Manohar International Airport Dainik Gomantak
ब्लॉग

Manohar International Airport: ...नामकरणाच्या मुद्यावरुन उठलेला धुरळा बसण्‍याऐवजी त्‍याला नवी किनार लाभली

Mopa Airport: अखेर बहुचर्चित मोपा विमानतळाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या उपस्‍थितीत लोकार्पण झाले.

दैनिक गोमन्तक

Manohar International Airport: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या उपस्‍थितीत अखेर बहुचर्चित मोपा विमानतळाचे लोकार्पण झाले खरे; परंतु नामकरणाच्‍या मुद्यावरून उठलेला धुरळा बसण्‍याऐवजी त्‍याला नवी किनार लाभली आहे. ‘मोपा’चे नाव ‘मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट’ असे अधिकृतपणे जाहीर करण्‍यात आलेय. मात्र, मनोहर म्‍हणजे कोण?? मुख्‍यमंत्री, पंतप्रधानांनी भाषणातून माजी मुख्‍यमंत्री तथा संरक्षणमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांच्‍या कार्याला उजाळा दिला.

‘मोपा’च्‍या रूपात पर्रीकरांच्‍या स्‍मृतींना उजाळा मिळत राहील, अशी त्‍यांनी पुस्‍तीही जोडली. पण, प्रत्‍यक्षात नामकरणावेळी हा दिलदारपणा कुठे गेला? नाव द्यायचेच होते तर ते पूर्ण का दिले नाही? हा तर मुखी पाने पुसण्‍याचा प्रकार झाला. वास्‍तविक, ‘मोपा इंटरनॅशनल विमानतळ’, असे नाव देऊनही चालले असते.

देशात साकारल्‍या जाणाऱ्या मोठ्या प्रकल्‍पांना महनीय व्‍यक्‍तिमत्त्‍वांची नावे यापूर्वीही देण्‍यात आली आहेत, आताही देण्‍यात येतात; परंतु त्‍यात केवळ ‘प्रथम’ नाम देण्‍याचा प्रघात नाही. मोपा हे त्‍याचे पहिले उदाहरण ठरावे! ‘नाव दिल्‍यासारखे करायचे आणि श्रेयही जाता नये, याची काळजी घ्‍यायची’, अशातलाच हा प्रकार झाला. समाजमाध्‍यमांवर तसे पडसादही उमटत आहेत.

नामकरण मुद्याचा विचार करताना गोव्‍यातीलच काही उदाहरणे वानगीदाखल देता येतात. ताळगाव पठारावरील इनडोअर स्‍टेडियमला डॉ. श्‍‍यामाप्रसाद मुखर्जी यांचे नाव देण्‍यात आले आहे. फातोर्डा येथे पंडित जवाहरलाल नेहरू स्‍टेडियम आहे.

इतकेच काय, तर अनेक विमानतळांचीही नावे पाहा- दिल्लीत इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, चंदीगढमधील शहीद भगतसिंग विमानतळ, पश्चिम बंगालमधील नेताजी सुभाषचंद्र बोस विमानतळ, उत्तर प्रदेशमधील लालबहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळ, तेलंगणमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, जम्मू-काश्मीरमधील शेख उल-अलम आंतरराष्ट्रीय विमानतळ. ही यादी आणखीही वाढू शकते.

मोपा विमानतळाला दिलेले नाव ‘मनोहर’ हे व्यक्तीचे नाव आहे की, ‘मन वेधून घेईल’ असे विमानतळ या अर्थाने आहे, हे सरकारच जाणो. नाव कोणाचे द्यावे, हा निर्णय केंद्राकडून घेतला जातो, असा युक्‍तिवादही आता होऊ शकतो. परंतु, पर्रीकरांनी ज्‍या पक्षासाठी भरीव योगदान दिले, त्‍या भाजपाचेच केंद्रात सरकार आहे. म्‍हणूनच नामकरणाचा हा नवा प्रकार काय आहे, याचा खुलासा करणे अगत्‍याचे आहे.

विमानतळाच्‍या लोकार्पणापूर्वीच नामकरणावरून मनोहर पर्रीकर की भाऊसाहेब बांदोडकर, असे मतप्रवाह निर्माण झाले होते. आताही एक गट भाऊसाहेबांचे नाव न दिल्‍याने नाराज आहे. त्‍यात ‘मनोहर’ या नावाने नवा संभ्रम निर्माण केला आहे. गोव्‍यातच नव्‍हे तर देशभर मनोहर पर्रीकरांचे चाहते आहेत. परंतु, पर्रीकरांचा मरणोत्तर नामोल्‍लेख करतानाही सहसा ‘मनोहर’ असा होत नाही.

पर्रीकर ही जोड सोबत येतेच. पर्रीकरांच्‍या भूमिका अनेकदा वादग्रस्‍त जरूर ठरल्‍या. परंतु त्‍यांची लोकप्रियता, जनाधार कालातीत आहे. राज्‍यातील कोणत्‍याही मतदारसंघात जाताच, भोवताली आपोआप माणसे जमतात ही किमया केवळ पर्रीकरांनाच साध्‍य होत होती, की जे गोव्‍यात सोपे नाही! खरेच जर उदार अंतःकरणापासून पर्रीकरांचे नाव द्यायचे असेल तर ते पूर्ण द्यावे. असा धेडगुजरी मध्‍यममार्ग स्‍वीकारून काय साध्‍य होणार?

मोपा विमानतळ गोव्‍यासाठी विकासाचे नवे पर्व ठरू शकेल. एक नवे आंतरराष्‍ट्रीय विमानतळ सुरू होत आहे, याचे नक्‍कीच स्‍वागत आहे. परंतु, या विमानतळातून गोवा उद्धृत होईल, याची नागरी उड्डाण खात्‍याने सातत्‍याने दक्षता घेणे क्रमप्राप्‍त आहे. सदर विमानतळ 5 जानेवारीपासून प्रत्‍यक्ष वापरात येणार आहे; परंतु अजूनही अनेक बारीकसारीक कामे पूर्ण होणे बाकी आहे आणि हे लपून राहिलेले नाही.

कोणत्‍याही कार्यक्रमाचे राजकीयीकरण करण्‍याचा प्रयत्‍न होतो, तेव्‍हा त्‍याचा त्रास नागरिकांना होतो, असा अनुभव आहे. ‘मोपा’ समारंभस्‍थळी 5 हजार क्षमता असतानाही त्‍याहून तिप्‍पट ‘पास’ नागरिकांना वाटण्‍यात आले. लोकार्पण बंधाऱ्याचे नव्‍हे तर विमानतळाचे होते. मोदींच्‍या कडक सुरक्षा यंत्रणेसमोर अधिकच्‍या लोकांचा प्रवेश मिळणे शक्‍यच नव्‍हते.

परिणामी अनेकांचा हिरमोड झाला. वास्‍तविक, असा प्रकार घडणे अपेक्षित नव्‍हते. ही नाण्‍याची एक बाजू झाली. तथापि, पंतप्रधान मोदी यांचा गोवा दौरा अनेक अर्थांनी आश्‍‍वासक ठरावा. धारगळ येथील आयुर्वेद इस्‍पितळ, गाझियाबाद येथील युनानी व नरेला-दिल्‍ली येथील होमिओपॅथी प्रकल्‍पांचे लोकार्पण करताना मोदींनी ‘स्वास्थ्यम् परमार्थ साधनम्’, ‘वन अर्थ, वन हेल्थ’चा उच्‍चार केला.

प्राचीन भारतीय वैद्यकशास्त्र अर्थात आयुर्वेदाला आधुनिक काळात जगात प्रतिष्‍ठा मिळवून देण्‍याचा संकल्‍प सिद्धीस जात असतानाच त्‍यातून मोठी अर्थव्‍यवस्‍था उभी राहावी, हा त्‍यामागील हेतू नक्‍कीच विधायक आहे. ‘सब का साथ, सब का विकास’ या धोरणाद्वारे पुढील तीन वर्षांत भारताची अर्थव्यवस्था पाच लाख डॉलरवर नेण्‍यासाठी केंद्राकडून जे प्रयत्‍न सुरू आहेत, त्‍याला उपरोक्‍त नव्‍या प्रकल्‍पांतून बळ मिळणार आहे.

नागरी स्वास्थ्यासाठी आयुर्वेदाचा मोठा उपयोग होत आहे. आठ वर्षांपूर्वी देशात 20 हजार कोटी असणारी उलाढाल आज दीड लाख कोटींवर पोहोचली आहे. या विषयाशी निगडित 40 हजार लघुउद्योग कार्यरत आहेत, हे शुभवर्तमानच म्‍हणावे लागेल. धारगळ येथील ‘आयुष’ इस्‍पितळ तसेच मोपा विमानतळाच्‍या माध्‍यमातून आरोग्‍य व व्‍यापार-उदीम क्षेत्रात मोठी संधी प्राप्‍त होईल. परंतु, त्‍यासोबतच वाढत्‍या नागरी जबाबदाऱ्या, दायित्व याचा विसर पडता नये, हेही तितकेच खरे!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job प्रकरणातील तक्रारदारांचे मोबाईल जप्त केल्‍याचा दावा; संशयितांचे कॉल डिटेल्स, लोकेशन्‍स जाहीर करण्याचे मुख्यमंत्र्यांना आव्हान

Anjuna Villagers Protest: हणजुणेत स्थानिक आक्रमक! मेगा इव्हेंट्सविरोधात धरणे आंदोलन; ध्वनी प्रदूषणाविरोधी झळकावले फलक

Calangute: दारुच्या नशेत टाईट पर्यटकाचा कळंगुटमध्ये राडा; नग्न होऊन रस्त्यात झोपला, टॅक्सीवर उभारला

Rashi Bhavishya 23 November 2024: नोकरीत बढतीची संधी अन् बेरोजगारांनाही दिलासा... 'या' दोन राशींच्या लोकांचा विशेष दिवस!

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

SCROLL FOR NEXT