एकविसाव्या शतकातील तिसऱ्या दशकात भ्रष्टाचार (Corruption), अत्याचार (Molestation), दांभिक राजकीय पटलावर गोवा खूपच बदलेला आहे. गेल्या दहा वर्षांत चोरी, दरोडे, बलात्कार, अत्याचार, वाढले असून लैंगिक छळांच्या घटनांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. गेल्या शतकात वर्तमानपत्रात एखादी बातमी असायची, तर आत्ता क्राईमच्या अनेक बातम्या (Crime news) दिसतात. त्यामुळे सुसंस्कृत गोवा (Goa) बदनाम झाला आहे.
(Goa raises concern over rise in sexual violence in the state)
पर्यटनाच्या नावाखाली क्लब, कसिनो संस्कृती वाढीस लागली असून अर्धनग्न फिरणारे पर्यटक समुद्र किनाऱ्यापासून गावोगावीही फिरत आहेत. यामुळेच आपली संस्कृती, सभ्यता लपत आहे. गोव्याची योग नाही, तर भोगवादी संस्कृती जगासमोर प्रदर्शित केली जात आहे. गोव्यात दर महिन्याला किमान पाच-सहा बलात्काराच्या, लैंगिक अत्याचाराच्या घटना घटत आहेत. त्यात कोणी बाप आपल्या चिमुरडीवर बलात्कार करतो, तर कोठे विद्यादानाचे काम करणारा शिक्षकच शिकवणीच्या नावाने अत्याचार करतो. याशिवाय बंद दाराआड होणाऱ्या अत्याचारांचा आकडाही मोठा आहे. अशा परिस्थतीमुळे आपली संस्कृती, संस्कार कुठे गेले? अवघ्या १२ तालुक्यांच्या गोव्यात घडणारी ही प्रकरणे राज्याच्या इभ्रतीला काळीमा फासणारीच आहेत. मोठ्या राज्याच्या तुलनेत हे प्रकार भयावह आहेत.
राष्ट्रीय क्राईम ब्युरोच्या २०२० च्या नोंदीत गोव्यात घडलेल्या बलात्कार प्रकरणातील ६६ टक्के बलात्कार हे अल्पवयीन मुलींवर झालेले आहे. उघड झालेले गुन्हे ६६ टक्के आहेत, तर मग इतर गुन्ह्यांचे काय? परप्रांतीयांनी हे केले, ते केले म्हणून त्यांच्या नावाने आपण बोटे मोडतो. पण, स्थानिक पातळीवरही खूप चांगले घडत नाही. २०२१ मध्ये अशा गुन्ह्यांची संख्या वाढत आहे. मडगावातील तो क्रूर बाप असेल किंवा म्हापशातील तो शिक्षक असेल, दोघेही जगण्यास लायक नाहीत. यापूर्वीही शिक्षकांप्रमाणे इतर नातेवाईकांनी केलेली अनेक अत्याचाराची प्रकरणे उघडकीस आली, पण पुराव्यांअभावी ते निर्दोष मुक्त झाले.
गेल्या काही दिवसांत राज्यात नराधमांनी केलेली एक प्रकारची ही हिंसाच आहे. त्यांना कामजीवनही माहीत नसते. त्यांच्या या हिंसक वृत्तीला लगाम घालण्यासाठी समाजात जागृतीबरोबरच प्रत्येकाने दक्ष राहणे गरजेचे आहे. समाजात फोफावलेली ही एक वाईट मानसिकता आहे. फक्त कायदे करून काहीही होणार नाही, शिक्षा दिली तरीही हे प्रकार वाढत जाणार आहेत. हे प्रकार रोखण्यासाठी जागृती, संस्कारांची गरज आहे. घरोघरी संस्कार व्हायला हवेत. रानटीवृत्तीतून बाहेर यायला हवे. माणसातील क्रूरता संपविल्याशिवाय त्याच्यात माणुसकी येणार नाही. माणुसकी हरवल्यामुळेच वय, नाते विसरून बलात्कार, लैंगिक अत्याचार होत आहेत. उपभोगाचे साधन म्हणून बघायची दृष्टी समाजच देत असतो.
पुरुषप्रधान कुटुंबव्यवस्थाही याला अपवाद नाही. आपल्या हाती असलेल्या सत्तेच्या जोरावर आपण काहीही करू शकतो, हा पुरुषांचा दृष्टिकोनच महिला अत्याचार आणि लैंगिक शोषणाला कारणीभूत ठरतो आहे. नाही मिळाले, तर ओरबाडा, ओरबाडता नाही आले तर नाहीसे करा, मला नाही तर कुणालाच नाही. ही मानसिकताच बलात्कार, अॅसिड हल्ला या घटनांना कारणीभूत आहे. स्त्रियांवर होणाऱ्या लैंगिक हिंसेच्या घटना आणि प्रसिद्धी माध्यमांमध्ये येणाऱ्या बातम्या यांची आता समाजाला सवय झाली आहे. रोज वर्तमानपत्रात किमान एक तरी विनयभंगाची आणि बलात्काराची बातमी असते. अशा घटनांमध्ये फक्त लैंगिक शोषणाचा उद्देश दिसत नाही, तर त्या पलीकडची अत्यंत क्रूर आणि हिंसक मानसिकता समोर येते. या मानसिकतेला नाते, वय, शिक्षण, जात, धर्म असा कुठलाच स्पष्ट चेहरा नाही.
राज्यातील घटनांपुरतेच बघायचे झाले, तर प्रौढ पुरुषांकडून अल्पवयीन मुलांवर अत्याचार झालेला आहे. अत्याचाराला सामोरे जावे लागणाऱ्या बालिका, मुली आणि महिलांचाही आता विशिष्ट वयोगट राहिलेला नाही. आपल्यातच राहणाऱ्या, समाजाचा एक भाग असणाऱ्या या पुरुषांचे विचार आणि कृती किती हीन पातळीची आहे, हे या घटनांमधून लक्षात येते. याकडे आपण उघड्या डोळ्यांनी बघतो आहोत का? आजूबाजूला आणि मनात धोक्याच्या घंटा वाजतात का? वैचारिक अधोगती झालेल्या, हिंसेच्या किडीने पोखरलेल्या समाजात राहणे असुरक्षित वाटत नाही का? का मुलींनी, महिलांनी सतत भीतीच्या छायेखाली वावरायचे? स्त्रीला जेव्हा जेव्हा हिंसेच्या, लैंगिक शोषणाच्या प्रसंगाला सामोरे जावे लागते, तेव्हा तेव्हा तिच्या मनावर वेदनेचा तीव्र खोल ओरखडा उमटतो. त्याचा आयुष्यभर ठसठसणारा व्रणही राहतो, अगदी नि:शब्दपणे!
अन्याय, भेदाभेद करणारे, हिंसेचे समर्थन करणारे, मुलांना, पुरुषांना मर्दानगीच्या खोट्या चौकटीत अडकवणारे, असुरक्षित जीवनशैली जगायला भाग पाडणारे, माणसामाणसांत अंतर पाडणारे नकारात्मक सत्तेचे, पुरुषप्रधानतेचे अवडंबर माजवणारे विचार आपण नाकारायला पाहिजेत, त्यांचा त्याग केला पाहिजे; त्यानंतरच माणूसपणाकडे नेणाऱ्या, समानता मानणाऱ्या हिंसाविरहित समाजाकडे आपली वाटचाल सुरू होईल. त्यासाठी प्रत्येक गोमंतकीयाने लढले पाहिजे, झगटले पाहिजे. सर्वभेदभाव विसरुन या क्रूर वृत्तीची मूळ उखडून काढली पाहिजे, तरच सुसंस्कृत गोवा अबाधित राहील.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.