Goa Chess International Master: गोव्याचा बुद्धिबळातील सर्वांत युवा इंटरनॅशनल मास्टर (आयएम) बुद्धिबळपटू बनण्याचा विक्रम एथन वाझ याने साकारला. १२ वर्षे व ४ महिन्यांचा असताना त्याने बुडापेस्ट-हंगेरी येथील स्पर्धेत तिसरा आयएम नॉर्म प्राप्त केला.
आवश्यक तांत्रिक बाबींची पूर्तता केल्यानंतर जागतिक बुद्धिबळ महासंघ (फिडे) एथन याच्या आयएम किताबावर शिक्कामोर्तब करेल. एकंदरीत तो गोव्याचा आठवा आयएम बुद्धिबळपटू ठरेल.
यापूर्वी २०१९ साली गोव्याचा लिऑन मेंडोन्सा १२ वर्षे व ११ महिन्यांचा असताना आयएम बुद्धिबळपटू ठरला होता. गोमंतकीय बुद्धिबळातील हा विक्रम एथनने मोडला.
एथन (एलो २४०३) याने बुडापेस्ट येथे झालेल्या वेझेरकेप्झो ख्रिस्तमस जीएम राऊंड रॉबिन बुद्धिबळ स्पर्धेत आयएम किताबाचा नॉर्म प्राप्त केला. यापूर्वीचे दोन्ही नॉर्म त्याने २०२३ मध्ये अनुक्रमे ऑगस्ट व नोव्हेंबर महिन्यात प्राप्त केले होते.
वर्षभरात थक्क करणारी प्रगती
गतवर्षी एथनच्या फिडे मास्टर (एफएम) किताबावर मोहोर उमटली. २०२२ मध्ये आशियाई युवा बुद्धिबळ स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त केल्यामुळे तो एफएम किताबासाठी पात्र ठरला होता.
ऑगस्ट २०२३ मध्ये २१०० एलो गुणांचा टप्पा गाठल्यानंतर फिडेने त्याच्या एफएम किताबावर शिक्कामोर्तब केले. स्टँडर्ड बुद्धिबळात नुवे येथील या प्रतिभाशाली बुद्धिबळपटूचे सध्या २४०३ एलो गुण आहेत. वर्षभरातच त्याने आयएम किताबासाठी आवश्यक तिन्ही नॉर्म संपादन केले.
ध्येय ग्रँडमास्टर बनण्याचे, गरज आर्थिक पाठबळाची
‘‘आयएम बुद्धिबळपटू बनल्यानंतर आता पुढील ध्येय ग्रँडमास्टर बनण्याचे आहे. त्यानंतर भरीव प्रगती साधत सुपर ग्रँडमास्टरही बनायचे आहे आणि जागतिक विजेता बनण्याचे स्वप्न मी जोपासले आहे,’’ असे एथन वाझ याने सांगितले.
त्याचे वडील एडविन वाझ यांनी मुलाच्या भावी वाटचालीत आर्थिक पाठबळाची गरज प्रतिपादली. ‘‘अगदी कमी संधी मिळूनही एथनने साधलेली वेगवान प्रगती रोमांचक आहे.
त्याला कॉर्पोरेट पुरस्कर्ते, तसेच गोवा सरकारकडून आवश्यक आर्थिक प्रोत्साहन लाभले, तर आम्ही त्याला आणखी व्यापक व्यासपीठ मिळवून देऊ शकतो,’’ असे एडविन म्हणाले.
प्रशिक्षक प्रकाश विक्रम सिंग, ग्रँडमास्टर स्वयम मिश्रा, किंग्स स्कूल समुदाय, या स्कूलच्या संचालक लिगिया परेरा, अध्यक्ष मेल्विन परेरा, इंटरनॅशनल मास्टर सागर शाह, एथनचे आजोबा-आजी मारियान व एलिझा फर्नांडिस, स्व. सेबॅस्तियाव व लुईझा वाझ, गोवा बुद्धिबळ संघटना, अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ यांचे एथनच्या आई लिंडा यांनी आभार मानले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.