Gomantak Editorial  Dainik Gomantak
ब्लॉग

Gomantak Editorial : अपेक्षांच्या ओझ्याखाली...

पालकांच्या अपेक्षा, समाजातील घरादाराची व स्वतःची पत-प्रतिष्ठा आणि जीवनात काहीतरी करून दाखवण्याचे गुलाबी स्वप्न अशा कितीतरी अपेक्षांच्या ओझ्याखाली मुलांची घुसमट होते.

गोमन्तक डिजिटल टीम

Gomantak Editorial : आ पले अपत्य डॉक्टर किंवा इंजिनियर झाले की, जीवनाचे सार्थक झाले, ही भावना आपल्या समाजात खोलवर रुजलेली आहे. विशेषतः आयआयटी, एनआयटी, एम्स किंवा नाणावलेल्या वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश म्हणजे गगन ठेंगणे, अशी भावना पालकांसह समाजात दृढमूल आहे.

या भावनेखाली दबलेले पालक आपल्या अपेक्षांचे ओझे मुलांवर कळत नकळत लादतात; पण त्यांच्या क्षमता आणि गुणवत्तेचा कोणताही ताळेबंद न मांडता! अभियांत्रिकी, वैद्यकीय शिक्षणाकरता देशातील उच्चतम संस्थांमधील प्रवेशासाठीचा पासवर्ड ‘कोटा फॅक्टरी’मध्ये आहे.

तो आपल्यालाच गवसेल आणि जीवनाचे ‘सार्थक’ होईल, अशा धारणेने देशभरातील हजारो पालक पाल्याला तिथे डेरेदाखल करतात. प्रवेशासाठीच्या मर्यादित जागा, संधी यामुळे सगळ्यांचीच स्वप्ने साकार होत नाहीत.

अनेकांना ती अर्ध्यावरच सोडावी लागतात, मिळेल तिथे प्रवेश घ्यावा लागतो. हे जळजळीत वास्तव असले तरी कोट्यातील विद्यार्थ्यांचा ओघ कोरोनाच्या जागतिक साथीनंतरही वाढतच आहे.

तथापि, चालू वर्षांत वीसवर विद्यार्थ्यांनी केलेल्या आत्महत्यांनी या ‘फॅक्टरी’तील कोवळ्या जीवांची ससेहोलपट समोर आली आहे. कोटामध्ये शिकायला आलेल्या सरासरी तीन विद्यार्थ्यांनी महिन्याला आपली जीवनयात्रा संपवली आहे.

आतापर्यंत प्रवेशपरीक्षांच्या तोंडावर किंवा तिच्या निकालानंतर विद्यार्थ्यांनी जीवनयात्रा संपवण्याचा प्रकार कोटामध्ये अधिक होता. तथापि, कोरोनानंतरच्या काळात तेथील नामवंत कोचिंग क्लासमध्ये प्रवेश घेतल्यानंतरच्या सुरुवातीच्या काही महिन्यांतच विद्यार्थ्यांनी जीवनयात्रा संपवल्याचे दिसते.

शिकण्याच्या प्रारंभीच अशा कोणत्या ताणतणावांना त्यांना सामोरे जावे लागते, ही चिंतेची बाब आहे. त्याच्या कारणांचा अभ्यास व्हायला हवा. कोरोनाकाळात बहुतांश विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची हेळसांड झाली. अनेक मूलभूत संकल्पनांचे त्यांना पुरेसे आकलन झाले की नाही, ही शंका आहे. ऑनलाईन शिक्षणाने त्यांच्या अभ्यासाची बैठक विस्कळीत झाली.

शिवाय, हुशार म्हणून कोटाच्या शिक्षणाच्या बाजारात आलेल्या विद्यार्थ्याला आपल्यासारख्या हजारो-लाखो हुशारांच्या संगतीत स्पर्धेत धावावे लागते. स्वतःची पात्रता, क्षमता, बौद्धिक सामर्थ्य हे सर्व पणाला लावत स्वतःला सिद्ध करावे लागते.

पालकांच्या अपेक्षा, समाजातील घरादाराची व स्वतःची पत-प्रतिष्ठा आणि जीवनात काहीतरी करून दाखवण्याचे गुलाबी स्वप्न अशा कितीतरी अपेक्षांच्या ओझ्याखाली या मुलांची घुसमट होते. विशीदेखील न गाठलेली ही मुलं एका सामाजिक आणि व्यक्तिगत स्थित्यंतरातून जात असतात.

त्यांना भवतालाचे आणि परिस्थितीचे पुरते आकलन नसते. अशाच काळात कुटुंबियांपासूनचा दुरावा आणि त्यांच्या पाठबळाला पारखे झाल्याने ही स्थिती निर्माण झाल्याचे निदर्शनाला येत आहे.

एकेकाळी विजेच्या साहित्याच्या निर्मितीचे तसेच तयार कपड्यांचे छोटेमोठे उद्योगांचे कोटा शहर स्पर्धापरीक्षातील हमखास यशामुळे नावारुपाला आले. दरवर्षी पाच हजार कोटी रुपयांची उलाढाल आणि तीन लाखांच्या आसपास विद्यार्थ्यांची नोंदणी येथील कोचिंग क्लासेस आणि अन्य पूरक उद्योगातून होते. स्वप्ननगरी म्हणविणारी ही नगरी प्रत्यक्षात राजस्थानातील ‘आत्महत्यांची राजधानी’ बनली आहे.

तमिळनाडूत द्रविड मुन्नेत्र कळघमचे (द्रमुक) सरकार सत्तेवर आल्यापासून वैद्यकीय प्रवेशासाठीच्या ‘नीट’ परीक्षेतून तमिळनाडूला वगळावे, यासाठी विधानसभेत ठराव करून तशी शिफारस राज्यपाल आणि राष्ट्रपतींकडे करत आहे. तिथे पुन्हा ‘नीट’च्या मुद्द्यावरून वातावरण तापत आहे.

या परीक्षापद्धतीने सर्व समाजघटकांना समान संधी मिळत नाही, ग्रामीण विद्यार्थ्यांवर अन्याय होतो, असा दावा आहे. हेदेखील दाहक वास्तव आहे. ‘नीट’ किंवा ‘आयआयटी-जेईई’ यासारख्या परीक्षांचा अभ्यासक्रम आणि प्रामुख्याने राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम यांच्यात मोठी तफावत आहे.

त्यामुळे अशा स्पर्धेत ग्रामीण भागातील मुले मागे पडतात आणि त्यांची संधी हुकते. स्वतःला कोंडून घेऊन पंधरा-सोळा तास अभ्यास करावे लागल्याने ही मुले एकलकोंडी होतात. समाजापासून अंतरतात. एवढे करूनही यशाच्या हुलकावणीच्या धास्तीने त्यांच्या अंतःकरणात कालवाकालव होते.

कोवळ्या वयातील अपरिमीत ताण असह्य झाला की, आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले जाते. हे लक्षात घेऊन परीक्षा पद्धतीतच काही मूलभूत बदल करता येतील का, याचा व्यापक विचार केला पाहिजे.

त्याबरोबरच अशा कोचिंग क्लासमध्ये विद्यार्थ्यांचे समुपदेशन, त्यांच्याशी संवादाचा आणि धीराचे चार शब्द देणारा पूल निर्माण करणे, त्यांना मन मोकळे करण्यासाठी काही उपाययोजना करता येतील का, हेही पाहिलेे पाहिजे.

कोटामध्ये पोलिसांनी तशा कक्षाची निर्मिती केली आहे. तथापि, ही प्रक्रिया जितकी अनौपचारिक होईल तितकी ती अधिक फलदायी होऊ शकते. शिवाय मुले कुटुंबीयांपासून दूरवर असल्याने त्यांना मानसिक पाठबळ आणि धीर कशा प्रकारे देता येईल, याचाही विचार केला पाहिजे.

कोटा हे निमित्त असले तरी, स्पर्धापरीक्षांमधून येणाऱ्या जीवघेण्या ताणतणावांचे व्यवस्थापन आणि जीवनात एखादी संधी हुकली तरी जगण्याच्या अगणित संधी असल्याची जाणीव आणि विश्‍वास निर्माण होण्यासाठी समाज आणि सरकार यांनी पुढाकार घ्यायला हवा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vijay Deverakonda Accident: मोठी दुर्घटना टळली! विजय देवरकोंडाचा कार अपघात, अज्ञात वाहनाने मागून दिली जोरदार धडक VIDEO

IND vs WI: दुसऱ्या कसोटीत जडेजा रचणार इतिहास! कपिल देवच्या 'खास क्लब'मध्ये एंट्रीची नामी संधी; कराव्या लागणार फक्त 'इतक्या' धावा

Viral Video: शाळेला दांडी मारुन रस्त्यावर 'आशिकी'! दोन मुलींसोबत रोमान्स करणाऱ्या पठ्ठ्याचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'अशा सडकछाप आशिकांनीच...'

Coldrif Cough Syrup Bans: मुलांचा बळी घेणाऱ्या 'त्या' जीवघेण्या कफ सिरपवर गोव्यात बंदी, 'FDA'कडून आदेश जारी

IND vs PAK मॅचमधील 'या' घटनेनंतर पाकिस्तानी खेळाडू अडचणीत, ICC च्या नियमांचं उल्लंघन करणं पडलं भारी; काय घडलं नेमकं?

SCROLL FOR NEXT