Swaranjali Music Concert पद्मविभूषण डॉ. गंगुबाई हनगल व गान सरस्वती किशोरी आमोणकर यांच्या पुण्यस्मरणाने ‘गीत शकुन- पणजी’ ही संस्था ‘स्वरांजली संगीत मैफल’ मागील कित्येक वर्षे सातत्याने आयोजित करत आहे.
त्यांच्या या आयोजनात एखादे सांगीतिक व्याख्यानही दरवेळी ठेवले जाते. संगीत कलेच्या जाणकारीबद्दल परिपक्वता निर्माण व्हावी हाच त्यामागचा उद्देश असतो.
यंदाच्या वर्षी ‘बरसन लागी री बदरीया’ ह्या आपल्या विशेष व्याख्यानात्मक कार्यक्रमात, प्रख्यात उपशास्त्रीय गायिका विदुषी राजश्री पाठक पावसाळ्यात गायले जाणारे उपशास्त्रीय संगीताचे प्रकार सादर करणार आहेत. विदुषी शोभा गुर्टू, विदुषी सरला भिडे यांच्याकडून गुरु शिष्य परंपरेने त्यांनी तालीम घेतली आहे.
प्रत्येक प्रदेशाला आपले स्वतःचे असे संगीत आहे व खास करून लोकसंगीताच्या नादातून हे संगीत आपली जीवन परंपरा सांगत असते. या गायकीचा ढंग व अर्थानुरूप केलेला स्वर विस्तार व स्वरविलास या गोष्टी सर्वसामान्य रसिकाला सहज भावतात व त्याचा तो सहजतेने आनंद घेऊ शकतो.
यंदाच्या ‘स्वरांजली’त आपल्याला हा आनंद उत्कटतेने अनुभवता येईल. ठुमरी, कजरी, झुला, सावन, दादरा हे वेगवेगळे प्रकार राजश्री पाठक माहितीसकट सादर करणार आहेत. जुन्या पिढीतील विलक्षण पात्रतेच्या बुजुर्ग उपशास्त्रीय गायिका आज मिळणे का मुश्किल झाले आहे, याचे उत्तर आपल्याला त्यांच्या व्याख्यानात मिळू शकेल.
पंडित राम शंकर वाराणसी यांच्या गायनाची मैफल वेगवेगळ्या रागातील बंदिशीतून सादर होईल. पंडित रामाश्रय झा यांचे शिष्य असल्यामुळे सहजतेने बंदिशी सादर करणे ही त्यांची खासियत आहे.
नव्या पिढीतील अतिशय तेज जोडी ऋषिकेश चारी व द्रुशल चारी यांच्या गायनाची जुगलबंदी स्वरांजली मैफिलीतून पहिल्यांदाच गोव्यात सादर होणार आहे. हुबळीच्या गंगुबाई हंगल गुरुकुलात पंडित कैवल्य कुमार गुरव यांच्यापाशी ही जोडी, गुरु शिष्य परंपरेने मागची चार वर्षे तालीम घेत आहे.
भजनी कलाकारांच्या परंपरेतून आपली अभिजात संगीत कला फुलवणारे व्हायोलिन वादक राजन माशेलकर अतिशय नजाकतदार विस्तार करतात. पं. डी. के. दातार यांचे ते शिष्य आहेत. आपल्या हार्मोनियम वादनातून स्वर- गायकी साकारणारे युवा पिढीतील श्रीवल्लभ प्रदीप पाडगावकर यांचे हार्मोनियम वादन व गोव्याच्या ताल परंपरेला सहजतेने पुढे नेण्याचा विश्वास दाखवणारा बालकलाकार सारंग केरकर यांचे तबलावादन या मैफिलीत होणार आहे.
गुरुच्या आठवणीने आपल्या संगीत कलेची निष्ठापूर्वक सेवा करणाऱ्या गोव्याच्या सुजाण गायिका डॉ. शकुंतला भरणे आणच पं. अशोक नाडगीर यांच्या भैरवी गायनाने कार्यक्रमाचे समापन होईल.
राया कोरगावकर (हार्मोनियम), सुभाष फातर्पेकर (हार्मोनियम) चारुदत्त गावस (हार्मोनियम), दयानिधेश कोसंबे, रोहिदास परब, दत्तराज शेटे व डॉ. उदय कुलकर्णी (तबला) याची कुशल साथ या मैफिलीला लाभणार आहे. कार्यक्रमाचे निवेदन नामवंत निवेदिका मनाली वाळवे करणार आहेत.
रविवार, दिनांक 23 जुलै 2023 रोजी मिनेझिस ब्रागांझा परिषद सभागृहात दुपारी 3 वाजल्यापासून मैफिलीला आरंभ होईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.