Gomantak Editorial
Gomantak Editorial Dainik Gomantak
ब्लॉग

Gomantak Editorial: बेताल बोलणाऱ्यांकडे दुर्लक्ष करणेच योग्‍य!

गोमन्तक डिजिटल टीम

Gomantak Editorial गोव्यात कुणीही यावे आणि बरळून जावे हा अपवाद आता नियम बनू पाहतोय, अशी स्थिती आहे. जाईल तेथे धार्मिक कलहाच्या ठिणग्या पाडणाऱ्या कर्नाटकातील एका असामीला तत्कालीन मुख्यमंत्री पर्रीकर यांनी गोव्यात येण्यापासून रोखले होते.

त्या महाशयांची पोकळी भरून काढण्याकरिता की काय नुकतेच एक सद्गृहस्थ गोव्यात येऊन धार्मिक विषयांवर बरळून गेले. मोठा गाजावाजा करूनही प्रत्यक्षात त्यांचे अनुनयन करण्यासाठी अपेक्षेपेक्षा कमी, मोजकेच लोक जमले आणि मूळ विषय सोडून भरकटलेल्या व रटाळ चिथावणीखोर झालेल्या संबोधनामुळे त्यांचा पुरता भ्रमनिरास झाला.

घाट माथ्यावरील रांगडी भाषा व कमरेखालचे वार गोमंतकीयांच्या पचनी पडणे शक्य नव्हते, झालेही तसेच. अगदी धार्मिक कट्टरतेचे स्वयंघोषित अध्वर्यूदेखील उठून चालते झाले. वास्तविक, धार्मिक चिथावणी देऊ पाहणाऱ्या ढुढ्ढाचार्याना गोवा जराही माहिती नाही.

पाचशे वर्षांच्या आवर्तनातून गोमंतभूमी घडली आहे. इथे हिंदू बहुसंख्य असले तरी २७ टक्के कॅथलिक आहेत. त्यांच्या एकीतून वृद्धिंगत झालेला धार्मिक सलोखा गोव्याचे वेगळेपण आहे आणि तो भविष्यातही जपला जाणे हितावह आहे.

गोव्यातील कॅथलिकांनाही ‘इन्क्विझिशन’च्या भयंकर दिव्यातून जावे लागले आहे. छळ सोसून घडलेल्या ख्रिस्ती धर्मीयांना एका तराजूत तोलता येणार नाही. बाहेरील लोकांनी येथे येऊन अस्मितेच्या नावाखाली हिंदूंच्या मनात द्वेषमूलक बिजे पेरण्याचे दुष्कृत्य करू नये, त्याचे कदापि समर्थन करता येणार नाही.

गोवा मुक्तीनंतर राज्यातील लोकसंख्या तीन पट वाढली आहे. स्थानिकांइतकेच बाहेरील लोक येथे कार्यरत आहेत. त्यांनी गोव्याची तत्त्वे शिकावीत, आचरणात आणावीत, ही अपेक्षा गैर नाही. देशासाठी गोवा म्हणजे इंद्रधनुष्य आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही गोव्यातील विविधतेतील एकतेचे भरभरून कौतुक केले आहे. हिंदू व कॅथलिक यांच्या मिलाफातून समाज उन्नयनाचा नवा रंग उदयास आला. त्याद्वारे संस्कृती उन्नत व्हावी, हे देशाचे स्वप्न आहे. ते पूर्ण व्हायचे असेल तर वाचाळवीरांना रोखायला हवे, जे राज्यघटनेलाच आव्हान देतात.

गोव्यात कडवा राष्ट्रवाद वाढतो आहे, असा संदेश देशभर जाऊ लागला आहे. ‘फ्रान्सिस झेविअर गोंयचा साहेब नाही’, असा जेव्हा एका धार्मिक कट्टरतेकडून दावा होऊ लागला तेव्हा हिंदूंनी दाद दिली नाही. लोकांना द्वेष नकोय. अशा कडव्या घटकांना निवडणुकीत ५०० मतेही पडत नाहीत, ही त्यांच्या कार्याची पोचपावती.

छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द वापरले जातात तेव्हा चर्चनेही संबंधितांचे कान पिळले आहेत. दोन्ही धर्मांमध्ये प्रागतिक घटक आहेत. ‘आयडियाज ऑफ गोवा’ ही एक संकल्पना आहे, ज्यात अनेक धर्मांचे, जातींचे लोक सौहार्दाने राहतात. ते देशासाठी आगळे उदाहरण आहे.

गोव्यात एकही धार्मिक दंगल झाल्याचा इतिहास नाही. कारण, कुठल्याच गोमंतकीयाला ती नको आहे. जिथे जिथे अशी विषवल्ली वाढू लागेल तिथे तिथे तिची वेळीच छाटणी होणे आवश्यक आहे. देशात गोव्यासह अनेक राज्यांत व केंद्रात भाजपचे सरकार आहे. त्याचा गैरफायदा घेऊन अनेक हिंस्र संघटना क्रियाशील होत आहेत.

हरयाणा, दिल्लीत जे घडले ते वाईट होते. संशयावरून घरात घुसून जीवे मारण्यासारख्या धक्कादायक घटना घडून जातात; पण त्याचे सामाजिक पातळीवर भयावह पडसाद उमटत राहतात. एकदा का धार्मिक सलोखा बिघडून हिंसेची ठिणगी पडली की आवरणे सोपे नाही.

गोवा सरकारने बघ्याची भूमिका घेऊ नये. विष कालवणाऱ्या वक्त्यांना थारा देऊ नये. वास्तविक, जे पर्रीकरांनी केले तेच मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही करणे अपेक्षित आहे. ज्यांची वादग्रस्त वक्तव्ये आधीच ज्ञात आहेत, ज्यामुळे गोव्यातील शांतता बिघडू शकते अशांना थारा देऊच नये.

त्यात काहीही गैर नाही. सामाजिक सलोखा राखणे ही जबाबदारी साऱ्यांची आहे. सरकारने विषाची परीक्षा घेण्याऐवजी सावध राहणे उचित ठरेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Todays Live Update: चिखलीत इनडोअर स्टेडियमची भिंत कोसळली

Jammu & Kashmir Terrorist Attack: कठुआमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; भारतीय लष्कराचे 4 जवान ठार, 6 जखमी

Nilesh Cabral: निलेश काब्राल यांचा थेट CM पदावरच डोळा?; मंत्रिमंडळ फेररचनेच्या पार्श्वभूमीवर मोठे विधान

Goa Rain Update: राज्यात पावसाचा हाहाकार! कुशावती नदीची पातळी वाढली; पारोडा रस्ता दुसऱ्या दिवशीही पाण्याखाली

Mumbai Goa Highway: निवारा शेडविना प्रवाशांचे हाल; पेडणे तालुक्याची समस्या

SCROLL FOR NEXT