविजेता व्हॉलिबॉलपटू चेन्नईतील कामगिरीविषयी क्रीडा व युवा

व्हॉलिबॉल प्रशिक्षक असलेल्या रामा धावसकरची कारकीर्द खूप मोठी आहे. सहाव्या इयत्तेत असताना स्पर्धात्मक व्हॉलिबॉल कोर्टवर पाऊल ठेवलेल्या कारापूर-डिचोली येथील या मुलाने उपजत नैसर्गिक व्हॉलिबॉल कौशल्याच्या बळावर गोमंतकीय व्हॉलिबॉलवर गारुड केले.

कारापूर येथील धावसकर कुटुंबाला व्हॉलिबॉल खेळाची मोठी परंपरा आहे, ती पप्पूने पुढे नेली. आऊटडोअर व्हॉलिबॉलमध्ये गोमंतकीय मैदाने गाजविल्यानंतर राष्ट्रीय पातळीवरही त्याने भरारी घेतली. राष्ट्रीय युवा स्पर्धेतील तो रौप्यपदकाचा मानकरी आहे.

व्हॉलिबॉलच्या इनडोअर कोर्टवरही रामाचा खेळ बहरतो. २०१४ साली गोव्यातील लुसोफोनिया क्रीडा स्पर्धेत श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये गोवा-भारत संघाचे नेतृत्व करताना रामाने आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम साधला. दशकभरापूर्वी तो बीच व्हॉलिबॉलकडे वळला आणि तेथेही पदकविजेता बनला.

२०१५ साली केरळमध्ये झालेल्या ३५व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत त्याने चुलतबंधू प्रल्हाद धावसकर याच्या साथीत पुरुष बीच व्हॉलिबॉलमध्ये ब्राँझपदक जिंकले. गोवा पोलिसांत असलेल्या प्रल्हादच्या मार्गदर्शनाखाली पप्पूने आता आशियाई निवड चाचणी स्पर्धा जिंकली हा सुद्धा एक योगायोगच. ‘प्रल्हादला माझ्या क्षमतेविषयी पूर्ण खात्री आहे. त्याला माझा खेळ पूरेपूर माहीत आहे, त्याचा लाभ चेन्नईत त्याच्या मार्गदर्शनाखाली खेळताना झाला’, असे पप्पू म्हणतो.

आता सुवर्णपदकाचे लक्ष्य

‘गतवर्षी गुजरातमध्ये झालेल्या ३६व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत गोव्यातील आणखी एक प्रसिद्ध व्हॉलिबॉलपटू अॅरोन परेरा याच्या साथीत रामाने बीच व्हॉलिबॉलमध्ये सलग दुसरे ब्राँझपदक पटकावले. ``

आता गोव्यात होणाऱ्या ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत मला पदकाची हॅटट्रिक साधायची आहे आणि त्याचा रंग सोनेरी करण्यासाठी मी झटत आहे’, असे रामा म्हणाला.

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या तयारीसाठी गोव्यातील बीच व्हॉलिबॉलपटूंचा सध्या मिरामार समुद्रकिनारी जोरदार सराव सुरू आहे.

प्रशिक्षकाने मनोबल उंचावले:

रामा धावसकर सांगतो, ‘व्हॉलिबॉलमधील आतापर्यंतच्या वाटचालीत कुटुंबीयांचे प्रोत्साहन व पाठबळ मोलाचे ठरले. व्हॉलिबॉलमधील माझे तंत्र आणि कौशल्य याबाबतीत सूर्या यांना खात्री होती त्यामुळे त्यांनी मला बीच व्हॉलिबॉलमध्ये येण्याची सूचना केली.

मी या खेळात राज्याचे-देशाचे नाव उंचावू शकतो आणि त्यासाठी समुद्रकिनारी यावे लागेल असे त्यांनी बजावले. सूर्या यांचे भाकीत खरे ठरले.’ गोव्याला लांबलचक समुद्रकिनारा लाभलेला आहे. येथील हवामान बीच व्हॉलिबॉलसाठी पूरक आहे, त्यामुळे गोमंतकीय बीच व्हॉलिबॉलमध्ये नाव कमवू शकतात असे रामाला वाटते.

‘प्रशिक्षक या नात्याने प्रशिक्षणार्थींना त्यांच्यातील गुणवत्तेला खतपाणी घालणे आणि क्षमतेची जाणीव करुन देण्यावर माझा भर असतो आणि हो... व्हॉलिबॉलमध्ये गोव्यातील मुलींही प्रतिभासंपन्न आहेत, त्यामुळे मुलींना प्रेरणा देताना त्यांनाही मी योग्य दिशा दाखवतो’ असे त्याने नमूद केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT