Goa Name History Dainik Gomantak
ब्लॉग

Goa Name History : गोवा स्थलनाम!

Goa Name History : आज संपूर्ण उष्णकटिबंध प्रदेशात स्वर्ग, भारतभूमीच्या मुकुटातील चमचमता हिरा असा या भूमीचा संदर्भ आढळतो.

गोमन्तक डिजिटल टीम

राजेंद्र पां. केरकर

गोव्याचा गोमांचल असा उल्लेख आढळतो. गोय आणि अंचल या दोन शब्दांच्या एकत्रिकरणातून गोमांचल निर्माण झालेला असून त्यातील अंचलचा संदर्भ गाईच्या आंचळाशी जोडलेला आहे.

आज पेडणे ते काणकोणपर्यंत विखुरलेल्या ३७०२ चौरस किलोमीटर क्षेत्रफळातल्या प्रदेशाला गोवा ही संज्ञा आहे. आज संपूर्ण उष्णकटिबंध प्रदेशात स्वर्ग, भारतभूमीच्या मुकुटातील चमचमता हिरा असा या भूमीचा संदर्भ आढळतो.

गोमंतक, गोंय, गोवा, गोवे अशा विविध नावांनी परिचित असलेल्या या राज्याला लाभलेली स्‍थलनामे, त्याचा समृद्ध इतिहास आणि संस्कृतीच्या वारश्‍याकडे अंगुलीनिर्देश करतात. आज लोकमान्य ठरलेले गोवा हे नाव कसे प्रचलित झाले याचा इतिहास खूपच रंजक आहे.

भारतीय उपखंडात प्राचीन काळापासून पश्‍चिम घाट आणि पश्‍चिम किनारपट्टीच्या कुशीत वसलेली ही भूमी परदेशी प्रवासी, यात्रेकरू,

व्यापारी यांना इथे पूर्वापार वापरात असलेल्या बंदर आणि त्यांना जोडणाऱ्या नदी-सागर-खाडी यांच्यातल्या जलमार्गामुळे परिचित होती आणि त्यामुळे युरोप आफ्रिका आणि आशिया खंडाच्या विविध भागांतून शेकडो वर्षांपासून इथे मानवी समूह भेट देत होता याचे इतिहासाच्या दप्तरांत असंख्य पुरावे उपलब्ध झालेले आहेत. शेजारच्या महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याच्या कोणत्याही जिल्ह्याच्या तुलनेत अगदी छोटी असलेली भूमी आकर्षण बिंदू ठरलेली आहे.

गोमंतकः प्रकृती आणि संस्कृती या ग्रंथाचे कर्ते बा. द. सातोस्कर यांच्या मते पूर्वेला सह्याद्री व पश्‍चिमेला अरबी समुद्र या गोव्याच्या नैसर्गिक सीमा असल्या तरी चिनी प्रवास युआन च्वांग याच्या वर्णनावरून त्याच्या काळी दक्षिण कोकणात वनवासी,

बेळगाव, धारवाड इत्यादी घाटावरच्या प्रदेशांचा समावेश गोव्यात व्हायचा. हे प्रदेश प्रादेशिकदृष्ट्या गोव्याचे भाग नसून, ते त्या काळातल्या राजसत्तेत गोव्याबरोबरच समावेश व्हायचा.

जुजे निकोलावद फोसेक यांनी गोवापुरी कदंब राजधानी असताना, गोव्यात दक्षिण कोकणाबरोबर पलसिगे (हळशी) वेळूग्राम (बेळगाव) आणि बऱ्याच जिल्ह्यांचा समावेश व्हायचा आणि गोव्यात १३४०० गावांचा समावेश व्हायचा.

आज कर्नाटक राज्यात असलेली गंगावळी नदी ही गोव्याची दक्षिण सीमा असून फोंडा घाटातून उगम पावणारी आचऱ्याची नदी ही उत्तर सीमा असल्याचे मत इतिहासकारांनी मांडलेले

आहे. अंकोल्यातल्या जुन्या काळातल्या संतकवी शुभानंद यांनी ‘गौराष्ट्र देशामाझारी गोकर्ण पंचक्रोशी भीतरी’ अकोलेगाव असा उल्लेख केलेला आहे.

स्कंदपुराणांतर्गत सह्याद्री खंडात गोव्याचे गौराष्ट्र व गोमांत असे उल्लेख आढळतात. बाळकृष्ण सावर्डेकर यांनी या भूमीला शूर्पारक असे नाव होते आणि कालांतराने त्याचा अपभ्रंश होऊन ‘गोमांतक’ शब्द प्रचलित झाल्याचे नमूद केलेले आहे.

गोव्याचा गोमांचल असा उल्लेख आढळतो. गोय आणि अंचल या दोन शब्दांच्या एकत्रिकरणातून गोमांचल निर्माण झालेला असून त्यातील अंचलचा संदर्भ गाईच्या आंचळाशी जोडलेला आहे. शणै गोंयबाब यांच्या मते गोमंतक म्हणजे गोधनयुक्त प्रदेश आहे. विष्णूपुराण व महाभारताच्या भीष्मपर्वात गोपराष्ट्र असा जो उल्लेख आहे,

त्यातले गोपराष्ट्र इतिहासकार श्रीधर केतकर यांच्या मते गोवा आहे. अनंत धुमे यांनी गोव्याच्या स्थलनामाचे विवेचन करताना, ‘‘ कोल जमात गोमंतकात आल्यावर आपल्या मुल-स्थानांतील त्यांचे जे मुख्य अन्न तांदुळ ते करण्यास भात व इतर तृणधान्य पेरले गेले व त्याचे पीक लांब ओंब्यांनी भरून त्यांची ताटे कलत होती, त्यावरून या जमिनीस गोयेन हे आपल्या भाषेतील नाव दिले असावे असे म्हटलेले आहे.

गोवा कदंबाच्या काळातच नव्हे त्यापूर्वी अरब व ग्रीक लोकांना गोवा ज्ञात होता. जुन्या ग्रीक भूगोलातल्या भारतीय स्थळ नावातल्या पेरिप्लसचे नेलकींदो प्लातीचे नेकानीडोन आणि टॉलिमीच्या मेलिंदा या नावाचा संबंध गोव्याशी जोडलेला आहे. मध्ययुगीन अरब आणि पशियिनांनी गोव्यासाठी जी नावे वापरली आहेत ती गोवा शब्दाशी आणि जुन्या राजधानीशी मिळती जुळती आहेत.

अरब लेखक व प्रवाशांनी कावा किंवा कावेसारखी जी नावे वापरली आहेत, ती भारताच्या पश्‍चिम किनारपट्टीवरच्या गोव्याशी संबंधित असल्‍याचे मत युरोपियन इतिहास लेखकांनी नमूद केलेले आहे.

अल- मसुदी, अल एद्रीसी, इब्न बतूता आदी अरब प्रवाशांच्या लिखाणात वारंवार आढळणारे सिंदाबूर म्हणजे गोवा असल्याचे मत दिलेले आहे. काळी नदीच्या काठी वसलेले कर्नाटकातले चिताकुले सिताबूर किंवा सिंदाबूर असल्याचे काही पाश्‍चात्य अभ्यासकांचे मत आहे.

अरब प्रवाशांच्या मते सिंदाबूर एका मोठ्या उपसागराच्या मुखाशी वसलेले होते व तेथे खूप मगरी होत्या. सिंदाबूर मध्ये तीस गावे होती, त्यामुळे जुन्या काळी जेव्हा चंद्रपूर म्हणजे आजच्या चांदोरहून राजधानीचे शहर जुवारी नदीकिनारी वसलेल्या गोवापुरीत आगशीच्या जवळ आणले, त्या शहाराचा उल्लेख अरबांनी सिंदाबूर असा केल्याचे मत इतिहासकारांनी मांडलेले आहे.

या गोवापुरीचा उल्लेख सूत संहितेत सहाव्या अध्यायात - गोवापुरी नामनगरी पापनाशिनी असा आढळतो. हळशी आणि पट्टाडकलच्या बाराव्या शतकातल्या शिलालेखात गोव्यासाठी गोवे असा शब्द वापरल्याचे स्पष्ट झालेले आहे.

विजयनगरच्या दुसऱ्या हरिहराच्या चौदाव्या शतकातल्या ताम्रपटात ‘गोवाभिधांकोंकण राजधानी’ असा उल्लेख मिळतो. त्यावरून ही भूमी गोवा, म्हणून शेकडो वर्षांपासून परिचित असल्याचे स्पष्ट झालेले आहे.

गोवा, गोवे ही आज इथे प्रामुख्याने लोकप्रिय ठरलेली नावे, या राज्याला इथल्या भूमीत पूर्वापार वावरणाऱ्या गावड्याच्या बोलीतून मिळाली असल्याचे मानले जाते. गोव्यातील गावडा ही जमात प्रोटो - ऑस्टालॉई जमात असून, त्यांनी भातशेतीबरोबर ही भूमी बागायतीच्या पिकाखाली आणण्याचा प्रयत्न केला होता.

भारतीय संस्कृती कोषांची निर्मिती करणाऱ्या पंडितमहादेवशास्त्री जोशी यांनी आसामातील गुवाहाटी हे स्थल नाव जेथे सुपारीची पैदास होऊन, तिचा बाजारातल्या होणाऱ्या व्यापाऱ्यातून निर्माण झाल्याचे म्हटले होते.

संस्कृत भाषेतला सुपारीला असलेला गुवाकः शब्द अनार्थ जमातींच्या भाषेतून आला असल्याचे मानले जाते. त्यावरून बा.द. सातोस्‍कर यांनी आसामाप्रमाणे गोव्यात सुपारी पिकत असल्याने गुवा हा शब्द गोव्याला कोल जमातीने रुढ केला असल्याचे मत मांडलेले आहे. प्रोटो ऑस्‍ट्रालॉईड जमातींनी गोव्यात सुपारीसह नारळ, केळे, लिंबू, जांभ पानवेल, मिरी, हळद आले आदींची लागवड केली.

गोवा हे स्थलनाम सुपारीमुळे या भूमीला लाभले असल्याचे प्रतिपादन जे इतिहासकार करतात, त्याला या भूमीतल्या सांस्कृतिक, सामाजिक आणि धार्मिक व्यवहारात सुपारीला जे स्थान लाभलेले आहे, त्याच्याशी संबंधित असले पाहिजे.

इथल्या कुळागरात सुपारीची लागवड प्रामुख्याने केली जात असून, तिचा वापर लोकधर्माद्वारे अंत्रूज महाल आणि परिसरात होळीसाठी जो पवित्र खांब उभारला जातो त्याच्यासाठीही करण्यात येतो. पोफळी किंवा सुपारीचा खांब इथल्या पारंपरिक लोकधर्मात पवित्र मानलेला आहे.

गोव्याच्या भूमीला लाभलेल्या विभिन्न स्थलनावे सुनापरांत, अपरांत, गोवापुरी, गोमंतक, गोमांचल, गोवा, गोवे आदी आहे. १५१० साली पोर्तुगीजांनी तिसवाडी महाल जिंकून घेतला आणि आपली राजधानी म्हणून एला गावाचे रूपांतर त्यांनी जुन्या गोव्यात केले.

गोव्यातल्या जुन्या काबिजादीतल्या तिसवाडी बार्देश आणि सासष्टी महालांबरोबर कॅप ऑफ गुड होपला वळसा घालून जी पोर्तुगीज वसाहतीची भूमी लाभते, त्या समस्त प्रदेशाची राजधानी म्हणून गोव्याला सन्‍मान लाभला.

जुन्या गोव्यात जेव्हा महामारीसदृश्‍ा साथ आली आणि तिथे मृत्यूचे तांडव सुरू झाले तेव्हा पोर्तुगीज सरकारने आपली राजधानी पणजीला हलवली. कधीकाळी गोवा, गोवे ही स्‍थलनामे तिसवाडी महालाशी जोडली होती आणि कालांतराने, या स्‍थलनामांतून आज प्रचलित झालेली गोंय, गोवा, Goa, गोआ या राज्याशी संबंधित झालेली आहेत.

हळशी आणि पट्टाडकलच्या बाराव्या शतकातल्या शिलालेखात गोव्यासाठी गोवे असा शब्द वापरल्याचे स्पष्ट झालेले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News Today: कुडचडे फसवणूक प्रकरणात बँक मॅनेजरला अटक

IFFI Goa 2024: "हा माहितीपट केवळ श्रद्धांजली नाही, मोहन रानडेंचे स्मारक व्हावे म्हणून केलेला प्रयत्न आहे"; चित्रपट महोत्सवात उभा राहिला मुक्तिसंग्राम

77th Army Day संचलनाची IFFI मध्ये झलक! पुणे सांभाळणार यजमानपदाची धुरा

Goa Crime: महिलांसाठी गोवा नॉट सेफ? 11 महिन्‍यांत सात महिलांची हत्या; लैंगिक अत्याचार, विनयभंगाच्या 100 घटना

Indian Navy Goa: भारतीय नौदलाच्या पाणबुडीचा आणि मच्छीमार नौकेचा अपघात कसा झाला? महत्वाची माहिती समोर, दोघेजण अद्याप बेपत्ताच

SCROLL FOR NEXT